... चुकून झाले!

Submitted by आनंदयात्री on 13 July, 2012 - 04:44

अनेकदा जे जगून झाले!
फक्त एकदा लिहून झाले

मला म्हणे ती - विसर मला तू!
बरेच मग आठवून झाले

करून झाल्यानंतर सुचले -
जे झाले ते चुकून झाले!

कागद भिजले, कागद सुकले
जगणे सारे टिपून झाले!

कसे सारखे रडावयाचे?
बदल म्हणुन मग हसून झाले

पसार्‍यातुनी कविता उरली
जेव्हा मन आवरून झाले!

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/07/blog-post.html)

गुलमोहर: 

Chhan.

मस्तच खूप खूप आवडली

पहिले तीन शेर फारच मस्त आहेत

करून झाल्यानंतर सुचले -
जे झाले ते चुकून झाले!>>>>>>>>>>

या वरून मला माझ्या कालच्या गझलेतला एक शेर आठवला

झाले गेले विसरू म्हणता
झाले हेच कळाले नाही >>>>>

संपुर्ण गझल आवडली
या गझलसाठी मी घरच्यांची प्रचंड बोलणी खाल्याने आता तुला पेनल्टी म्हणुन मला भेटल्यावर कॅडबरी द्यावी लागेल Proud

शेवटचा शेर __/\__

पसार्‍यातुनी कविता उरली
जेव्हा मन आवरून झाले!>>> 'मन आवरुन...' भारीच रे... Happy

गझल मस्तचं... Happy

अनेकदा जे जगून झाले!
फक्त एकदा लिहून झाले

मला म्हणे ती - विसर मला तू!
बरेच मग आठवून झाले

करून झाल्यानंतर सुचले -
जे झाले ते चुकून झाले!

>>. आह! कातिल! क्या बात! बोहोत बढिया! कमाल! क्लास! Happy

नचिकेत, "अह्ह्हा" झालीये अख्खी गज़ल... वा वा वा..
(जनरली छोट्या बहरातली गज़ल अवघड असते म्हणतात ना, तू अगदी सहज लिहील्यासार्खी वाटलीय)

काय आवडलं त्यातल्या त्यात तर-

कागद भिजले, कागद सुकले
जगणे सारे टिपून झाले!>> जगणे टिपणारा टिपकागद, कुठे रे सापडला? मस्त मस्त!

बदल म्हणून हसणे, विसर म्हणाल्यावर (काय काय विसरावे ह्या बहाण्याने) आठवणे.. आणि पज्जो म्हणाली तसं 'मन आवरणे' आणि उरले काय, तर कविता... सहीये! बदलीच्या वेगवेगळ्या गावी जाताना एका जागंच बस्तान हलवताना, सगळा पसारा भरून घेतल्यावर कुठे कुठे कधी कपाटाच्या खाली, तर कधी, फर्निचरच्या खाली गेलेले कागदं, त्यावरची उगीच रेखाटलेली अक्षरं झर्कन समोरून गेली... जियोच! Happy

करून झाल्यानंतर सुचले - होउन गेल्यानंतर कळले....असे म्हणायचय का?
कारण जाणिवपुर्वक केलेली गोष्ट नंतर चुकून झाली अशी सारवा सारव केल्या सारखे मला तरी वाटले.

मक्ता लाजवाब.... कागदही छानच!

ही खूप आवडताना एक माझीही जुनी क आठवली,शेअर करतेय :)) कविंची आगाऊ सवय.

-सर्वस्वाच्या पसार्‍यात बसून
मी तुझ्याकडे बघते गोड हसून

आज आवरेनच मी हे सारे
माणसे,प्रसंग,मतमतांतरे

संदर्भ लावेन दुहेरीतिहेरी
कालसुसंगत ,आद्याक्षरनुसारी

सर्वस्वाच्या पसार्‍यामधून
पण तुला ठेवेनच वेगळे जपून..

शुभेच्छा!

मला म्हणे ती - विसर मला तू!
बरेच मग आठवून झाले>>> छान.

शेवटच्या शेरातला खयाल आवडला.

नचिकेतजी! गझल वाचली. आवडली. पण, ही गझल वाचल्यावर मला खालील खयाल सुचले.............

मनाप्रमाणे जगून झाले!
पण तैसे ना लिहून झाले!!

आता म्हणते.... “विसर मला तू!”
नाव तिचे गोंदवून झाले!!

करून बसलो....नंतर कळले....
जे झाले ते चुकून झाले!

टिपकागदाप्रमाणे माझे;
जगणे सारे टिपून झाले!

असे नव्हे की, रडतच बसलो....
मधेच थोडे हसून झाले!

गझल तुझ्यावरची सापडली;
जेव्हा मन आवरून झाले!

.........प्रा.सतीश देवपूरकर
...............................................................................................

कसे सारखे रडावयाचे?
बदल म्हणुन मग हसून झाले>>> क्या बात है.
@मस्त गझल@

_______________
माझ्या निवडक दहात
------------------------

मनापासून धन्यवाद दोस्तहो! Happy

या गझलसाठी मी घरच्यांची प्रचंड बोलणी खाल्याने आता तुला पेनल्टी म्हणुन मला भेटल्यावर कॅडबरी द्यावी लागेल
Lol

नानुभाऊ, भारती, Happy

बागेश्री, इतका भरभरून प्रतिसाद! थॅ़क्स म्हणू का? Happy

कारण जाणिवपुर्वक केलेली गोष्ट नंतर चुकून झाली अशी सारवा सारव केल्या सारखे मला तरी वाटले.

शाम, त्या शेरात एक्झॅक्टली हे आणि हेच म्हणायचंय! Happy

कागद भिजले, कागद सुकले
जगणे सारे टिपून झाले!

पसार्‍यातुनी कविता उरली
जेव्हा मन आवरून झाले!>>>

वा वा, फार आवडले शेर. गझलही मस्तच