गणूचे कुतूहल

Submitted by vandana.kembhavi on 16 July, 2012 - 07:28

सकाळ झाली वाटत? बाबाने अंथरुणातून गणूला उचलले, खळखळ त्याचे तोंड धुतले, कपडे सारखे केले आणि त्याच्या हातात एक बिस्कीट कोंबले. गणू अजून पेंगतच होता. बाबाने स्वतःचे आवरले आणि गणूला खांद्यावर घेउन तो शेताकडे निघाला. बाबाच्या खांद्यावर गणू आपली झोप पूर्ण करून घेत होता. पायवाटेने बाबा निघाला आणि पक्षांच्या किलबिलाटाने गणूला प्रसन्न जाग आली. त्याने मान वळवून पक्षांच्या दिशेने पाहायला सुरुवात केली. पक्षांना पाहून त्याला खूपच छान वाटले आणि बाबाच्या खांद्यावर तो नीट सरकून बसला. मध्येच एक पक्षांची रांग झाडांमधून बाहेर पडून आकाशाच्या दिशेने उडाली आणि गणूची मान त्या दिशेने कलली. ते सगळे पक्षी दिसेनासे होईपर्यंत गणू पाहत राहिला. ते दिसेनासे झाले आणि गणूचे लक्ष आकाशातील पिवळ्या सोनेरी रंगांकडे गेले. त्याच्याही नकळत त्याच्या चेहेऱ्यावर हसू उमटले. तो रंग पाहून त्याला मंदिरातल्या फुलांची आरास आठवली.... बाबाची पावलं झपझप उचलत होती. गणू आभाळातील रंग निरखण्यात मग्न होता. ते रंग बदलत होते तसे तो आश्चर्यचकित होत होता. कोण बरे बदलत असेल हे रंग? त्याच्या बालमनात प्रश्न उमटला... बाबाला उत्तर माहित असेल...त्याने बाबाच्या गालाला स्पर्श केला. बाबाने गाल त्याच्या हातावर टेकवला आणि मग मान वळवून गणूकडे प्रेमाने पाहिले. गणूच्या चेहेऱ्यावर हसू उमटले. गणूशी हलक हसून बाबाने पुढे चालायला सुरुवात केली. नकळत त्याचा चेहेरा गंभीर झाला. गणूचा प्रश्न मनातच राहिला...
हळूहळू पूर्ण उजाडले आणि गणूचे डोळे चोहीकडे पोहोचले, बाबाच्या खांद्यावरून त्याला खूप दूरवरच दिसत होतं. आता बाबाच्या चारही बाजूना शेते पसरलेली दिसत होती. हिरवीगार बहरलेली शेते पाहून त्याला आईचा पदर आठवला, असाच रंग होता आईच्या पदराचा..हवेवर डोलणारी फुले पाहून त्याला आईच्या केसात माळलेल्या फुलांची आठवण झाली. त्याने त्या फुलांचा गंध आठवण्याचा प्रयत्न केला पण त्याला पुसटसाही आठवेना...तो मनात खट्टू झाला, रडवेला झाला...का बरे येत नाही आई? त्याने आभाळाकडे पाहिले...त्याच्या आज्जीने त्याला जाण्यापूर्वी सांगितलेले कि आई आता आभाळात राहणार आणि तिथून तुला पाहणार...तो आभाळाकडे पाहून छानसं हसला....
आता बाबा त्यांच्या शेताच्या बांधावर पोहोचला होता, मोठ्या जांभळीच्या झाडाखाली बांधलेल्या झोपाळ्यावर बाबाने गणूला बसवलं. त्याच्या हातातलं बिस्कीट खात गणू इकडे तिकडे पाहू लागला. त्याचं लक्ष चिमुकल्या खारुताई कडे गेलं. चिमुकली खारुताई भराभर झाडावर अन झाडावरून खाली पळत होती, घाईत असल्यासारखी दिसत होती. मध्येच थांबून तिने गणूकडे पाहिले. गणू ओळखीचं हसला आणि मग खारुताई तिच्या कामात मग्न झाली. मग गणूला एक मोठं फुलपाखरू दिसलं, त्याच्या पंखावरची रंगीबेरंगी नक्षी गणूला खूपच आवडायची. त्याच्या घराच्या शेजारी राहणारी ताई असाच नक्षी असलेला फ्रॉक घालायची. गणूला तिची आठवण आली पण मग त्याच्या लक्षात आले कि ताई तर शाळेत गेली असेल...त्याने परत आपले लक्ष फुलपाखराकडे वळवले. फुलपाखरू या फुलावरून त्या फुलावर उडता उडता दिसेनासे झाले....एव्हाना गणूचे बिस्कीट खाऊन संपले होते आणि त्याला आता झोपाळ्यावरून खाली उतरायचे होते. त्याने बाबा कुठे दिसतो का पाहिले पण त्याला बाबाच दिसेना, त्याने इकडे तिकडे वळून बाबाला शोधले. बाबाने गणूची चुळबुळ लांबून पाहिली आणि हातातले काम टाकून तो गणूकडे आला. गणूचा रडवेला चेहेरा बाबाला पाहून खुलला. बाबाने त्याला उचलून जवळ घेतले आणि गणूने त्याच्या चिमुकल्या हातांची मिठी बाबाच्या मानेभोवती घातली. मग बाबाने त्याला खाली सोडले आणि गणू दुडूदुडू धावत शेताकडे वळला. त्याच्या चिमुकल्या आकृतीकडे बाबा प्रेमाने पाहत राहिला आणि मग हळूच आपले डोळे टिपून कामाला लागला.
गणू धावतच शेतात काम करणाऱ्या इतर लोकांकडे जाऊन पोहोचला. रखमा आज्जी त्याची सगळ्यात आवडती. गणू आधी तिच्याकडे गेला आणि त्याने तिच्या गळ्यात हात टाकले. रखमा आज्जीचं " अरे लब्बाडा" ऐकलं आणि गणू खिदळू लागला. आज्जीने त्याला जवळ घेऊन त्याचे लाड केले आणि मग झाडाखाली झाकून ठेवलेल्या लोटी मधले दुध गणूला प्यायला दिले. गणू झाडाखाली बसून दुध पिताना मनीमाऊ आली आणि गणूला चिकटून बसून राहिली. गणूने थोडसं दुध तिच्यासाठी ठेवलं आणि कुणाच लक्ष नाही पाहून हळूच मनुला दिल. मनुने चटचट दुध संपवलं आणि मग ते दोघ तिथेच झाडाखाली खेळत बसले. मनुचे खेळून झाल्यावर ती झोपली मग गणू तिथून उठला आणि पुन्हा शेतात गेला. आता त्याने महादू काकांना शोधले आणि तो त्यांच्याकडे गेला. महादू काका त्याला खूप आवडायचे. ते खूप गमतीशीर बोलायचे आणि त्याला छान छान गोष्टीही सांगायचे. पण आता महादुकाका खूपच गडबडीत होते, गणूने त्यांना जाऊन मिठी मारली. काकांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि झाडाखाली जाऊन खेळायला सांगितले. हिरमुसला होऊन गणू निघाला तेव्हा "जेवताना गोष्ट सांगेन रे बाळा" असे काकांचे बोलणे ऐकून गणूची कळी खुलली, तो उड्या मारतच झाडाखाली पोहोचला.
झाडाच्या बुंध्याला टेकून तो मातीत घर बांधू लागला. गणूचे लक्ष झाडाच्या बाजूने चालणाऱ्या मुंग्यांच्या रांगेकडे गेले. केवढी मोठी ती रांग, लगबगीने कुठेतरी निघाल्या होत्या. गणू जमिनीवर झोपून रांगेचे निरीक्षण करू लागला. "कुठे बर निघाल्या असतील ह्या?" त्याला एकदम जत्रा आठवली, बाबा त्याला घेऊन गेला होता, तेव्हा अशीच भरपूर माणस आजूबाजूने चालत होती. पण ह्या मुंग्या कशा एकापाठोपाठ चालल्या आहेत, तशी माणसे का बरे चालत नाहीत? बाबाला माहित असेल...त्याने बाबाकडे पाहिले, बाबा कामात गढून गेला होता. नंतर विचारू असे ठरवून गणू मुंग्यांच्या निरीक्षणात रंगून गेला. कितीवेळ गेला कुणास ठाऊक? बाबाने मातीत झोपलेल्या गणूला उचलून झाडाखाली अंथरलेल्या अंथरुणावर आणून ठेवले.
गणू जागा झाला तेव्हा दुपार झाली होती. तो अंथरुणात उठून बसला. बाबाने लांबून त्याला हात केला आणि गणू हसला. बाबा आणि इतर सगळे झाडाखाली येताना बघून गणू टाळ्या पिटू लागला. सगळे येत आहेत म्हणजे जेवणाची वेळ झाली आहे हे त्याला बरोबर कळले. सगळे हातपाय धुवून झाडाखाली येऊन बसले. एकमेकांना वाढून सगळे गप्पा मारत जेवू लागले. गणू सगळ्यांना जाऊन भेटला. त्याचा चेहेरा आनंदाने भरून गेला. मग तो बाबाकडे येऊन बसला. बाबाने त्याला जेवायला दिले आणि बाबा जेवू लागला. गणूला भरवलेले अजिबात आवडत नसे, इतर मोठ्या माणसांसारख त्यालाही स्वतःच्या हाताने खायला आवडे. सगळ्यांचे खाऊन संपले तरी गणूचे जेवण संपलेच नव्हते. मनु पुन्हा गणूला चिकटून बसली आणि गणू तिला भरवताना स्वतः पण जेवू लागला. रखमा आजीने त्याला हात तोंड धूउन दिले आणि ती पुन्हा शेताकडे गेली.
गणू तिथेच बसून मनुबरोबर खेळू लागला. गणूच्या गालावर पाण्याचा एक टपोरा थेंब पडला आणि त्याने वर पाहिले. सगळे आभाळ काळ्या ढगांनी भरून गेले होते. पुन्हा कोणी बरे यांना काळा रंग दिला? आणि पहाता पहाता पाऊस कोसळू लागला. गणूला खूप आनंद झाला, तो टाळ्या वाजवत नाचू लागला. शेतात पळापळ झाली. सगळे झाडाच्या आश्रयाला धावले. बाबा धावत आला आणि त्याने गणूला उचलून घेतले आणि आडोशाला जाऊन उभा राहिला. गणू हिरमुसला, त्याला पावसात भिजायला कित्ती मज्जा येत होती. त्याने केविलवाणे तोंड करून बाबाकडे पाहिले पण बाबाचे लक्षच नव्हते. तो आपल्या शर्टने गणूचे डोके कोरडे करण्यात गुंग होता. पाऊस थांबायचे नाव घेत नाही हे बघून डोक्यावर इरली चढवून जो तो शेतात परत गेला. बाबा मात्र गणूला घट्ट धरून उभाच राहिला. त्याला तसं सोडून जायला बाबाचे मन धजेना. मालकाने मात्र त्याला कामाकडे परतण्याचा हुकुम सोडला तेव्हा एक प्लास्टिक झाडाला बांधून त्याने गणुसाठी आडोसा तयार केला. " इथेच बसून रहा रे बाळा, पावसात जाऊ नको हं" असे बाबाने म्हटल्यावर गणूने नाखुशीनेच मान डोलावली. मग त्याला तिथे बसवून बाबा भिजतच शेतात गेला.
प्लास्टिक वर ताडताड आवाज येत होता त्याची गणूला मजा वाटत होती. त्या प्लास्टिकच्या कडेला गळणाऱ्या पाण्याकडे तो एकटक पाहत बसला. हळूच हात बाहेर काढून तो त्या पाण्याखाली धरत होता. त्या पाण्याच्या स्पर्शाची त्याला खूप गंमत वाटली. आजूबाजूला पडणारे पावसाचे थेंब पाहून त्याला प्रश्न पडला, कोण बरे पाडत असेल हा पाऊस? आभाळातून पडतो म्हणजे देवबाप्पा तर नाही? त्याने हात जोडून देवाला आईला पावसाबरोबर खाली पाठवण्याची प्रार्थना केली, आता बाप्पा आपलं ऐकेल असा त्याला विश्वास वाटला आणि तो मनमोकळ हसला.....त्या पावसाच्या तालबध्द संगीतात गणू कधी झोपला ते त्यालाही कळले नाही...
जागा झाला तेव्हा पाऊस पूर्ण थांबला होता पण अजून अंधारलेल होत. गणूला एकदम भीती वाटली, त्याला वाटले बाबा त्याला न घेता गेला कि काय? तो रडू लागला पण बाबा काही येईना. खूप वेळ झाला तरी कुणी आले नाही. रडणे थांबवून गणू त्या अंधारात बाबाला शोधायला निघाला, त्याला दूरवर लोकांचे आवाज ऐकू आले आणि आपण एकटे नाही या जाणीवेने तो खुश झाला. थोडस पुढे आल्यावर त्याला लोक शेताकडून परत येताना दिसले. बाबा धावत त्याच्या कडे आला आणि त्याने गणूला उचलून कडेवर घेतले. " बहादूर रे माझा राजा, अंधाराला घाबरला नाही न?" बाबाच्या प्रश्नाला गणूने नाही अशी मान डोलावली. बाबा तू मला अंधारात का ठेवून गेलास? असं त्याला विचारावस वाटलं खर, पण बाबाच्या स्पर्शाने तो सारं विसरून गेला. सगळे लोक गणूला गोंजारून आपल्या रस्त्याला लागले. महादू काकांनी, "गण्या, गोष्ट उद्या रे" सांगितलेले गणूने बरोबर ऐकले आणि आवाजाच्या दिशेने मान डोलावली.
गणूला खांद्यावर बसवून बाबा घराकडे झपझप निघाला. आजूबाजूच्या अंधाराची गणूला भीती वाटू लागली , त्या अंधारात त्याला बाबा दिसत नसे. त्याला नेहेमी वाटे कि बाबाने आपल्याला घरी जाताना कडेवर घावे म्हणजे भीती वाटली तर बाबाच्या कुशीत शिरता येईल. पण बाबाला कसे बरे सांगायचे? मी सांगतो ते बाबाचं काय कुणीही ऐकू शकत नाही. मी इतकं काही बोलत असतो ते कुणालाच का बरे ऐकू येत नाही? मग त्याला एकदम बाप्पाला केलेली प्रार्थना आठवली, आईला परत पाठव सांगितले खरे पण ते बाप्पाने तरी ऐकले असेल का? त्याने पुन्हा आभाळाकडे पाहिले...आकाश चांदण्यांनी भरून गेले होते...त्याला एकदम वाटले कि आईच्या घरी दिवा लागला आहे म्हणजे तिला बाबा आणि मी दिसतो आहे. म्हणजे ती आता बाप्पाला सांगेल आणि माझ्याकडे परत येईल. तिने सांगितलेले बाप्पाला बरोब्बर समजेल कारण ती बोलू शकते, तिच्या मनातले दुसऱ्यांना सांगू शकते...आणि गणूला अंधाराची भीती वाटेनाशी झाली, त्याने बाबाच्या गालाला हात लावला आणि वर पाहत चांदण्यामध्ये तो आईला शोधू लागला.........

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच छान गोष्ट. आवडली.
साधी सोपी, सरळ भाषा. लहान मुलाच्या मनातले विचार चांगले मांडले आहेत. गणू डोळ्यासमोर येतो - निष्पाप, निरागस. आईची आठवण काढणारा, पण तरीहि रडत न बसणारा.

ज्यांना लहान मुले आवडतात त्यांना आवडावी अशीच गोष्ट... आणि लहान मुले कोणाला नाही आवडत..
मलाही आवडली गोष्ट.. सुरेख लिहिलीय.. Happy

Pages