टिक्कू - जिथे अंधारते परिपक्वतेने तिथे बाल्यामुळे होते दिवाळी

Submitted by बेफ़िकीर on 9 July, 2012 - 04:46

Tikkoo Sleeping.jpg

बिलगणे फार आवडले तुझे ते
घरी आलीस उत्साहात माझ्या
किती मस्ती किती दंगा तुझा तो
किती आनंद या नशिबात माझ्या

तुला खाऊ दिला जो जो हवा तो
तुझे ते सांडणे अन हात ओले
तुला मी तोंड धू अन पुस म्हणालो
तुझे ते बोबड्या शब्दात "होले"

तुला बसवून या पोटावरी मी
कराव्या गुदगुल्या अन तू हसावे
मला तू गुदगुल्या करताक्षणी मी
हसू यावे न यावे पण हसावे

तुझा माझा किती आवाज होतो
घरातिल लोक म्हणती बास आता
तसा खोटाच मी नाराज होतो
नि तू म्हणतेस काका हास आता

तुला घरभर फिरवणे अन हसवणे
कडेवरही तुझा दंगाच चालू
तुला काकू म्हणे हे फार झाले
तिला तू सांगणे काकाच चालू

तुझे दमल्यामुळे बिलगून बसणे
तुला मी थोपटत कुजबूज करणे
कडक छाती तरी हळवाच काका
कुशीमध्ये तुझे निर्व्याज निजणे

तुझा तो चेहरा न्याहाळताना
स्वतःचा व्याप मी विसरून जातो
निरागसता तुझी सांभाळताना
निरागसतेत मी हरवून जातो

इथे निजतेस घटकाभर तरी तू
घराला तासभर येते नव्हाळी
जिथे अंधारते परिपक्वतेने
तिथे बाल्यामुळे होते दिवाळी

तुझे उठताच 'भ्भो' करणे मला ते
पुन्हा खाऊ तुला देणे नवा मी
तुझी पापी मधाची घेत असता
कुणाला फोनवर असतो हवा मी

अरे हा कॉल तर तुमचाच आहे
तुला बोलावते आई तुझी बघ
उद्या येशील हे पूर्वी म्हणे मी
तयारी घर बदलण्याची तरी बघ

उद्यापासून तर तुमचे नवे घर
तुझी ही भेट शेवटचीच आहे
स्वतःला सांगतो मी यार सावर
नसे टिक्कू तुझी, परकीच आहे

घरी जाण्यास तू इतकी उताविळ
तुला जाणीवही नाही कशाची
निरोपाच्या क्षणी तू पूर्ण गाफिल
मला तर खबरही नाही स्वतःची

इथे होतीस साडे चार वर्षे
नि बागडलीस माझ्या रुक्षतेवर
घराला देउनी घरपण सहर्षे
किती हसलीस या परिपक्वतेवर

अता येऊ तसे आम्ही अधेमध्ये घरी तुमच्या
तुझ्या सोसायटीचा वॉचमन माझा कुणी नाही
वहीमध्ये लिहू की जायचे टिक्कूकडे तुमच्या
कधी माझाच होता जो अता माझा कुणी नाही

-'बेफिकीर'!

(टीप - आर्णवी ही आमच्या सोसायटीतील मुलगी तीन महिन्यांची असल्यापासून गेली साडे चार वर्षे रोज आमच्याकडे यायची. तिला मी 'टिक्कू' हे नांव ठेवले होते. काल संध्याकाळी ती 'आमच्या सोसायटीतील मुलगी' म्हणून शेवटचीच आली कारण आज त्यांनी जागा बदलली. घराला मिळालेले साडे चार वर्षांचे घरपण समाप्त झाले. प्रत्येक क्षणावर आणि कोपर्‍याकोपर्‍यावर तिची चिन्हे आणि आठवणी आहेत. तिला मी मुलगा मानत असे. 'मुलगी नाही', 'मुलगाच'! असे काही नाही, उगाच आपले मुलगा म्हणत असे. ती आणि मी , दोघे करत असलेला दंगा म्हणजे सोसायटीतील ऐतिहासिकच दंगा! काल ती घरातून जाताना तिला काहीच जाणीव नव्हती की ती आता उद्यापासून सारखी येऊ शकणार नाही. पण मी आणि यशःश्री मात्र पराकोटीचे खिन्न झालो होतो. कवितेचे स्पष्टीकरण देणे चूक आहे, पण खरंच राहवत नाही म्हणून लिहिले)

गुलमोहर: 

बंडोपंत,

आभार मानत नाही. काल ती घरातून जाताना तिला पत्नी घरी सोडायला गेली. मी खरंच रडलो काल संध्याकाळी आणि आत्ता ही माझीच कविता पुन्हा वाचूनही मला पुन्हा रडू येतच आहे.

तुला खाऊ दिला जो जो हवा तो
तुझे ते सांडणे अन हात ओले
तुला मी तोंड धू अन पुस म्हणालो
तुझे ते बोबड्या शब्दात "होले">> अगदीच आपण स्वतः लहान वयात शिरल्या सारखे वाटले

बाकी कवितेने मात्र खरच काळीज पिळल्या गेले
आम्ही स्वता घर सोडताना असेच रडलो होतो, घर जुने भाड्याचे होते पण शेजारी अगदी घरच्या सारखे संबंध होते.

बेफीजी मी सुचवणे चूक आहे हे मान्य त्यासाठी क्षमस्व पण असे करता येईल का....

इथे निजतेस घटकाभर जरी तू
घराला दिवसभर येते नव्हाळी
जिथे अंधारते परिपक्वतेने
तिथे बाल्यामुळे होते दिवाळी>>>>>>

न रुचल्यास पुन्हा एकवार क्षमस्व ..........

वैवकु, तुम्ही सुचवणे चूक वगैरे नाहीच. केवळ मनात फार दु:ख असल्याने मी या कवितेतील शब्दरचनेवर काही कामच केलेले नाही. बाकी काही नाही. Happy

मी या कवितेतील शब्दरचनेवर काही कामच केलेले नाही. बाकी काही नाही.
>>>>>>>>>>>>>

नकाच करू बेफीजी खरंच अगदी मनापासून ..... मनापासून सान्गतोय
मी फक्त ही कविता जर मी रचली असती तर आणि असा बदल केला असता तर कसे दिसले असते अशा भावनेने विचारून पाहत होतो बस !!

असो
कवितेत तुमचा आत्मा काढून ठेवलाय्त तुम्ही........ अगदी !!
_/\_

छानच. हृदयस्पर्शी आहे. त्या छकुलीने किती आश्वासक मनाने खांद्यावर मान टेकवलीय.>>>

होय टुनटुन, ती लहान होती तेव्हा अशी मान टेकायची नाही. त्यावर मी (नेहमीप्रमाणे :फिदी:) शेर केला होता, तुमच्या प्रतिसादाने तो आठवला.

नशीब आले कडेवरी जोजवून घ्याया
विसंबुनी मान आपली टेकलीच नाही

(माझ्या 'मुशायर्‍याची शमा पुढे ठेवलीच नाही, जगास माझी कथा कधी झेपलीच नाही' या 'बेफिकीरी' मधील गझलेत हा शेर आहे)

Happy

धन्यवाद सर्वांचे

किती लळा लागलाय टिक्कूचा तुम्हाला हे अगदी जाणवतेय या रचनेतून ......
खूपच जिव्हाळ्याने भरलेली उत्कट रचना...
ना याच्यात काही शब्दसौंदर्य शोधायचे ना उपमा ना अलंकार - फक्त एक निरागस, निर्व्याज निखळ प्रेम नाते - जे अगदी सहज स्पष्ट होतंय ......