विशेष सूचना: इमरान हाश्मीच्या सिनेमांचे परीक्षण लिहिण्याचे धाडस करणार्या सर्व लोकांचे कौतुक आणि त्यांना छोटीशी मदत म्हणून मी हे परीक्षण त्यातली वाक्येच्या वाक्ये जशीच्या तशी उचलून लिहिता येतील, अशा पद्धतीने लिहिणार आहे. ही वाक्ये कॉपीराईट मुक्त असून ती कुणालाही, कधीही वापरता येतील.
.....................................
हं तर सुरू करते.
.....................................
नेहमीप्रमाणे हा भट टोळीचा सिनेमा आहे.
एक कळकट इमरान हाश्मी असतो. त्याचे वडील सज्जन (म्हणजेच पांढर्या रंगात रंगलेले). 'इमरानचा रंग वेगळा...' (तो नेहमीच करडा आणि काळ्यामध्ये कुठेतरी असतो.)
त्याचं नाव 'अर्जुन दीक्षित' असतं. (हा मराठी?????????????) तर तो एकूणच बेफिकीर वृत्तीचा. बेफिकीरपणा काय तर, पैसे उधार घेऊन तीनपत्ती वगैरे जुगार खेळणे. तर त्यातही एक वैशिष्ट्य असे की, तो शेवटचा डाव 'बुरी तरहसे' हरत असतो.
एके दिवशी नेहमीप्रमाणे शेवटचा डाव हरून टॅक्सीतून परत जाताना तो या वैशिष्ट्याचे विश्लेषण करतो. त्यादिवशी त्याच्याकडे एक्का, राजा येतो, पण राणीऐवजी गुलाम आल्याने हार नशिबी येते. 'खर्या आयुष्यात राणी नसल्याने ती पत्त्यांमध्येही येत नाही' असा निष्कर्ष अदी (अर्जुन दीक्षित) काढतो. चाणाक्ष प्रेक्षक लग्गेच ओळखतात की आता हिरॉईन येणार आहे.
तर ते (इमरान आणि त्याचा जिवलग मित्र!) मॉलमधल्या दुकानदाराला नकली ब्रँडेड गॉगल्स विकत असताना एक तरूणी एस्कलेटरवरून खाली येऊन एका दुकानात जाते.
तिथे ती बरोब्बर इमरानला दिसेल अशी उभी राहून कपडे (विकायसाठी हँगरवर टांगलेले) बघत असते. इमरान तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी एकटक बघत राहतो. मग ती त्या दुकानातून काहीही विकत न घेता एस्कलेटरवरून वर जाते नि एका दागिन्यांच्या दुकानाबाहेर उभी राहून तशाच अनिमिष नेत्रांनी एक अंगठी बघत राहते. (लोकहो, लक्ष द्या. ही अंगठी या सिनेमातले एक महत्त्वाचे पात्र आहे. अगदी क्लायमॅक्सपर्यंत.)
इमरान तिच्या बाजूला येऊन उभा राहतो. तिला त्याच्या कळकटपणामुळे वाटते की तो बहुधा मॉलमधला सफाई कर्मचारी आहे. पण तो विचारतो की, अंगठी आवडली का? मग ती बहुधा त्याला सेल्समन समजून 'हो' म्हणते.
मग नेहमीप्रमाणे हाश्मीबाबा अभूतपूर्व कृत्य करतात. ते दुकानात जाऊन सरळ त्या शोकेसची काच मुठीने फोडतात. आता नायिकेने अंगठी घेऊन पळून जावे, हा त्यांचा हेतू असतो बहुधा. पण नायिका पडली प्रामाणिक!
रीतीप्रमाणे पोलिस येतात नि हाश्मीची तुरुंगाकडे वाटचाल सुरु होते.
काच फोडण्याच्या प्रसंगापासून विमानातल्या शेजारच्या फिरंगी मनुष्यानेही नजर सिनेमाकडे लावली. त्याला मज्जा वाटत असावी.
पोलिस पकडून नेत असताना अदी जोरजोरात ओरडून नायिकेला तिचे नाव विचारतो. अगदी शेवटी ती अस्फुट आवाजात 'झोया' असे म्हणते. ते त्याला तेवढ्या कल्लोळातही ऐकू जाते.
भटकाकांच्या सिनेमांचा एक गुण मला फार आवडतो. वेगवेगळ्या जातीधर्मांची पात्रे त्यात एकत्र नांदतात. कुठेही नीची जाति का लडका/लडकी, घराने की इज्जत, खानदान के रीतिरिवाज वगैरे भानगडी येत नाहीत. नायक नायिकेचे आईवडील नावापुरतेच असतात. बर्याच वेळा ते नसतातच. 'काय आभाळातून पडलास काय रे?' याला भटकाकांचे नायक, नायिका ताठ मानेने 'हो' म्हणू शकतील.
तर ही झोया आईवडिलांचा घटस्फोट होऊन दोघांनीही दुसरा घरोबा केल्याने हॉस्टेलवर राहत असते. (भटकाका किती कल्पकतेने आईवडिलांच्या भूमिकेला चाट देतात पहा. यश चोप्रा किंवा करण जोहर असते, तर त्यांनी दोघांनाही दुसर्या जोडीदाराच्या घरच्यांसकट सिनेमात आणले असते.)
इमरान तीनपत्ती खेळण्याकरता फक्त निर्दयी गुंडांकडूनच उधार पैसे घेत असतो. (खेळातले थ्रिल वाढत असावे!) मग एकेदिवशी गुंड त्याला भेटायला येतो. इमरान बेफिकीर असला तरी गुंड बेफिकीर नसतो. (शेवटी तो त्याच्या घामाचा पैसा! इमरानचं काय जातंय?) मग तो एकेठिकाणी 'मी वसुली कशी करतो?' हे दाखवायला इमरान आणि त्याच्या मित्राला घेऊन जातो. तेथे तो त्या व्यक्तीचे एक बोट कापतो आणि म्हणतो, पैसे परत द्यायला असाच उशीर केलास तर एकेक दिवशी एकेक अवयव कापून नेईन.
इतके समोर होऊनही इमरान बेफिकीर! तो थंडपणे गुंडाला 'पैसे बाद मे देगा' अशा भावार्थाचं काही सांगतो.
त्याच्या या थंडपणाने थिजल्याने गुंड काही काळ पैसे मागत नाही.
इकडे आता इमरानला झोया उर्फ 'असली जिंदगी की रानी' चे वेध लागलेले! त्याच्या मित्राला नकली गॉगल विकून मिळवलेले पैसे घेऊन तो अंगठी आणायला निघतो. त्याला नेहमी टॅक्सीतून इकडे तिकडे सोडणारे चाचा टीव्हीवर क्रिकेट बघत असतात. तो तिथे थांबून मॅचबद्दल बरोबर भाकीत वर्तवतो आणि ते खरे निघते. चाचा म्हणतात, 'बेटा ये तीनपत्ती छोड और क्रिकेट पे सट्टा लगाव. तेरा भविष्य उसी मे है...'
पुढे तो गुंड पुन्हा पैसे मागायला येतो. आणि म्हणतो, की आता पैसे दिले नाहीस तर जिवानिशी मारीन. नेमकी तेव्हाही क्रिकेटची मॅचच चालू असते. इमरान गुंडाला पटवतो की सट्टा खेळून तो पैसे परत देईल. आणि प्रत्येक भाकीत अचूक वर्तवून इमरान सट्टा जिंकतो. गुंड खूश! (मॅच कुठली तर इंग्लंडविरुद्ध मॅच जिंकून गांगुलीने उघड्या अंगाने शर्ट फिरवला होता ती!)
इथून इमरानच्या जीवनाला नवी दिशा (गुन्हेगारी विश्वाची) मिळते.
दरम्यान झोयाच्या हॉस्टेलवर जाऊन इमरानने तिला ती अंगठी देण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण ती सच्छील, सद्वर्तनी असल्याने अशा उगाच महागड्या भेटी कळकट हाश्मीकडून घेत नाही. पण भटकाकांना सिनेमा भराभर पुढे न्यायचा असल्याने या प्रसंगाच्या शेवटी तिच्या मनात प्रेमाचे अंकुर फुटतात.
मग इमरान लगेच नवे घर, नवी गाडी घेतो आणि झोया आणि त्याच्या वडलांना एकदमच घरी जेवायला बोलावतो. इमरानचे सद्वर्तनी, पांढरे वडील झोयाला 'इमरान एक नंबरचा खोटारडा आहे' हे कळकळीने सांगतात.
मग इमरान नेहमीप्रमाणेच नायिकेला काहीतरी सांगून स्वतःची बाजू पटवून देतो.
मग इमरानच्या सट्टा जिंकवून देणार्या सिक्स्थ सेन्सची कीर्ती सातासमुद्रापार अबू अब्राहम नावाच्या डॉनपर्यंत पोचते. (आं! लब्बाड... चाणाक्ष प्रेक्षकांना कळलं कोण तो!)
मग तो त्याला सन्मानपूर्वक मॅचफिक्सिंगचा जॉब ऑफर करतो आणि इमरान 'भारत देश स्वप्नं बघायला ठीक आहे. पण स्वप्नं पुरी मी इथेच करीन!' असं म्हणत ऑफर स्वीकारतो.
मग एकदम सिनेमा पुढेच गेला. एका आलिशान घरात झोया आणि इमरान राहताना दिसले. 'जरा सी दिल मे दे जगह...' वगैरे गाणी आणि खास दृश्ये कापलीच गेली. शेजारचा फिरंगी अजूनही मन लावून सिनेमा बघत होता. त्या भाबड्या जीवाचा झालेला विश्वासघात पाहून माझे मन कळवळले.
मग इमरान मुंबईत असताना जो इन्स्पेक्टर त्याला पकडून त्याच्या वडिलांच्या पुण्याईमुळे सोडून देत असतो तो इमरानला पकडायला थेट परदेशात येतो. (पोलिसांतही ऑनसाईट सुरू झाले तर....!) तो झोयाला भेटून सगळे सांगतो आणि झोया इमरानला सोडून जायची तयारी करते.
पुन्हा इमरान तिला पटवतो.
मग झोया प्रेग्नंट असल्याची बातमी येते. त्यावेळचे हाश्मी आणि तिचे संवाद काहीसे असे आहेत.
'झोया तुम मां बनने वाली हो?' -हाश्मी.
'नही, क्वीन एलिझाबेथ मां बननेवाली है...'
मला उगीच टेन्शन. शेजारचा फिरंगी (ऑस्ट्रेलियन होता तो!) चिडून एकदम 'आमच्या राणीचा अपमान केला, तिच्याबद्दल असभ्य उद्गार काढले' वगैरे भांडण काढायचा. पाहिले तर तो पेंगत होता.
मग पुढे कथा नेहमीच्या वळणाने गेली. नायिकेने इमरानला कर्दमातून बाहेर काढायचा खूप प्रयत्न केला पण तो कर्दमात रूततच गेला.
मग वर्ल्डकप असतो. अबू अब्राहमला मॅचफिक्सिंगची नितांत गरज असते. मग तो हाश्मीला एवढे एकच काम कर असे म्हणतो. (आठवले का? 'इमरान... शेवटचा डाव... बुरी तरहसे हारना...')
प्रेक्षकांना काय होणार याची कल्पना येते.
एक मॅच फिक्स करत असताना त्या टीमचा कोच एकदम तिथे येतो आणि आपले बिंग फुटू नये म्हणून अबू अब्राहमचा माणूस त्या कोचला यमसदनाला पाठवतो. (हेही चाणाक्ष प्रेक्षकांना लग्गेच कळलं!)
आळ येतो प्रामाणिकपणे फक्त पैशाचा वापर करून मॅचफिक्सिंग करणार्या इमरानवर! तो पोलिसांपासून वाचण्यासाठी पळत सुटतो. पाठलाग सुरू होतो.
क्लायमॅक्स:
तो झोयाकडे येतो. ती प्रामाणिक आणि सद्वर्तनी असल्याने त्याला सरेंडर कर म्हणून सांगते. तो तिच्या सांगण्यानुसार पिस्तुल खिशातून काढून जमिनीवर फेकतो आणि....
पिस्तुलाबरोबरच 'ती' अंगठीही खिशातून बरोबर पिस्तुलाशेजारी पडते. ऑनसाईट आलेला पोलिस इन्स्पेक्टर त्याला बेड्या घालण्यासाठी हळूहळू पुढे येत असतो. तेवढ्यात इकडे तिकडे बघत असताना हाश्मीला अंगठी दिसते. आणि तो ती उचलायला वाकताच, प्रेमभावना, हळुवारपणा, उच्च कोटीचे प्रेम आणि छोट्या वस्तूचे अमूल्य असणे याची काडीमात्र माहिती नसलेले विदेशी पोलिस इमरानला अनेक गोळ्या घालतात.
झोया पोलिसांना शिव्या देते, इमरानच्या मृतदेहाला कवटाळून रडते आणि शेवटच्या प्रसंगात मुलाला प्रामाणिक व साधेपणाने वाढवताना दिसते.
जन्नत
Submitted by श्रद्धा on 17 September, 2008 - 03:58
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चित्रपटाच
चित्रपटाच नाव थोडस चुकल आहे ना?
हा चित्रपट बघुन जिवंतपणी नरकयातना भोगाव्या लागतात त्याच काय??
परिक्षण नेहमीप्रमाणेच जबरा
.............................................................

Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!
फारच साधा
फारच साधा आणि सरळ चित्रपट म्हणायचा की हा.. एकदम बाळबोध
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे
नविन शब्द
नविन शब्द कळला कर्दम!!
बाकि मस्तच लिवलस, मला तर मुळ्ळिच दु:ख वगैरे झालं नाहि, इम्रान च्या मरणाचं! आधिच मेला वाय गेलेला कार्टा होता,बरं झालं खपला ते.
सिनेमा
सिनेमा काही आम्ही पाहीलेला नाही, पण तुम्ही सांगताय त्या कथेप्रमाणे सिनेमाचे नाव 'जन्नत' कसे हाच मुळी प्रश्न पडतो.
पण तुम्ही परिक्षण मात्रं छान लिहीलयंत
इमरानचे
इमरानचे सद्वर्तनी, पांढरे वडील>>>

कळकट. अगदी अगदी. इमरानचे एका शब्दातले वर्णन..
आणि त्या भ(रक)ट काकांनी हा कळकट भौ दत्तक घेतलाय की काय, नकळे.
श्रध्दा,
श्रध्दा, ए-वन म्हणजे ए- वन लिहिलंय!

शेजारचा फिरंगी अजूनही मन लावून सिनेमा बघत होता. त्या भाबड्या जीवाचा झालेला विश्वासघात पाहून माझे मन कळवळले. <<<<< पोट धरून हसले!
कुणाला कुठे तर कुणाला कुठे हसु येतं (वाचताना)!!!
..............
बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी
ह्.ह.पु.वा.
ह्.ह.पु.वा.

मलाही मृण्मयीसारखंचं त्या फिरंग्याच्या वर्णनावर खुप हसु आलं.
(पोलिसांतह
(पोलिसांतही ऑनसाईट सुरू झाले तर....!)

मलाहि
मलाहि सगळ्यात जास्त तिथेच हसु आल ग मृ...
बाकी श्रद्धा, मस्त लिवलयस.
महान!
बापरे अजून भट फॅक्टरी तसेच चित्रपट काढते का काय? कथेमधल्या प्रत्येक गोष्टी पूर्वी कोठेतरी (म्हणजे हॉलिवूड मधल्या चित्रपटात) पाहिल्यासारख्या वाटतात.
बापरे अजून
बापरे अजून भट फॅक्टरी तसेच चित्रपट काढते का काय?
>>>
फारेंडा, महेश भटने चित्रपट दिग्दर्शनामधूओन रीटायरमेट घ्यातल्यावर सध्या फक्त सल्लागार म्हणून काम करतोय.
श्र. एकदम चोक्कस लिहिलयस.
आता रूबरू एकदा बघ ना!!
--------------
नंदिनी
--------------
हाहाहा सही
हाहाहा सही !!
कळकट्ट इम्रान ला गाणी नेहेमी प्रमाणे यात ही सही मिळाली आहेत.
पण हे भट्ट कंपू चे सिनेमे कुठल्या ना कुठल्या प्रकारे करमणून करतात हो :)), बघताना कंटाळा येत नाही :..
कसला
कसला भन्नाट पिक्चर आहे. हाहा !!
प्रीतम
प्रीतम च्या गाण्यांना 'सही' म्हणू नका...
तो फक्त त्याच त्याच चालीची किंवा चोरलेल्या चालीची गाणी देतो
नक्षा मधलं u & i lets do बल्ले बल्ले,
गोल मधलं मेरी हर साँस पे,
आणि रेस मधलं ख्वाब दे के... ही ३ गाणी एकाच चालीवर बेतली आहेत...
_______
नमस्ते लंडन
वेगळीच
वेगळीच वाटतात की मला तरी ही गाणी
चोरी असो
चोरी असो किंवा अजुन काही, मला प्रीतम ची गाणी प्रचंड आवडतातः), तशीही ती ओरिजिनल कोरीयन वगैरे गाणी कोण ऐकायला गेलं असत नाही तरः)

प्रीतमदा रॉक्क्स
चोरी तर शंकर जय किशन, आर डी, सलिल चौधरी सगळ्यांनी केली होती, शेवटी त्या गाण्यांचं देशी व्हर्जन आपल्याला आवडतं, कदाचित ओरिजिनल पेक्षा जास्त
हाहाहा....
हाहाहा.... काय मस्त परीक्षण लिहिलंय !!
<<<<<<<<
मग झोया प्रेग्नंट असल्याची बातमी येते. त्यावेळचे हाश्मी आणि तिचे संवाद काहीसे असे आहेत.
'झोया तुम मां बनने वाली हो?' -हाश्मी.
'नही, क्वीन एलिझाबेथ मां बननेवाली है...'
मला उगीच टेन्शन. शेजारचा फिरंगी (ऑस्ट्रेलियन होता तो!) चिडून एकदम 'आमच्या राणीचा अपमान केला, तिच्याबद्दल असभ्य उद्गार काढले' वगैरे भांडण काढायचा. पाहिले तर तो पेंगत होता.
>>>>>>>>
ह. ह. पु. वा !
जन्नत मधे
जन्नत मधे मला आवडलेला डॉयलॉगः
खुषीया खरीदी नही जाती: इम्रान चा मित्र
ये वोह लोग बोलते है जिन्हे पता नही होता कि किसिको खुशी देने के लिये क्या और कहा से खरीदना है:): ईम्रान
लै भारी
लै भारी परीक्षण!
सिनेमाच्या तिकिटात बुडालेले पैसे परीक्षण वाचुन वसूल
इमरान
इमरान तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी एकटक बघत राहतो. >>> त्यापेक्षा 'अधाशासारखा' हा शब्द जास्त बरा नाहिये का?
~~~~~~~~~

~~~~~~~~~
मीनू,
मीनू, लोकांनी 'अधाशासारखा' असाच अर्थ घ्यावा म्हणून श्रध्दाने 'इमरान' अन 'अनिमिष नेत्र' अशी काँट्रोव्हर्सी वापरली असेल की नाही..
मी नुकताच
मी नुकताच हा चित्रपट वॉल्वोत पाहिला.मला फार अचाट आणि अतर्क्य सिनेमे वॉल्वोत पहावे लागतात्.इमरान हाशमी दिसताच मी नजर सिनेमावरून काढून इकडे तिकडे वळवली. पण आवाज एवढा मोठा होता की बघण्याशिवाय गत्यन्तर नव्हते. विशेष म्हणजे चित्रपट बराच सुसह्य वाटला.त्याचा दिग्दर्शक कुणी एक 'कुणाल देशमुख' होता पाहून त्यातल्या त्यात बरे वाटले...
हे कस
हे कस वाचायच हुकल? जबरि लिहलय श्र.. सगळ्यात ह.ह.पु. त्या फिरंग्याच्या वर्णनाला झालि माझि..
जबरदस्त
जबरदस्त लिहीलय. विश्वासघात शब्द एकदम चपखल. त्यामूळे जाम हसलो.