अजुनी तसाच ताजा प्रत्येक घाव आहे!!

Submitted by सतीश देवपूरकर on 28 June, 2012 - 13:00

गझल
हृदयात कोरलेले एकेक नाव आहे!
अजुनी तसाच ताजा प्रत्येक घाव आहे!!

भाजून घेच पोळी! बघ, छान ताव आहे!
धू हात आज तूही, आताच वाव आहे!!

नावानिशीच इथला माणूस ओळखे मी;
कळते मला अरे हा माझाच गाव आहे!

डॉक्टर हवा कुणाला, इंजीनिअर कुणाला;
या दोन जावयांचा भलताच भाव आहे!

झालो न भाट केव्हा, केली कधी न हांजी!
करतो पुढे पुढे जो, त्याचेच नाव आहे!!

खेळात जीवनाच्या ही एकमेव आशा.....
हातात माझियाही येणार डाव आहे!

जनताजनार्दनाने हा फैसला करावा....
गझलेत भाव आहे की, फक्त आव आहे?

अध्यात्म काय त्यांना साठीतही कळेना;
पैसा असो प्रसिद्धी, सगळीच हाव आहे!

आयुष्य खर्च झाले, गझलेस आकळाया;
मज लागलाच कोठे अद्याप ठाव आहे?

गझलेवरील त्यांचे प्रतिसाद हे म्हणू की,
अतृप्त कावळ्यांची ही कावकाव आहे?

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

प्रा. देवपूरकर,
मी आता एवढच म्हणेन की, कवीला काव्याची देणगी असते त्यावर तो गझला लिहायला शिकतो. पण तुम्हाला तर डायरेक्ट गझलेचीच देणगी आहे. Happy

खुपच छान गझल.

देवसर या गझलेतले सगळे शर मस्त आहेत पण मला एक गोष्ट खटकली

'पर्यायी' गुरुदेव...... अहो अशा दात-ओठ खावून (चावून )गझला आमच्या सारख्या टाईमपास म्हणून गझल करणार्‍या गझलकारांनी करायच्या असतात
तुम्हाला नाही शोभत हे...........
तुम्ही"आमद के शेर" च करायचे .....हे असले खुन्नस खावून केलेले शेर आमच्या झोळीत टाकले आहेत देवानं.....ते आम्हालाच करू द्यात ........:(
_____________________________

अवांतर :

या आव शब्दावरून ....जो तुम्ही माझ्या गझलेवर प्रतिसाद देताना प्रसाद द्यावा तसा दिला होता या वरून मीही याच कवाफीची एक गझल करायला घेतली आहे

अपल्याला 'नैवेद्य' म्हणून दोन शेर पेश करतो .......

जशी पायरी नामयाला दिलिस तू
मला वीट दे , मज तिची हाव आहे

तुला घेत गेलो गझल देत गेलो
तुझा विठ्ठला मी दिला भाव आहे
_____________________________

सुरेख.... नेहमीप्रमाने उत्त्म रचना........ Happy

हृदयात कोरलेले एकेक नाव आहे!
अजुनी तसाच ताजा प्रत्येक घाव आहे!!

भाजून घेच पोळी! बघ, छान ताव आहे!
धू हात आज तूही, आताच वाव आहे!!

हे खास आवडले........ Happy