... कानावरती!

Submitted by आनंदयात्री on 29 June, 2012 - 08:02

प्रेम तुझे मग नक्की आहे कोणावरती?
त्याच्यावर की तुझ्या मनातिल प्रेमावरती?

विश्वासाने पाय टाकता खचली धरती
काळ कोसळू आला अवघ्या जन्मावरती

"शंका घेऊ नकोस माझ्या चारित्र्यावर!
डाग नव्हे हा, तीट असे ही ओठावरती!"

केवळ शपथेखातर कायम शांत राहिलो
(तुझी वदंता आली होती कानावरती!)

बघता बघता अनोळखीही झालो आपण
वारा धरुनी शिडे निघाली पाण्यावरती

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/06/blog-post_27.html)

गुलमोहर: 

विश्वासाने पाय टाकता खचली धरती
काळ कोसळू आला अवघ्या जन्मावरती

केवळ शपथेखातर कायम शांत राहिलो
(तुझी वदंता आली होती कानावरती!)

हे जास्त आवडले Happy

.............त्यामुळे स्त्रीलिंगी बरोबर>>>>>>>>>>>>>>बरोबर !!!

सर्वच्यासर्व शेर अफलातून झालेत

विश्वासाने पाय टाकता खचली धरती
काळ कोसळू आला अवघ्या जन्मावरती>>>>>>>>>>>>>> हा सर्वाधिक आवडला

अवान्तर : माझ्या मते ते तीट असते Wink

नचि, आवडली रे. आशय फार सुंदर आहे.

प्रेम तुझे मग नक्की आहे कोणावरती?
त्याच्यावर की तुझ्या मनातिल प्रेमावरती? >>> Happy मस्तच !

समथिंग मिसिंग वाटली.
सुटे मिसरे छान आलेत
"बघता बघता अनोळखीही झालो आपण" हा फर सहज उतरलाय!
वारा धरून? (वारे भरून शिडं निघाली, असे काय?) मी कन्फुज्ड, जरा सांग..

गझल छानच आहे. पण काही शेरांबाबत काही म्हणावेसे वाटत आहे.

प्रेम तुझे मग नक्की आहे कोणावरती?
त्याच्यावर की तुझ्या मनातिल प्रेमावरती?>>> कल्पना मस्त आहे. (मनातील प्रेमावर प्रेम असणे)

विश्वासाने पाय टाकता खचली धरती
काळ कोसळू आला अवघ्या जन्मावरती>>> दुसरी ओळ पहिल्या ओळीचे एक प्रकारचे एक्स्प्लनेशन किंवा परिणाम सांगणारी वाटली. (तसेच, धरती खचणे आणि काळ कोसळू येणे यातील कनेक्शन नीट जाणवले नाही)

"शंका घेऊ नकोस माझ्या चारित्र्यावर!
डाग नव्हे हा, तीट असे ही ओठावरती!">>>

ओठावर तीट किंवा डाग (सहसा) नसते / नसतो. चारित्र्यावर डाग हे पटते, पण ओठांवर डाग हे नीट पटले नाही. ओठावर तीट हेही पटले नाही. तीट आणि तीळ (स्त्रीलिंग, पुल्लिंग हा विषय नाही) यातील तीट ही मुद्दाम (दृष्ट लागू नये म्हणून) लावली जाते तर तीळ आपोआपच असतो. त्यामुळे डाग या गोष्टीची तुलना तीळ या गोष्टीशी सहज व्हावी असे वाटले (तीट पेक्षा). या शेरात ओठाऐवजी गालावर असे घेतले असते तर टेक्निकली करेक्ट झाले असते का? (तसेच, तीळ असे हा गालावरती - असे)

येथे एक विचार करावासा वाटला. चारित्र्यावर शंका घेण्यास जर ओठांवरील तीट / तीळ कारणीभूत होत असेल तर त्यात चुंबनांच्या शक्यतेमुळे चारित्र्यावर शंका घेतली गेली असे वाटते. प्रत्यक्ष चुंबनात कोणा एकाने लिपस्टिक वापरलेली असल्यास दुसर्‍याच्या ओठावर खुण दिसू शकेल. (येथेही लिंगाबाबत काही नाही, लिपस्टिक कोणीही लावेल). पण ते चोरटे चुंबन घेऊन संपल्यानंतर पुन्हा आपल्या नेहमीच्या व्यक्तीसमोर येताना माणूस ओठ नक्की पुसून येणार. (ही गंमत करत नसून खरेच म्हणत आहे). (ओठ तसेही पाणी वगैरे प्यायल्यामुळे स्वच्छ होऊ शकतील). याही दृष्टीने (मला तरी) 'गालावरील डाग' हे अधिक संयुक्तिक वाटले. (याचे कारण तीळ असला तर ती नेहमीच असणार, एखाद्याच वेळी चारित्र्यावर शंका घेतली जाईल असे होणार नाही. आणि तीट असली तर ती स्वच्छपणे तीट आहे हे दिसणार)

बाकी ही सगळी चर्चा केवळ तांत्रिकच. (आणि अनावश्यकही, पण हल्ली हल्ली मीही असा विचार करतो की अशास्त्रीय उल्लेख झालेच तर ते टाळूयात - हे त्या 'वेगवेगळे परीघ' पासून मनात जोर धरू लागले म्हणा, पण अजूनही तो मतला अला अशास्त्रीय वाटत नाही हेही खरे) Happy

केवळ शपथेखातर कायम शांत राहिलो
(तुझी वदंता आली होती कानावरती!)>>>

हा शेर मला आवडला. पण यात मला वदंता ऐवजी कहाणी हा शब्द योग्य वाटला. वदंता ही आशयाच्या स्वादानुसार सहसा 'खोटी बातमी' या अर्थाने घेतली जाते. वदंता म्हणज खोटी कहाणी असे सहसा समजले जाते. जर तिच्याबाबतीतील ती बाब वदंता असेल तर शांत / अशांत काही होण्याची आवश्यकता उरणार नाही असे वाटले. पण जर ती गोष्ट खरी कहाणी असली तर मात्र ती गरज निर्माण व्हावी.

बघता बघता अनोळखीही झालो आपण
वारा धरुनी शिडे निघाली पाण्यावरती>>>

यात मला दुसर्‍या ओळीतील शिडांचा उल्लेख पुरेसा समर्थनीय वाटला नाही. पहिल्या ओळीत प्रवाह, नदी, समुद्र असा काही उल्लेख असता तर कदाचित (माझ्यासाठी) ते सुलभ झाले असते.

अर्थात, प्रत्येक ओळ, प्रत्येक खयाल आवडलाच. बाकी या अशा चर्चा म्हणजे रिकामा वेळ आणि कनेक्शन यांचा परिणाम Happy

धन्यवाद

ही गंमत करत नसून खरेच म्हणत आहे>>>>>>>>>>>>:D

बाकी या अशा चर्चा म्हणजे रिकामा वेळ आणि कनेक्शन यांचा परिणाम >>>>>>>>>> डोळे झाकून अनुमोदन !!!

दोस्तहो आभार! Happy

बेफिकीर, तुमचे विवेचन वाचले. तुम्हाला मान्य आहे की नाही ते मला माहित नाही, पण ही गझल माझ्या इतर गझलांपेक्षा मलाच वेगळी वाटते. अशा प्रकारचे शेर पहिल्यांदाच लिहिले गेले आहेत. त्यामुळे, काही विचार नेमकेपणे मांडले गेले नसतीलही, प्रयत्नांनी तेही जमेल. तसेही मी आधीही एके ठिकाणी एका प्रतिसादात लिहिले आहेच, की काही थॉट्स नेमकेपणे मांडण्याचा जीवापाड प्रयत्न सुरू आहे, अजून जमत नाहीये.

"शंका घेऊ नकोस माझ्या चारित्र्यावर!
डाग नव्हे हा, तीट असे ही ओठावरती!"
तो शब्द तीटच म्हणायचा होता, तीळ नव्हे. तीट मुद्दामहून लावली जाते, त्याचप्रमाणे, ही ओठावरची खूण मी मुद्दामच लावून घेतली आहे. थोडक्यात, करून झालेल्या 'गोष्टी'चे समर्थन करण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करते आहे. असा काहीसा अर्थ. पोचला नसेल तर पुन्हा केव्हातरी! Happy
धन्यवाद!

बागेश्री, वारा 'धरून' मध्ये एखाद्याचे बोट धरून निघून जावे, किंवा संधी मिळताच कुणाची तरी सोबत धरून निघून जावे असं म्हणायचं होतं. भरून नव्हे, धरून असंच किंवा याच अर्थी! 'भरून' मध्ये एक प्रकारची अपेक्षित आणि सर्वमान्य प्रक्रिया येते. 'समथिंग मिसिंग' वाटलं असण्याचं कारणही कदाचित हेच असेल की, (माझ्यामते) एक वेगळा प्रयत्न करून पाहिलाय.
तुलाही धन्यवाद!

मयुरे??? तू आहेस होय! फुलनदेवी कोण ते कळलंच नै!! Lol

ही गझल माझ्या इतर गझलांपेक्षा मलाच वेगळी वाटते >>>

होय, ऑफ लेट तुम्ही निराळे खयाल लिहीत आहात हे खरेच

(अर्थात, ते जाणूनबुजून होते असे म्हणायचे नाहीच. या प्रवासात बहुधा माणूस सतत बदलत राहतो इतकेच)

छान...
बघता बघता अनोळखीही झालो आपण...
यातील 'ही' हा भरीचा वाटतोय..चुभूद्याघ्या.
बाकी मस्त.

सुंदर रचना,खूप विश्लेषणाच्या अरण्यात तुम्ही गझलवाले शिरता ते छान वाटतं ,मुळातला माझा कविचा शिष्टपणा बदलतोय अलिकडे..पण मूळ रचनेत फारसा बदल करू नये हे फीलिंग कायमच.