पुन्हा पाउस.

Submitted by suneha on 5 July, 2012 - 01:32

पावसाच्या सरी झिरमिर झिरमिर
ढगांची लगबग भरभर सैरभैर
विजेची अदा कमनीय सुंदर
वाऱ्याचा दंगा गरगर सरसर.

मनाची लपाछपी, पापण्यांची भिरभिर
मायेचा ओलावा, बटांची भुरभूर
पाऊस माझा, पावसाची मी,
अंगावर तुषार, काळजाची हुरहूर.

सुस्नात धरती, हिरवळीची सळसळ
बिलोरी पिंपळपानांची लोभस चमचम
प्राजक्ताचा सडा झुरमुर झुरमुर
ओल्याशार जमिनीच्या गंधाची दरवळ.

ओथंबलेली पाने, थेंबांची टपटप
भिजलेले पंख, गुपचूप चिडीचुप.
भारावलेला आसमंत, पावलं झपझप
दूर एकांड्या माडाच्या उरात धकधक.

पावसाची झिरमिर, पापण्यांची भिरभिर
पुन्हा नवलाई, अन पुन्हा काहूर.

गुलमोहर: