हवेच आता जळभरले ढग

Submitted by पुरंदरे शशांक on 5 July, 2012 - 02:11

खुपत रहाते डोळ्यांना ही
आषाढातिल नितळ निळाई
जादूभरले रंग असुनही
इंद्रधनूही टोचत राही

नको वाटते तिरिप उन्हाची
नावहि आता नको रवीचे
हवेच आता जळभरले ढग
गदगदलेले करडे गहिरे

नसो जरी तो गडगडणारा
बरसणारा मेघ येऊ दे
नित झरणा-या झारीमधुनी
थेंब सुखाचे जरा वर्षु दे

जुनेर अंगी लपेटलेली
तृषार्त झाली अवघी अवनी
लाज राख रे तू गिरिधारी
धरेस सजवी हिरव्या वसनी...

गुलमोहर: 

.

अगदी अप्रतीम आहे ही कविता

अगदी साधेसुधे दोन बदल सहज म्हणून सुचले

१)हवेच आता जळभरले ढग>>>>>> हवेत आता जळभरले ढग....
२)बरसणारा मेघ येऊ दे>>>> "पाउसणारा" मेघ येऊ दे........

अगदी सहज सुचले म्हणून ........... कोणतीही विनन्ती/ सूचना /आग्रह इत्यादी नाही .गैरसमज नसावा

जुनेर अंगी लपेटलेली
तृषार्त झाली अवघी अवनी
लाज राख रे तू गिरिधारी
धरेस सजवी हिरव्या वसनी...>>>व्वा!
आवडली.

जुनेर अंगी लपेटलेली
तृषार्त झाली अवघी अवनी
लाज राख रे तू गिरिधारी
धरेस सजवी हिरव्या वसनी...

कृष्ण द्रौपदीचा संदर्भ अप्रतिम..