सहप्रवास १

Submitted by भारती.. on 10 July, 2012 - 01:17

सहप्रवास -१

एकमेकांसाठी आपण असतो अर्थमय शक्यता
वादसंवादांच्या.आत्मप्रत्ययाच्या. सघन घटनांच्या.

देहाच्या उंबरठ्यावर उभे राहून आपण भेटतो एकमेकांना
प्रथम न्याहाळतो चेहरे,हाताची बोटे ,बोलण्याच्या लकबी
किती काळ भरकटतो एकमेकांच्या उपनगरांमध्येच
नंतर खोल पोचल्यावरही थांबतो गूढ बंद दारासमोर.
संदिग्ध. हाच गाभारा की ही अडगळीची खोली?

तरीही एकमेकांबरोबर चालताना आपण होत जातो विशाल
स्वत:च्या देहमनाइतकीच सवय करून घेतो दुसर्‍याची
उणिवाजाणिवांच्या गणिताचे उत्तर येते विस्तृत शून्य
तेव्हा नशा चढते आपल्याला सहसंवेदनेच्याच उन्मादाची
साध्य करायचे नसते काही?सिद्ध करायचे नसते?

आपण तसे तयारच असतो निरोप घ्यायला.भेटण्याचे ठरवायला.
पूर्ण चक्रावत जातो संबंधांच्या बंधनांबद्दल.
तंतुतंतू उसकतो व्यवहार भावना आणि अध्यात्माचे.
रस्तेरस्ते भ्रमतो चर्चा करत किंवा अश्रूंनी गदगदत
ओळीओळी शोधतो मधल्या कोर्‍या पानाशीही थांबत.

एकमेकांनंतर आपल्याला उरायचे असते एकएकटे.विधीसंकेतानुसार.
पृथक चरित्रउतरणीवर सांभाळत सम्यक अस्तित्वविस्तार.

भारती बिर्जे डिग्गीकर

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तरीही एकमेकांबरोबर चालताना आपण होत जातो विशाल
स्वत:च्या देहमनाइतकीच सवय करून घेतो दुसर्‍याची >>>>> यासारखी अनेक आशयघन वाक्ये आहेत या रचनेत.... पण जरा शब्दजंजाळामुळे (माफ करा - हे वै. मत - इतर कोणाला आवडेलही हे) समजून घ्यायला अवघड जातीये...

देहाच्या उंबरठ्यावर उभे राहून आपण भेटतो एकमेकांना
प्रथम न्याहाळतो चेहरे,हाताची बोटे ,बोलण्याच्या लकबी
किती काळ भरकटतो एकमेकांच्या उपनगरांमध्येच
नंतर खोल पोचल्यावरही थांबतो गूढ बंद दारासमोर.
संदिग्ध. हाच गाभारा की ही अडगळीची खोली? >>>>> हे देखील आवडलेच - पण वर म्हटल्याप्रमाणे जरा अवघडच जातंय.......

खूप आवडली... बरीचशी पटलीदेखील! Happy
एकमेकांबरोबर जगताना हे अनुभव थोड्याफार फरकाने असेच.
साध्य करायचे नसते काही?सिद्ध करायचे नसते? >> हा प्रश्नही अगदिच खरा... असेच तर असते की.
पृथक चरित्रउतरणीवर सांभाळत सम्यक अस्तित्वविस्तार.>> ही ओळ मात्र नाही समजली तितकीशी..
पुढच्या कवितेची वाट बघतेय. Happy

:)) आभार शशांकजी.

अमेलिया,आपआपल्या स्वतंत्र आयुष्यात एकमेकांच्या प्रभावाने बदललेली ,विशाल अन पूर्वीपेक्षा वेगळी झालेली व्यक्तिमत्वे घेऊन जगतो आपण.असे काहीसे.

एकमेकांनंतर आपल्याला उरायचे असते एकएकटे.विधीसंकेतानुसार.>> अतिशय छान.

पुर्ण कविताच आशयगर्भ आहे. खुपच आवडली. अभिनंदन Happy

............ 'खरच हा सहप्रवास किती गुढ सुंदर आणि रहस्यमय असतो...!'.

मस्त आणि सुंदर्..............आशयघन....... Happy

आवडली.... आशयही भिडणारा.

चंद्रस्वप्न.... मस्तच!

समुद्र पक्षी.. खूप खूप आवडलं........ खूप सार्‍या सदिच्छांसह

....................................शाम

खूप आभार ऑर्फिअस,योगुली,लाजो,शाम..समजून घेऊन दाद देण्यासाठी..अनुभवांची रूपं अनंत,तशीच कवितेचीही..

देहाच्या उंबरठ्यावर उभे राहून आपण भेटतो एकमेकांना
प्रथम न्याहाळतो चेहरे,हाताची बोटे ,बोलण्याच्या लकबी
किती काळ भरकटतो एकमेकांच्या उपनगरांमध्येच
नंतर खोल पोचल्यावरही थांबतो गूढ बंद दारासमोर.
संदिग्ध. हाच गाभारा की ही अडगळीची खोली?
.....

निव्वळ मॅड आहे...
मजा आया

खूपदा वाचली आहे मी ही कविता , अवाक होतो मी नेहमी !!
"प्रतिसादात आपणही काहीतरी लिहावंत अशी आपली योग्यताच नाहीये वैभवराव!".
............हे स्वत:ला बजावतो ;आणि गप्प बसतो मी नेहमी !!

धन्स दाद,वैभव मी याचे सिक्वेलसही लिहितेय गडेहो :)) वैभव,तुमची प्रतिक्रिया नव्हती त्याचं कोडं आत्ता उलगडलं..प्रतिभेची लहर हे एकच उत्तर-एखादं लेखन खूप सुंदर होतं तेव्हा.