रविकिरणांच्या दिंडीमधला वारकरी मी!

Submitted by सतीश देवपूरकर on 9 July, 2012 - 09:46

गझल
रविकिरणांच्या दिंडीमधला वारकरी मी!
सूर्य पाहिला अंधाराच्या घरोघरी मी!!

पाय मला मातीचे होते....साफ विसरलो!
उगाच केली आकाशाशी बरोबरी मी!!

हृदयी माझ्या धडधड धरणीच्या हृदयाची;
मेघांनी हे ओळखले की, शेतकरी मी!

मन अन् बुद्धी...टाळ जाहले, तुझिया भजनी;
तुझा भक्त मी! तुझा पुजारी! टाळकरी मी!!

घाम गाळतो, कष्टाची मी भाकर खातो!
कष्ट कराया कशास लाजू?....कष्टकरी मी!!

जिथून जे जे, मिळते ते ते, अजून शिकतो!
गझलेच्या या क्षेत्रामधला शाळकरी मी!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

पाय मला मातीचे होते....साफ विसरलो!
उगाच केली आकाशाशी बरोबरी मी!!

हृदयी माझ्या धडधड धरणीच्या हृदयाची;
मेघांनी हे ओळखले की, शेतकरी मी!>>>

आवडले

शेवटचा शेर आणि तुम्ही नुकतीच थांबवलेली इस्लाह यांचे टायमिंग छान जुळले आहे

-'बेफिकीर'!

भूषणराव! धन्यवाद!
आपली शाबासकी पोचली.
अवांतर:
मतल्यावरील आपले मत जाणून घ्यायला आवडेल.
मतल्याचा आपणास झालेला बोध मला वाचायला आवडेल.

मी एक शेर माझ्या कालच्या गझलेत नव्याने टाकला आहे. आपणास तो शेर कसा वाटतो, ते जरूर कळवा. माझा नवा शेर असा आहे.....

माझ्यावरीच खेळे;जग, खेळ भाकरीचा!
मी वाटतो जगाला निश्चल तळ्याप्रमाणे!!

..............प्रा.सतीश देवपूरकर

माझ्यावरीच खेळे;जग, खेळ भाकरीचा!
मी वाटतो जगाला निश्चल तळ्याप्रमाणे!!>>>

मी वाटतो जगाला विझत्या तव्याप्रमाणे - असे मला सुचले ('यावेळी' मला असेच सुचले)

==============

रविकिरणांच्या दिंडीमधला वारकरी मी!
सूर्य पाहिला अंधाराच्या घरोघरी मी!!>>>

सूर्य प्रसवतो अंधाराच्या नभावरी मी - असे मला सुचले (कंस रिपीट)

धन्यवाद

मतल्यावरील आपले मत जाणून घ्यायला आवडेल.
मतल्याचा आपणास झालेला बोध मला वाचायला आवडेल.>>>

अच्छा, मत द्यायचे होते होय, मी चुकून पर्यायी मतलाच टाकला

रविकिरणांच्या दिंडीमधला वारकरी मी!
सूर्य पाहिला अंधाराच्या घरोघरी मी>>>

पहिली ओळ हृद्य आहे, दुसरी गद्य! (म्हणजे पहिल्या ओळीचे एलॅबोरेशन किंवा एक्स्प्लनेशन)

वारकरी सर्वत्र विठ्ठल पाहतात यापेक्षा वारकरी सर्वत्र विठ्ठलभक्ती पोचवतात हे (मला) अधिक महत्वाचे वाटते

पाय मला मातीचे होते....साफ विसरलो!
उगाच केली आकाशाशी बरोबरी मी!!.... हा खुप छान.

... देवसर पुर्ण गझलेतील एकच शब्द आवडला नाही.. खालील....

गझलेच्या या क्षेत्रामधला शाळकरी मी!!

यापेक्षा

गझलेच्या या शाळेमधला शाळकरी मी!! ...... हे लयबध्द वाटते, त्या क्षेत्र या शब्दाला का कोणास ठाऊक मला नेहमीच जगण्यातील व्यावसायीक व्यवहाराचा वास येतो. ( काव्यातील अपवाद - युध्द्क्षेत्र). अर्थात हा माझ वैयक्तिक भाग आहे.

मतला बरा आणि त्यानंतरचे दोन शेर छान.

नंतरचे तीन शेर म्हणजे निव्वळ जुळवाजुळव वाटली.... स्पष्टवक्तेपणाचा राग नसावा.

भूषणराव! प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
मी थोडासा खुलासा करू इच्छितो...........
माझा शेर होता........
माझ्यावरीच खेळे; जग, खेळ भाकरीचा!
मी वाटतो जगाला निश्चल तळ्याप्रमाणे!!

इथे “भाकरीचा खेळ” असा शब्दप्रयोग केला आहे, जो एक लहानमुलांचा खेळ आहे. पाण्याच्या पृष्ठभागाला तीन, चार वेळा चाटून जाईल अशा रीतीने खापरी किंवा चपटा दगड वा ठिकरी साधारणपणे स्तब्ध वा निश्चल पाण्यावर फेकण्याचा हा खेळ असतो. जितक्या वेळा तो चपटा दगड पाण्याच्या पृष्ठभागाला चाटून जाईल तेवढ्या भाक-या असे मोजतात. मुले अशा खेळात खूप रमून जातात व त्याचा खूप आनंद घेतात. जेवढे पाणी शांत तेवढ्या जास्त भाक-या मिळण्याची शक्यता असते. साधारणपणे तळी, सरोवरे इत्यादींत हा खेळ छान जमतो. भाक-या जेव्हा, पाण्यावर निर्माण होतात, तेव्हा शांत पाण्यात काही क्षण तरंग निर्माण होतात, ते थरथरते.
हा भाकरीचा खेळ जग माझ्यावरच खेळते कारण मी जगाला एखाद्या निश्चल तळ्याप्रमाणे वाटतो.
इथे जगातील माणसांची एक वाईट सवय सूचीत केली आहे, ती म्हणजे शांत माणसाला लोक कसे disturb करतात व त्यातच त्यांना कसा विकृत आनंद मिळत असतो, हे सुचवले आहे. असो.
तेव्हा इथे तवा तापणे/निवणे/भाकरी भाजणे इत्यादीचा काहीही संबंध नाही.
असो.
सूर्याच्या शेरावर आता इतकेच लिहितो की, खरा (आकाशातला) सूर्य आणि घराघरातील माणसांमधला सूर्य, पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे व कलणारी (परतणारी) सूर्यकिरणे (रविकिरणांच्या दिंडीचा प्रवास/वारी) अशी तुलना इथे आहे. शेराचे सविस्तर अर्थ नंतर लिहीन. (आता वेळ झाला आहे म्हणून).
या दिलेल्या hints वरून शेरातील अर्थ व सौंदर्य लक्षात येईल बहुतेक.
...........प्रा.सतीश देवपूरकर

जो एक लहानमुलांचा खेळ आहे.>>>

कशावरून? कोणत्या भारतीय संस्कृतीतल्या कोणत्या पन्यावर असे म्हंटले आहे की भाकरीचा खेळ लहान मुलांचा असतो? काही सांगता का प्रोफेसर साहेब?

आय अ‍ॅम वेटिंग

तळ्यावर टाकलेल्या टिपर्‍यांना भाकरीचा खेळ म्हणणे हे भाकरी या शब्दाच्या अंगभूत गुणांवर अन्यायकारक आहे. तुम्ही म्हणता तो खेळ मला आठवला व त्या दृष्टीने शेर निर्दोष असला तरी 'खेळ भाकरीचा' ही संज्ञा काही वेगळे सुचवते व कवी ते त्याला हव्या त्या अर्थापर्यंत नेऊ शकतो की नाही हा (निदान माझ्या मुळ प्रतिसादावरूनतरी) चर्चेचा विषय ठरावा

खेळ भाकरीचा' ही संज्ञा काही वेगळे सुचवते >>>> अ‍ॅब्सील्युट्ली कर्रेक्ट

शांत माणसाला लोक कसे disturb करतात व त्यातच त्यांना कसा विकृत आनंद मिळत असतो, हे सुचवले आहे >>>

त्या खेळाला भाकर्‍या खेळणे असेच म्हणतात... भाकरी नव्हे,
शिवाय हा अल्लड वयातला खेळ आहे.. त्यामुळे पोरपणाशी संबंधीत ... जाणत्या माणसांनी हा खेळ खेळणे न पटण्या सारखे आहे.. मात्र एखाद्या निवांत क्षणी तळ्याकाठच्या निसर्गाचा आनंद घेत सहज तळ्यात खडा माणूस मारतोही तेही केवळ त्या शांत पाण्यात उठणार्‍या तरंगांचा आनंद घेण्यासाठीच... तळ्याला त्रास देण्याचा कोणताही हेतू त्यात नसतो... आणि कोणत्याही खेळाचासुद्धा असा हेतू असत नाही.. अशा वेळी तळे हतबल होऊन खडा मारणार्‍याकडे पहात रहील... जे सामान्य माणसे करतात...

म्हणुन मी सुचवलेला शेर अपेक्षीत अर्थाची परीपुर्ती करणारा ठरतो.. असे मला वाटते

आनंद घेत माझा ते मारती खडे ही
उठती तरंग माझे हतबल तळ्याप्रमाणे

.

बेफिकीर + १, देवसर..भाकरीचा खेळ ही संज्ञा सगळीकडेच तुमच्याकडील अर्थाने प्रचलीत असेल असे कदापि शक्य नाही. आमच्याकडे त्याला 'ठिकरी टप्पे' किंव्हा नुसतेच 'ठिकरी' असे म्हणतात.

इथे “भाकरीचा खेळ” असा शब्दप्रयोग केला आहे, जो एक लहानमुलांचा खेळ आहे. पाण्याच्या पृष्ठभागाला तीन, चार वेळा चाटून जाईल अशा रीतीने खापरी किंवा चपटा दगड वा ठिकरी साधारणपणे स्तब्ध वा निश्चल पाण्यावर फेकण्याचा हा खेळ असतो. जितक्या वेळा तो चपटा दगड पाण्याच्या पृष्ठभागाला चाटून जाईल तेवढ्या भाक-या असे मोजतात. >>>>>>>

हे मला मान्य आहे असे असेल हे मला पटते

तरीही

भाकरीचा खेळ ही संज्ञा सगळीकडेच तुमच्याकडील अर्थाने प्रचलीत असेल असे कदापि शक्य नाही>>>>>>

हे ही मला मान्य आहे !!

यावर उपाय एकच : कोणत्याही मराठी डिक्शनरीत शोधावे
जर हा शब्द (नाम /वाक्प्रचार काय असेल ते असेल) तिथे याच अर्थाने दिला असेल तर देवसरांचे बरोबर -नसेल तर बाकीच्यांचे बरोबर ......कबूल???
माझ्या मते हा शेर देवसरांना बदलावाच लागेल ........कारण गझलेला असे चालत नाहीना म्हणून !!!

रविकिरणांच्या दिंडीमधला वारकरी मी!
सूर्य पाहिला अंधाराच्या घरोघरी मी!!

माझा काहीसा अर्थ

रविकिरणांच्या दिंडीमधला वारकरी मी!
रवि (अर्थात सुर्य) पासुन जे किरण बाहेर पडतात, त्याती एक किरण (कण) मी ही ओळ चांगली वाटते

दुसरी अर्थच लागत नाही
सूर्य पाहिला अंधाराच्या घरोघरी मी!! - थोडक्यात असा लगोतो जेथे जेथे अंधार आहे तेथे काही प्रतिभावानही आहेत असा होतो.

येथे पहील्या ओळीच्या अनुषंगाने ,
घरोघरीचा अंधकःर दूर सारायला पाहीजे होता

भूषणराव, विजयराव, शामराव, ऑर्फिअसजी, ज्ञानेशजी आणि वैभवजी!
“भाकरीचा खेळ” असाच शब्दप्रयोग रूढ आहे व तो खेळ कुणीही खेळू शकतो. पण लहान मुलांमधे तो खेळण्याचा ओढा असतो.
आमच्या लहानपणी जुन्नरमधे (माझे जन्मगाव) आम्ही हा खेळ खेळायचो.
या खेळासाठी लागते शांत पाणी व चपटा दगड/खापरी/ठिकरी/टिपरी वगैरे.
वरील शब्दप्रयोग आपणास खालील शब्दकोशात दिसून येईल.......
अभिनव मराठी-मराठी शब्दकोश (१९८३)
खंड चौथा,
Compiler:Dr. D.H. Agnihotri
M.A.Ph.D.
या खेळाला दुसरे नाव दुसरीकडे असेलही, म्हणून “भाकरीचा खेळ” ही संज्ञा चुकीची ठरत नाही.
शामराव! आपला पर्यायी शेर चांगला आहे, हे मी पूर्वीच लिहिले आहे.
पण, बारकाईने वाचले तर तुमच्या व माझ्या शेरांतल्या अर्थांची छटा खूपच वेगळी आहे.
जरा खुलासा करतो.............
भाकरीचा खेळ जरी लहान मुलांचा असला, तरी मोठी (जाणती) माणसेही तो खेळ आनंदाने खेळतात, हे सर्वत्र दिसून येते. तेव्हा यात (जाणत्या माणसांनी खेळण्यात) न पटण्याजोगे काहीही नाही.

आता आपल्या दोघांच्या शेरांची तुलना इथे करावी लागत आहे....क्षमस्व!
आपण शेरात म्हणत आहात की, लोक (ते) केवळ (तरंगांचा) आनंद घेण्यासाठी तळ्यात खडे मारतात. इथे तळ्याला आपण हतबल म्हणत आहात, जे मला पटत नाही. इथे ज्याच्या त्याच्या व्यक्तीमत्त्वाचा फरक दिसून येतो. तसे मला म्हणावेसे वाटत नाही.
लोकांच्या खडे मारण्याच्या क्रियेवर तळ्याने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे तरंग उठणे, ज्यामधे हतबलतेचा प्रश्नच येत नाही.

मी माझ्या शेरात “भाकरीचा खेळ” खेळणे असा शब्दप्रयोग केला आहे, जो एक आनंद घेण्यासाठी लहान मुले वा मोठी माणसे देखिल खेळतात.
आम्ही म्हणतो.............
हे जग माझ्यावरतीच भाकरीचा खेळ खेळते. या वाक्यातच चाणाक्ष रसिकांच्या (ज्यांना ही संज्ञा माहीत असते) डोळ्यांसमोर शांत पाणी/तळे/सरोवर उभे राहते.
कारण, दुस-या ओळीत म्हटले आहे..............
मी जगाला (एखाद्या) निश्चल तळ्याप्रमाणे वाटतो आहे
इथे “निश्चल” शब्दाला खूप महत्व आहे.
निश्चल म्हणजे शांत, स्थिर, स्तब्ध, बिनहालाचालीचे इत्यादी....
भाकरीचा खेळ, जगाने तो खेळ माझ्यावरती खेळणे, मी म्हणजे निश्चल तळे असे जगाला वाटणे..........ही सर्व प्रतिकांची भाषा आहे, ज्याद्वारे जगातील लोकांच्या विकृत स्वभावाची छटा लगेच प्रकट होते.
इथे तळे काही हतबल वगैरे नाही.
आमचा स्वभाव एखाद्या निश्चल तळ्याप्रमाणे आहे...शांत, स्तब्ध, serene राहण्याचा.पण, जगातील लोक मात्र आमच्या या स्वभावाचा फायदा उठवतात, केवळ त्यांना आनंद मिळतो म्हणून. इथे भाकरीच्या खेळाचे प्रतिक चपखल बसते.

निश्चल तळ्यात क्षणभर तरंग उठतील, भाकरी/भाक-या पडलेल्या दिसतील, पण, नंतर लगेच तळ्याचे पाणी निश्चल वा शांतच होते, कारण त्याचा तो मूळ स्वभाव आहे.
शांत माणसांना लोक कसे डिवचतात हे येथे सूचीत केले आहे.
आमचा शंतपणा हा आमचा स्वभावदोष नाही, किंवा हतबलताही नाही.
क्षणभर आम्ही थरथरतो, पण, परत आम्ही शांतच राहू, त्या निश्चल तळ्याप्रमाणे!, कारण ही मन:शंती आम्ही कमावलेली आहे, ती विनासायास आलेली नव्हे.
आम्हाला कुणीही कायमचे अशांत करूच शकत नाही.
यात आमचे व्यक्तिमत्व व जगातील लोकांचे विकृत व्यक्तिमत्व हा विरोधाभास “भाकरीचा खेळ” या शब्दप्रयोगातून चपखलपणे मांडला आहे.

शामजींच्या शेरात हतबल तळ्याप्रमाणे म्हटले आहे,ज्यात मी म्हणतो ती छटा नाही.
आशयघनतेच्या व शेराच्या व्यामिश्रतेच्या दृष्टीने आमचा शेर आम्हाला जास्त सशक्त वाटतो.
अर्थात सौंदर्य, शामजींच्याही शेरात आहे.
ज्ञानेशजी!..............
रविकिरणमंडळाचा इथे काहीही संबंध नाही.
सूर्यकिरणांची जणू एक दिंडी आहे, जिच्यातला एक किरण म्हणजे मी, जो त्या दिंडीतला वारकरी आहे, अशी कल्पना आहे.
हा शेर अर्थाच्या दृष्टीने खूपच व्यामिश्र (complex) आहे.
रविकिरणांची दिंडी, , त्यातील मी एक वारकरी, अंधाराच्या घराघरातील सूर्य मी पाहिला....अशी प्रतिकांची भाषा वापरली आहे.

आता माझ्या या शेराचे सौंदर्यशास्त्रीय विश्लेषण करू या..............

सूर्यकिरणांना दिंडीची उपमा देणे, त्यातील मी म्हणजे एक वारकरी, असे म्हणणे........हे खूपच हृद्य व चपखल आहे.
कसे ते खुलासेवार सांगतो...........
वारक-यांच्या दिंड्या वा-या करतात. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांच्या दिंड्या आळंदी ते पंढरपूर व परत पंढरपूर ते आळंदी .
तुकरामांच्या देहू ते पंढरपूर व नंतर पंढरपूर ते देहू.

इथे सूर्य उगवतो, सूर्यकिरणे पृथ्वीवर पडतात, व दुपारनंतर सूर्यकिरणे कलतात, म्हणजे परत जणू सूर्याकडे जातात. ही म्हणजे जणू एकप्रकारची वारी आहे, असे आम्ही म्हणतो. किरणांना जणू वारकरी म्हटले आहे, ज्यांच्या दिंड्या सूर्य ते पृथ्वी व पृथ्वी ते सूर्य अशा जातात.

आता मी एक सूर्यकिरणरूपी वारकरी आहे व मी अंधाराच्या घरोघरी सूर्य पाहिला, ही एक अत्यंत उच्च दर्जाची काव्यात्मक भाषा आहे.

आता या ओळीतले काव्य पाहू...............

अंधाराच्या घरोघरी म्हणजे पृथ्वीतलावरील (अंधारातल्या) घराघरात सूर्याप्रमाणे असणारी माणसे पाहिली. आकाशात एक सूर्य आहे, पण पृथ्वीवर तेजस्वी माणसांच्या रूपाने अनेक सूर्यच अस्तित्वात आहेत.
आकाशातही सूर्य, पृथ्वीवरही (घराघरात) अनेक सूर्य .
जसे पंढरपूरला विठ्ठल, आळंदीलाही विठ्ठल आणि देहूलाही विठ्ठल!

हे सत्य मला केव्हा प्रतीत झाले जेव्हा मी सूर्यकिरणांच्या दिंडीतला एक वारकरी झालो तेव्हा.
परमेश्वर/ईश्वरी अंश सगळीकडे कसा आहे हे देखिल या शेरात उत्कटपणे मांडले आहे. सूर्य पाहिला अंधाराच्या घरोघरी मी....................
ही ओळ अत्यंत उच्चदर्जाची काव्यात्मक ओळ आहे.
आकाशातला सूर्य आणि माणसांमधला सूर्य अशी काव्यात्मक कल्पना इथे मांडली आहे. असो,
थांबतो!
...........प्रा.सतीश देवपूरकर

टीप:
मीच माझ्या शेराचे रसग्रहण केले याबद्दल, क्षमस्व!
पण, हे खात्रीने सांगतो की, जर असा व्यामिश्र (complex) शेर(कुणाचाही) माझ्या वाचनात आला तर मी त्याचे देखिल अत्यंत रसाळ सौंदर्यशास्त्रीय विश्लेषण करेन.
मायबोलिकरांनो! अशा शेरांची/गझलांची वाट पाहतो आहे...........
.................................................................................................

पुराव्यानिशी सिद्ध होत आहे म्हणून 'भाकरीच्या खेळा'च्या शेराच्या आरोपातून प्रा. सतीश देवपूरकर यान्ची निर्दोश मुक्तता करण्यात येते आहे..!!

(सादर केलेल्या पुराव्याची शाहनिशा करणे बाकी असले तरी ..!!;) )

असा व्यामिश्र (complex) शेर(कुणाचाही) माझ्या वाचनात आला तर मी त्याचे देखिल अत्यंत रसाळ सौंदर्यशास्त्रीय विश्लेषण करेन.>>>>>>>>>>>>>

या शेराचे कराल का सर ....................

मी कडेवर घेतल्यावर कारटी सोकावते
विठ्ठलाच्या कंबरेचा हट्ट धरते काळजी .........
..

आपला एकलव्य (पर्यायीगझल -अर्जुन!!)

वै व कु