बोम दिया अंगोला - भाग २

Submitted by दिनेश. on 14 July, 2012 - 05:12

भाग पहिला - http://www.maayboli.com/node/36375

सध्या माझे पाककलेचे प्रयोग मात्र ऑन होल्ड आहेत. कारण सध्या ऑफ़िसमधेच स्थानिक जेवण जेवतोय.
टेबलावर चार सहा प्रकार असतात पण त्यातला एकच मांसाहारी असतो. भात किंवा पुलाव, टोमॅटो कांदा ग्रेव्ही, उकडलेले बीन्स, उकडलेले किंवा भाजलेले किंवा तळलेले रताळे / कसावा / केळे, मक्याची उकड असे पदार्थ असतात. क्वचित कोबी / बटाटा अशी भाजी पण असते. बिनमसाल्याचे जेवण मला सध्या आवडतेय.

घरी खायला मात्र पावाचा छान पर्याय उपलब्ध आहे. ब्लॉगवर एक पाव ४ डॉलरला असे लिहिले आहे,
पण तो परदेशी पाव असावा. इथे जागोजाग बेकऱ्या दिसतात आणि सांजसकाळ ताजे पाव विकायला
येतात. फ़्रेंच बगेत च्या आकाराचा पण त्यापेक्षा खुपच मऊ असा पाव, चांगला चवदार लागतो.
पिठे मिळतात का त्याचा शोध घ्यायचाय शिवाय माझ्याकडे लाटणे तवा वगैरे नाही, सध्यातरी.

इमिरेट्स काय किंवा इथिओपियन काय, बॅगेजच्या बाबतीत फारच उदार आहेत. ४० किलो तर
तिकिटावरच लिहिलेले असते शिवाय वर ५/६ किलो असले तरी काही बोलत नाहीत. ( स्विस एअर चालू
होती त्यावेळी मी ११०/१२० किलो वगैरे सामान नेले आहे.) त्यामूळे पुढच्या फ़ेरीत हे सगळे आणायचे आहे.

पाव मुबलक म्हणजे मैदा मिळत असावा, मक्याचे पिठही असणार. पण सध्या थोडीफ़ार अडचण आहे ती भाषेची. इथली व्यवहाराची भाषा पोर्तुगीज. ऑफ़िसमधे माझे अडत नाही, कारण बहुतेकांना इंग्लिश येते.
सुपरमार्केटमधे मुक्याने व्यवहार करता येतो. प्रत्यक्ष बाजारात मात्र पोर्तुगीज बोलावी लागते.
मी तशी तयारी करून आलो होतो, पण इथली पोर्तुगीज हि ब्राझिलियन पोर्तुगीज असल्याने, उच्चार थोडे वेगळे आहेत. नेटवर ती उपलब्ध नाही. त्यामूळे माझ्या सेक्रेटरीशी लेखी व्यवहार करुन शिकतोय.

तसे बरेचसे शब्द ओळखीचे वाटतात. अननस, बटाटा, पाव, काजू हे सगळे मूळचेच पोर्तुगीज शब्द आहेत. लोकांची नावे पण मावरो, परेरा, डिकास्टा अशी गोवन वाटतात.

सध्याच्या जगात इंटरनेट शिवाय आमच्या क्षेत्रात व्यवहार करणे अशक्य आहे. आम्ही सध्या मोडेम वापरतो. या क्षेत्रात इथे दोनच कंपन्या आहेत, त्यामूळे स्पर्धा नाही. (केनयात एअरटेल आल्यापासून या क्षेत्रात क्रांती झाली होती. भारतापेक्षा तिथले कनेक्शन फ़ास्ट होते.) इथेही तसे लवकरच घडेल अशी आशा वाटते. पण तरीही, घरी अगदी ब्रॉडबॅंड कनेक्शन येईल, याची मात्र खात्री नाही.

बँकांचे व्यवहार देखील मला नेटवरच बघावे लागतात. त्यांच्या साईटस मात्र दर्जेदार आहेत. पासवर्डस साठी पण जरा वेगळीच सोय आहे. (विनयचे काम का हे ?)

माझे राहते घर ऑफ़िसपासून १० किमी वर आहे. सकाळी गावातले वातावरण अगदी आपल्याकडे असावे असे असते. बायका केरसुणीने अंगण झाडताहेत (मुले पाठीला बांधली आहेत ) शाळेत मुले टिवल्याबावल्या करत जाताहेत. काही बायका पाण्याच्या मागे लागल्यात तरी काहिंनी दुकानांची मांडामांड सुरु केलीय.

घर ते ऑफ़िस हा प्रवास दुबईतील डेझर्ट सफ़ारीची आठवण करुन देणारा. रस्ते म्हणजे वाळूच, तीसुद्धा
मऊशार. वाटेत कोंबडी, कुत्री येणार. डायवरसाहेबांचे रोज नवे शॉर्टकट. पण एकंदर मजाच.
येताना मात्र आम्ही हायवेवरून येतो. तो नव्याने बांधलेला आणि नीट निगा राखलेला आहे.
रस्ता दुभाजक जरा रुंद आणि तो गाडीला ओलांडणे अशक्य (म्हणुन तर जायचे यायचे रस्ते वेगळे.)
नायजेरियात तर छोटी गाडी, चार जण उचलून दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला ठेवतात.

या रस्त्याला लागून एक रेल्वेलाईन जाते. दोनदा फ़ाटक ओलांडावे लागते. मला चक्क आठवड्यातून
चारपाच वेळा आगगाडी दिसते. हे मुद्दाम लिहितोय कारण, नायजेरियात रेल्वे लाईनवर तर चक्क
बाजार भरतो. कधीमधी जर चुकत माकत रुळावर गाडी आलीच तर फ़ेरीवाले आपला माल उचलतात.
माझ्या ४ वर्षांच्या वास्त्यव्यात मी फ़क्त एकदा रुळावर गाडी बघितली.

इथली आगगाडी ३ डब्याचीच असते. बाहेरचा अवतार अगदीच कुर्डुवाडी पंढरपूर असा नसतो आणि पब्लिक लटकत वगैरे नसते. दोनदा तर चकाचक एसी गाडी दिसली. छोटी छोटी स्टेशन्स अगदी स्वच्छ आणि नवीन दिसताहेत. फ़ाटकाच्या बाजूला बाजार असायलाच हवा.

मला खास आवडले ते रेल्वेलाईन ओलांडणारे पादचारी पूल. खुप सुबक डिझाईनचे आहेत ते,
शिवाय त्यावर व्हीलचेअर्स साठी वेगळी सोय आहे (असे आधी वाटले.)

पण त्याचा उपयोग दुसरेच एक वहान करत असताना दिसते. कवासाकी बाईकच्या मागे, साधारण ५ फ़ूट बाय ५ फ़ूट असा टेंपोसारखा हौद लावलेला दिसतो आणि त्यात ६/८ प्रवासी किंवा फ़ुटकळ सामान घेऊन जात असतात. कवासाकीच्या ताकदीला मानावेच लागते.

सामान्य लोकांसाठी बाईक्स पण दिसतात. पण वाळूतून चालताना त्या बऱ्याचदा घसरतात. मऊ वाळूत पडल्यावर फारसे लागत नसावे, कारण अशावेळी चालक आणि ग्राहक दोघेही, पटकन कपडे झटकून पुढचा प्रवास सुरु करतात.

टॅक्सी म्हणून छोट्या, आकाशी पांढऱ्या रंगाच्या मिनीबसेस दिसतात. आफ़िकेतल्या मिनी बसेस हे एक वेगळेच प्रकरण असते. ( केनयात त्या असतात मटाटू, म्हणजे ३ सेंटसना एक मैल. अर्थात हा पुर्वीचा दर. ) तर या गाड्या म्हणजे आमच्या डायवरसाहेबांची डोकेदुखी. कारण भररस्त्यात कुठेही थांबणे, प्रवासी घेण्यासाठी आडवे चालणे. भर रस्त्यात बिघडणे, हे अगदी नेहमीचेच.
त्याशिवाय चांगल्या बसेस पण रस्त्यावरुन दिसतातच. आणि बाकि सगळ्या पॉश अद्यावत गाड्या.

यादवी संपल्यानंतर इथे भरपूर उलाढाल दिसतेय. पण भारतीय कंपन्या मात्र यात उतरलेल्या दिसत नाहीत. याबाबतीत मुसंडी मारलीय ती चायनाने. इथे बांधकामाचे प्रचंड मोठे प्रकल्प चीन राबवताना दिसतो. लोकांना स्वस्त घरे उपलब्ध करुन द्यायचे या सरकारचे धोरण आहे, त्यानुसार चायना इंटरनॅशनल फ़ंड ने, एक खुप मोठा प्रकल्प इथे जवळजवळ पूर्ण करत आणलाय.

अर्थातच तिथे चिनी कामगार दिसतात. केनयात पण एक मोठा फ़्लायओव्हर, चिनी कंपनीने बांधून पुर्ण केला. (नैरोबीत या लोकांबद्दल एक विचित्र समज आहे. ते म्हणतात, तिथे जन्मठेपेची वगैरे शिक्षा झालेल्या लोकांना, आफ़्रिकेत पाठवून देतात. आणि ती माणसे जीवावर उदार होऊनच काम करतात.) मी वर लिहिल्याप्रमाणे माझ्या विमानात पण बरेच जण होते. आमच्या कंपनीची पण एक भलीमोठी फ़ॅक्टरी शेड, चिनी लोकांनी बांधून पुर्ण केलीय.

इतक्या मोठ्या संख्येने चिनी लोक इथे आहेत, कि अनेक फलक पण चिनी लिपीत लिहिलेले आहेत. कदाचित त्यांचे चायना टाऊन पण असेल. हि संधी भारताने गमावली असेच म्हणावे लागेल आता.

बांधकाम साहित्य, जसे कि लाद्या, दिव्याच्या शेड्स, बाथरुम फ़िटिंग्ज पण चीनमधून आयात झालेली दिसतात. या देशात उद्योगधंदे आता आता सुरु होताहेत.

इथे भारताचा दूतावास आहे, पण भारतीय किती आहेत याची कल्पना नाही. आमच्या गावात मात्र, मी आल्यापासून एकही भारतीय व्यक्ती दिसलेली नाही. लुआंडामधे भारतीय वाणसामान मिळणारे दुकान आहे, असे वाचले. भारतीय रेस्टॉरंटस पण असल्याचे वाचले. पण ती अतिमहागडी आहेत, असे वाचले.

संपुर्ण आफ़्रिकेभर एम नेट हे टिव्ही नेटवर्क आहे. ते इथेही दिसते. त्यावर काही भारतीय चॅनेल्स दिसतात. दुपारच्या जेवणाच्या वेळी मी कधी कधी बघतो, धोरण म्हणून मी घरात, टिव्ही ठेवत नाही.

यादवी युद्धाच्या जखमा त्या त्या देशात दिसत राहतातच. आम्हालाही रस्त्यात वापरात नसलेल्या सैनिकी चौक्या, चौथरे, वापरात नसलेले रणगाडे, काही जाळलेल्या गाड्यांचे सांगाडे दिसतात. पण घरांवर काही गोळीबाराच्या खुणा दिसत नाहीत. बहुतेक घरे नव्याने बांधलेली दिसतात.

त्या काळात पेरलेले काही सुरुंग अजून तसेच आहेत, त्यामूळे रस्ता सोडून बाजूला जाऊ नये असे नेटवर लिहिलेले आहे. पण तेसुद्धा लुआंडामधे असावे असे वाटते, कारण आमच्या गावात रस्ताच नसल्याने, रस्त्याच्या आजूबाजूला असे काही प्रकरणच नाही. मुख्य रस्त्यावरुन आत शिरल्यावर एक भले मोठे मैदानच लागते, त्यातून रॅलीत चालल्यासारख्या आमच्या गाड्या चाललेल्या असतात. शिवाय आजूबाजूला मुलांचे फ़ुटबॉलचे खेळ रंगात आलेले असतातच.

अगदी गल्लीबोळात मुले हा खेळ खेळत असतात. पहिल्याच विकेंडला माझे रवांडन मित्र, मला एका हॉटेलमधे स्पेन विरुद्ध इतालिया असा सामना बघायला घेऊन गेले होते. असे सामने बघावेत तर आफ़्रिकन किंवा दक्षिण अमेरिकेतील लोकांसोबत, त्यांचा त्या सामन्यातला मानसिक सहभाग, क्षणाक्षणाला होणारी घालमेल बघण्यासारखी असते.

हे हॉटेल आमच्या गल्लीतच आहे. मला आवडले ते तिथले आवार, स्वच्छता, पांढरा प्रकाश आणि नो स्मोकिंगचा बोर्ड ! नाहीतर अंधारे आवार, सिगारेटचा धूर, दारू चढलेल्या माणसाचे चढलेले आवाज, यांनी मी वैतागतो.

या देशाचे चलन आहे क्वांझा. पण त्याचबरोबर डॉलर्स देखील सहज स्वीकारले आणि दिले जातात.
बॅंकेचा विनिमय दर ९३/९८ असला तरी व्यवहारात १ डॉलर म्हणजे १०० क्वांझा असे सोपे गणित
वापरले जाते. केनयात करन्सीवर काही बंधने नसली तरी असा रोखीने व्यवहार होत नाही,
नायजेरियात तर चारचौघात डॉलर हा शब्दही उच्चारता येत नाही. त्याला तिथे, राजा म्हणतात आणि
बोलताना तोच शब्द वापरतात.

प्रत्येक देशातील तरुणांच्या एकंदर दिसण्याबद्दल काही ठोकताळे बांधता येतात. धावण्याच्या स्पर्धेत
नेहमी केनयाचे खेळाडू पहिले येतात, ते बघितले असेल. ते जसे दिसतात म्हणजे अगदी कृश अंगकाठीचे आणि शरीरावर कातडी ताणून बसवल्यासारखे, तसेच तिथले युवक दिसतात. मुली मात्र खुपच स्थूल दिसतात. त्या तुलनेत अंगोलाची तरूण पिढी मात्र चांगलीच बांधेसूद दिसते. मुले आणि मुलीसुद्धा. ( गेल्या वर्षी मिस अंगोला, जगतसुंदरी ठरली होती ना ? )

वर लिहिल्याप्रमाणे पोर्तुगीजचे धडे मला सेक्रेटरी देत आहेच. सर्वात आधी सर्वाना म्हणायचे ते बोम दिया. म्हणजे गुड डे. इंग्रजांप्रमाणे हे लोक केवळ सकाळसाठी नव्हे तर पूर्ण दिवसासाठी शुभेच्छा देतात.

तिला बाकी काही सांगितले कि ती म्हणते, शीं ~~
कारण शीं म्हणजे हो !

(इथले हवामान आणि निसर्ग याबाबत पुढच्या भागात लिहितो.)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हाही भाग आवडला. Happy

बाकी भारताने स्वतःच्या देशातल्याच इतक्या संधी गमावल्यात की बाकीकडंच काय बोलावं? चायना मात्र सगळीकडे विस्तार करत आहे. जवळपास प्रत्येक शहरामधे महत्वाच्या भागत त्यांचे चायना टाऊन असतेच. Happy

दिनेशदा, हाही भाग छान झाला आहे. डोळ्यासमोर दृश्ये उभी राहत आहेत.
काही गोष्टी इथल्या सारख्या वाटतात, उदा.- वाळूचे रस्ते.
फोटो केव्हा टाकणार ?

वा..खूपच मजा येतीये वाचायला.. फोटो नसले तरी सुरस वर्णनामुळे एकेक दृष्यं जसच्यातसं डोळ्यासमोर उभं राहतंय..
रच्याकने आफ्रिका आणी चीन मधील व्यापारिक संबंध तुफानी प्रमाणात वाढलेले आहेत्,ही गोष्ट मागच्या चारपाच वर्षांपासून अगदी डोळे मिटून सुद्धा प्रकर्षाने जाणवत आहे. अचानक ठोकबाजारपेठांमधून होलसेलमधे दिसणारे( आणी खरेदी करणारे ) आफ्रिकन लोकं इतके वाढलेत.दोन्ही देशांनी एकमेकांकरता वीजा मिळण्याची(इतर देशवासियांकरता किचकट असलेली) प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे.

दिनेशदा, अजून वाचतेय. पण मध्येच एक शंका आली. तुम्ही सारखं ब्लॉग ब्लॉग म्हणताय ते कोणाचे आहेत? ब्लॉग्जचा एवढा सारखा रेफरन्स का येतोय तुमच्या लिखाणात? त्यांचं एवढं महत्त्व का आहे? तुम्ही अगदी रेडी रेकनर सारखे हे ब्लॉग्ज वापरताय की काय? Happy

दिनेशदा ,........

It was worth !! प्रचीची मागणी रास्त !!

सुंदर लेख !

<< फोटो नसले तरी सुरस वर्णनामुळे एकेक दृष्यं जसच्यातसं डोळ्यासमोर उभं राहतंय..>> १०० %

भारताने संधी सोडली.

चीन देश प्रगती करतो, भारतातील लोक प्रगती करतात हा फरक आहे,

चीन सरकार स्वता: देशाच भविष्य ठरवते आणि त्या नुसार आखणी करते. आफ्रिकन देशावर चीन ने आपली
नजर २००० साला पासून लावलेली आहे. अगदी येमन, ओमान पासून प्रत्येक देशात त्यांचा वावर आहे.

चीन च लक्ष नुसत्या लोकल बाजार पेठ केंद्रित न रहाता मोठ्या प्रकल्प बांधण्या कडे त्यांचा कल आहे.

भारत सरकार ईथे अफगानिस्तानच्या पूढे पहायला तयार नाही. तिथे सुद्धा कधी पाय काढता घ्यावा लागेल
ह्याचा नेम नाही आणि केलेल्या गुंतवणुकीचा तोटा अक्कल खाती जमा होईल.

भारतातील लोकांची गुंतवणुक जीथे कमी कष्टात जास्त फायदा मिळेल तीथे होणे स्वाभावीक आहे. त्यामूळे
दुबई सारख्या देशात इतके गुंतवणुकदार दिसतात. असे गुंतवणुकदार आफ्रिकेत येणे शक्य नाही.

दिनेशदा,
तुमच्या लेखनशैलीने मी मस्त अंगोला फिरुन आलेय, जर तिकडे आलेच तर सगळे परिचयाचे वाटेल इतके छान लिहीलेय तुम्ही.. अजुन खुप खुप वाचायला आवडेल.. खुप खुप शुभेच्छा.. Happy

तिला बाकी काही सांगितले कि ती म्हणते, शीं ~~
कारण शीं म्हणजे हो !>>>
शींका? अजबच म्हणायचे!!!!

हा भाग पण एकदम मस्त, दिनेशदा.

छान माहीती. अफ्रिकेबद्दल इतकं चांगलं चुंगलं कोणी प्रेमाने लिहिलेलं पहील्यांदाच पाहतेय. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

सुरेख दिनेशदा!

बोम दिया म्हणजे गुड डे होय! Happy

आता प्रचि मस्ट्च आहेत हो!

भारताने संधी सोडली. >>> नविन ते काय?

असो... हाही भाग मस्तच!

पुभाप्र!
धन्यवाद.

Pages