तुझ्या चाहुली जाणवाव्या कितीदा
मनाला फुटावी नवी पालवी
किती तारकांनी नभाशी सजावे
तुझा चंद्र स्वप्नामधे मालवी
कळे ना मला मी कुठे लुप्त होतो
निवारा तुझ्या सावलीचा मला
जणू सांजवेळी कुणी सप्तरंगी
मुखावर पदर रेशमी ओढला
विचारांस माझ्या नसे आज थारा
पतंगाप्रमाणे इथे वा तिथे
हवेच्या दिशेशी जुळे खास नाते
तुझा गंध मोहून नेतो जिथे
पुन्हा एकदा दाटुनी रात येते
पुन्हा मी नभाशी असा भांडतो
जरी दूर असला तरी चंद्र माझा
मला शुभ्र अन् आपला वाटतो
कशी रोज माझी सरे रात्र येथे
तुला आकळावे कसे? दूर तू
मनाच्या सतारीतुनी छेडलेला
सुन्या जोगियाचा सुना सूर तू
सरी पावसाच्या सवे आणती हा
तुझ्या पैंजणांचा जुळा सोहळा
भिजावे सये नाद वेचून सारा
बनूनी तुझा मी हरी सावळा
.................... बनूनी तुझा मी हरी सावळा
.................... बनूनी तुझा मी हरी सावळा
....रसप....
८ जुलै २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/07/blog-post_08.html
रसप तुम्ही आम्हाला जसे एक
रसप तुम्ही आम्हाला जसे एक गझलकार म्हणून खूप आवडता तसेच एक कवि म्हणूनही खूप आवडता.... नेहमीच !!तुम्हाला हे इतक्या सहजासहजी कसं शक्य होतं ??
आम्हाला पण ही कला शिकवा ना राव
आपला
वैवकु
पुन्हा एकदा दाटुनी रात येते
पुन्हा एकदा दाटुनी रात येते
पुन्हा मी नभाशी असा भांडतो
जरी दूर असला तरी चंद्र माझा
मला शुभ्र अन् आपला वाटतो
रसप,सुंदर शब्द या कवितेवर प्रसन्न झालेत..एक चांगली रचना वाचण्याचा आनंद मिळाला.
जरी दूर असला तरी चंद्र
जरी दूर असला तरी चंद्र माझा
मला शुभ्र अन् आपला वाटतो >>>>मनातल बोललात कविराज.
सुंदर काव्य.
भुजंगप्रयात मधील रचना आहे का
भुजंगप्रयात मधील रचना आहे का रे ......
ही रचनाही फारच सुरेख..........
मस्त कविता. "मनाच्या
मस्त कविता.
"मनाच्या सतारीतुनी छेडलेला
सुन्या जोगियाचा सुना सूर तू " >>> हे सर्वाधिक आवडलं.
धन्यवाद ! शशांक
धन्यवाद !
शशांक सर,
भुजंगप्रयात नाही. एक आड एक चरणात एक गुरू कमी असलेले अर्धसमव्रुत्त आहे. दोन चरण एकत्र केल्यास 'सुमंदारमाला' होऊ शकेल. पण माझ्या मनात संभ्रम आहे.
व्वा, तुझा चन्द्र....मस्त.
व्वा, तुझा चन्द्र....मस्त.
किती सुन्दर!!
किती सुन्दर!!