मस्त गाणे श्रावणाचे

Submitted by निशिकांत on 29 June, 2012 - 12:27

आज मी गाणार आहे मस्त गाणे श्रावणाचे
पावसा तू ये न ये मी श्राध्द केले आसवांचे

कोरडा दुष्काळ आहे पाचवीला पूजलेला
का म्हणूनी आसवांना मी सदा गाळावयाचे?

नाचणे तालावरी मी पावसा बघ बंद केले
बंद कर तू दु:ख भाळी आमुच्या कोरावयाचे

धुंद आनंदात रमणे रीत माझ्या जीवनाची
मी न आहे मोर ज्यानी सोडले नाचावयाचे

वाट बघती लोक जेंव्हा देवही धावून येतो
श्रेष्ठ का देवाहुनी तू पावसा ठरवावयाचे

पावसा रे ! ओल उरली फक्त आता आसवांची
त्रास दे वाटेल तितका गाव माझे वेदनांचे

वेधशाळा मोजते पाऊस तो झाला किती, पण
कृष्ण पैशांच्या सरींना मी कसे मोजावयाचे?

घोषणा पॅकेजची भरगोस झाली, पण निधीला
पाय फुटले पीडितांनी फास आता घ्यावयाचे

बंडखोरी शोभते "निशिकांत"च्या का शायरीला!
रान आता पेटवावे का कुणाला भ्यावयाचे ?

निशिकांत देशपांडे मो. क्र. ९८९०७९९०२३
E Mail--nishides1944@yahoo.com

गुलमोहर: 

मस्त गाणे श्रावणाचे........... वाह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह Happy

आज मी गाणार आहे मस्त गाणे श्रावणाचे
पावसा तू ये न ये मी श्राध्द केले आसवांचे>>> छान! (अनुस्वाराला अलामतीत महत्व दिले जात नाही हे खरे)

पावसा रे ! ओल उरली फक्त आता आसवांची
त्रास दे वाटेल तितका गाव माझे वेदनांचे>>> हाही छान

मस्त.

(अनुस्वाराला अलामतीत महत्व दिले जात नाही हे खरे)

आसवान्चे - अर्ध्या 'न' चा स्पष्ट उच्चार

दोघांत - 'न' अस्पष्ट

बेफि, अशावेळी अलामतीबाबत काय विचार व्हावा असे वाटते? मला आसवांचेच्या बाबतीत आं अशी अलामत घ्यावीशी वाटेल... दुसर्‍या बाबतीत 'आ', आपले मत कळावे Happy

तेच म्हणत आहे मी, श्रावणाचे व आसवांचे यात अनुक्रमे आ व आं अशा अलामती म्हणाव्या लागतील

(असो, हे केवळ तंत्रापुरतेच, बाकी अशा बाबी सादरीकरणात जाणवत नाहीतच म्हणा)

माझा प्रश्न थोडा वेगळा होता

दोघांत च्या बाबतीत कुठली अलामत धरावी - उच्चारानुसार 'आ' धरायला हरकत नसावी(फक्त तंत्रापुरतेच बोलायचे झाल्यासच)

दोघांत - या शब्दात 'आ' हीच अलामत ठरणार. याचे कारण दोघांत हा शब्द मराठीत (म्हणे जुन्य पद्धतीनुसार - हल्ली नव्हे) 'दोघांमध्ये' असे लिहिण्यासाठी लिहितात. हल्ली ते 'दोघात' असेच लिहिले जाते असे ऐकून आहे. जसे 'नावांत काय आहे', हे माझे गांव' इत्यादी. याचे कारण काही शब्द असे (फसवे) असतात की अनुस्वार (लिहिताना) दिला नाही तर त्यांचे अर्थ बदलू शकतात. उदाहरणार्थ नाव आणि नांव! 'नाव' म्हणजे होडी आणि 'नांव' म्हणजे नेम!

यामुळे, या अशा शब्दांमधील अनुस्वार हा केवळ अर्थस्पष्टतेसाठी असावा असे म्हणायला वाव आहे. त्यामुळे त्या अनुस्वाराचा उच्चारही 'नेमका अनुस्वारासारखा' होत नाही. त्यामुळे त्याची अलामत 'आ' म्हणायला कोणाची हरकत नसावी

Happy

बेफीजी, कणखरजी या चर्चेसाठी अत्यंत आभारी आहे
मला हाच प्रश्न एकदा पडला होता .गोंधळ उडाल्याने मी ती कावाफीच सोडून दिली गझल थांबवली आता पुन्हा नव्याने त्याच कामाला लागीन म्हणतोय .....................

सर्व लाभधाराकांच्या वतीने अनेक अनेक धन्यवाद

आपला कृपाभिलाषी
वै व कु