Submitted by सुप्रिया जाधव. on 12 July, 2012 - 02:30
बोलण्याने बोलणे वाढेल ना...
अंतरीचा भाव तो ताडेल ना !
या मनाचा भरवसा दयावा कुणी....
हे कुणावरही कधी भाळेल ना !
याचसाठी शांत मी बसते अशी...
व्यक्त होता अर्थ भांबावेल ना !
वास्तवाला सांग या गाडू कुठे...
आठवांचा ओघ भंडावेल ना !
उत्तराने संपतो का प्रश्न हा...
प्रश्न जगण्याचाच रेंगाळेल ना !
-सुप्रिया.
गुलमोहर:
शेअर करा
याचसाठी शांत मी बसते
याचसाठी शांत मी बसते अशी...
व्यक्त होता अर्थ भांबावेल ना !
वास्तवाला सांग या गाडू कुठे...
आठवांचा ओघ भंडावेल ना !>>>
वा वा
===========
चित्तरंजन भटांची 'बोलण्याने बोलणे वाढेल आता' आठवली
गझल छान झाली आहे
बोलण्याने बोलणे वाढेल
बोलण्याने बोलणे वाढेल ना...
वास्तवाला सांग या गाडू कुठे...
उत्तराने संपतो का प्रश्न हा...
>> या तीनही ओळी प्रचंड आवडाल्या
चित्तरंजन भटांची 'बोलण्याने
चित्तरंजन भटांची 'बोलण्याने बोलणे वाढेल आता' आठवली
हेच म्हणतो.
एकंदर गझल ठीक आहे. पण एखाद्या प्रसिद्ध गझलेतली एखादी ओळ (तरहीसारखी) उचलू नये असे माझे वैयक्तिक मत आहे. संपूर्ण गझलेचे कॉपीराईट घेता येते, नुसते एखाद्या ओळीचे / कल्पनेचे घेता येत नाही- या गोष्टीचा गैरफायदा घेतला जाऊ नये असे मला वाटते.
यावर "शब्दांवर कोणाची मालकी नसते / एक ओळ अनेकांना सुचू शकते / मिसरे टकराना" इत्यादि प्रतिवाद करता येईल आणि माझा वरील मुद्दा सहज खोडून काढता येईल याची मला कल्पना आहे. मात्र असे करावे किंवा नाही हा निर्णय प्रस्तुत कवयित्रीने घ्यायचा आहे.
याचसाठी शांत मी बसते
याचसाठी शांत मी बसते अशी...
व्यक्त होता अर्थ भांबावेल ना !>> अगं, काय मस्त आहे हा शेर... 'व्यक्त होता अर्थ भांबावेल ना' वाह!!
ज्ञानेश, सुप्रियांना ती
ज्ञानेश, सुप्रियांना ती चित्तंची गझल माहीत आहे की नाही हेही विचारायला हवे असे मला वाटते.
<<<<ज्ञानेश, सुप्रियांना ती
<<<<ज्ञानेश, सुप्रियांना ती चित्तंची गझल माहीत आहे की नाही हेही विचारायला हवे असे मला वाटते.>>>>
हे बेफींच्या पोस्टवरुनच कळाले मला.....
ज्ञानेशजी,
आपल्या मतांचा आदर करते मी पण आपल्यातील प्रत्येकाने दुस-यांच्या भावनेचाही योग्य आदर राखून प्रतिसाद द्यावा ही ढोबळ अपेक्षा...
<<<< एक ओळ अनेकांना सुचू शकते >>>>
हेच आणी फक्त हेच घडले आहे इथे.
कॄ.गै.न.
लोभ असावा,
-सुप्रिया.
आपल्या मतांचा आदर करते मी पण
आपल्या मतांचा आदर करते मी पण आपल्यातील प्रत्येकाने दुस-यांच्या भावनेचाही योग्य आदर राखून प्रतिसाद द्यावा ही ढोबळ अपेक्षा...>>>
यात काही विशेष नाही सुप्रिया. चित्तंची ती गझल बहुश्रुत व प्रसिद्ध गझल आहे. ती तुम्हाला माहीतच असणार असे ज्ञानेश यांना वाटणे हे सहज शक्य आहे.
असो!
एकच ओळ अनेकांना सुचू शकते, हे
एकच ओळ अनेकांना सुचू शकते, हे मी आधीच मान्य केले आहे. तसे झाले असल्यास माझा वरचा प्रतिसाद प्रस्तुत रचनेच्या संदर्भात आपोआपच गैरलागू ठरतो.
सुप्रिया यांनी चित्तरंजन यांची ती गझल वाचलेलीच नसल्याने माझा आधीचा प्रतिसाद रद्द समजावा. कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही, तसे झाले असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो.
या मनाचा भरवसा दयावा
या मनाचा भरवसा दयावा कुणी....
हे कुणावरही कधी भाळेल ना !
याचसाठी शांत मी बसते अशी...
व्यक्त होता अर्थ भांबावेल ना !
>>
वा वा
सुंदर
माझा आधीचा प्रतिसाद रद्द
माझा आधीचा प्रतिसाद रद्द समजावा.>>>>>>>>>>असे कसे समजायचे ?
सुप्रिया यांनी चित्तरंजन यांची ती गझल वाचलेलीच नसल्याने >>>>>>>>>>> या बाबीचा विचार करायचाच कशाला माहीत असो नसो काय फरक पडतो (मलतरी नक्कीच नाही पडत !!)??
...पडतो असे का वाटते लोकाना ?(...........हा मला पडलेला साधाभोळा प्रश्न आहे !)
दुखावण्याचा हेतू नाही, तसे झाले असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो.>>>>हे अम्हाला आधीपासूनच माहीत आहे दिलगिरी व्यक्त करावे असे काही नाहीच आहे यात ज्ञानेश जी
बेफीजिना ती आठवण झाली ती अगदी सहज झाली असणार( नेहमीप्रमाणे............:) !!)यावर सुप्रियाज्याताईन्नी ही ओळ चित्तजीन्च्या गझलेतूनच घेतलीय असा निष्कर्ष काढता येतो हे मान्य पण तो बरोबर आहेच का हे आपण कसे ठरवायचे ?
मला वाटते एक वाचक म्हणून मी ही रचना कुणाची आहे हे न पाहता ती काय आहे हे पाहिले पाहिजे /ती कशी आहे हे ठरवले पाहिजे .....नै का ?
बाकी कॉपीराईटचा जर विषय(वाद) असेलच तर तो सुप्रियाताई अन् चित्तजी यानी आपापसात चर्चिला पाहिजे असे मला वाटते ...........
आपण फक्त आपल्या ताटात वाढलेल्या गझलेचा आस्वाद घेवूया ... नै का ?
ज्ञानेशजी :तुम्हाला दुखावण्याचा माझा हेतू नाही...........नव्हता ...कधीही नसणार आहे...कृपया याची खात्री बाळगावी!!
_____________________________________________________-
सुप्रियाताई :गझल बेहद आवडली
दोन दिवस झाले मी पाहतोय माबोवर खूप मस्त मस्त गझला येवू लागल्यात
ज्ञानेशजीन्ची असो की देवसरान्ची ..अगदी माझी गझल पण मला आवडू लागलीय आताशा !!
तुमची ही गझलही खूप खूप आवडली
मला तर बुवा या गझलेवरून ती तरही आठवली जिच्यात तुमचा , ....जीव ओवाळून टाकावा असा शेर होता
सांगताना सांगते आहे बरी
बोलण्याची ही प्रथा आहेच ना !!
(............आठवला तसा लिहिलाय चुकल्यास क्षमस्व!!)
या वरून आठवलं सुप्रियाताई ...............कशा आहात ??
वास्तवाला सांग या गाडू
वास्तवाला सांग या गाडू कुठे...
आठवांचा ओघ भंडावेल ना !
उत्तराने संपतो का प्रश्न हा...
प्रश्न जगण्याचाच रेंगाळेल ना !>>>>>>>>>सुंदर.
याचसाठी शांत मी बसते
याचसाठी शांत मी बसते अशी...
व्यक्त होता अर्थ भांबावेल ना !...सुंदर
गझल छान
सुंदर.........
सुंदर.........
<<<<तसे झाले असल्यास मी
<<<<तसे झाले असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो.>>>>
नाही ज्ञानेशजी, याची खरच गरज नाहीय.
गझलेतील मात्रांचे, वृतांचे कित्येक धडे मी आपल्याकडूनच गिरवले आहेत.
मात्र हा मिसरा खरोखर मला असाच सुचला आहे.
धन्यवाद!
-सुप्रिया.
याचसाठी शांत हल्ली
याचसाठी शांत हल्ली राहते...
व्यक्त होता अर्थ भांबावेल ना !
हा शेर आवडला.
समकालीन गझलकारांच्या रचना सर्वांनीच वाचत रहाव्यात, त्यावर चिंतन करावे... शक्यतो जमीनसुद्धा सारखी नसावी ह्याचीही काळजी बरेच गझलकार घेताना दिसतात.
सुप्रिया, हे असे बर्याचदा सहजच होते. माझा एक शेर आहे
ज्या क्षणास मानतो तिमीर हाच सोबती
मागणे नसूनही उजेड कोण धाडतो
ह्यातला पहिला मिसरा चित्तरंजन ह्यांच्या अजून एका शेराशी साधर्म्य सांगणारा आहे. चित्त ह्यांचा शेर बघा,
ज्या क्षणास आपले ऋणानुबंध संपले
वाटले किती भकास वाटले बरे किती
रुखरुख नसावी.
धन्यवाद!
गझल छान
गझल छान आहे...
अवांतर-
"कुसुमाकरचा जाने.२०१२ गझल विशेष अंक "... मला वाटतं ज्यांच्या ज्यांच्या गझला यात आहेत त्या सगळ्यांकडे हा अंक प्रकाशकांनी तेंव्हाच पोहचवलेला आहे..
आपल्याही गझला यात असल्याने आपल्याकडेही हा अंक असावा असे वाटते... त्यात चित्तरंजन भटांची..
"बोलण्याने बोलणे वाढेल आता" पान नं. ५३.................... नक्की वाचून पहा.
पु.ले.शु !
...............................शाम
शामजी चान्गली माहिती हे
शामजी चान्गली माहिती
हे कुसुमाकर नियतकालिक कसे उपलब्ध होईल?
त्याची वार्षिक वर्गणी...इत्यादीबाबत मला माहिती द्याल का ?
हे नियतकालिक घरपोच मिळते का ?
अशी अजूनही गझलेला वाहिलेली काही नियतकालिके असल्यास मला कळवाल का?
आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहे
आपला नम्र
गझलजिज्ञासू..........
वैवकु
शामराव , बहुमुल्य
शामराव ,
बहुमुल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
नानुभाऊ,
बागेश्री,
रीया,
वै व कु,
शोभा१२३ ,
बेफीजी, विदिपा,....(विशेष),
<<<समकालीन गझलकारांच्या रचना सर्वांनीच वाचत रहाव्यात, त्यावर चिंतन करावे... शक्यतो जमीनसुद्धा सारखी नसावी ह्याचीही काळजी बरेच गझलकार घेताना दिसतात.>>>>
नेमके हेच राहुन गेले आहे....गझल हेच एकमेव व्यक्त होण्याचे माध्यम मिळाले नि जमेल तशी लिहीत गेले....गझलेकडॅ अशा अभ्यासक वृत्तीने पहायची मनस्थितीच नव्हती आजवर....
असो,
या पुढे नक्कीच प्रयत्नशिल राहीन.
अरविंदजी,
मनःपुर्वक आभार.
-सुप्रिया.
सुप्रियाताई, मलाही गझल वाचून
सुप्रियाताई, मलाही गझल वाचून भटांची गझल आठवली. खयाल सारखा होणे, रदिफ, काफिया समान असणे वगैरे गोष्टी बर्याचदा घडतात. मलाही कित्येकदा एखाद्याचा शेर वाचून माझा शेर सुचला आहे. त्यात काही वावगं आहे अशातला भाग नाही. इथे मिसरा जवळपास तसाच्या तसा आला असल्यामुळे शंकेला वाव होता. पण बाकीची गझल बघता मिसरा उचलायची गरज तुम्हाला पडेल असं वाटत नाही. शिवाय एखाद्याने खरंच गझल वाचली होती की नाही हे कसं ठरवायचं हा मोठा प्रश्न आहे. हे शेवटी गझलेवरच्या निष्ठेवर सोडावं हे उत्तम..!
बाकी प्रस्तुत गझलेबद्दल सांगायचं तर
याचसाठी शांत मी बसते अशी...
व्यक्त होता अर्थ भांबावेल ना !
हा शेर आवडला..!
<<<<पण बाकीची गझल बघता मिसरा
<<<<पण बाकीची गझल बघता मिसरा उचलायची गरज तुम्हाला पडेल असं वाटत नाही.>>>>
धन्स अभिजीत
<<<<शिवाय एखाद्याने खरंच गझल वाचली होती की नाही हे कसं ठरवायचं हा मोठा प्रश्न आहे. हे शेवटी गझलेवरच्या निष्ठेवर सोडावं हे उत्तम..!>>>>
ये बात!....आणि प्रत्येकालाच 'मीच फक्त निष्ठावान आहे, बाकी सारे चोर!' असे वाटणेही सहज शक्य आहे...:-)
म्हणून निष्ठेचा प्रश्न ज्याचा-त्याच्यावर सोडणे उत्तम ...नाही का?
असो!
धन्यवाद अभिजीत.
-सुप्रिया.
माझे मत पुन्हा देत आहे. या
माझे मत पुन्हा देत आहे. या गझलेतील पहिली ओळ व चित्तरंजन भटांच्या त्या गजलेची पहिली ओळ हे साम्य आहे तरीही ती गझल सुप्रिया यांनी वाचली नसल्याची शक्यता माझ्या मनात आली होती. मात्र सुप्रिया यांची माझा मुलगा ही गझल माझी मुलगी या कवीवर्य निफाडकरांच्या गझलेप्रमाणे भासू शकते हे साम्य खटकण्यासारखे आहे.
सुप्रिया यांच्या इतर अनेक स्वरचित तसेच तरही जमीनीवरील स्वरचित गझला वाचल्यानंतर त्यांना असे करायची काहीच जरूर नसेल हे जितके पटते तितकेच 'जाणीवपूर्वक एखादी सुप्रसिद्ध ओळ, शेर, गझल, जमीन टाळायला हवी' हेही.
(बाकी या पातळीला मराठी गझल जाणे याचा अर्थ निफाडकर व चित्त यांच्या त्या त्या गझला विख्यात असल्याचे व मराठी गझलेत 'ही ओळ यांच्या ओळीसारखी वाटली' असे वाटण्याइतक्या गझला होत असल्याचे निदर्शक असावे)
धन्यवाद
-'बेफिकीर'!
बेफ़िकीर, सर आत्ता मनातला
बेफ़िकीर,
सर आत्ता मनातला प्रतिसाद दिलात आपण....
<<<<मात्र सुप्रिया यांची माझा मुलगा ही गझल माझी मुलगी या कवीवर्य निफाडकरांच्या गझलेप्रमाणे भासू शकते हे साम्य खटकण्यासारखे आहे.>>>>
या गझलेबद्दल संबधितांशी सविस्तर चर्चा झालेली आहे बेफीजी, 'माझा मुलगा' पोस्टायच्या आधी 'प्रेरणा-माझी मुलगी' असे प्रत्येक समुहावर (अपवाद- सुरेश भट् इन) नमुदही केलेले होते मी जुनी मुरदी उखाडून जर निकष काढायचे असतील अन चर्चा वाढवायचीच असेल तर माझा नाईलाज असेल...
असो.
-सुप्रिया.
जुनी मुरदी उखाडून जर निकष
जुनी मुरदी उखाडून जर निकष काढायचे असतील अन चर्चा वाढवायचीच असेल तर माझा नाईलाज असेल...>>>
तुमची आणि माझीही प्रत्यक्ष चर्चा झालेली होती. तेव्हाही माझे मत इतकेच होते की कोणीही तशी गझल करू शकतोच. येथे मला फक्त इतकेच म्हणायचे होते की तुमच्यासारख्या गझलकाराला ह्याची गरज नसते, त्यामुळे उगाच चर्चा होत राहते.
असो
<<<<तुमच्यासारख्या गझलकाराला
<<<<तुमच्यासारख्या गझलकाराला ह्याची गरज नसते, त्यामुळे उगाच चर्चा होत राहते. >>>>
सर,
या गझलेबाबात जे मी केलेच नाहीय त्याची गरज मला भासेलच कशी?
आणी चर्चेचे म्हणाल तर करु देत की, कुणी कितीही चर्चा इथे अथवा कुठेही केली तरी जे सत्य आहे ते सत्यच राहिल, हो न?
असो!
-सुप्रिया.
मित्रांनो, वरच्या चर्चेत बरेच
मित्रांनो,
वरच्या चर्चेत बरेच स/नकारात्मक मुद्दे आले आहेत. मला येवढेच नमूद करवेसे वाटते.
१) एखाद्या गझलेचा कॉपीराईट असू शकतो (असावाच) पण एखाद्या ओळीचा,शब्दसमूहाचा कॉपीराईट
कसा असू शकेल? उदा:
रात अर्धी अजुन बाकी कां तरी
चंद्र आता मावळाया लागला
यातील दुसरा मिसरा मा.सुरेश भटांकडून 'घेतला' आहे असे म्हणता येईल का?हा मिसरा
(शब्द्समूह) जरी मा.सुरेश भटांमी लिहला असला आणि या शेरात तो तसाच्या तसा आला
असला तरी ही कल्पना या शेराच्या कविची आहे. त्यामुळे हे 'चौर्य' कदापि नाही. असे असते तर चंद्र
आता मावळाया लागला' नंतर कोणालाच वापरता आला नसते.अर्थात ज्यानी ही ओळ आधी वाचलेली
आहे त्यांना ती आठवणे साहजिक आहे.
२) तरी सुद्धा सुप्रियाने आपले गझलांचे वाचन वाढवणे, निदान ज्येष्ठ व नामांकित गझलकारांच्या रचना
तरी वाचलेल्या असणे, अनिवार्य आहे.कारण अगदी सारखा मिसरा सुचला तर शक्य असल्यास त्यात
आशयाला धक्का न लावता एखादा छोटा बदल केल्यास पुनरावृत्ती व त्यातून उद्भवणारे वरील
प्रकारचे वाद टाळता येतील.
जयन्ता५२