सर येते जेव्हा जेव्हा....

Submitted by रसप on 5 July, 2012 - 03:18

सरल्या स्मरणांच्या ओठी उत्कट शब्दांचे गाणे
हलकासा शीतल वारा हातातुन निसटुन जाणे
सावरतो भरकटणाऱ्या बेधुंद मनाला जेव्हा
दरवळत्या संध्याकाळी सर रिमझिम येते तेव्हा

विसरुन गेलेली प्रीती धडधडत्या हृदयी दाटे
झुकलेले अंबर पाहुन संदेह अनामिक वाटे
खिडकीची चौकट मजला खिळवून ठेवते जेव्हा
आक्रोश आतला घेउन सर धो-धो येते तेव्हा

हातावरच्या रेघांतुन भलतीच वाट सापडते
अन मनासारख्या देशी मन पळभर हे बागडते
माझ्यातच रमलो असतो मी कधी नव्हेतो जेव्हा
दबकून छुप्या रस्त्याने सर उगाच येते तेव्हा

ओथंबुन येता डोळे निर्धास्त चिंब मी भिजतो
आभाळ मोकळे होता मी क्षितिजापाशी थिजतो
मन पुन्हा पुन्हा वेडावुन भिजण्यास धावते जेव्हा
बरसून दूर गेलेली सर फिरून येते तेव्हा

छुनछुन पैंजणनादाने नजरेची भिरभिर होते
हळुवार तुझ्या गंधाने भारून हवा ही जाते
रेशीम खुल्या केसांचा मज स्पर्श जाणवे जेव्हा
आकाश फिरून उजाडे सर चुकवुन जाते तेव्हा

....रसप....
१६ जून २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_17.html

गुलमोहर: 

क्या बात है रणजित...... काय जमलीये मित्रा ही रचना......
छान श्रावण सरी झुळझुळाव्या, रेशीम सरी उलगडाव्या तशी ही गोड रचना. पुन्हा पुन्हा गुणगुणत रहावी अशी आहे.
अतिशय आवडली हे वेगळे सांगणे नकोच.
मनापासून धन्यवाद....