बोम दिया अंगोला - भाग २

Submitted by दिनेश. on 14 July, 2012 - 05:12

भाग पहिला - http://www.maayboli.com/node/36375

सध्या माझे पाककलेचे प्रयोग मात्र ऑन होल्ड आहेत. कारण सध्या ऑफ़िसमधेच स्थानिक जेवण जेवतोय.
टेबलावर चार सहा प्रकार असतात पण त्यातला एकच मांसाहारी असतो. भात किंवा पुलाव, टोमॅटो कांदा ग्रेव्ही, उकडलेले बीन्स, उकडलेले किंवा भाजलेले किंवा तळलेले रताळे / कसावा / केळे, मक्याची उकड असे पदार्थ असतात. क्वचित कोबी / बटाटा अशी भाजी पण असते. बिनमसाल्याचे जेवण मला सध्या आवडतेय.

घरी खायला मात्र पावाचा छान पर्याय उपलब्ध आहे. ब्लॉगवर एक पाव ४ डॉलरला असे लिहिले आहे,
पण तो परदेशी पाव असावा. इथे जागोजाग बेकऱ्या दिसतात आणि सांजसकाळ ताजे पाव विकायला
येतात. फ़्रेंच बगेत च्या आकाराचा पण त्यापेक्षा खुपच मऊ असा पाव, चांगला चवदार लागतो.
पिठे मिळतात का त्याचा शोध घ्यायचाय शिवाय माझ्याकडे लाटणे तवा वगैरे नाही, सध्यातरी.

इमिरेट्स काय किंवा इथिओपियन काय, बॅगेजच्या बाबतीत फारच उदार आहेत. ४० किलो तर
तिकिटावरच लिहिलेले असते शिवाय वर ५/६ किलो असले तरी काही बोलत नाहीत. ( स्विस एअर चालू
होती त्यावेळी मी ११०/१२० किलो वगैरे सामान नेले आहे.) त्यामूळे पुढच्या फ़ेरीत हे सगळे आणायचे आहे.

पाव मुबलक म्हणजे मैदा मिळत असावा, मक्याचे पिठही असणार. पण सध्या थोडीफ़ार अडचण आहे ती भाषेची. इथली व्यवहाराची भाषा पोर्तुगीज. ऑफ़िसमधे माझे अडत नाही, कारण बहुतेकांना इंग्लिश येते.
सुपरमार्केटमधे मुक्याने व्यवहार करता येतो. प्रत्यक्ष बाजारात मात्र पोर्तुगीज बोलावी लागते.
मी तशी तयारी करून आलो होतो, पण इथली पोर्तुगीज हि ब्राझिलियन पोर्तुगीज असल्याने, उच्चार थोडे वेगळे आहेत. नेटवर ती उपलब्ध नाही. त्यामूळे माझ्या सेक्रेटरीशी लेखी व्यवहार करुन शिकतोय.

तसे बरेचसे शब्द ओळखीचे वाटतात. अननस, बटाटा, पाव, काजू हे सगळे मूळचेच पोर्तुगीज शब्द आहेत. लोकांची नावे पण मावरो, परेरा, डिकास्टा अशी गोवन वाटतात.

सध्याच्या जगात इंटरनेट शिवाय आमच्या क्षेत्रात व्यवहार करणे अशक्य आहे. आम्ही सध्या मोडेम वापरतो. या क्षेत्रात इथे दोनच कंपन्या आहेत, त्यामूळे स्पर्धा नाही. (केनयात एअरटेल आल्यापासून या क्षेत्रात क्रांती झाली होती. भारतापेक्षा तिथले कनेक्शन फ़ास्ट होते.) इथेही तसे लवकरच घडेल अशी आशा वाटते. पण तरीही, घरी अगदी ब्रॉडबॅंड कनेक्शन येईल, याची मात्र खात्री नाही.

बँकांचे व्यवहार देखील मला नेटवरच बघावे लागतात. त्यांच्या साईटस मात्र दर्जेदार आहेत. पासवर्डस साठी पण जरा वेगळीच सोय आहे. (विनयचे काम का हे ?)

माझे राहते घर ऑफ़िसपासून १० किमी वर आहे. सकाळी गावातले वातावरण अगदी आपल्याकडे असावे असे असते. बायका केरसुणीने अंगण झाडताहेत (मुले पाठीला बांधली आहेत ) शाळेत मुले टिवल्याबावल्या करत जाताहेत. काही बायका पाण्याच्या मागे लागल्यात तरी काहिंनी दुकानांची मांडामांड सुरु केलीय.

घर ते ऑफ़िस हा प्रवास दुबईतील डेझर्ट सफ़ारीची आठवण करुन देणारा. रस्ते म्हणजे वाळूच, तीसुद्धा
मऊशार. वाटेत कोंबडी, कुत्री येणार. डायवरसाहेबांचे रोज नवे शॉर्टकट. पण एकंदर मजाच.
येताना मात्र आम्ही हायवेवरून येतो. तो नव्याने बांधलेला आणि नीट निगा राखलेला आहे.
रस्ता दुभाजक जरा रुंद आणि तो गाडीला ओलांडणे अशक्य (म्हणुन तर जायचे यायचे रस्ते वेगळे.)
नायजेरियात तर छोटी गाडी, चार जण उचलून दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला ठेवतात.

या रस्त्याला लागून एक रेल्वेलाईन जाते. दोनदा फ़ाटक ओलांडावे लागते. मला चक्क आठवड्यातून
चारपाच वेळा आगगाडी दिसते. हे मुद्दाम लिहितोय कारण, नायजेरियात रेल्वे लाईनवर तर चक्क
बाजार भरतो. कधीमधी जर चुकत माकत रुळावर गाडी आलीच तर फ़ेरीवाले आपला माल उचलतात.
माझ्या ४ वर्षांच्या वास्त्यव्यात मी फ़क्त एकदा रुळावर गाडी बघितली.

इथली आगगाडी ३ डब्याचीच असते. बाहेरचा अवतार अगदीच कुर्डुवाडी पंढरपूर असा नसतो आणि पब्लिक लटकत वगैरे नसते. दोनदा तर चकाचक एसी गाडी दिसली. छोटी छोटी स्टेशन्स अगदी स्वच्छ आणि नवीन दिसताहेत. फ़ाटकाच्या बाजूला बाजार असायलाच हवा.

मला खास आवडले ते रेल्वेलाईन ओलांडणारे पादचारी पूल. खुप सुबक डिझाईनचे आहेत ते,
शिवाय त्यावर व्हीलचेअर्स साठी वेगळी सोय आहे (असे आधी वाटले.)

पण त्याचा उपयोग दुसरेच एक वहान करत असताना दिसते. कवासाकी बाईकच्या मागे, साधारण ५ फ़ूट बाय ५ फ़ूट असा टेंपोसारखा हौद लावलेला दिसतो आणि त्यात ६/८ प्रवासी किंवा फ़ुटकळ सामान घेऊन जात असतात. कवासाकीच्या ताकदीला मानावेच लागते.

सामान्य लोकांसाठी बाईक्स पण दिसतात. पण वाळूतून चालताना त्या बऱ्याचदा घसरतात. मऊ वाळूत पडल्यावर फारसे लागत नसावे, कारण अशावेळी चालक आणि ग्राहक दोघेही, पटकन कपडे झटकून पुढचा प्रवास सुरु करतात.

टॅक्सी म्हणून छोट्या, आकाशी पांढऱ्या रंगाच्या मिनीबसेस दिसतात. आफ़िकेतल्या मिनी बसेस हे एक वेगळेच प्रकरण असते. ( केनयात त्या असतात मटाटू, म्हणजे ३ सेंटसना एक मैल. अर्थात हा पुर्वीचा दर. ) तर या गाड्या म्हणजे आमच्या डायवरसाहेबांची डोकेदुखी. कारण भररस्त्यात कुठेही थांबणे, प्रवासी घेण्यासाठी आडवे चालणे. भर रस्त्यात बिघडणे, हे अगदी नेहमीचेच.
त्याशिवाय चांगल्या बसेस पण रस्त्यावरुन दिसतातच. आणि बाकि सगळ्या पॉश अद्यावत गाड्या.

यादवी संपल्यानंतर इथे भरपूर उलाढाल दिसतेय. पण भारतीय कंपन्या मात्र यात उतरलेल्या दिसत नाहीत. याबाबतीत मुसंडी मारलीय ती चायनाने. इथे बांधकामाचे प्रचंड मोठे प्रकल्प चीन राबवताना दिसतो. लोकांना स्वस्त घरे उपलब्ध करुन द्यायचे या सरकारचे धोरण आहे, त्यानुसार चायना इंटरनॅशनल फ़ंड ने, एक खुप मोठा प्रकल्प इथे जवळजवळ पूर्ण करत आणलाय.

अर्थातच तिथे चिनी कामगार दिसतात. केनयात पण एक मोठा फ़्लायओव्हर, चिनी कंपनीने बांधून पुर्ण केला. (नैरोबीत या लोकांबद्दल एक विचित्र समज आहे. ते म्हणतात, तिथे जन्मठेपेची वगैरे शिक्षा झालेल्या लोकांना, आफ़्रिकेत पाठवून देतात. आणि ती माणसे जीवावर उदार होऊनच काम करतात.) मी वर लिहिल्याप्रमाणे माझ्या विमानात पण बरेच जण होते. आमच्या कंपनीची पण एक भलीमोठी फ़ॅक्टरी शेड, चिनी लोकांनी बांधून पुर्ण केलीय.

इतक्या मोठ्या संख्येने चिनी लोक इथे आहेत, कि अनेक फलक पण चिनी लिपीत लिहिलेले आहेत. कदाचित त्यांचे चायना टाऊन पण असेल. हि संधी भारताने गमावली असेच म्हणावे लागेल आता.

बांधकाम साहित्य, जसे कि लाद्या, दिव्याच्या शेड्स, बाथरुम फ़िटिंग्ज पण चीनमधून आयात झालेली दिसतात. या देशात उद्योगधंदे आता आता सुरु होताहेत.

इथे भारताचा दूतावास आहे, पण भारतीय किती आहेत याची कल्पना नाही. आमच्या गावात मात्र, मी आल्यापासून एकही भारतीय व्यक्ती दिसलेली नाही. लुआंडामधे भारतीय वाणसामान मिळणारे दुकान आहे, असे वाचले. भारतीय रेस्टॉरंटस पण असल्याचे वाचले. पण ती अतिमहागडी आहेत, असे वाचले.

संपुर्ण आफ़्रिकेभर एम नेट हे टिव्ही नेटवर्क आहे. ते इथेही दिसते. त्यावर काही भारतीय चॅनेल्स दिसतात. दुपारच्या जेवणाच्या वेळी मी कधी कधी बघतो, धोरण म्हणून मी घरात, टिव्ही ठेवत नाही.

यादवी युद्धाच्या जखमा त्या त्या देशात दिसत राहतातच. आम्हालाही रस्त्यात वापरात नसलेल्या सैनिकी चौक्या, चौथरे, वापरात नसलेले रणगाडे, काही जाळलेल्या गाड्यांचे सांगाडे दिसतात. पण घरांवर काही गोळीबाराच्या खुणा दिसत नाहीत. बहुतेक घरे नव्याने बांधलेली दिसतात.

त्या काळात पेरलेले काही सुरुंग अजून तसेच आहेत, त्यामूळे रस्ता सोडून बाजूला जाऊ नये असे नेटवर लिहिलेले आहे. पण तेसुद्धा लुआंडामधे असावे असे वाटते, कारण आमच्या गावात रस्ताच नसल्याने, रस्त्याच्या आजूबाजूला असे काही प्रकरणच नाही. मुख्य रस्त्यावरुन आत शिरल्यावर एक भले मोठे मैदानच लागते, त्यातून रॅलीत चालल्यासारख्या आमच्या गाड्या चाललेल्या असतात. शिवाय आजूबाजूला मुलांचे फ़ुटबॉलचे खेळ रंगात आलेले असतातच.

अगदी गल्लीबोळात मुले हा खेळ खेळत असतात. पहिल्याच विकेंडला माझे रवांडन मित्र, मला एका हॉटेलमधे स्पेन विरुद्ध इतालिया असा सामना बघायला घेऊन गेले होते. असे सामने बघावेत तर आफ़्रिकन किंवा दक्षिण अमेरिकेतील लोकांसोबत, त्यांचा त्या सामन्यातला मानसिक सहभाग, क्षणाक्षणाला होणारी घालमेल बघण्यासारखी असते.

हे हॉटेल आमच्या गल्लीतच आहे. मला आवडले ते तिथले आवार, स्वच्छता, पांढरा प्रकाश आणि नो स्मोकिंगचा बोर्ड ! नाहीतर अंधारे आवार, सिगारेटचा धूर, दारू चढलेल्या माणसाचे चढलेले आवाज, यांनी मी वैतागतो.

या देशाचे चलन आहे क्वांझा. पण त्याचबरोबर डॉलर्स देखील सहज स्वीकारले आणि दिले जातात.
बॅंकेचा विनिमय दर ९३/९८ असला तरी व्यवहारात १ डॉलर म्हणजे १०० क्वांझा असे सोपे गणित
वापरले जाते. केनयात करन्सीवर काही बंधने नसली तरी असा रोखीने व्यवहार होत नाही,
नायजेरियात तर चारचौघात डॉलर हा शब्दही उच्चारता येत नाही. त्याला तिथे, राजा म्हणतात आणि
बोलताना तोच शब्द वापरतात.

प्रत्येक देशातील तरुणांच्या एकंदर दिसण्याबद्दल काही ठोकताळे बांधता येतात. धावण्याच्या स्पर्धेत
नेहमी केनयाचे खेळाडू पहिले येतात, ते बघितले असेल. ते जसे दिसतात म्हणजे अगदी कृश अंगकाठीचे आणि शरीरावर कातडी ताणून बसवल्यासारखे, तसेच तिथले युवक दिसतात. मुली मात्र खुपच स्थूल दिसतात. त्या तुलनेत अंगोलाची तरूण पिढी मात्र चांगलीच बांधेसूद दिसते. मुले आणि मुलीसुद्धा. ( गेल्या वर्षी मिस अंगोला, जगतसुंदरी ठरली होती ना ? )

वर लिहिल्याप्रमाणे पोर्तुगीजचे धडे मला सेक्रेटरी देत आहेच. सर्वात आधी सर्वाना म्हणायचे ते बोम दिया. म्हणजे गुड डे. इंग्रजांप्रमाणे हे लोक केवळ सकाळसाठी नव्हे तर पूर्ण दिवसासाठी शुभेच्छा देतात.

तिला बाकी काही सांगितले कि ती म्हणते, शीं ~~
कारण शीं म्हणजे हो !

(इथले हवामान आणि निसर्ग याबाबत पुढच्या भागात लिहितो.)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

किमान पाच वेळा वाचून काढला मी हा लेख अजूनही पुन्हा पुन्हा वाचावा वाटतोय...............

जादू आहे तुमच्या लिखाणात................ जादू अहे राव!!!

असो

बाहेरचा अवतार अगदीच कुर्डुवाडी पंढरपूर असा नसतो >>>>>>>>>>>>>>>>

मी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे (पंढरपूरचा असल्याने)...........आपणही घेतला असवात असे जाणवते आहे

ही ओळ आवडली 'कुर्डुवाडी-पंढरपूर ' चा असा उपयोग फक्त आम्ही पंढरपूरकरच करतो असे मला वाटे.............पण हा सन्दर्भ इतका फेमस असेल असे नव्हते वाटले

छान

मस्त झालाय हा भाग. छोटा आहे. पण अजून येणार आहेत, तेव्हा चालेल.
चिनी इथेही आहेत का? आफ्रिकेतल्या बर्‍याच देशात मुसंडी मारली आहे त्यांनी..

जसं दिसलं तसं लिहित गेलो एवढेच. मी मागे लिहिले होते कि पुर्वी विचित्र विश्व असे मासिक यायचे, त्यात आफ्रिकेतील एका देशात.. अशी सुरवात करुन काहितरी भन्नाट लिहिलेले असायचे. इथे आल्यावर कळले, कि जरा हातचे राखूनच लिहिलेले असायचे., कारण त्यापेक्षा विचित्र गोष्टी इथे दिसत असतात. सगळ्यांना लेख आवडले हे बघून छानच वाटले.

वर्षू, लोला
आफ्रिकेत काहीही उद्योग नव्याने उभारायचा तर कुशल कामगारांची सर्वच पातळ्यांवर कमतरता भासते. शिवाय कच्चा माल आयात करायचा, तर अनेक देशांना स्वतःचे बंदर नाही, उत्तम रस्ते नाहीत. काहि देशात तर रस्तेच नाहीत. वीज आणि पाणी पण हवे तसे उपलब्ध नाही.. त्यामूळे बांधकामासाठी लागणारे साहित्य आणि मनुष्यबळ चायना मधून आणणे सोपे जाते. गल्फ मधे एके काळी, भारताने या क्षेत्रात नाव कमावले होते.
इथले चिनी लोकांनी केलेले बांधकाम मात्र खरेच दर्जेदार आहे.

मामी, एक्स्पाट ब्लॉग म्हणून एक साईट आहे. तिथे सर्व देशांचे ब्लॉग्ज आहेत. अनोळखी देशात जाण्यापुर्वी ते ब्लॉग चाळले तर बरे, पण आता कळले कि ती माहिती कालबाह्य झालीय.

शशांक, तो चित्रपट रवांडा या देशातला आहे. मी लिहिले होते त्याबद्दल इथे.

भारतात अगदी शेवटच्या क्षणी मी लेकाबरोबर कॅमेरा एक्स्चेंज केला. पण या कॅमेराला जो अडाप्टर लागेल तो मिळला नाही अजून.

वैभव, कुठलाही नवीन देश बघताना, भारतातल्या प्रतिमा नाही विसरता येत. नकळत मन ती तुलना करत असतेच. इलाज नाही.

मस्त चालली आहे ही मालिका. आधी 'फोटो हवे होते' असे खूप वाटले पण आता त्यांच्यावाचून काही अडत नाहीये हे समजले आहे.

पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.

दिनेश, शिर्षक वाचून लेख वाचायचं फार काही मनावर घेत नव्हते. पण असंच एक पॅरा चाळून पाहून म्हटलं आणि दोन्ही लेख एकाच दमात वाचले. सुंदर लिहिलयत तुम्ही. फक्त प्रचि तेव्हढी टाका Happy

दोन्ही भाग वाचले. आफ्रिकेतील कित्येक देशांबद्दल नाव सोडले तर बाकी काहीही माहिती नाही ( काहींची तर नावंही माहीत नसतील. ) त्यामुळे एकदम 'सुरस आणि चमत्कारीक' वाचल्यासारखे वाटते आहे.
अजून खूप वाचायला आवडेल ह्या देशाबद्दल आणि फोटोही बघायला आवडतील Happy

चांगला आहे लेख.

काहीच दिवसांपुर्वी चीन आफ्रिकेत कसा पैसा ओतत आहे आणी सगळी पाश्चिमात्य राष्ट्रे त्यामुळे कशी काळजीत आहे असा लेख वाचला होता त्याच अनुषंघाने अंगोलात चीनने कसे घोस्ट टाऊन बांधले आहे त्याबद्दल वाचले होते. लेख इथे पाहता येईलः http://www.dailymail.co.uk/news/article-2168507/Footage-shows-brand-new-...

नात्या, ते मोठे हाऊसिंग कॉम्प्लेक्स मी रोज बघतो. तिथे कोण राहणार आहे, कल्पना नाही.
पण चीनने जर हेतूतः ते केले असेल, तर कौतूक करायला हवे कारण, खनिजे, तेल, हिरे आणि पुढे मागे शेतीमालासाठी त्यांना हक्काचे क्षेत्र मिळेल.

मस्तच. छोट्या छोट्या परिच्छेदांनी जास्त मजा आणली.

आता तो अ‍ॅडाप्टर मिळेपर्यंत प्रचिंची वाट बघावी लागेल. ( नवा कॅमेरा घेणं शक्य आहे का?)

दिनेशदा, हाही भाग ऊत्तम ! तुम्ही तुमच्या नेहमीच्या स्टाईलने सहजगत्या असं सुरेख वर्णन केलंय की फोटोची अगदि गरजच आहे असे वाटत नाही. Happy अर्थात कॅमेरा मिळाल्यावर फोटो येतीलच, तोपर्यंत ...................नुसते वर्णन वाचू Proud

Pages