सुधागड - एक रम्य सफर

Submitted by sabha on 12 July, 2012 - 07:15

सुधागड (पाली)

येत्या २४ ते ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता हा वेधशाळेचा अंदाज ऐकून शंकेची पाल चुकचुकलीच, म्हटलं आपण नेमक पावसाळी ट्रेक ठरवतोय, त्यात आठवडाभर पावसाने मारलेली (दडी), भरीत भर म्हणून कि काय हा हवामान खात्याचा अंदाज, म्हणजे पाऊस पडायची शक्यताच नाही. तरीही ट्रेक महिनाभर आधीच ठरलेला होता आणि एकदा का आमचा श्रावण (हो हो श्रावण आमचाच हो, गुरुजीना श्रावण प्रिय असतो त्यापेक्षा अधिक कोणाला असेल काय? ) सुरु झाला कि पार अनंत चतुर्दशी पर्यंत खा_वायला देखील वेळ नाही अशी परिस्थिती. (मध्यंतरी एका समवयस्क गुरुजींकडून त्याचे आवडते गाणे ऐकले होते "श्रावण मासी हर्ष मानसी हिरव्या नोटा चहू कडे, क्षणात इकडे सत्यनारायण, क्षणात तिकडे होम घडे..... ई.ई.") असो. पण काही झाले तरी ट्रेकला जाणे आवश्यक होत, सुधागडला भेट देऊन देखील बरीच वर्ष झाली होती. मी, सुजित, भूषण आणि वरुण उर्फ मन्यामामा शनिवारी सकाळी जाणार होतो तर निलेश आणि समीर हे रविवारी सकाळी बाईक वरुन येणार होते.

सुधागडाचा थोडक्यात ईतिहास पाहायचा झाला तर "भोर संस्थानाचे वैभव असलेला सुधागड किल्ला म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणा-या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरीच. अतिशय प्रशस्त असे पठार असलेला हा एक अतिप्राचीन किल्ला. सुधागड परिसरातील ठाणाळे आणि खड्सांबळे लेण्यांचे अस्तित्व ते सिद्ध करते. सुधागडला आधीचे नाव भोरपगड असेही आहे. १६४८ साली किल्ला हिंदवी स्वराज्यात दाखल झाला. शिवरायांनी भोरप गडाचे नाव सुधागड ठेवले. सुधागडच्या पायथ्याशी पाच्छापूर हे गाव आहे. पाच्छापूर हे "पातशाहपूर" या नावाचा अपभ्रंश. याच गावात संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेट झाली होती. गडावरील श्री भोराई देवीची स्थापना भृगु ऋषींनी केली, म्हणून या देवीला "भृगुअंबा, भोरांबा, भोराई" अशीही नावे आहेत. पुराण काळात भृगु ऋषींचा आश्रम या किल्ल्यावर होता असे सांगितले जाते. श्री भोराई देवीच्या पुरातन मंदिराची भोरच्या पंत सचिवांनी पुनर्बांधणी केली व याच देवीला त्यांनी आपली कुलदैवत म्हणून मानले. पंत सचिवांनी सुधागडावरील भोराई देवी मंदिराचे सभागृह इ.स. १७५० मध्ये बांधून पूर्ण केले. गुरव, खंडागळे, खोडागळे व सरनाईक ही घराणी भोराई देवस्थानाशी संबंधित आहेत." (साभार ट्रेकक्षितीज)

शनिवारी सकाळी ११.३० वा. आम्ही भूषणच्या गाडीतून निघालो. वाटेत पनवेल-खोपोली दरम्यान प्रबळ, इर्शाल, माथेरान यांना ढगांचा वेढा पडला होता.

पाली गावातून देवळाच्या मागेच असलेला सरसगड.

पनवेल, खोपोली, पाली, पात्छापूर असे मजल दरमजल करीत ठाकूरवाडी या सुधागडच्या पायथ्याशी असलेल्या गावात येईपर्यंत ३.०० वाजले. पाली ते पात्छापूर अंतर साधारण ८-१० कि.मी. पात्छापूर गावात रस्त्याच्या बाजूलाच हिरव्या झाडीत एक टुमदार कौलारू घर छान दिसत होत. हे घर पाहून हिरवी श्यामल भवती शेती, पाउल वाटा अंगणी मिळती, लव फुलवंती जुई, शेवंती, शेंदरी आंबा सजे मोहरू, खेड्यामधले घर कौलारू ... या ग.दि.मांच्या ओळी न आठवल्या तर नवलच.

पात्छापूर पासून २ कि.मी. वर असलेल्या ठाकूरवाडी गावात आलो. शाळेजवळ गाडी पार्क केली, आणि निघालो. ठाकूरवाडीतील लोक मुख्यतः महादेव कोळी किवा कातकरी वर्गापैकी. वाडीतील घर काही पक्की, काही कुडाच्या भिंतीची तर काही शेणाने सारवून ठेवलेली. बहुतेक सर्वच घरांच्या बाहेर जळाऊ लाकडांची बेगमी केलेली दिसत होती.

ठाकूरवाडीतूनच एका सोप्या पायवाटेने गडाच्या दिशेने निघालो,

मधूनच सुधागड ढगातून आपले डोके वर काढत होता.

हिरव्या गच्च झाडीतून दिसणारी पाऊलवाट

साधारण अर्धा तासात एका शिडीपाशी आलो. शिडी कसली रेल्वेचा ब्रिजच तो. तेथून ठाकूरवाडीतील घर आणि शाळेजवळच्या गाड्या स्पष्ट दिसत होत्या.

शिडी

शिडी

शिडीपाशी क्षणभर विश्रांती

क्षणभर विश्रांती घेऊन, पावसाचा अंदाज घेत निघालो, या नवीन शिडीच्या मागेच जुनी पण आता वापरात नसलेली शिडी आहे, ती पाहून सुजीतचा अघोचरपणा एकदम जागृत झाला आणि आम्ही नवीन शिडीवरून गेलो तर तो जुन्या शिडीवरून आला.

नव्या शिडीवरून जाताना

जुनी शिडी

शिडीवरून दिसणारे दृश्य

हिरवा निसर्ग

फार दूरवर नसलेला सरसगड

शिडी मागे टाकून निघालो आणि साधारण १५-२० मिनिटात सुधागडाच्या मुख्य पाय-यांपाशी आलो.

पाय-या

बुरुजावरून

बुरुजाच्या बाजूलाच असलेला चोरदरवाजा

बुरुजावरच टाइमर लावून एक फोटो काढून टाकला.

आमच्या दिशने चालून येत असलेला पाऊस आम्हाला हुलकावणी देवून भलतीकडेच निघून गेला.

ऊन्ह-पावसाचा खेळ

तिथून अर्ध्या तासात सुधागडच्या पठारावर पोहोचलो. पठारावर पुण्याहून आलेला आणखी एक ग्रुप भेटला. त्यांच्या सोबत गप्पा-टप्पा करण्यात आणखी १५-२० मि. गेली.

सुधागडच्या पठारावर

पुन्हा एकदा टाइमर लावून एक फोटो काढून टाकला

ठाकूरवाडीत आमच्या गाडीच्या बाजूला दुसरी गाडी पार्क केली होती ते पुण्यातील राजदेरकर आणि मंडळी

दहाच मिनिटात पंत-सचिव यांच्या चौसोपी वाडयापाशी पोहोचलो.

पंत-सचिव यांचा चौसोपी वाडा (बाहेरच्या बाजूने)

पंत-सचिव यांचा चौसोपी वाडा.

ब-याच दिवसांनी निवासी ट्रेक करीत होतो. त्यामुळे जरा निवांतपणा होता हे विशेष. शिवाय निवासी ट्रेकला गैस, पातेल्या, शिधा, ई. सामानामुळे माझ्या आणि सुजितच्या पाठ-पिशव्या भारी वजनदार झाल्या होत्या. त्यामुळे म्हटलं जरा १५-२० मिनिट आराम करू मग चहाच्या आणि कांदा-भजीच्या तयारीला लागू, गड फिरायला काय उद्याचा आख्खा दिवस आहेच कि. वेधशाळेचा अंदाज खोटा ठरवत (नेहमीप्रमाणेच) पावसाचा मागमूस नव्हताच. सगळा खटारखाना काढून ठेवला. तोपर्यंत मन्यामामा आणि भूषण पाणी घेऊन आले होतेच.

चहा आणि कांदाभजिच्या तयारीला लागलो.

चहा आणि कांदाभजिवर यथेच्छ ताव मारून होताच, सुजित पुलावाच्या तयारीला लागला. तोपर्यंत मन्यामामा गडावर रहाणा-या आजींकडून दुध आणि दही घेऊन आला. मग काय विचारता पुलाव-पापड-दही जोडीला लोणचं-चटणी असा झकास बेत असल्यावर पोटभर न जेवलो तर नवलच. जेऊन सामानाची आवराआवर करुन गुलाबजाम करायच्या तयारीला लागलो. चितळे गुलाबजाम मिक्स होतचं कि. मेणबत्ती आणि बॅटरीच्या प्रकाशात गुलाबजाम पीठ मळून, गोळे तयार करुन ते तळुन घेतले आणि पाकात घातले. पुन्हा एकदा आवराआवरी करुन गुलाबजामच्या पातेल्यावर वजन ठेऊन शतपावली करण्यासाठी चांदण्या रात्री भोराईदेवीच्या मंदिरात जायला निघालो. १०-१५ मिनिटात मंदिरात पोहोचलो. आमच्यातला मन्यामामा ताडोबाला बरेच वेळा जाउन आला असल्याने त्याने वाघांचे किस्से सांगायला सुरुवात केली. मग काय तास दिड्तास सहज निघुन गेला आणि पुन्हा वाड्यात यायला १२-१२.३० झाले. वाड्यात आल्यावर आजीबाईंकडून आणलेल्या दुधाची कॉफि केली आणि पुन्हा एकदा गप्पा मारत बसलो. १-१.३० च्या सुमारास पावसाची जरा ब्-यापैकी झड आली, त्यानंतर केव्हातरी झोपलो.

ट्रेक आरामाचा असल्याने थोडं ऊशिरा उठलो हे सांगायला नकोच. बैठा खो-खो खेळुन प्रेशरचं निवारण करुन आलो आणि चहा आणि पोह्यांच्या तयारीला लागलो. प्रेशरचं निवारण करता करता समोरच दिसत असलेल्या तैल-बैला आणि घनगडाचे फोटो काढुन टाकले.

तैल-बैला

तैल-बैला झुम्म्म्म

घनगड

घनगड झुम्म्म्म

सुधागडाची तटबंदी

चहा पोहे तयार होईपर्यंत समीर कदम आणि निलेश हे आमचे मित्रदेखिल आम्हाला येऊन मिळाले. भल्या पहाटे ५ वा. निघुन बाईक हाकत ९.३० ला ते गडावर पोहोचले देखिल. धन्य त्यांची. त्यांच्या बरोबर गप्पा मारत चहा-पोह्यांचा कार्यक्रम ऊरकुन घेतला म्हणजे चहा-पोहे खाण्याचा कार्यक्रम हो.

कांदे-पोहे

तेव्ह्ढ्यात अस्मादिकांना गुलाबजाम कसे झालेत ते पहायची लहर आली आणि पाहतो तो काय ट्म्म फुगलेले ४०-५० गुलाबजाम आरपार पाकात मुरलेले हो.

गुलाबजाम - चला ऊचला पटापट

गुलाबजाम झुम्म्म्म

दोन-दोन, चार्-चार गुलाबजाम ऊडवून पुन्हा एकदा आवराआवर करुन गडदर्शनासाठी बाहेर पडलो. सुरुवात करायची होती ती १०-१५ मिनिटावर असलेल्या भोराईदेवी मंदिरापासुन.

भोराईदेवी मंदिर

भोराईदेवी मंदिर

भोर संस्थानाची कुलदैवत भोराईदेवी

चिमाजीआप्पा यांनी पोर्तुगीजांशी झालेल्या युद्धातून आणलेली घंटा

मंदिरातील पुजारी श्री. खंडागळे

मंदिर परिसरातील विरगळ

इतस्ततः विखुरलेल्या काही भग्न मूर्ती

पाषाणातील हनुमान मूर्ती

पाषाणातील हनुमान मूर्ती

देवीचे दर्शन घेऊन गड फिरायला निघालो. समोरच दृश्य अवर्णनीयच. आजुबाजुच्या हिरव्या निसर्गाशि एकरुप होण्यासाठी जणु काही ढग खाली ऊतरुन आले होते.

नभं उतरू आलं

नुकत्याच झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने हिरवं गवत भूई फोडून वरती आलं होत आणि आसमंत न्याहाळत होत. विविध प्रकारची फुल, पानं आपापले वेगळपणं जोपासत सृष्टीची सुंदरता वाढवत होती. काही ठिकाणी अगदी लहान आकारात असलेली अळंबी झूम्म्म्म केल्यावर खासच दिसत होती.

हिरवा गालीचा

फुलं

फुलं2

फुलं3

फुलं४

हिरवी पानं

हिरवी पानं २

हिरवी पानं ३

अळंबी

अळंबी 2

ही सगळी सृष्टीची किमया पहात एकीकडे गड भटकंती चालू होतीच. सुधागड म्हणजे भोर संस्थानची राजधानीच जणू त्यामुळे गडावर ब-याच पडक्या इमारती, बांधकामं, तलाव, बुरुज, तट्बंदी, चोरवाटा, पाण्याची टाकी शिल्लक आहेत.

तलाव व इतर पडक्या इमारती

पडक्या इमारती

आणखी एक तलाव

लाटा

डबक्यात पोहोणारा कुत्रा

हे सर्व पहात गडाचा मुख्यदरवाजा पहायला गेलो हा दरवाजा म्हणजे रायगडाच्या महादरवाजाची प्रतिकृतीच. भोराईमंदिरापासुन २०-२५ मि. खाली ऊतरुन गेलो कि ह्या दरवाज्यापाशी पोहोचतो. या दरवाज्यावरील शिल्प, दरवाजाची रचना, दोन्हि बाजुचे अजस्त्र बुरुज पाहुन रायगडाच्या महादरवाजाची आठवण न झाली तर आश्चर्यच.

रायगडाच्या महादरवाज्याची प्रतिकृती असलेला सुधागडाचा महादरवाजा

दरवाजावरील शिल्प

महादरवाजा प्रवेश रचना

गोमुखी बांधणीचा महादरवाजा

महादरवाज्याचे बुरुज

पाण्याचे टाके

आणखी एक चोर दरवाजा

गडाच्या तटबंदीच्या बाहेर उघडणारा चोर दरवाजा

अशात-हेने गड भटकून झाल्यावर १२-१२.३० ला पुन्हा आमच्या "वाड्यावर" आलो. लगेच भात लावला आणि एकीकडे कांदा-बटाटा रस्स्याची तयारी केली. भात, कांदा-बटाटा रस्सा, पापड, लोणचं, लसणाची चट्णी असा बेत हाणल्यावर, आवराआवर करुन २-२.३० च्या सुमारास गडावरुन प्रस्थान ठेवले. निघताना आजीबाईंना दह्या-दुधाचे पैसे द्यायला गेलो तर आजीबाई पैसे घ्यायला काही तयार नाहीत. त्यापेक्षा तुमच्याकड्चा ऊरलेला शिधा द्या म्हणाली मग आम्ही देखील आमचा सगळा शिधा तिला देऊन टाकला. आजी खुश एकदम. आजीला म्हटले तुझा छान फोटो काढतो जरा हस कि तर म्हणाली "दात राहिले नाय बा आता फोटू काढुन काय ऊपीग". तरीही फोटो काढुन तिला दाखवलाच, जाम खुश झाली. "आठवण ठेवा रे बाबांनो" अस काही बाही बोलली आणि आतमध्ये निघुन गेली.

आजीबाई

आजीबाईंचा निरोप घेऊन आम्ही देखील परतीच्या प्रवासाला लागलो.

स.भा.

गुलमोहर: 

छान!!!

Sabha,

गडाचा ईतिहास छान सांगितलात !!

सुधा गडावर एकदाच गेलोय ते सुद्धा १९८९-१९९० च्या दरम्यान !! त्याला आता २२- २३ वर्ष झाली !!

त्यावेळी जाणवलेली गोष्ट ,

गडाचा महा दरवाजा कातळ फोडुन काढलेला दिसतो.

मला प्रर्कशाने जाणवलेली गोष्ट म्हणजे महा दरवा जा च्या बाजुला असलेल्या कातळाच्या भिंती हाताने

तासलेल्या आहेत. अगदि अस वाटत कि काही तरी प्रोसेस करुन कातळ कोरलेला आहे.

सुधागडा वर मबो वरील बरेच लोक जाउन आले असतील, कोणाला त्या बद्द्ल माहिती असेल तर ह्या वर

जाणकारांनी प्रकाश टाकावा !!

मस्त फोटो आणि वर्णन ,
तुम्हा लोकांचं कौतुक वाटतं गडावर जाऊन तुम्ही सुगरणीसारखा स्वयंपाक ( गुलाबजामुन , पुलाव) केलात , धन्य आहे रे बाबांनो.

जबरदस्त झाली की भटकंती. Happy
फोटोही सुंदर. तुमच खास कौतुक ह्यासाठी की सगळा शिधा नेवुन सगळ रांधलत. Happy

सुंदर फोटो आणि वर्णन दोन्ही.

दोन वेळा पाच्छापुरला जायचा योग आला होता. माझ्या चुलत दिराच्या बायकोचे हे गाव. त्यांनी तिथेच लग्न लावले होते. तेंव्हा भर उन्हाळा असल्याने परत पाच्छापुरचे नाव काढायचे नाही असे अनुभवातून प्रत्येकाच्या तोंडी होते. रस्ते पण इतके डेंजर. रस्त्याच्या कडांना सापांची वारुळ. रखरखीत उन. सगळ तेंव्हा भयानक होत. पण तुमचे हे फोटो पाहून तिथला पावसाळ्यातला निसर्ग समजला धन्यवाद. आता पावसात एकदातरी तिथे जाऊन येणार.

खरच 'रम्य सफर' आहे... सुंदर अनुभव Happy
प्रचि आणि वर्णन आवडलं. बरेच जण हा ट्रेक एका दिवसात आटोपतात... तुमचा अनुभव वाचून दोन दिवसांचा ट्रेक करायची इच्छा झाली आहे.

मस्त फोटो आणि वर्णन ,
तुम्हा लोकांचं कौतुक वाटतं गडावर जाऊन तुम्ही सुगरणीसारखा स्वयंपाक ( गुलाबजामुन , पुलाव) केलात , धन्य आहे रे बाबांनो. >>>> +१००

व्वा! प्रचि, माहिती आणि वर्णन सर्वच सुंदर. आणि गुलाबजाम तर तोंपासू. Happy
सगळे फ़ोटो पाहून मी कोकणात फ़िरतेय असंच वाटल. खूप दिवसानी, हिरवागार निसर्ग, कौलारू घर, जळाऊ लाकडांची बेगमी हे पहायला मिळालं. धन्यवाद!.
तुम्ही बरोबर शिधा नेऊन, गुलाबजाम सुद्धा केलेत, आणि उरलेला सगळा शिधा त्या आजींना दिलात शाब्बास! Happy

अतिशय सुरेख फोटोग्राफ्स
कांदेपोहे, पापड हे कॉम्बिनेशन वेगळं आहे पण आवडलं.
गुलाबजाम चा फोटो पाहून, पोटात भुकेची जाणिव झाली. Happy

तुमचा अनुभव वाचून दोन दिवसांचा ट्रेक करायची इच्छा झाली आहे. >> इंद्रा +१

मस्त फोटु ... तो महादरवाजा भन्नाट आहे ... Happy

अरे !!

महाराष्ट्राच्या गडा - गडा वर फिरणार्या जाणकारांनो

यो रॉक्स, रोहित .. एक मावळा !!

कोणी तरी सांगा ?

महा दरवाजा प्रवेश रचना , आणि गोमुख बांधणीचा महा दरवाजा ह्या प्रची त दिसणार्या भिंती कातळ
कोरून केल्या आहेत का ?

महा दरवाजा प्रवेश रचना , आणि गोमुख बांधणीचा महा दरवाजा ह्या प्रची त दिसणार्या भिंती कातळ
कोरून केल्या आहेत का ? >> किल्ले बांधणीच्या शास्त्रात रणमंडळ, चक्राकार किंवा गोमुखी बांधणीचे दरवाजे प्रचलित होते. शिवकालीन राजवटीत गडावरील चिरा वापरून दरवाजे बनविण्याचे तंत्र विकसीत होते. तर शिलाहार कालीन दरवाजां मधे चुना न वापरता दगडांची विशिष्ट पद्धतीने रचना करुन दरवाजा बांधणी केलेली पहावयास मिळते.