मला प्रेमात आताशा पडावे वाटते आहे

Submitted by वैवकु on 11 July, 2012 - 04:27

कधी घडलेच नाही ते घडावे वाटते आहे
मला प्रेमात आताशा पडावे वाटते आहे

जरी हे एकटे आयुष्य मी उजवे म्हणालेलो
खरे सांगू.. तिला भेटून डावे वाटते आहे

जशी माझी गझल हल्ली तिच्या ओठात बागडते
तिने गझलेत माझ्या बागडावे वाटते आहे

जगालेखी तिचे-माझे नसावे वेगळे काही
तिच्या 'असण्यात'.. माझे सापडावे वाटते आहे

कसा रडलोय माझ्या विठ्ठलासाठी ..मला माहित
तिच्यासाठी तसे धो-धो रडावे वाटते आहे

मला बोलायचे नव्हते तरी बोलून गेलो मी
म्हणाले मौन माझे .."बडबडावे वाटते आहे !!"

__________

मला बोलायचे नव्हते तरी...........
बोलून गेलो मी ...................!!

गुलमोहर: 

सुंदर..मात्र,

कसा रडलोय माझ्या विठ्ठलासाठी ..मला माहित
तिच्यासाठी तसे धो-धो रडावे वाटते आहे
हे शेवटी यायला हवे असे वाटले.

सृष्टी ,योगुली ,भारतीताई धन्यवाद

@भारतीताई
अपले मत वाचले .या प्रान्जळ मताबद्दल धन्यवाद ताई

माझे मत विस्ताराने सांगतो पण आपल्या 'विचारपूस' मध्ये
जरूर वाचावे ..........
धन्यवाद !!

वैभवजी! गझल छान आहे.
मतला सुंदर आहे.
दुसरा शेरही सुंदर आहे. पण सानी मिस-याचा अर्थ उलटा घेतला जाण्याचा धोका जाणवला.
असे केले तर तो धोका टळू शकतो.........

जरी हे एकटे आयुष्य मी उजवे म्हणालेलो;
खरे तर ते.......तिला भेटून डावे वाटते आहे!
तिसरा शेर.....खयाल सुंदर
तिसरा शेर अजून सुंदर करता येवू शकतो...........तो असा..........

तिच्या ओठांवरी माझी गझल रेंगाळते आहे!
तिला गझलेत माझ्या बागडावे वाटते आहे!!

चौथा शेर अजून स्पष्ट व सुंदर होवू शकतो...........तो असा...........

मला वाटे तिचे-माझे नसावे वेगळे काही;
तिच्यामध्ये मला, “मी” सापडावे वाटते आहे!

पाचवा व सहावा शेर..........छान!
..........प्रा.सतीश देवपूरकर
.................................................................................................

जगालेखी तिचे-माझे नसावे वेगळे काही
तिच्या 'असण्यात'.. माझे सापडावे वाटते आहे

मला बोलायचे नव्हते तरी बोलून गेलो मी
म्हणाले मौन माझे .."बडबडावे वाटते आहे !!"

शाब्बास!!

कणखरजी : तुमच्याकदून शाबासकी मिळाली हे पाहून खूप आनन्द होत आहे धन्यवाद

जितूभाय : थॅन्क्स यार ...............थॅन्क्स!! तूने सहीसही पेहचाना मेरे भाई !!

देवसर : मी आपला खूप खूपआभारी आहे
तुमचे पर्यायी शेर मला खूप आवडले ............तीन्हीही!!

'डावे'चा पर्यायी बर्‍यापैकी उजवा झालाय यात शन्का नाही ....'ते' हा शब्द मूळ शेरात अव्यक्त होता आपण तो बरोब्बर 'खोदून' काढलात ...............आगदी !!

'बागडावे' च्या शेरात मूळ शेरातली पहिली ओळ मला जास्त रोंमॅन्टि़क वाटते आहे ;शिवाय मूळ शेर 'मला काय वाटते आहे ते'... सांगतो .पूर्ण गझलेत मी हेच सूत्र पाळले आहे .(शेवटच्या शेरात अपवाद !....इथे माझे मौन मला काय म्हणाले ते सान्गितले आहे मला काय वाटते ते मात्र इथे सान्गितलेले नाही तरी तरी पहिल्या ओळीत ते व्यक्त होते आहे असे मला वाटते !)...तुम्ही दिलेल्या दुसर्या ओळीत हे सूत्र पाळले जात नाही नाही आहे असे आवर्जून नमूद कारावेसे वाटते.

'सापडावे'च्या शेरात तुम्ही सुरुवात 'मला वाटे..... ."अशी केलीत ती मूळ शेराशी ; तसेच त्या ओळीत आपण जे सांगत आहात ते दुसर्या पर्यायी ओळीशी विसंगत आहे असे मलातरी जाणवले तसेच मूळ शेर जगाला उद्देशून आहे जागाला तिच्या असण्यात =अस्तित्वात ...माझे असणे =अस्तित्व ....सापडावे.........इथे "जगाला सापडावे " (जगाला =तुमच्या पद्धतीने सान्गायचे झाल्यास कीवर्ड !!) असे मला वाटते असे मी म्हणत आहे !! मला मी सापडावे.......... असे म्हटल्यास तितकी मजा येणार नाही नै का ?

असो शेर म्हणून ते तिन्हीही सुंदरच आहेत

अजून एक : मला तरी माझ्या कोणत्याही मूळ शेरात बदल करावा अशी आवश्यकता भासत नाही आहे
आपला पहिला पर्यायी शेर तेवढा सूट होतो आहे मूळ शेराशी पण 'मुळा'त बदल करावा अशी कोणतीही नेमकी गरज मला इथे जाणवली नाही .(.........अजूनतरी )

तथा माझे मूळ शेर आहेत तसे ठेवतो आहे

पुनःश्च धन्यवाद सर

आपला कृपाभिलाषी
वैवकु