"सत्यमेव जयते" भाग १० - (Dignity For All)

Submitted by आनंदयात्री on 8 July, 2012 - 05:27

आज, ८ जुलैच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा -

सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ५ - http://www.maayboli.com/node/35415
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरची वा खालची जात, श्रेष्ठ व कनिष्ठ जात, उच्च वा नीच जात
हे सगळे शब्द वापरायचे असल्यास वापरताना 'तथाकथित' हे बिरूद वरची, खालची, श्रेष्ठ, कनिष्ठ, उच्च, नीच या सगळ्यामागे जोडावे कृपया.

मला ना एक प्रश्न पडलाय.. म्हणजे आमच्या १०वी पर्यंतच्या पुस्तकात संविधान होतं.. त्यातले हे शब्द.. "...समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य..."
तर मला ना प्रश्न पडायचा म्हणजे अजूनही आहे.. आपण धर्मनिरपेक्ष बोलतो पण मग सगळी कडे reservation system का आहे..? म्हणजे काय फरक आहे यात..? कि ते नुसता नावापुरतं असतं..?
विपु मध्ये टाकल तरी चालेल कारण इथे चर्चा करायला माझा अभ्यास तेवढा नाहीये आणि वयही !.. Happy

<<तर मला ना प्रश्न पडायचा म्हणजे अजूनही आहे.. आपण धर्मनिरपेक्ष बोलतो पण मग सगळी कडे reservation system का आहे..? म्हणजे काय फरक आहे यात..? कि ते नुसता नावापुरतं असतं..?>>

Rofl आवो त्ये नावापुरतंच असतंय वो........इथे कुणाला समान वागणूक हवीये........लायकी उघडी पडेल ना मग!!!!!!

किरण मुद्दा समजला. आपल्या एका देशात अनेक देश आहेत - मोठ्या शहरात दिसणारा भारत, छोट्या शहरात आणि अगदी छोट्या गावात दिसणारा भारत वेगवेगळा. सगळीकडे लागू होणारा उपाय मला अजून दिसत नाही.

डेलिया, नीधप, मला वाटते लोकांमध्ये जातीविषयीचे (निष्कारण) प्रेम निर्माण करण्याचे कार्य राजकीय पुढार्‍यांकडूनही बेमालूम होत असते. जातीजातीतील विविध खाद्य संस्कृती, पोशाख याबद्दल प्रेम असणे चांगले, पण त्यावरून अमके श्रेष्ठ म्हणणे चांगले नाही हे आपल्याला तितकेसे जमलेले नाही, हेही आहेच.

>>धर्मनिरपेक्ष बोलतो पण मग सगळी कडे reservation system का आहे..?
झरबेरा, राखीव जागांचा धर्माशी संबंध नाही. तर जातीशी आहे. आपले जातीनिरपेक्ष संघराज्य कुठे आहे? Happy

जातीजातीतील विविध खाद्य संस्कृती, पोशाख याबद्दल प्रेम असणे चांगले, पण त्यावरून अमके श्रेष्ठ म्हणणे चांगले नाही हे आपल्याला तितकेसे जमलेले नाही, हेही आहेच.<<<
अगदीच पटले.
श्रेष्ठ-कनिष्ठ या प्रकाराला निरोप देऊन जातीनिहाय गुणवैशिष्ठ्ये, कौशल्ये, संस्कृती, पद्धती यांचे डॉक्युमेंटेशन व्हायला हवे.

झरबेरा, राखीव जागांचा धर्माशी संबंध नाही. तर जातीशी आहे. आपले जातीनिरपेक्ष संघराज्य कुठे आहे?

माहितीबद्दल धन्यवाद पण 'जातीनिरपेक्ष संघराज्य'.. झेपलं नाही. Sad

आणि धर्मात जाती येतात ना.. मग ते जातीनिहाय संघाराज्य करायच असेल तर किमान धर्मनिरपेक्ष देश तरी हवा ना..
म्हणजे.. मी बरोबर बोलतेय ना..? Sad आधी धर्म निरपेक्ष देश झाला कि मग जातीनिरपेक्ष देश .. right ? Sad

हा भाग जातीभेदाच्या समस्येवर असण्यापेक्षा या समस्येची सर्वाधिक शिकार झालेल्या 'भंगी' जातीतील लोकांना ज्या भयानक जीवनाला सामोरे जावे लागते त्याची जाणीव करून देणे आणि यावर मात करण्यासाठी करावयाच्या उपायांबद्दल चाललेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी मुख्यतः होता असे मला तरी वाटले.
सफाई कामगारांचे काम अधिकाधिक सुसह्य करण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था शहरी भागांसाठी राबवली जाते. पण ती अतिखर्चिक असल्याने लहान गावांमध्ये पोचणे आणि ती व्यवस्थित चालविणे दीर्घकालीन योजना आहे. त्या पद्धतीसाठी देखील ड्रेनेज तुंबल्यावर कांही लोक हे काम करण्यासाठी लागणारच. त्यांची कामे सुसह्य व्हावीत यासाठी व्यावहारीक स्तरावर उपयुक्त असे कोठले नवे तंत्रज्ञान उपलब्ध आहे याची थोडी माहिती या भागात यायला हवी होती असे वाटले.
खेड्यांसाठी काय उपयुक्त ठरू शकेल याचा महात्माजींनी खोलवर विचार केला होता. त्यांच्या आश्रमांमधून भंगीकामे आश्रमवासीयांचीच जबाबदारी असायची असे वाचले/ऐकले आहे. लहान गावांना उपयुक्त ठरतील असे उपाय शोधून काढण्याच्या प्रयत्नांना महात्मा गांधीजींनी मोठा हातभार लावला असे मला दिसते.कोकणातील त्यांच्या पटवर्धन नामक शिष्याने यासाठी अनेक प्रकारचे कमीअधिक खर्चाचे सेप्टिक टॅंक विकसित केले होते. ते कसे बांधावेत आणि व्यवस्थित राखावेत यासाठी एक अभ्यासक्रमही आखला असावा. पुण्याला कोथरूड भागातील गांधीभवनच्या आवारात त्याचे शिक्षण देण्यासाठी पूर्ण आकाराची मॉडेल्स कदाचित आजही दिसतील. या पटवर्धनांनी महात्माजींच्या आदर्शानुसार सर्व काही प्रयत्न केले. पण त्यांच्या राजकीय चेल्यांपर्यंत भंगी समाजाचा हा आक्रोश आजही पोचलेला नाही असेच वाटते.
या समाजाच्या समस्यांसाठी शोधून काढलेले मार्ग आणी केले गेलेल्या प्रयत्नांचे एक त्रोटक का होईना दर्शन घडवायला हवे होते त्यामुळे थोडा तरी आशावाद जागवला गेला असता.
कोणाला ना कोणाला हे काम करावेच लागणार आहे. ते घाण काम आहे पण अति महत्वाचे आहे. त्या कामाचे महत्व आपल्याला ड्रेनेज फुटल्यावरच कळते. हे काम करणार्‍यांना आसवे ढाळल्याने प्रतिष्ठा मिळणार नाही. त्यांना जर मोठया मोठ्या पगारांची स्केल्स दिली तर 'व्यवसायबंदीची बेडी' आपोआपच गळून पडेल. आजच्यापेक्षा त्यांची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल. जुन्या जमान्यात लॅब टेक्निशियन नसायचे त्या काळातील पॅथॉलॉजीस्टांनी स्टूल्स वगैरेंच्या तपासण्या केल्या असतील त्या काय निव्वळ सेवाभावनेने? आजही हॉस्पिटल्समधून आया आणि वार्डबॉय यांना अशी कामे करावी लागतात. ते कांही सगळे 'भंगी' जातीचे असतात का? नाही . पण हॉस्पिटलमधील घाण कामाला समाजात फार कमीपणाचे समजले जात नाही. हे काम सुसह्य करण्यासाठी लागणार्‍या सुविधाही उपलब्ध केल्या जातात. मिळकतही तुलनेने बरी असते. थोडक्यात सांगायचे तर जर असे घाणीशी संबंधीत काम भरपूर उत्पन्न देत असेल तर या कामालाही हळुहळु समाजात मान्यता मिळु लागते असे दिसून येते.

>> धर्मनिरपेक्ष देश
आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. कोणाही सज्ञान व्यक्तीला कोणताही धर्म स्वीकारायची, त्याप्रमाणे वागायची मुभा आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे प्रत्येक धर्मीय व्यक्तीला त्यात्या धर्माची तत्वे पाळण्याची मुभा असणे.
पण तशी जात बदलण्याची मुभा नाही.

शिकवणी : इयत्ता तिसरीचा वर्ग..

रोपट्याचे चित्र काढून त्याला पान, फूल वगैरे नावे द्यायला लावली.... एक मुलगा म्हणाला मला येत नाही.

म्या म्हनलं... लेका, तू कुंभाराचा ना? आणि चित्र येत का नाही? मग तू उद्या गणपती कसा रंगवणार?

एखाद्या जातीतील चाम्गला गुण हेरण्यासाठी जातीचा उल्लेख करणं हे चूक आहे का?

दामोदरसुत ~

'भंगी' जातीतील लोकांना ज्या भयानक जीवनाला सामोरे जावे लागते त्याची जाणीव करून देणे आणि यावर मात करण्यासाठी करावयाच्या उपायांबद्दल चाललेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी मुख्यतः होता असे मला तरी वाटले."
~ अगदी अगदी....अत्यंत योग्य निरिक्षण. केवळ न्या.धर्माधिकारी यानी एकूणच जातीभेदावर सर्वंकष विवेचन केले, त्या निमित्ताने (जो त्यांचा अधिकारच आहे). अन्यथा कार्यक्रमातील ८०% भाग 'आजही हाताने भंगीकाम करायला लावणारी स्थिती' आणि त्याबद्दल केन्द्र आणि शासनाची अक्षम्य बेपर्वाई याकडेच अंगुलीनिर्देश करीत होता.

येथील (कित्येक) प्रतिसादामध्ये सरसकट जातीभेद यावरच टिपण्या होत आहेत, ते योग्य नव्हे. तो विषय जरी यातीलच एक अटळ असा भाग असला तरी मग त्याकरीता वेगळा बाफ हवा असे माझे मत आहे. [अर्थात जालीय दुनिया अस्तित्वात येण्यापूर्वीच्या काळापासून हा आदी ना अंत अशाच स्वरूपाचा विषय भरतभूमीत राहिला आहे, राहीलही असे विषादाने म्हणावे लागत आहे.]

अशोक पाटील

लोकांनी आधी स्वतः कडे पाहावे. काही जातींनीच इतरांना अशी कामे करायला लावली आहे. स्वतःपासुन सुरुवात करा आधी मग शासना कडे बघा प्रत्येक बाब शासनावर ढकलुन मोकळे होउ नका.शासन काय करणार जास्तीजास्त कायदा करेल लोकांना तुरुंगात टाकेल. परंतु वृत्ती शासन थोडीच बदलु शकणार आहे.? लोकांनी आधी स्वतःची वॄत्ती सुधारायला हवी. तरच हे होईल. आंतरजातिय विवाहाला विरोध करणारे मुर्खशिरोमणी सुध्दा आहेत इथे. स्वतःला उच्च समजणार्‍यांनी(मनाने मात्र तुच्छ) स्वता:च्या वागणुकीत बदलाव आणला तर बदल होतील
आंतरजातीय विवाह करणार्‍यांना विरोध न करता स्विकार करायला हवा. त्यातुनच बदलाव होतील ..

@ नरहरी

तुमच्या पोस्टला योग्य ते उत्तर दिलं तर फेक असलात तरी चार दिवस झोप येणार नाही. पण तुमच्या पोस्टमधून तुमची एकंदर कुवत लक्षात आल्याने ज्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी बाहुल्याला आणि पैलवानाला इग्नोर केलं त्याचप्रमाणे तुमच्या बाबतीत केले जाईल. अ‍ॅडमिनकडे तक्रार करावी अशी गरज वाटत नाही.

किरणराव,
तुमच्या वरील पोस्टशी सहमत.
जीभ अन बोटे शिवशिवत होती ती नरहरी पोस्ट वाचल्यापासून. पण आवरत होतो स्वतःला. जाऊ द्या.

>>एखाद्या जातीतील चाम्गला गुण हेरण्यासाठी जातीचा उल्लेख करणं हे चूक आहे का?
हो. चूक आहे.
कारण निष्कारण दबाव (अमक्या जातीचे म्हणून अमकी गोष्ट चांगली जमायला हवी) उपयोगाचा नाही. आणि कुंभाराच्या मुलाने मोठेपणी कुंभारच व्हायचे हे अधोरेखित होणेही चांगले नाही.

माझा चुकला हा भाग, इथे यू ट्यूबवर बघायला मिळेल का याची पण शंका आहे.
पण असा विषय निवडल्याबद्दल, खरेच आनंद वाटला.

>>कारण निष्कारण दबाव (अमक्या जातीचे म्हणून अमकी गोष्ट चांगली जमायला हवी) उपयोगाचा नाही. आणि कुंभाराच्या मुलाने मोठेपणी कुंभारच व्हायचे हे अधोरेखित होणेही चांगले नाह>><<

+१०००

हे म्हणजे भंग्याने भंग्याचीच कामं करावी. उद्या त्याने देवळातल्या पुजारीचा जॉब घेवु नये कारण त्याचा जन्म भंगी म्हणून झालाय.. हे बरोबर आहे का?

का नाही तो इतर काम करु शकणार? माणूसच आहे ना इतरांसारखा? हां आता लहानपणापासून कुंभाराने तेच ते काम करून पटाईत असला तरी दुसराही करु शकतोच ना शिकून.
मग कशाला तो जातीचा उल्लेख.

खाद्य संस्कृती ही जातीवरून नाही तर एखाद्या भगावरून पडलीय... भौगोलिक भागावरून. अनायासे एकच काम करणारे लोकं एकत्र येवून(प्रत्येक जण आपला कंपू करूनच रहातो तसा) त्या त्या भागात रहायला लागली व आपली आपली पद्धती विकसित करून पाळायला लागली हाच तो फरक असे मला वाटते. त्या त्या भौगोलिक भागात मुबलक असलेले जिन्नस घालून करायला लागली, त्यात जातीचा सबंध उगाच लावलाय असे मला वाटत.

मराठ्या कडची भाकर, ब्राम्हणाकडची भाकरी असे थोडीच असते?. कोकणात तर सारख्या पद्धतीने बनते.. थोड्या फार फरकाने (जात= दिले गेलेले काम )मिळकतीत फरक असल्याने खालील जातीत जरासा बनवण्याच्या पद्धतीत फरक असेल तर....

जातीनिहाय पारंपारीक व्यवसायच केला पाहिजे हा आग्रह चूक. मोडला जायलाच हवा.
पण जातीनिहाय कौशल्ये हा एक वेगळा विषय आहे.
पिढ्यानपिढ्या कारागिरी(दागिने घडवणे, लाकडी कोरीवकाम, कलमकारी, पट्टचित्रकार, पैठणी विणकर, मातीकाम आणि असे अनेक भारतीय दृश्यकलांचे वारसे) करून मिळवलेले कला-कौशल्य अचानक सहजपणे प्रत्येकाला शिकता येईलच असे नाही. मुळात हातात आणि नजरेत ते असायला हवं उपजत मग एखाद्या कलेचं तंत्र शिकता येईल. पण पारंपारीक कारागिराच्या सहजतेच्या, कामातल्या सफाईच्या, अनुभवाच्या पातळीला जायचे असेल तर त्या कारागिराचं जगणं जगायला हवं. त्यासाठी आयुष्य वार्‍यावर उडवून देणारा एखादा भास्कर कुलकर्णी हवा. त्याशिवाय ते जमायचे नाही.
एसी क्लासरूममधे बसून चार टेक्निक्स शिकली की पारंपारीक कला हातात आली असे होत नाही.
असो हा सगळा पूर्ण वेगळा विषय आहे पण ही कलाकौशल्ये कुणीही सहज शिकू शकतो हे मात्र पटण्यासारखे नाही.

<<<सरकारला किन्वा लोकांना खरेच अगदी मनापासून जात सोडायची असेल तर तसे निश्चितच होऊ शकते. आज सुरवात केली तर हे काम अजुन ४-५ पिढ्यांनंतर तरी निश्चितच पुर्ण होईल.प्रॉब्लेम हा आहे की खालच्या जातीतले असो वा वरच्या, लोकांना जातीचे प्रेम, अभिमान , ओढा , आधार वाटत असतो. आणि अगदी खालच्या जातीच्या माणसाची पण जात टाकायची तयारी नसते. जात खालची असली तरी तीच त्याची ओळख असते. ठरवले तर आज मोठ्या शहरात रहाणारा माणुस नक्कीच 'जात' सोडून राहू शकतो. पण अगदी खालच्या जातीतील सधन माणसे सुद्धा 'जात' त्यागायला तयार दिसत नाहीत. >>>

हे खालची व वरची जात म्हणजे काय म्हणायचे आहे लक्षात आले नाही. म्हणजे सुपिरियर, इन्फिरिअर असे तर नव्हे? वरची आणि खालची म्हणजे?

जात हे भारतातील एक वास्तव आहे हे मान्य झाल्यानंतर हे 'खालचे, वरचे' असे उल्लेख करून जातपात नष्ट होईल असा 'प्रॉमिसिंग' वाटणारा प्रतिसाद देणे योग्य का? की उपरोधाने असे उल्लेख केलेले आहेत? प्रथम कोणत्याही जातीला खालची, वरची असे म्हणणे आपणच सोडायला नको का? (मग भाग पाहिलेला नसला तरी ते स्वीकारार्ह वाटेल, नाही का?)

==========================

जातव्यवस्था हे एक वास्तव आहे व काही शतकांपासून ते एक अस्त्र म्हणून वापरण्यात येत आहे या दोन्ही बाबी खर्‍या आहेत.

याबाबत पुढारी, शासन व नागरीक अशा कोणत्याच पातळीवर रिअलिस्टिक एफर्ट्स होत नसावेत हे आमीर खानच्या कार्यक्रमातून पुढे आलेले दिसत आहे.

एक कार्यक्रम, एक चळवळ व एक वास्तव समोर आणून जागरुकता निर्माण करून शतकानुशतकांच्या प्रथांची पुटे मनावरून झटकण्याचा एक अटेंप्ट म्हणून कार्यक्रम नक्कीच उत्तम असणार!

परंतु, जातव्यवस्था व आपापल्या जातीबाबतचा अभिमान हा मनाच्या सूप्त पातळीवर राहणारच. (खरे तर इतर जातींचा काहीसा तिरस्कारही). आंतरजातीय विवाह होतील, ब्राह्मण आणि महार गळ्यात गळे घालून फिरतील आणि शहाण्णव कुळी मुलगी मांगाच्या मुलाबरोबर पळून जाईल पण या धरतीत मुरलेली जातपात जाणार नाही. ती जाण्यासाठी तांत्रिक विकास, शहरीकरण व चळवळ या अपुर्‍या पडतील. फुकटचा आशावाद चांगला असतोच. असेही असेल की खूप लोक खरोखर त्या कार्यासाठी झोकूनही देत असतील. पण जातपात काही जाणार नाही.

याचे कारण समाजातील आयडेंटिटीच जातीवर असते. रिक्षावाला (उदाहरणार्थ) मराठाच असणार, पुजारी ब्राह्मणच असणार आणि चप्पल शिवणारा चांभारच असणार (असायला हवा असे म्हणत नाही आहे), हे जमीनीत मुरलेले आहे. दुर्दैवी बाब ही आहे की जात हीच बर्‍याच मोठ्या समाजातील भागात 'आयडेंटिटी' म्हणून अस्तित्वात आहे. भारताची तांत्रिक प्रगती ही ज्या विशाल क्रॉस सेक्शनवर होत आहे त्यातील जवळपास ऐंशी नव्वद (सुमारे व साधारण) टक्के समाज त्या विकासापासून प्रत्यक्षात वंचितच आहे. आणि चळवळ उरलेल्या वीस टक्यांना चालवायची इच्छा आहे.

जातीय व्यवस्थेतील दुर्दैवाचे हे समर्थन नसून इतकेच म्हणायचे आहे की देशाची संस्कृतीच जात व धर्म व्यवस्था यावर अधिष्ठित आहे. तिच्यात आमुलाग्र बदल करणे हे जवळजवळ भारत हा देशच बदलण्यासारखे आहे.

त्यामुळे ते स्वीकारून व प्रत्येक जातीला संधी देऊन पुढे जाणे क्रमप्राप्त ठरते व त्यामुळे आरक्षण निर्माण होते.

अर्थात, ते म्हणजे साप निघाल्यावर डासांचा फवारा मारण्यासारखेच आहे, पण निदान ठोस तरी आहे.

बाकी कोणतीच कृती, योजना या रक्तात भिनलेल्या भावनेला ठार करत नाही.

त्यामुळे दलितांना (तथाकथित) संधी देत राहणे व तांत्रिक विकास व जागतिक 'एक्स्पोजर' सर्व थरात पोचवत राहणे याच मार्गाने ती भावना नष्ट होऊ शकेल.

<त्यामुळे दलितांना (तथाकथित) संधी देत राहणे व तांत्रिक विकास व जागतिक 'एक्स्पोजर' सर्व थरात पोचवत राहणे याच मार्गाने ती भावना नष्ट होऊ शकेल.>
मलाही कधीकाळी असेच वाटायचे.

बेफिकीर कार्यक्रम पाहिलात का? आयएएस ऑफिसरसाठी वेगळा ग्लास(ऐकताना 'एक होता कार्व्हर' आठवले.) संस्कृतच्या प्राध्यापिकेने भाड्याने घेतलेले घर सोडल्यावर शुद्धीकरण.

>>कलाकौशल्ये कुणीही सहज शिकू शकतो हे मात्र पटण्यासारखे नाही.
_कुणीही_ = _प्रत्येक_ माणूस असे नाही.
कुणीही म्हणजे कोणत्याही जातीचा कुशल माणूस असे मला वाटते.
शक्य आहे. सोपे आहे असे नाही.

रेव्यु मला वाटते आपण सगळेच पार्ट ऑफ प्रॉब्लेम आहोत. एकदा प्रॉब्लेम आहे हे मान्य केले की मग सोल्यूशन शोधायला गती येईल.

>>>>>>कलाकौशल्ये कुणीही सहज शिकू शकतो हे मात्र पटण्यासारखे नाही.
कुणीही म्हणजे कोणत्याही जातीचा कुशल माणूस असे मला वाटते.
शक्य आहे. सोपे आहे असे नाही..<<<<<<

शक्य आहे. सोपे आहे असे नाही.+१००००

वर्षानुवर्षे पारंपारीक गणपती बनवायचाच व्यवसाय असलेल्या गावातल्या एका प्रसिद्ध मुर्तिकाराच्या मुलाला माती तिंबणं पण जमायचे नाही म्हणून त्याचा बाप वैतागयाचा की ह्या व्यवसायाचे पुढे काय? कोण बघणार?. ना अभ्यासात गती त्या मुलाला. शेवटी आजोबाने सांगितले जावु दे, नसेल इच्छा व आवड. कशाला घुसवितोस ह्याच्यात.
तेव्हा कला ही अंगात असली व तिची आवड व त्यातच काही करायची स्वतःहून इच्छा असेल तर कोणत्याही जातीचा व पारंपारीक कलेचा वारसा नसून माणूस शिकु शकतो. फक्त त्या माणसाच्या अंगात कला पाहिजे. "अबक" च्या घरी जन्मलेला म्हणून काही येणार नाही. करायला म्हणून करणारे कलाकार कुठे अशी पातळी गाठतात?
कित्येक गायकांची पोरं भेसूरी गातात इतकी शिकवणी व वातावरण पूरक असून सुद्धा. तर अक्क्ख्या घरात गाणे कोणीच गात नसलेल्या आई वडीलांच्या घरची मुल लहानपणापासून सुरेल गातात.. त्यात योग्य शिकवणीची व त्यांच्या मेहनतीची जोड मिळाली की उत्तम होतात.
जातीचा काहीही संबध नाही. आणि अनुभव हा प्रत्येकाला त्यात आवडीने मेहनतीची वर्षे घालवविली तर येवु शकतोच. . पण कोणी जन्माला येतानाच पारंपारीक चित्रकार,सुतार, कुंभार म्हणून जन्मला नसतोच मुळी.
कित्येक चांगल्या नट- नायिकांची मुले भद्दड अ‍ॅ़ंक्टींग करतातच ना... लहानपणापासून कला बघतात तरी... पण ते हेरायची अक्कल व मूळात गुण हवे ना...
---------------------------------------------------------------------------------------------------
फक्त सुतारकीची आवड म्हणून शिकलेल्या माझ्या आजोबांनी एक अक्खा लाकडाचा झोपाळा स्वतः बनवलेला होता गावी. त्याची लाकडावरची नक्षी बघून लोक अचंबित होत की तो त्यांनी केला म्हणून. का तर? हे कुठल्या तरी मुरब्बी(मुरलेल्या) सुताराचेच काम असेल ह्या विचाराचा लोकांवर असलेला प्रभाव म्हणून. तुम्ही कधीपासून सुतारकी करताय वो? असे म्हणत लोकं.

<आजही हॉस्पिटल्समधून आया आणि वार्डबॉय यांना अशी कामे करावी लागतात. ते कांही सगळे 'भंगी' जातीचे असतात का? >
या वाक्यातून काय सुचवायचे आहे ते कळत नाही. हॉस्पिटलची संकल्पना सार्वत्रिक होण्याचा आणि या व्यवसायांचा इतिहास फार जुना नाही. आया, वॉर्डबॉय हे व्यवसाय स्वेच्छेने स्वीकारले जातात. तुमचा जन्म विशिष्ट आईवडिलांच्या पोटी झाला म्हणून तुम्ही हा व्यवसाय करा अशी सक्ती नसते. 'अशी' कामे हा त्या व्यवसायाच्या एकंदरित कामाचा एक भाग असतो. ते काम करणार्‍याला तुच्छ आणि अस्पृश्य लेखले जात नाही. आया आणि वॉर्डबॉय यांचा स्पर्श विटाळ मानला जात नाही (ते परवडायचेही नाही).
----
जातीभेदाचा विषय हाताळण्याचे धाडस आमीर दाखवेल असे वाटले नव्हते. तेही त्यने दाखवले. जातीभेदाचे सर्वाधिक निंदनीय व ज्यावर दुमत होणार नाही असे रूप त्याने विषय मांडताना खुबीने घेतले.

Pages