पाऊल तुझे पडले अन् धरणीचे सोने झाले!

Submitted by सतीश देवपूरकर on 14 July, 2012 - 08:57

गझल
पाऊल तुझे पडले अन् धरणीचे सोने झाले!
माती न राहिली माती, मातीचे सोने झाले!!

तू हात दिला अन् फुलली, बहरली जिंदगी माझी!
आधार मिळाल्यावरती, वेलीचे सोने झाले!!

तू दिलीस जेव्हा जेव्हा लेखणीस माझ्या वाणी;
लिहिलेल्या एका एका ओळीचे सोने झाले!

टाकलीस तू माझ्याही पदरात कृपेची भिक्षा;
फाटक्याच आयुष्याच्या झोळीचे सोने झाले!

हलकेच दार नशिबाने वाजवले आयुष्याचे!
अन् मीही जागा होतो, संधीचे सोने झाले!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

टुकार काव्य प्रसवतो,सखोल चिंतनामधुन
हरेक शब्द येतसे,सुवर्ण लेवुनी सजुन

तुझ्यात खूप गझलियत,असे लिखाण बंद कर
रसीक विनवितो तुला,सतीश देवपूरकर

रसीक विनवितो तुला,सतीश देवपूरकर

-कावळा

कावळेराव! (रसिक?)
आपली कावकाव वाचली. वृत्तात, लयीत केली असती तर ती कावकाव श्रवणीय व मंजुळ झाली असती. रसिकांचा ठेका घेणे सोडा!

देवपूरकर,
माझी कावकाव कलिंदनंदिनी या वृत्तात आहे. जेव्हा ती वृत्तात असते,तेव्हा ती आपोआपच लयीत होते. माझ्या प्रतिसादाने, ती ही विनवणीची कावकाव्,आपण आत्मपरीक्षण कराल असे वाटले होते, पण मी लिहीतो ते श्रेष्ठच या शेवटच्या निष्कर्षाप्रत आपण असल्याने आम्ही काव-काव केली काय आणि अजून काही केले काय्,वही ढाक के तीन पात.

काव-काव

-कावळा

देवसर होतं असं कधी कधी...........
प्रत्येक गझलेला टाळ्या मिळतीलच असे नाही ....................
आपणास आपला प्रत्येक शेर कामयाब , आपली प्रत्येक ओळ - प्रत्येक शब्द आमदभरा वाटतो हे आम्हास ठावूक झाले आहे
पण प्रत्येक वेळी ते तसे नसते हेही ठावूक झाले आहे

........जसे की ; मलाही माझा विठ्ठलाचा प्रत्येक शेर, माझा प्रत्येक नवीन शब्द जसा बेहद आवडतो , तसा तो प्रत्येक वाचकास (१००% लोकाना) आवडत नाही हे मला ठावूक झाले आहे ...तसेच !!

इथे आवर्जून नमूद करावी अशी बाब ही की माझा विठ्ठलाळलेला शेर काहीजणाना का होईना.... आवाडतो हे नक्की ...........

(होय शेर माझाच !!मी केला म्हणून माझा !! माझ्या पाप-पुण्यांचा ..(चुकान्चा) हिशेब माला फेडावा लागतो मग मी केलेल्या शेराचं श्रेय त्याला का देवू मी???)

तसा आपला स्वयंघोषित आमद्का शेर / स्वयंघोषित कामयाब शेर /आपली स्पष्टीकरणे /आपले इतराना दिलेले पर्यायी व त्यावरील स्पष्टीकरणे ....इत्यादीपैकी काहीही .....कोणालाही (१००% लोकाना ) आवडत नाही ....हो कि नै ????????

ते कोणासही आवडूनये म्हणजे ते नक्कीच कोणासही न आवडण्याजोगे आहे हे स्पष्ट होते का ?....यावर आता आपल्यातर्फे गम्भीरपणे विचार व्हावा असे मला वाटते आहे !!

धन्यवाद!!!

आपला नम्र
वै व कु
________________________-

अवांतर : या पुढे माझ्या विठ्ठलाच्या शेरावर कमेंट करताना त्यात भक्तीचा आव आहे की बाराचा भाव आहे हे पाहत बसू नये खयाल /शेर /गझलियत... कशी वाटते इतकेच बोलावे ...तेही बोलावेसे वाटल्यास

माझी कावकाव कलिंदनंदिनी या वृत्तात आहे.>>>>>>>>>>>>>

कावळो़जीराव कैच्याकै बरका ............(असो..!! र्‍हस्व-दीर्घ तपासा.. बहुधा एक दोन चुका झाल्या आहेत )

असो ........कावकाव आवडली बरका धन्यवाद !!

माझी निराळीच अडचण आहे. मला आता सगळ्या गझला सारख्याच वाटू लागल्या आहेत. त्यामुळेच मी तो धागा काढला होता.

भूषणराव! आपली अडचण कळली नाही. कृपया खुलासा कराल का? आमचे काही चुकते आहे का? गझलेत तोचतोचपणा येत आहे का?
कृपया आपली मते कळवाल का? वाचायला आवडतील! मला माझ्यात सुधारणा करता येतील.

'झाले' व अशा स्वरुपाच्या शब्दांनी शेर संपतो तेव्हा त्यात एक 'कथानक सांगणे' हा घटक 'येऊ शकतो' व त्यामुळे (काहीवेळा) रसभंग होऊ शकतो. (यात मला असे म्हणायचे नाही की प्रत्येक 'झाले' या शब्दाने संपणार्‍या शेरांची गझल तशीच होते वगैरे, पण तो एक धोका असतो). (हेही मान्यच, की रदीफ काही अशी कृत्रिमपणे निवडून वगैरे घेतली जात नाही तर ती सुचतेच तशी).

त्याचबरोबर 'सोने झाले' अशी रदीफ असल्यास ती अतिशय 'विशिष्ट' रदीफ होते. 'कशा ना कशाचे' सोने झाले या उक्तीवर शेर संपणार हे आस्वादकाला जाणवले की तो (बहुतेकवेळा) 'आता कशाचे सोने झाले ते पाहू' अशा विचाराने पुढचे शेर आस्वादू लागतो. (यालाही कवीचा नाईलाज आह हेही मान्यच, पण मग जेव्हा अशी रदीफ घेतली जाते तेव्हा शेरांमध्ये नाट्य / शॉक / पंच इत्यादीपैकी एखादा घटक असायला हवा अशी 'फक्त माझी वैयक्तीक आस्वादसंदर्भातील गरज' आहे).

तसे नाट्य, रदीफेवर पोचताना आपोआप 'वाहवा' उद्गारले जाण्याइतका प्रभावी खयाल हे अशा प्रकारच्या रदीफेसाठी (माझ्यापुरते) आवश्यक आहे.

वरील रचना (सोने झाले) ही मला तितकीशी प्रभावी गझल वाटली नाही हे माझे वैयक्तीक मत आहे

-'बेफिकीर'!