वारी

Submitted by shilpa mahajan on 29 June, 2012 - 04:42

पंढरीची वारी

नेमे करिता पंढरी वारी हात जोडितो फक्त
यंदा करूया अदला बदली , विठू मी अन तू भक्त !

वैकुंठीच्या महालातुनी कुटीत माझ्या येई
पंढरीची मानुनिया वारी पायी चालत येई

लुळा लंगडा वारकरी तुज भेटे जो जो कोणी
तुझ्या कृपेचे पाज तीर्थ त्या दोन्ही कर भरभरुनी

कृतार्थ त्यांचे आशिष आणेल पाणी तुझ्या नयनात
यंदा करूया अदला बदली , विठू मी अन तू भक्त !

भजन सुरांचा बुक्का उधळी तू माझ्या अंगणात
कृतार्थ होईल माझी झोपडी ,चरण स्पर्श दे फक्त

मोक्षसुखाची माळ तुळशीची घाली मम कंठात
देहभान मम गळून पडू दे, प्राण घेई पदरात

चरणी तुझ्या मी विलीन होता कोण देव अन भक्त ?
तुझ्या दर्शने देवपणा मम, गळू दे निमिषार्धात !
यंदा करूया अदलाबदली , विठू मी अन तू भक्त !!!

गुलमोहर: 

नेमे करिता पंढरी वारी हात जोडितो फक्त
यंदा करूया अदला बदली , विठू मी अन तू भक्त

दोन ओळी जमल्यात .पुढेपुढे कविता या दोन ओळीतला अर्थ ( आध्यात्मिक + तात्विक ) .....पेलूशकत नाही आहे.

कविता भावनिक पातळीवर मात्र उत्तम चितारलीत हे खरे

या प्रतिसादाने आपला अपेक्षाभंग झाला असल्यास क्षमस्व

कवितेमध्ये अध्यात्म उतरण्यासाठी मनाने तेवढी उंची तर गाठायला हवी ! इथे अध्यात्मातील अ सुद्धा नाही मग कवितेत कुठून येणार? माझ्या भावना
वाचकांपर्यंत पोहोचल्या हेच माझ्यासाठी खूप झाले. आपल्या कवितेला प्रत्येक वेळी सर्वांनी छानच म्हणावे असा आग्रह धरून कसे चालेल? शिवाय कोणीतरी
चुका दाखवल्याशिवाय आपल्यात सुधारणा कशी होणार? माझ्या कविता कोणीतरी वाचाव्यात एवढीच माझी इच्छा आहे