कथा कुणाची व्यथा कुणा

Submitted by shilpa mahajan on 28 June, 2012 - 08:27

.

कथा कुणाची व्यथा कुणा

पाणवठ्यावर पाणी भराया ,वाट फार दूरची
विहीर खणाया सुरु केली पण गती कासवाची
पाणी मिळते तरी ते ठरते संजीवन सर्वांचे
जल न मिळाले हरण जाहले माहीच्या प्राणांचे .

अगे भूमी ही नच तव कन्या, पोटी का धरलीस?
रथचक्रासम गिळून टाकण्या कर्ण का समजलीस?
दोष तुला मी देऊ कशी तू उगा नाही चिडलीस
मनुजाने तुज खोल छेदले, त्याने दुखावलीस.

माझी माही खेचून घेऊन राग तुझा का शमला?
तुला छेद देणारा माते सांग कुठे परि लपला ?
छेदून तुजला ,तशीच सोडून स्वस्थ घरी तो निजला
माझा जीवन प्राण तिथे परि अडखळून गे पडला!

पैसा,मेहेनत , वेळ खर्चुनी जरी काढले तिजला
देह अचेतन हाती आला , प्राण कधीचा गेला!
काय करील ते न्यायालय ही , आदेश त्याने कधीच दिधला
पाळले न आदेशाला म्हणुनी ,करील शिक्षा कधीतरी त्याला !

जल न मिळाले , शिक्षा झाली, ज्याची करणी त्याला नडली.
वांझ जाहली पुनरपि जननी , चूक कोणती तिची जाहली ?
झरा आटला, परी आईची अश्रुनदी वाहिली
कथा कुणाची व्यथा कुणा ही गोष्ट अशी घडली !!!
---------------------------0--------------------

गुलमोहर: