मी पाहिला एक " कारगील हिरा"

Submitted by विक्रमसिंह on 10 July, 2012 - 02:34

गेल्या आठवड्यात एका व्यक्तिला आमच्या कंपनीत भाषण द्यायला बोलावल होत.

केवळ अप्रतीम व अविस्मरणीय अनुभव.
एक साधासा दिसणारा माणूस. पण ४५ मिनिटे नुसते खिळवून ठेवले.
अंगावर काटे येणे, रक्त सळसळून उठणे, आणि भावनांमुळे डोळे भरून येणे हे सर्व एकाच वेळी अनुभवले.

त्याच नाव . परमवीर चक्र विजेता नायब सुभेदार योगेंद्र सिंग यादव.

कारगील युद्धात दाखवलेल्या अतूलनीय शोर्या साठी त्यांना १९९९ साली परम वीर चक्र या सर्वोच्च पदकाने सन्मानीत करण्यात आले. त्यांच्या बद्दल माहितीजालावर जी माहिती उपलब्ध आहे. ती काही मी देत नाही.
yogendra_singh_yadav.JPG
हा माणूस उत्तरप्रदेश मधला. वडिल सैनिक. लहानपणा पासून वडिलांच्या तोंडून ऐकलेल्या युद्धकथांमुळे सैन्यात जायचा निर्णय. केवळ १६ वर्षे आणि ५ महिने वय असताना सैन्यात भरती. दोन वर्षांच्या प्रशिक्षणा नंतर तुकडीत दाखल. ५ मे १९९९ ला लग्न. २० मे १९९९ रोजी सैन्यात परत रूजू झाल्यावर लगेचच त्यांच्या तुकडीची निवड आघाडीवर कारगील युद्धात जाण्यासाठी. येथे ते सांगतात, ध्यानी मनी नसताना आमच्या तुकडीला आघाडीवर पाठवण्यात आल. लग्नाच्या रजेवर असताना त्यांना एक स्वप्न पडल होत. कुणीतरी भारतीय झेंडा घेउन पळतय म्हणून. आई म्हणाली काही नाही रे, उगाचच असेल. पण तो एक संकेत होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे त्यांच्या हातून घडायच होत हे देवाच्या मनात होत.

जूनच्या सुरूवाती पासून आपण पाकिस्तानी घूसखोरांना हटवण्याचा प्रयत्न करत होतो. सुरूवातीला फक्त घूसखोर आहेत अस वाटल. त्यामुळे फक्त लोकल पलटणीचे ऑपरेशन असे त्याचे स्वरूप होते. आधी बोफोर्स किंवा हवाई हल्ले का केले नाहीत अस विचारता ते म्हणाले , जोपर्यंत यात पाकिस्तानी सेनेचा हात आहे हे कळले नव्हते तो पर्यंत ऑपरेशन लोकल लेव्हल पर्यंत ठेवण्या शिवाय पर्याय नव्हता. यात चूक झाली असती आणि मोठे युद्ध भडकले असते तर त्याचे खापर आपल्यावर आले असते.

पाकिस्तानी घूसखोर मोक्याच्या जागी असल्याने आपली सुरूवातीला अपरिमित हानी झाली. टायगर हिल जिंकल्या शिवाय घूसखोरांना हूसकावून लावण अशक्य होत. अशा दोन अपयशी चढायांनंतर पुन्हा जेंव्हा चढाईचा निर्णय घेतला गेला तेंव्हा वेगवेगळ्या ठिकाणांहून ५-५ जवान निवडून एक २८-३० जणांची तुकडी बनवण्यात आली. तिच नाव " घातक." यातील ७ जणांची निवड टायगर हिलवर जाण्यासाठी झाली. त्यात योगेंद्र सिंग होते. ते म्हणतात , ही नियती.

जवळपास ७२ तास प्रवास करून (रात्री प्रवास दिवसा लपून विश्रांती.) काहिही न खाता ती २८ जणांची तुकडी कारगिल हिलच्या पायथ्याशी पोचली. २५ मिटरचा उभा कडा ७ जणांचा तुकडीने दोरांच्या सहाय्याने पार केला. तेंव्हा सकाळ झाली होती.यातुकडीने आश्चर्यचकित झालेल्या पाकिस्तानी सैनिकांवर गोळीबार करून ७-८ जणांना यमसदनास धाडले. पण दोन जखमी सैनिक पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यांनी मागे जाउन वर्दी दिली, भारतीय फौज वर पर्यंत आली आहे पण त्यांचे सातच बंदे आहेत.

अर्ध्या तासात जवळपास ३० -३२ पाकिस्तानी जवानांनी तिन्ही बाजूंनी पुनः तुफानी हल्ला केला. आपले सातही वीर एका मागून एक गोळ्या लागून पडले. योगेंद्रना फिल्डपट्टी (त्यांचा शब्द) लावत असता त्यांचा नायक डोक्याला गोळी लागून पडला. ते लोक शिव्या देत होते , लाथा मारत होते. आपली एक मिडियम मशिन गनची पोस्ट खाली होती. त्यावर हल्ला करण्याची आखणी ते करत होते.

योगेंद्र म्हणाले, " सगळे पडल्यावर दोन सैनिकांनी पुढे येउन आपल्या प्रत्येक सैनिकाला पुनः गोळी मारली व ठार केले. त्यातल्या एकाने माझ्या पायात गोळी मारली हातावर गोळी मारली. शेवटी छातीवर गोळी मारली. पॉईंट ब्लँक रेंज वरून. वरच्या खिशात असलेल्या पाकिटामध्ये ५ रुपयांच्या नाण्यांचा गठ्ठा होता त्यामुळे मी वाचलो. मी विचार केला येवढ होउन सुद्धा मी जर मेलो नाही तर मला आता मरण नाही. आपल्या खालच्या तुकडीचे प्राण वाचवलेच पाहिजेत या एका तीव्र जाणिवेने माझ्या अंगात त्याही परिस्थितीत हजार हत्तींचे बळ आले. जसा पाकिस्तानी सैनिक मला गोळी घालून मागे वळला, तसा मी माझ्या पाठी असलेल्या ग्रेनेडमधली पिन काढली व तो त्याच्यावर भिरकावला. काय होतय हे कळायच्या आत तो ग्रेनेड फुटला व तो सैनिक माझ्या अंगावर गतप्राण होउन पडला. त्याची गन माझ्या हाताशी आली. त्याने मी अंदाधूंद फायरिंग चालू केले. पाकिस्तानी सैनिकांमध्ये हाहा::कार माजला. त्यांना वाटले आधी कोणी जिवंत नव्हता, भारतीय फौज जास्ती संख्येने वर आली आहे. मागे न बघता ते पळून गेले.

माझ्या मनात विचार आला , आता काहिही करून त्यांच्या पुढील हल्ल्याची आखणी आपल्या साथींना सांगायलाच हवी. माझा एक हात निकामी झाला होता. कपाळावर आणि नाकावर मोठी जखम झाली होती. पायात गोळ्या लागल्या होत्या. त्याही परिस्थितीत मी अजून कोणी माझ्या सारखाच जिवंत आहे का हे पाहिले, पण दुर्देवाने कोणी सर्वजण शहीद झाले होते. मग मी कसा बसा २५ मिटर खोल घळीतून घसरत, उलटा पालटा होत गेलो. माझ्या सहकार्‍यांना हाक मारली. त्यांना जेंव्हा मी पुढील येणार्‍या पाकिस्तानी हल्ल्याची बातमी सांगितली तेंव्हा मला माझे कर्तव्य पूर्ण झाल्या सारखे वाटले."

असा हा योगेंद्र नावाचा हिरा.

कार्यक्रमासाठी त्यांना बोलावल्यावर त्यांनीही लगोलग आढेवेढे न घेता यायच कबूल केल आणि ५ जुलैला आले देखिल. कुठल ही मानधन न मागता, हे विशेष. ते म्हणाले आता पर्यंत मी फक्त शाळा, महाविद्यालय व लष्करी संस्था येथेच गेलो आहे. कुठल्याही कंपनीने आतापर्यंत बोलावलेच नाही. तुम्ही प्रथम..

एकतीस बत्तीस वर्षाचा अगदी सर्व साधारण दिसणारा एक साधा सैनिक. मध्यम उंची, सैनिकी अंगकाठी. अत्यंत नम्र. भेटल्या भेटल्या मिठी मारून आलिंगन दिल. जस काही आम्ही लहानपणापासूनचे मित्र. परमवीर चक्र विजेता म्हणजे खरोखरचा सेलिब्रिटी. पण ग ची बाधा म्हणून नाही. कसलीही मागणी नाही की हट्ट नाहीत. आत्मविश्वास मात्र जबरदस्त. मलाच जरा काळजी वाटत होती कार्यक्रम कसा होणार म्हणून. केवळ यु ट्यूब वरचा विडीओ पाहून त्यांना बोलावले होते. दिसायला आणि वागायला अगदीच साधे व्यक्तिमत्व. वलय नाही.

पण एकदा त्यांनी बोलायला सुरवात केली , " साथियो" .आणि सगळ्यांना खिळवून सोडले. नाही, हलवून सोडले. पुनः सांगतो. अंगावर काटे येणे, रक्त सळसळून उठणे, आणि भावनांमुळे डोळे भरून येणे हे सर्व एकाच वेळी अनुभवले. केवळ अविस्मरणीय अनुभव. त्यांची शैलीही उत्कृष्ट. अक्षरशः आमच्या समोर युद्धभूमी उभी केली.

विनय इतका की भाषणाच्या शेवटी त्यांनीच आम्हाला सांगितल, अगदी मनापासून. निरागसपणे. देश तुमच्या मुळे घडतो. आम्ही काय , फक्त रक्षण करतो.

त्यांना एकाने विचारले, भ्रष्ट राजकारणी पाहिले तर तुम्हाला अस कधी वाटत नाही का, आपण कशाला येवढ लढ्तोय, कशा साठी. त्यांच उत्तर , मी सैनिक आहे, मी माझ कर्तव्य करतो . इतर काय करतात याच्याशी माझा संबंधही नाही आणि घेणही नाही. मी माझे कर्म इतरांवर का अवलंबून ठेवावे. कर्मयोग म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण.

कारगील युद्ध जेंव्हा झाल तेंव्हा हा माणूस केवळ १९ वर्षांचा होता. मृत्यूच थैमान आजूबाजूला चालू असताना , बरोबरचे सर्व सहा जण धारातिर्थी पडले असताना आणि स्वतःच्या शरिरावर गोळ्यांची बरसात झाली असताना देखिल एखादा सैनिक केवळ आपल्या पाठीमागच्या सहकार्‍यांना वाचवण्यासाठी अक्षरशः तळहातावर शीर घेउन कसा लढू शकतो याची कल्पने पलिकडली सत्यकथा म्हणजे योगेंद्र सिंग यांची गोष्ट. रम्य तर नाही पण प्रेरणादायक नक्कीच. त्यांनी जे केल त्यापलिकडे काहिच नाही हे नक्की. आणि मुख्य म्हणजे आपण जे काय करतो ते किती क्षुल्लक याची झालेली जाणीव.

आयुष्यात भेटलेली सर्वात संस्मरणीय व्यक्ति कोण मला कुणी विचारल तर मी नक्कीच सांगेन - योगेंद्र सिंग यादव. एक हिरा. अशी माणस पाहिली की विश्वास बसतो, मेरा भारत महान.

त्या युद्धात काय झाल हे तुम्ही त्यांच्याच शब्दात ऐका. सुदैवाने अशाच एका पूर्वी त्यांनी केलेल्या भाषणाची लिंक उपलब्ध आहे जी खाली दिली आहे. प्रत्येक भारतीयाने अवश्य पहावी व दुसर्‍याला दाखवावी. मला अस वाटल प्रत्येक मायबोलीकरानेही त्यांचे भाषण पहावे व इतरांना पहायला सांगावे म्हणून हा लेख प्रपंच.

http://www.youtube.com/watch?v=ZPADty-baFs

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खुप उत्सुकतेने हा लेख वाचायला घेतला, पण लगेच संपला, खुपच थोडक्यात लिहीलेत. थोडे विस्ताराने लिहीले असते तर वाचायला अजुन इंटरेस्ट वाढला असता.

तुनळीवर तर पाहणार आहेच परंतु शेअर केल्याबद्दल धन्यवाद

खुप उत्सुकतेने हा लेख वाचायला घेतला, पण लगेच संपला Sad

नायक सुभेदार योगेंद्र सिंग यादव अणि त्यांचे सहकारी (आपल्या सैन्य दलातील जवान) सर्वांना सलाम!!!

नताशा आणि प्रफुल्ल,

मी मुद्दाम जास्ती माहिती दिली नाही. एक तर ती माहिती जालावर सहज उपलब्ध आहे. माझ्या लेखाचा उद्देश तुम्ही सर्वांनी त्यांचा विडिओ पहावा येवढाच. तुमची उत्सुकता चाळवण्या येवढाच. Happy

अशी माणसे आयूष्यात एकदा जरी भेटली, तरी दुसर्‍याचे जीवन उजळून टाकतात.
इथे आणखी सविस्तर लिहायला हवे होते. ती क्लीप बघायला मिळेल का, याची शंका आहे.

क्लिप बघतेच आता! पण तुम्ही देखील मस्त लिहीले आहे!
अशी व्यक्तिमत्वं खरंच भेटायला हवीत अधून मधून! रोजच्या ढपलेल्या रूटीनमध्ये असा एखादा अड्रेनलिन रश देणारा दिवस येणं बरं असतं! Happy

परमवीर चक्र विजेता नायब सुभेदार योगेंद्र सिंग यादव यांच्या बहादूरीला सलाम. छान लेख. धन्यवाद एका चांगल्या व्यक्ती बद्दल माहीति दिल्यबद्दल.

वा विक्रमजी, फार छान माहिती दिलीत, नक्कीच ही लिंक बघेन.
या कर्मयोग्याचे उद्गार अंतःकरणात साठवून ठेवण्यासारखे आहेत.
परमवीर चक्र विजेता नायब सुभेदार योगेंद्र सिंग यादव व सर्व भारतीय जवानांना अनेक सलाम !!!

व्वा...विक्रम....

याला म्हणतात 'हिर्‍या' ची ओळख. लेखाचे शीर्षक काहीसे फसवे वाटल्याने (म्हणजे मी त्यावरून अंदाज केला एखाद्या अलंकाराविषयीचा लेख असावा) तो लागलीच पाहिला नव्हता. पण आज इथल्याच एका जालीय मित्राने अगदी फोनवरून 'मामा, नायब सुभेदार योगेंद्र सिंग यादवबद्दलचा हा धागा वाचा' असे सांगितल्यावर झटदिशी धागा उघडला... आणि खरंच सर्वार्थाने एका खर्‍याखुर्‍या हिर्‍याची ओळख झाली.

कंपनीत येऊन "देश तुमच्या मुळे घडतो. आम्ही काय , फक्त रक्षण करतो......" असे विनयशील उदगार काढणे हे योगेन्द्रजींच्या स्वभावाचा आणखीन् एक आदर्शवत असा पैलू. या वाक्यामुळे तुमच्या कंपनीतील कर्मचार्‍यांनाही अगदी भरून आल्यासारखे वाटले असेल यात संदेह नाही.

लिंकबद्दलही धन्यवाद.

अशोक पाटील

लेखाबद्दल आणि लिन्कबद्दल धन्यवाद.

<<रोजच्या ढपलेल्या रूटीनमध्ये असा एखादा अड्रेनलिन रश देणारा दिवस येणं बरं असतं! >> ++१

मस्तच... पण खरच जरा अजुन लिहील असतत तरी चालल असत.. हे म्हणजे लगेच संपल्यासारख वाटतय...
ईतका चांगला अनुभव अजुन ऐकावा वाटतोय...

योगेंन्द्र सिंग यांचा फोटो टाकल्या बद्दल अ‍ॅडमिन यांना धन्यवाद.

आम्हास दिसलेले योगेंद्र सिंग यादव. Happy
pvc maayboli.JPG

आजच्या कारगील दिना निमित्त सर्व शहिदांना आदरांजली.

बाणासिंग व संजयकुमार हे अजून दोघेच परमवीर चक्र विजेते हयात आहेत. व या दोघांनाही कारगील युद्धातील (वेगवेगळ्या) .शौर्याबद्दल परमवीर चक्र सन्मान मिळाला आहे.

एका दमात वाचला लेख! आता लिंक बघते!

धन्यवाद विक्रमसिंह!

कारगील दिना निमित्त सर्व शहिदांना आदरांजली!

लिंक बघितली! अंगावर काटा आला, कित्येकदा श्वास रोखला गेला, डोळे वाहु लागले!

भारतीय जवानांना धन्यवाद देऊ तेव्हढे थोडेच आहेत!

योगेंद्रांना सलाम !

आपल्या मायबोलीकरांना सुध्दा अशी संधी येईल जेव्हा अतिरेकी शहरात घुसतात. अंदाधुंद गोळीबार करतात. अश्यावेळी धैर्य दाखवुन थोडा प्रतिकार केला तर काय होईल ? अतिरेकी अश्या शहरात यायला घाबरतील. पिंपरी चिंचवड मध्ये जिंदा आणि सुखा या ज. वैद्य यांच्या मारेकर्‍यांना पकडुन देणारे सामान्य नागरीक होते. याच जिंदा व सुखा यांनी बँक लुटताना त्यांना प्रतिकार करणारे सामान्य नागरिक होते. माझ्या मते ( हे विधान सरसकट चुकही असेल ) या प्रतिकारामुळे पुण्यात अतिरेकी हल्ले फारसे झाले नाहीत. देशसेवा करायला सैनिकच होण्याची गरज नाही ; मात्र देशप्रेमी होण्याची गरज आहे.

Pages