सनम - ३

Submitted by बेफ़िकीर on 2 July, 2012 - 08:06

आपली मोठी जाऊ ही आपली मोठी जाऊ नसून सासर्‍याची दुसरी बायको आहे आणि गावाने बोंब मारू नये म्हणून मोठी सून म्हणून मिरवत आहे हे सनमला दुसर्‍याच दिवशी समजले. विन्याने सांगितले. विन्याला तिच्याशी तेवढे बोलायला वेळ मिळाला. का मिळाला, तर त्याच्या आईने त्याला सांगितले की नव्या सुनेने उगाच तोंड उघडू नये म्हणून तिला आधीच हे सांगून ठेव. तेवढे वाक्य बोलून आणि लाळ गाळत विन्या सटकला.

सनम भाकरी करत होती. माहेरी असतानाही अनेकदा करायची, पण सासरी एका वेळी पंचवीस भाकरी कराव्या लागत होत्या. नाश्ता, जेवण, डबा आणि रात्रीचे जेवण हे सगळे भाकरीच असायची. सनमला तिचे रान आठवले. तेथे शिकार तर ती रोजच करायची. पण फळेही मिळायची विविध प्रकारची. त्या तुलनेत या दोन खोल्या म्हणजे नरकच.

स्वभावाने समजूतदार असावे वगैरे बाबी सनमपासून फारच लांब होत्या. मोकळ्या हवेत आणि चहुबाजूला पसरलेल्या एकांतात हुंदडत वाढलेली मुलगी होती ती. शंभर भाकरीही आरामात थापल्या असत्या. पण एखादा माणूस स्वभावाने वाईट असू शकतो आणि तरीही आपल्याला शांत बसावे लागते किंवा तसे आपल्याकडून अपेक्षित असते या विचारापासून ती फारच दूर होती. कालच रात्री तिची 'लमान' म्हणून झालेली उपेक्षा आणि रात्री उशीरापर्यंत करायला लागलेली कामे या दोहोंनी ती भडकलेली होती. या लग्नाला अर्थ काय हे तिला समजत नव्हते. तिच्यामते लग्न म्हणजे नवरा नवरी राहतात आणि मजा करतात. इथे भलताच प्रकार होता. अरे ला का रे करण्याचा सनमचा स्वभाव होता. सासरी पाय टाकण्यापूर्वी आईने हजार उपदेश केलेले होते. कोणी काही म्हणाले तरी मान खाली घालून काम करत राहायचे. सर्वांवर प्रेम करायचे. सासूवर तर जीव उधळायचा. आवाज कधीही वाढवायचा नाही. विचारल्याशिवाय बोलायचे नाही. चार चौघांत उगाचच वावरायचे नाही. बाहेरचे कोणी आले किंवा दीर किंवा सासरे समोर आले तर डोळ्यांपर्यंत पदर ओढायचा. पहाटे लवकर उठून तयार होऊन कामाला लागायचे. सतरा सूचना केलेल्या होत्या.

सनमचा मूळ स्वभाव आणि केलेल्या सूचना यात काहीही साधर्म्य नव्हते. ती तशी नव्हतीच. तिच्या अंगात ताकद तर इतकी होती की एखाद्या पुरुषाने मान खाली घालावी. तिचा भाकरी थापण्याचा वेग आणि भाकरीचा आकार पाहून सगळेच बघत बसले होते. तिचे कोणाकडेच लक्ष नव्हते. आईची शिकवण तिला आठवत असली तरी 'जश्यास तसे' या न्यायाने आपण नक्कीच वागू शकतो हा तिला आत्मविश्वास होता. त्यामुळे तिला सासरच्या पब्लिकचे काही टेन्शनच नव्हते. उलट सासरच्यांच्याच मनांवर ताण होता. ही मुलगी परजातीतली, त्यात दिसायला लाखात एक, त्यात आपल्या घरात न शोभणारी आणि त्यात रानात बेधुंदपणे वाढल्यामुळे खणखणीत स्वभावाची झालेली. ही कधी काय म्हणेल याचा त्यांना अंदाज नव्हता. पण सासर्‍यांनी, म्हणजे भिकाने सगळ्यांना सांगून ठेवले होते. तिला भरपूर कामं करायला लावा, सहा महिन्यात कृश व्हायला हवी.

परिणाम असा झाला की दुसर्‍याच दिवशी सकाळी सनमबाबत काहीही अंदाज नसताना सासूने तोंड सोडले.

"हौसे, तू तुझ्या जातीनं वाग बया.....साधं लुगडं न्येसत जा... त्ये लमानाचं थेर आपल्याला न्हाई जमायचं"

सनमसकट प्रत्येक बाई साधंच लुगडं नेसलेली होती. सनम दिसायलाच अशी होती त्याला ती काय करणार? कोणत्याही लुगड्यात ती सोन्यासारखीच दिसायची. सासूच्या या वाक्यात लमाणी जातीबद्दल अनावश्यक उल्लेख आला आणि तो आपल्याला उद्देशून आहे हे सनमला समजले. आईची शिकवण आठवली. बोलायचे नाही. सगळे जण तिच्याकडे बघत होते. ही जर काही उलटून बोलली तर सासू तोंड सोडणार होती. आणि पुन्हा त्यावर सनम काही बोलली तर थोरला दीर तिला बडवणार होता. कारस्थानी लोक.

मधली जाऊ कारण नसताना आत जाऊन लुगडं बदलून आली. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर नापसंतीचा पूरच होता जणू सनमबद्दल.

भाकरी संपवून सनम आसपास जे काय सांडलेले होते ते हाताने गोळा करत उठली आणि हराच्या दारातून बाहेरच्या नाल्यात टाकायला निघाली. सासू ते पाहून ओरडली.

"आमच्यात नव्या सुना लागलीच घराबाहेर जात न्हाईत... आन पदर नाही व्हय घेता येत???"

सनम मुकाट मागे वळली आणि एका कोपर्‍यात ते हातातले नीट ठेवत तिने हात धुतले आणि पुढच्या कामाला लागली. तेवढ्यात एक दीर बडबडला.

"आग आय ती लमाने... लमानांना पदराची जरूर नस्ती.. त्यांचं रूप जगाला दिस्न्यासाठीच आस्तं"

सनमच्या डोक्यात स्फोट झाले. त्या दिराला लाथेने उडवावा असे तिच्या मनात आले. पण गप्प बसली. एक शब्द न बोलता तिने भांडी घासायला घेतली.

या लोकांना लमाणी मुलीचे हात लागलेल्या भाकरी बर्‍या चालतात, असे तिच्या मनात आले.

तीन नंबरची जाऊ पुटपुटली.

"आमच्याकडच्यांनी दहा हजार रोकड घातलीवती... तवा मला उंबरा ओलांडू दिलान... आन हितं म्हन्जे इनय भावजींनी निस्तं रुपडं बघितलन आन आन्ली उचलून लमान"

आता मात्र सनमचा तोल सुटला. तिने मागे वळून तीक्ष्ण नजरेने जावेकडे पाहिले.

जाऊही वस्ताद. म्हणाली.

"बघते काय? तुझ्या डोळ्यांत न्हाई मावायची मी"

सनमने पुन्हा कामात डोके घातले. एक दीर उठला आणि सनमसमोरच्या भांड्यांच्या ढिगार्‍यातच तंबाखू थुंकून म्हणाला....

"भाईर थुकायच म्हन्जे गाव बोंब मारतंय... म्हनं वाटंत थुकल्यानं रोगराई व्हते"

सनम सटकलेली होती. ती चिडायचीच सगळे वाट पाहात होते. त्याच दिवशी झुर्क्याला बातमी पोचवायचे त्यांचे ठरले होते. की नवी नवरी जीभ चालवायला लागली. आम्हाला असलं चालायचं नाही म्हणून.

मुलीचं एकदा लग्न झालं की तिचं नशीब सासरच्यांच्या स्वभावाशी बांधलं जातं, त्यामुळे झुर्क्या जमीनीवर येऊन घसघशीत हुंडा द्यायला तयार झाला असता हे या लोकांना चांगले माहीत होते.

पण आश्चर्य म्हणजे अख्ख्या रानाचं ऐकून न घेणारी सनम आत्ताही गप्प बसली.

त्यामुळे घरच्यांची पंचाईत व्हायला लागली होती. हिला काही कारणाने थेट हाणावे तर ही कशी उसळेल ते माहीत नव्हते. नाहीतर आपण द्यायचो एक फटका आणि ही काठी घेऊन सगळ्यांना बडवायची. झाडावरून इकडून तिकडे लीलया उडणारी ही पोरगी आहे. माकडं लाजतील हिला पाहून असल्या हालचाली.

तीनही दीर दारूने फुसके आणि सासरा तसाही म्हातारा त्यात तोही दारुडा! ही मुलगी एकेकाला एकेक दणका घालून झाडावर चढून बसली तर करणार काय?

इतका वेळ तिचा अपमान करणार्‍या घरच्यांना आता तिच्या मौनाचीच भीती वाटू लागली. ही शांत आहे की भडकलेली हे त्यांना समजेना. तिची त्या सर्वांकडे पाठ होती.

"चला... च्या टाका"

सासरे निर्मलाकडे बघत म्हणाले. निर्मलाने नाक उडवत सांगितले.

"माझ्याच हाच्चा पायजेल का लमानी च्या पायजेल?"

पुन्हा 'लमानी' हा शब्द ऐकला तसे सनम मागे वळली आणि निर्मलाकडे बघत अतिशय शांतपणे पण अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाली.

"पुन्हा जातीचं नाव काढायचं न्हाई... कालपासून दोन चार यळां ऐकलं...पुन्हा लमान म्हनालं कोन तर जीभ हासडून हातात दील...आधी म्हाईत नव्हती काय जात माझी? रानात आलेवते सासू सासरे तवा? मागनी घालून आन्लीय हितं मला... पाय धरत आल्ये नव्हते मला पदरात घ्या म्हनून... झुर्क्याची सनम हाय मी... नीट र्‍हाईल त्याच्याशी नीट आस्ते... नायतर तुला उल्टी टांगंन आन खालून जाळ करंन..."

भिकाच्या दोन खोल्यांच्या चार भिंती पहिल्यांदाच असले बायकी पण भयानक बोल ऐकत होत्या. निर्मला बसल्या जागी हादरली होती. डोळे थिजवून सनमकडे पाहात होती. खुद्द सासर्‍यासमोर हिने आपल्याला दम दिला हे तिला अजून खरं वाटत नव्हतं. तिघेही दीर बसल्या जागीच विचार करत होते. हिच्यावर हात उचलला आणि ही झाडांवरून उड्या मारत माहेरी गेली तर काय करा? सून सांभाळून ठेवता येत नाही म्हणून गाव शेण घालेल तोंडात. आणि हिचं ऐकून घ्या तरी गाव तेच करेल. या बयेचं करायचं काय? तंगड मोडून ठेवलं की ही उड्या मारून जायची नाही माहेरी. पण तसं करता तर आलं पाहिजे?

सासरा मात्र खवळला. त्याच्यादेखत त्याच्या लाडक्या दुसर्‍या बायकोची पार पिसं काढली होती सनमनं. मोठ्ठाच अपमान

भिका गरजला.

"ऐ.. वामन्या.. आन त्यो गज.. घालतूच टाळक्यात हिच्यायला हिच्या.. पहिल्या दिशी जीभ चालतीय"

निर्मलाचा कागदोपत्री नवरा असलेला वामन्या उठला आणि गज घेऊन आला. गज घेऊन आला तेव्हा त्याच्या डोळ्यांवर त्याचाच विश्वास बसेना.

सनमच्या हातात जाड लाकडी काठी होती. ती सासर्‍याच्या खोकड छातीवर रुतवून तिने सासर्‍याला भिंतीवर दाबला होता. त्याला न श्वास घेता येत होता न नि:श्वास सोडता येत होता. तो गुदमरून सनमकडे बघत असताना बाकीचे हडबडून दुसर्‍या भिंतीला चिकटून उभे राहिले होते. आणि सनम गळ्याच्या शिरा ताणून खाऊ की गिळू अशा नजरेने म्हणत होती.

"यडाभ्भोक.. ही काठी छातीतून आरपार जाईल तर भिंतीत रुतंल.. पायाखाली दोन फुटाचं माकड दाबून मारत्ये मी रानात.. तुझ्यायला तुझ्या... माझ्या टक्कुर्‍यात गज घातलास तर तो गज मोडंल... अय भवाने... सासू सासू म्हनून लय ऐकलं तुझं... म्हायेरी चाल्लीय मी... थितं यून झुर्क्याच्या पाया पडाल तवा माघारी यील... सनम नांव हाये माझं.... जातीची लम्मान हाये मी.. हवेवंर चालत्ये आन पाण्यावर पळत्ये मी... अय गज घेऊन उभा.. टाक तो गज.. पेलवतोय व्हय तुला??? "

दिराने वचकून गज खाली टाकला. सासू यड लागल्यासारखी बघत बसली. सनमने काठी सासर्‍यापासून दूर केल्यावर तो जोरजोरत खोकत छाती धरत खाली बसला... आणि सनम...

... सनम घराबाहेर पडून चौकापर्यंत धावत गेली... आख्खा रस्ता डोळे फाडून तिच्याकडे बघत असतानाच ती एका पिंपळावर सरसरा चढली... तिथून शेजारच्या पिंपळावर तिने माकडासारखी उडी मारली... अशीच तिने आणखीन दोन मोठी झाडे पार केली आणि नंतर ती दिसेनाशीच झाली...

... रस्त्यावरचा एक अन एक सजीव सनमच्या त्या भयानक वेगाकडे आणि अद्भुत क्रियांकडे बघत तोंडात बोटे घालत होता...

केवळ दिड तासात सनम स्वतःच्या माहेरी पोचलेली होती आणि तिचा चमत्कार ऐकून तिला रागवायच्या ऐवजी तिचे आईबाप डोक्याला हात लावून हासून हासून दमलेले होते..

===================================

बाई पळून गेली तर बाईच बदनाम होते या समजाला सुरुंग लागला. खोकत खोकत कसाबसा बाहेर आलेला भिका आणि बाकीचे वडार तोंडावर हात ठेवून उडत उडत गेलेल्या सनमच्या दिशेला बघत बसले आणि कोणीतरी 'काय हून ग्येलं' विचारल्यावर लाजलज्जेचा विचार मनात यायच्याआधीच भिका जमीनीवर बसत घाबरून म्हणाला..

"सर्व्यांना दम दिला प्वारीनं.. म्हन्ली माकडागत दाबंल पायाखाली... यून म्हायरी माफी मागाल तं यील... न्हाईतर धुरी देईल म्हन्ली उल्टं टांगून...."

अनार गांव खदाखदा हासलं भिकाच्या बोलण्यावर!

कोणी जाणता म्हातारा पुढे झाला... भिकाल म्हणाला..

"भिका यड्या... प्वारगी पळून ग्येली... आजूबाजूची शंभर गावं छी थू कर्नार तुझी.. त्या आधीच चार जन घ्यून झुर्क्याला भ्येट आन ओढत आन प्वारगी... न्हाईतर अब्रू घालवशील बघ वडाराची.."

मोठाच विचार विनिमय झाला..... अनार गावात छी थू झालेलीच होती... पण पंचक्रोशीत बातमी पसरायच्या आत पोरीला ओढत सासरी आणली ही बातमी पोचायला हवी होती.. तरच भिका वडारची अब्रू राहणार होती... आणि पर्यायाने वडारांची लमाणांसमोर...

जाणते तीन जण आणि भिका आणि भिकाची दोन मोठी मुले... भिकाची दोन्ही बायका.. रत्नी आणि निर्मला... लवाजमा झुर्क्याच्या रानाकडे निघाला... त्यांना तेथे पोचायला तीन तास लागले.. तेव्हा सनम आत निवांत झोपलेली होती आणि तीनही शिकारी कुत्री या लवाजम्यावर जीव खाऊन भुंकत होती... ती कुत्री पाहून लवाजमा एकेक पाऊल मागे सरकत असताना झुर्क्या तिथे पोचला.. त्याच्याचबरोबर मामी.... म्हणजे सनमची आईही होती... दोघांनी कुत्र्यांना आवरले आणि पाहुण्यांना बसवले..

पाणीबिणी पाजल्यावर झुर्क्या आणि मामीही समोर बसले आणि झुर्क्याने मांडी घालायच्या आधीच बॉम्ब टाकला....

"जातपातीवरून प्वरीला कोन बोललं तर मंग मी हाये अन त्यो हाये"

आपण आलो कशाला आहोत आणि करतोय काय हे पब्लिकला समजेना.. हा मुलीचा बाप असून हाच दम देतोय हे एका पहिलवान वडाराला, धिवरला सहन होईना. तो बिनदिक्कत म्हणाला..

"पाव्हनं. पोरगी आता आमच्या घरचीय.... आमचं मानूस हाये त्ये... तोंड सांभाळून बोला.. "

"दम द्यायची भाषा क्येलीस तर पाय मोडून गावी परतशील... भिका वडार... बरूबर छक्के कशाला आन्लेत?? मरद तरी आनायचेत"

झुर्क्याचा एकंदर आवेश, देहाचा पसारा आणि डोळ्यातले भाव पाहून धिवर चूप झाला. धिवरच चूप झाल्याने बाकीचेही गळाठले. त्यात पुन्हा झुर्क्याने कुत्र्यांना आदेश दिला असता तर ती फाडायला पुढे आलीच असती. आपण मुलाकडचे आहोत हेच विसरायला होत होते. भिकाने धीर केला कसाबसा...

"आमची सून कुटंय???"

"लवंडलीय आतमधी.... क्क्का???"

"न्हाई... तिला घ्यायला आलूत.."

"आशी बरं यील त्यी???"

"म्हन्जे???"

"मापी मागा झाईर... जातपातीवर्नं बोल्नार न्हाइ म्हना... मग सोडतू प्वरगी"

"झुर्के... हे लय होतंय... काई झालं तरी मुलाकडचं हावोत आमी..."

"मी जबरदस्ती करतंच न्हाय प्वारगी न्यायची... राहूद्या हित्तंच... योक तर प्वारगी आपली...जड न्हाय"

आता आली का पंचाईत. मुलगी माहेरीच राहिली तर गावंच्या गावं म्हणणार झुर्क्याच्या पोरीनं वडाराची गांड मारली. वडार शेपूट घालून परत आला. आणि सासरी नेली तर तिच्याविरुद्ध बोलता येणार नाही. ओढून कसली नेता? सन्मानाने न्यायची तरी माफी मागावी लागणार आहे. पण रत्नीला जीभ फुटली.

"आसं कूटं बघितल्यालं न्हाई... लगीन झाल्याच्या दुसर्‍याच दिशी सून म्हातार्‍या सासर्‍यालाच मारून झाडावरून उड्या मारत म्हाईरी ग्येली.. काय लाजबीज???"

"ओ व्हैनी... सनमचा सासरा म्हातारा न्हाई... सुनेवंबी डोळाय त्याचा..."

आता शिवीगाळ व्हायची वेळ आली झुर्क्याच्या या बोलण्यानं! पण आजूबाजूची तीन शिकारी कुत्री आणि त्यांच्या लोंबणार्‍या जिभा पाहिल्या की शब्द घशात जात होते... धिवरला कंठ फुटला...तो झुर्क्याला म्हणाला..

"पावनं... घरचे मामले घरचेच.. त्यात तुमी पडायचं कारन न्हाई..."

"माज्या प्वारीचं काय? तिला जातीवाच बोलल्यालं सांगू पाटलाला की मापी मागताय?"

पोलिस पाटलाला सांगितलं तर तो तालुक्याच्या चौकीवर नेऊन सगळ्यांना फोडून काढून परत पाठवेल आणि वर प्रकरण दाबायचे पैसे घेईल हे सगळ्यांना समजत होतं. पण झुर्क्याचा चांगुलपणा जागृत करायच्या उद्देशाने एक जाणता म्हातारा वडार हरि म्हणाला...

"झुर्के.. दोन्हीबी बाजूनं मी सांगतू.. प्वारीच्या जातीवं आता यापुढं कोन बोल्नार न्हाई.. आणि भिका मापीबी मागनार न्हाई.. त्येबी मुलाकडचेच की? त्यांनाबी काई आदर बिदर हायेच की? तवा तोडा सौदा.. प्वारगी द्या आमाला... आन आमी तिला फुलागत ठिवू..."

झुर्केने मामीकडे पाहिले. हरि वडाराचे नांव होते पंचक्रोशीत. त्याला एकदम नाही म्हणणे चांगले नव्हते. त्याचे वयही चांगले पंचाहत्तरच्या पुढे होत. वडिलांच्या ठिकाणी होता तो सगळ्यांना. मामी जमीनीत बोटांनी रेघोट्या ओढत हरी वडाराला म्हणाली...

"चाचा... तुमच्या शब्दाखातर प्वारगी धाडतीय मी... सनम.. भाईर ये गं..."

सनम डोक्यावर पदर घेऊन बाहेर आली. तिने सगळ्यांचेच बोलणे ऐकलेले होते. तिने फक्त हरि वडाराला वाकून नमस्कार केला. भिका, रत्नी, निर्मला आणि धिवर मनातून खवळून सनमकडे पाहात होते. सनमची आई मामी सगळ्यांना म्हणाली. कोंबडं कापते. जेवून जा. पण आणखीन वेळ घालवला आणि प्रकरणाला तिसरंच वळण लागलं तर काय या भीतीने सगळे तरातरा निघू लागले. तीनही शिकारी कुत्री नदीपर्यंत पोचवायला आली. झुर्के पोहत पोहत नावेबरोबर पलीकडच्या काठाला आला. त्याला नमस्कार करून सनम चालू लागली तसा त्याने पुन्हा नदीन सूर मारला आणि परतू लागला.

सनमने त्याच दिवसांत पुन्हा सासरच्या उंबर्‍यात पाय टाकला आणि त्याचक्षणी विन्याने तिच्या कानसुलात भडकावली. विन्याच्या फटक्याने त्या मुलीला काय होणार होते? पण आल्या क्षणीच नवीन प्रकार बापाला समजायला नको म्हणून ती म्हणाली...

"मारू नकोस.. फुलागत ठिवाल या बोलीवं माघारी धाडलीय मला.. न्हाईतर तुझ्या आयबापाची तिथली अवस्था काय झाली त्ये ऐक त्यांच्याचकडून..."

भिकाने विनयला दटावून गप्प बसवले. सनमला आतल्या खोलीत पाठवून सगळ्यांना भोवती जमवून कुजबुजत सगळा प्रकार सांगितला. अर्थातच त्यांच्यातल्या प्रत्येकाने तिला खतम करण्याची शपथ घेतली.

आणि त्याच क्षणी पंचायतीचा प्रमुख नाथ देशी दारूचा वास पसरवत आत आला... भिकाकडे बघत म्हणाला..

"वडाराघरची प्वार पळून ग्येली तं वाळीत टाकावी लागत्ये तिला... गावाची दौलत व्हत्ये ती... आसं पंचायत म्हन्ते.. समद्ये चर्चंला चला चौकात गावाच्या... त्या प्वरीला घेऊन... आत्ताच निकाल लावायचाय"

नाथाला पाहून भिका वडारचे अख्खे कुटुंब हादरलेले होते... सनम हातची गेली हे आता नक्की होते... पण आतल्या दारातून खणखणीत आवाज आला.....

"वडाराची प्वार न्हाई मी... वडाराची सून हाये... लमानाच्या प्वारीला तुझी पंचायत मंजूर न्हाई... चल कुटं जायचं त्ये.. माझ्याशिवाय या घरातल्या यकाबी बाईला चौकात यायला लावलंन.... तर गावातल्या सगळ्या बामनाच्या बायाबी ओढून आनंल त्या चौकात मी... तुझ्या घरचं यक अन यक मानूस आनंन थितं... तुझी पंचायत घालवतीच आज मसनात बघ ही सनम"

आतल्या दारात उभ्या असलेल्या सनमच्या हातातील गज आणि सनमचा अवतार पाहून...

.... नाथाची फाटली होती

==================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

सनमचा भाग २ वाचला त्यावेळी तिचे केलेले वर्णन मराठीतील "चाणी" चित्रपटातील रंजनासारखे वाटले, म्हणजे अंगाने एकदम भोरे असने वगैरे .......... पण या भागातील सनमतर नुसती छान छान दिसणारी बाहुली नाही तर वेळ आली तर अरे ला कारे करणारी रणचंडिका आहे, त्यात तिला मिळालेली तिच्या आई वडिलांची सोबत तर अजुन मजेदार ....... असे जर सर्व मुलींचे आई वडिल सासरी होणारया अन्यायाविरुद्ध तिच्या पाठीशी राहतील तर कितीतरी हुंडाबळी, सासुरवास कमी होतील.....

व्वा बेफि... खुश करुन टाकलत... ३ रा भाग इतक्या लवकर टाकुन.
मस्त रंग भरतो आहे ... पुढ्चे भाग येउ द्या पटापट Happy

छान