शांतता बेत

Submitted by vandana.kembhavi on 3 July, 2012 - 06:23

झोपेतून जाग आली तीच पक्षांच्या मधुर किलबिलाटाने. उठून बाहेर आले आणि पडदे बाजूला केल्यावर घर उजेडाने भरुन गेले. वातावरणातला स्वच्छपणा मनाला प्रसन्नतेचा शिडकावा देऊन गेला. आजूबाजूंच्या झाडावर कित्येक पक्षी बसून सकाळ झाल्याची वर्दी देत मजेत बसले होते. थोड्याच वेळात गॅलरीमध्ये एक एक पक्षी हजेरी लावून गेला. हिरवे, लाल, जांभळे रंग अंगावर ल्यायलेल्या पोपटांच्या जोड्या, पांढरा शुभ्र रंग आणि तसाच शुभ्र तुरा मिरवणारे "कोकाटू" आणि बरेचसे छोटे पक्षी माझ्या तिथेच उभी असण्याची तमा न बाळगता गॅलरीभर बागडू लागले. माझे मन आनंदाने भरून गेले. काचेच्या दरवाजा आडून मी मनसोक्त पक्षांचे निरीक्षण केले. त्यांचे बागडून झाल्यावर त्यांनी आकाशात भराऱ्या मारल्या आणि मी त्यांच्याकडे मान उंचावून ते दिसेनासे होईपर्यंत पहात राहिले....आता मात्र आपणही घरातून बाहेर पडायला हवे असा विचार मनात आला आणि चटकन आवरून मी बाहेर पडले.
घराचे दार बंद करून मी रस्त्यावर आले आणि आखीव रेखीव रस्त्यांवरून चालायला सुरुवात केली. रस्त्यावर कुणीही नव्हते, शांत निर्मनुष्य रस्त्यावरून मी निवांत चालायला सुरुवात केली. मधूनच एखादी गाडी जात होती, तेवढीच काय ती माणसांची जाग, बाकी खूपच शांतता.. काल संतत पडणाऱ्या पावसाने आज पूर्ण विश्रांती घेतली होती त्यामुळे अजूनही ओलेत भासणारे निसर्गाचे रूप खूपच लोभसवाणे भासत होते. थोडस चालून गेल्यावर एक मोठे उद्यान दृष्टीपथात आले, चालता चालता मी त्या उद्यानात येऊन पोहोचले, दूरवर कुठे तरी माणसे दिसतात का यावर आपसूकच माझी नजर गेली,रविवारी सकाळी जेवढ शांत असू शकते तेवढीच शांतता वातावरणात भरून राहिली होती, त्या शांततेची तमा न बाळगता मी बागेतून चालू लागले, आणि माझ्या कानी समुद्राची गाज आली, नाकापुड्यांमध्ये समुद्राचा चिरपरिचित सुगंध शिरला आणि नकळत पावले समुद्राकडे वळली....अथांग समुद्र नजरेच्या टप्प्यात आला आणि माझ्याही नकळत पावलांचा वेग वाढला, वेगाने चालत मी समुद्रावर आले, वाळूचा स्पर्श पावलांना झाला आणि मी डोळे मिटून तो स्पर्श अनुभवून घेतला...लाटांकडे पाहून मी प्रसन्न झाले, फेसाळणाऱ्या लाटा हलकेच किनाऱ्यावर येउन आदळत होत्या. समोर पसरलेले निळेशार पाणी, त्यावर आच्छादलेले निरभ्र आकाश आणि पांढऱ्या शुभ्र वाळूचा किनारा आणि त्या किनाऱ्यावर उभी मी... एकटीच...आता या किनाऱ्यावर मनसोक्त चालायचे आणि ही शांतता गात्रांमध्ये भरून ती शांतता अनुभवायची....कुणी कुणी मला त्यापासून अडवणारे नव्हते, कारण अडवायला होतं तरी कोण? अगदी काळ कुत्रं सुद्धा नव्हत...माझ्या मनात हा विचार यायला आणि लांबून भुंकत येणारा काळा कुत्रा दिसायला एकच गाठ पडली...
मी घाबरले, आजूबाजूला आता आमच्या दोघांव्यतिरिक्त इतर कुणीही नव्हते म्हणजे आता त्या कुत्र्याला सामोरं जाणं भागच होतं. तो धावत माझ्याजवळ आला आणि मी घाबरत नाही म्हटल्यावर शांत झाला आणि माझ्या पायाला चिकटून उभा राहिला. मी प्रेमाने (?) त्याच्या डोक्यावर हात फिरवायला सुरुवात केली आणि तोंडाने त्याला "गुड बॉय" म्हणत राहिले. मी हात काढून घ्यायला लागले तर तो अजून जवळ यायला लागला. मला काहीही करता येइना, मी हालचाल करायचा प्रयत्न केला की तो अजून जवळ येऊन मला ढकलायचा प्रयत्न करु लागला, बहुदा तो मला त्याच्याशी खेळ असे सांगत होता. पाच मिनिटे झाली, दहा मिनिटे झाली तो काही हलेना. माझ्या लक्षात आले की तो कुत्रा एका पायाने लंगडा होता, त्याच्या गळ्यात पट्टा होता पण लांबवर कुठेही त्याच्या मालक वा मालकिणीचा पत्ता नव्हता. त्याला गुड बॉय म्हणणे थांबवून आता मी त्याच्याशी मराठीत गप्पा मारु लागले......त्याच्यावर काही परिणाम नव्हता मी मात्र आता रडकुंडीला येण्याच्या अगदी जवळ सरकू लागले होते, आवाज सहज ठेवत मी त्याला जा सांगून पाहिले पण काही फरक नाही....मी कुणीतरी किना-यावर येइल या आशेने इकडे तिकडे पहात होते पण व्यर्थ.....माझ्या किना-यावर शांतपणे फिरण्याच्या बेतावर पाणी पडले होते, आता माझा धीर पण सुटू लागला, आणि काय झाले माहित नाही कुत्रा वळला आणि मागे गेला......
मागे वळून त्याने समुद्राच्या दिशेने चालायला सुरुवात केली, मला काय करावे हेच सुचेना.... मी लगेच घराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. हळूच तिरक्या नजरेने मी तो माझ्या मागे तर येत नाही ना याकडे लक्ष ठेवून होते आणि मला तो माझ्या मागे येताना दिसला...... मी समोर रस्त्यावर कुणीतरी दिसेल या आशेने रस्त्याकडे पाहिले पण काही उपयोग नव्हता. मी त्यातल्या त्यात भराभर चालू लागले आणि वर रस्त्यावर आले. तिथून रस्ता दोन बाजूला जात होता. मी माझ्या रस्त्यावर चालू लागले आणि हळूच मागे पाहिले तर तो बिचारा कुत्रा दुस-या रस्त्याने त्याच्या घरी निघाला होता, मला खुदकन हसू आले.....
पुन्हा वळून किनाऱ्यावर जाण्याचा मोह मी टाळला, न जाणो पुन्हा हे महाशय माझ्या मागून आले तर....त्याच्याशी खेळण्याचे त्राण माझ्यात नव्हते ... निसर्गाचा शांतपणा अनुभवण्या पेक्षा माझ्या माणसांनी भरलेल्या माझ्या चिरपरिचित जगात जाणे जास्त सोयीचे होते, नाही का?

गुलमोहर: