जुन्या दिसाचे गोड गाणें........!

Submitted by सुधाकर.. on 28 June, 2012 - 11:14

जुन्या दिसाचे गोड गाणे आज घडीला उरले नाही.
नात्यांमधले प्रेम ही आता अडीनडीला उरले नाही.

जिकडे तिकडे उजाड झाले, हे लाल- तांबडे रान.
झाडावरती पान ही आता पानझडीला उरले नाही.

भातुकलीच्या खेळामधले कुठे हरवले रुसवे फुगवें?
बालपणीचे सौख्य ही आता सवंगडीला उरले नाही.

काळासंगे मने आतुनी माळावाणी भकास झाली.
कोसळावे काही आत,असेही आता पडझडीला उरले नाही.

दु:ख घेउनी जो तो पळतो आप-आपुल्या सौख्यापाठी
डोळ्यामधले पाणी आता रडारडीला उरले नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वाह वाह मस्त
नक्कीच शेर उत्तम आहेत आशय विषयाच्या दृष्टीने
तरी अजून दोन एक मात्रा कमी पडतायत काही जागी........ काही जागी जास्त आहेत
......... थोडा अजून जोर लावा

अभिनन्दन

दु:ख घेनी जो तो पळतो आप-आपुल्या सौख्यापाठी
डोळ्यामधले पाणी ही आता रडारडीला उरले नाही.

हा सर्वात जास्त निर्दोष वाटला................. ऊ चे उ करा आणि 'ही' काढून टाका.......... बस!!

इतर शेरात काही सुटे मिसरे मस्त आहेत

पुलेशु

वैभू तुझे विशेष आभार एवढ्याच साठी ज्यास्त की तू दोष-निर्दोष्यासाठी माझ्याच मनातली अक्षरे चफखलपणे
काढलीस.

..............धन्यवाद.

ऑर्फिअसजी! मी आपल्या रचनेस प्रथमच प्रतिसाद देत आहे. आज प्रतिसाद देतो आहे, कारण मला या तुमच्या रचनेत गझलेचा स्पार्क दिसत आहे!
आपल्याकडे ताकदीचे खयाल असतात, हे मी कधीच ओळखले होते. फक्त वृत्तहाताळणी आपण शिकून घ्यावी. सरावाने ते प्रत्येकास जमते.
गझलकाराला हवी, तशी तबीयत आपल्याकडे आहे हे लक्षात ठेवा.
स्वत:वर व परमेश्वरावर श्रद्धा ठेवा.
शब्दांचे व विचारांचे सखोल चिंतन करा.
थांबायची तयारी ठेवा.
गझल वा शेर पूर्ण करण्याची घाई करू नका.
गझलेच्या ९९% आपण जवळ आला आहात!
आपले लेखन पाहून मला, ३० वर्षांपूर्वीचा “मी” आठवतो.
माझ्या अनुभवावरून सांगतो की, लवकरच दर्जेदार गझल आपल्या लेखणीतून पाझरू लागेल! पण, रियाज चालू ठेवा.
कामयाब गझलेतील शेरांचा, बैठक मारून सखोल अभ्यास करा, म्हणजे अभिव्यक्ती प्रभावी कशी करावी याचे तंत्र आपणास अवगत होवू लागेल.
मी जे केले वा अजून करतो आहे, ते आपणास सांगतो आहे.

आता आपल्या या रचनेविषयी...............

पहिली गोष्ट म्हणजे आपली ही रचना १००% गझल आहे!
फक्त वृत्तामधे बारिकसारिक चुका काही ठिकाणी आहेत, ज्या सरावाने आपोआप जातील.
लिहिण्यापूर्वी गुणगुणायला शिका, म्हणजे वृत्तातील लय आपणास वश होईल.
आपली चूक आपल्याच कानाला लगेच खटकते!
मग मात्रांची मोजदाद देखिल करावी लागत नाही. असो.

खरे तर प्रथम अक्षरगणवृत्तात लिहावे, म्हणजे लेखनास एक शिस्त लागते.
अक्षरगणवृत्तावर एकदा का पकड आली की, (याला कित्येक वर्षे देखिल लागतील वा लागणारही नाहीत) मग, मात्रावृत्तांकडे वळावे!
मात्रावृत्ते दिसायला सोपी दिसतात, पण त्यांच्यातील लय आत्मसात करणे हे महत्वाचे असते, जे रियाजाने आपोआप येते.

आपल्या गझलेत फक्त “पडझडीला” शब्द वृत्तात बसत नाही.
बाकी सर्व शेर आवडले! खयाल उत्तमच आहेत!
आपण घेतलेल्या मात्रावृत्तात ८+८+८+८=३२ मात्रा आहेत प्रत्येक मिस-यात.
लय ८/८ मात्रांची आहे.
कुठे कुठे मात्रा कमीअधिक झाल्या आहेत.

हे सर्व मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
फक्त पडझडीचा शेर मला दुरुस्त करता आला नाही, म्हणून तो काफियाच गाळून मी “घडीघडीला” हा काफिया घेवून पूर्ण नवीन शेर दिला आहे.

टीप: मी दिलेल्या शेरांचा बारकाईने अभ्यास करा, म्हणजे सुचलेल्या खयालांवर चिंतन कसे करायचे, अभिव्यक्ती प्रभावी कशी करायची, हे आपणास उमगेल!
आपण स्वत: देखिल हे करू शकाल, असा मला विश्वास वाटतो!
आता मी आपली गझल कशी वाचली ते देतो, ते खालीलप्रमाणे..............

आपला हितचिंतक,
...........प्रा.सतीश देवपूरकर

.....................................................................................................
जुन्या दिसांचे मंजुळ गाणे आज घडीला उरले नाही!
नात्यांमधले स्नेह, जिव्हाळे अडीनडीला उरले नाही!!

जिकडे तिकडे उजाड झाले! रानच सारे लाल तांबडे!
झाडांवरती पानच कोठे पानझडीला उरले नाही!!

भातुकलीच्या खेळांमधले कुठे हरवले रुसवेफुगवे?
बालपणाचे सुखद स्मरणही सवंगडीला उरले नाही!

प्रत्येकाच्या आत खरे तर, मूल निरागस असते म्हणती.......
कट्टीबट्टी, हसणे, रडणे घडीघडीला उरले नाही!

दु:खांचे भारे घेवोनी, जो तो पळतो सुख मिळवाया;
कोणासाठी कुणीच आता रडारडीला उरला नाही!

..........प्रा.सतीश देवपूरकर
टीप: आपली मते कळवावीत, वाचायला आवडेल!
.................................................................................................

सर्वांचा मी खुप खुप आभारी आहे. Happy

---------------------------------------

प्रा. देवपूरकर सर आपले कोणत्या शब्दात आभार मानू ?

आपण केलेल्या या मौल्यवान मर्गदर्शना बद्दल आपले आभार मानावे तितुके थोडेच!

तरीही मी आपल्या सदस्यत्वातील विचारपूस मध्ये माझे कृतज्ञ मत मांडत आहे.

........................................................................... ऑर्फिअस..!

आमच्या गझलमित्राला अत्यंत सखोल मार्गदर्शन; अत्यंत नेमक्या शब्दात केल्याबद्दल आमचे 'पर्यायीगझल'-गुरू प्रा. देवपूरकर सरांचे लाख लाख आभार