विसरुन जाणे अवघड आहे

Submitted by रसप on 9 July, 2012 - 06:37

कधीकाळची तुटकी-फुटकी स्वप्ने सारी विसरुन गेलो
डोळ्यांना रोजच खुपणारे विसरुन जाणे अवघड आहे
बरेच पाणी वाहुन गेले पुलाखालच्या प्रवाहातले
माझे घर वाहुन नेणारे विसरुन जाणे अवघड आहे

दिवस रोजचा उदासवाणा रोज उगवतो अन मावळतो
उगाच काही तांबुसरंगी शिंतोड्यांना दूर उधळतो
एक कोपरा आभाळाचा मनासारखा करडा दिसता
क्षितिजावरती भळभळणारे विसरुन जाणे अवघड आहे

थबथबल्या पाउलवाटेवर प्राजक्ताचा सडा सांडला
तिथेच त्या वळणाच्या आधी मी नजरेला बांध घातला
किती गंध मी उरात भरले अन श्वासांना गुंतवले पण,
नसानसांतुन दरवळणारे विसरुन जाणे अवघड आहे

कपोलकल्पित तीरावरती अगणित लाटा खळखळ करती
मनातल्या फेसाळ मनाला फिरून येते अवखळ भरती
नकोनकोसे भिजणे होता माझे पाउल मीच अडवतो
रेतीवर अक्षर बुजणारे विसरुन जाणे अवघड आहे

जमेल का तू सांग एकदा तुला जरासे पुन्हा बहकणे
पुन्हा एकदा मिठीत येउन रोमरोम अंगावर फुलणे
मी माझ्या चुकल्या ठोक्यांना अजून थोडे जुळवत आहे
तुझ्या मनातुन धडधडणारे विसरुन जाणे अवघड आहे

....रसप....
३० जून २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_30.html

गुलमोहर: