काफियाची तू अलामत ...

Submitted by कमलाकर देसले on 27 June, 2012 - 13:12

काफियाची तू अलामत ...

आणले पोहे जयाने त्या सुदाम्या सारखा ;
जीव ओवाळीन ऐसा एक भेटावा सखा ..

पत्थरा रे देवही होशील नक्की तूच रे ;
मुर्तिकाराचा परी तू रोज बाबा मार खा ..

जिंकण्याचीही मजा अन हारण्याचीही मजा ;
जिंकु दे आता दुजाला एकदा तू हार खा..

सभ्यतेची पारदर्शी भिंत आहे केवढी ;
भेटणारा भेटणार्‍यालाच झाला पारखा..

येथल्या न्यायालयांची एक ही शोकांतिका ;
न्याय नाही, लाभती पण तारखांवर तारखा ..

आपल्या दोघातले जाहीर झाले मैत्र हे ;
काफियाची तू अलामत मी रदीफे सारखा..

(ही गैरमुरददफ गझल आहे .पण यातल्या दूसर्‍या आणि तिसर्‍या शेरात काफिया तुटतो आहे .जसे की "मार खा "
आणि "हार खा " तर ही अशी सवलत घेता येते का ? जाणकारांनी मार्गदर्शन करावे . )

गुलमोहर: 

गैर मुरद्दफ आहे. त्यामुळे सारखा, सखा, खा, खा... हे काफिये झाले. एकच काफिया कितीही वेळा वापरला तर चालतो. त्यामुळे खा दोनदा वापरला गेलाय, तरी ते चालते. हार खा, मार खा यात काफिया तुटला असे म्हणण्यापेक्षा नुसता खा असाच काफिया धरता येऊ शकेल ना?

एक अक्षरी काफिया असेल तर त्याची अलामत कुठे असते?

सभ्यतेची पारदर्शी भिंत आहे केवढी ;
भेटणारा भेटणार्‍यालाच झाला पारखा

(केवढी हा शब्द भरीचा असल्यासारखा वाटला) हा शेर आवडला.

खालील ओळीही आवडल्या:

जीव ओवाळीन ऐसा एक भेटावा सखा ..

जिंकण्याचीही मजा अन हारण्याचीही मजा ;

जीव ओवाळेल ऐसा एक भेटावा सखा - असेही छान होऊ शकेल. (म्हणजे कृष्णाची भावना - असे)

काफियाची तू अलामत मी रदीफा सारखा..
>>>

मी रदीफेसारखा - असे योग्य व्हावे. रदीफ स्त्रीलिंगी शब्द आहे. Happy

काफिया दोन शब्दांत विभागले गेले आहेत, पण ते चालते असे समजले जाते. (शेर , खयाल चांगला आला पाहिजे असे फक्त समजतात)

पुलेशु

-'बेफिकीर'!

'सुदाम्या' आणि 'रदीफे' करावंच, (आग्रही विनंती!)

अप्रतिम, वेगळिच गझल.

आवडली.

येथल्या न्यायालयांची एक ही शोकांतिका ;
न्याय नाही लाभतो पण तारखांवर तारखा ..

मस्त शेर आहे.

मी दुसरी ओळ -

'न्याय नाही, लाभती पण तारखांवर तारखा' - अशीही वाचून पाहिली.

धन्यवाद!

....रसप....

एक एक शेर अफाट खूप आवडली ही गझल

आपण विचारलेल्या प्रश्नाचे बेफीजीन्नी अत्यंत समाधानकारक उत्तर दिले आहे

'सुदाम्या' आणि 'रदीफे' करावंच, (आग्रही विनंती!)>>>>+१

तारखा या शेरात ..........न्याय लाभत नाही असे आपणास म्हणायचे आहे हे उघड आहे. पण नाही लाभतो असे म्हणणे खटकते(व्याकारणाच्या दृष्टीने काळ नक्की लक्षात येत नाही )
ना लाभतो /लाभत नाही अशी वाक्यरचना असायला हवी .पण वृत्तात बसत नाही ही अडचण आहे.
मी ही ओळ अशी करून पाहिली >>>>>>>>>>न्याय लाभो वा न लाभो ,.......... तारखांवर तारखा.
रसप यांची ओळ तर खूपच मस्त आहे >>>>>>> 'न्याय नाही,..... लाभती पण तारखांवर तारखा'
(स्वल्प विरामास इथे वरच्या दोनही ओळीत फार महत्त्व आहे. वाचताना लक्षपूर्वक वाचावे लागते)

काफिये पाहून एक माझीच रचना आठवली........... नेहमीप्रमाणे Happy
http://www.maayboli.com/node/31354

रसप , बेफिजी , शामजी ,वैभवराव आपण सुचविलेले बदल मला खूप भावले . ते मी घेतले आहेत . आपले मन:पूर्वक आभार .
नर्मदा व जगावेगळी आपलेही आभार .

सभ्यतेची पारदर्शी भिंत आहे केवढी ;
भेटणारा भेटणार्‍यालाच झाला पारखा

बेहतरीन शेर .

बेफीजी म्हणतात तसे 'केवढी' हा शब्द भरीचा वाटतो खरा !...........
मी प्रयत्न करून पाहिला तो असा

सभ्यतेची पारदर्शी भिंत येते आडवी ;(... येता आडवी )
भेटणारा भेटणार्‍यालाच होतो पारखा

देसालेसाहेब चू भू द्या घ्या .......
आवडल्यास जरूर कळवा

बेफीजी म्हणतात तसे 'केवढी' हा शब्द भरीचा वाटतो खरा !...........

वैभवजी ,

मला तसे वाटत नाही . "केवढी" या शब्दातून मला - वरुन ,खालून - कोठूनच पलीकडे जाता येणार नाही . असं अभिप्रेत आहे . सहजतेच्या , स्वाभाविक केंद्रापासून माणूस खूपच लांब निघून आला आहे . अपवाद सोडून बहुतेक सर्वांना आपल्या व्यवहारी ,औपचारिक वर्तनाच्या (सभ्यतेच्या पारदर्शी ) भिंतीपलीकडे जाणे आता शक्य होत नाही . आपण हसत हसत माणसं कटऊ शकतो . आमच्या (आपल्या) खेड्यात आता पूर्वीसारखं कुणी तोंडभरून रागवत नाही . दुसर्‍याच्या भल्यासाठी पूर्वी तिसरा माणूसही शिव्या द्यायचा . आता पालकही अस्सल रागवत नाही . एकूणच कौटुंबिक ,सामाजिक वर्तन व्यवहारात सहजता हरवत चालली आहे. मी ही त्यातील एक आहे . सगळं ठीक चाललं आहे .पण काहीच ठीक नाही . पुलं कुठेतरी म्हणतात ना " दातात काही अडकलं असतांना अप्सरेचं चुंबन घेणं ही अवघड होऊन जातं. सारखी जीभ त्या दातात अडकलेल्या फालतू गोष्टीवरून फिरत रहाते " लक्षार्थाने असच काही तरी या सभ्यतेने होऊन बसलं . असं नाही वाटत ? त्यामुळे आपण आनंदातही आनंदी होऊ शकत नाही . परतीच्या वाटा पुसतच माणसाने हा सभ्यतेचा प्रवास केला आहे . आता ही सभ्यतेची भिंत पाडणे ,ती उल्लंघून पलीकडच्या स्वाभाविक ,सुंदर जगात जाणे मोठे दुरापास्त होऊन बसले आहे . अस्सल आध्यात्मिक साधनेने ते शक्य आहे . पण अध्यात्मातली सभ्यताही कमी भयंकर नाही .( आपल्या कवितेत आपण अधून मधून तिचा समाचार घेतात . )एवढी पार्श्वभूमी "केवढी" शब्दामागे आहे. माझं मत हे माझं आहे . (खरं तर यातही ठामपणा हवा . " माझं मत हे माझं मत आहे " हे बोलणं सुद्धा सभ्यता आहे . )असो . एवढं पुरेसं व्हावं .
2)वैभवजी , आपण ,बेफि,देव सर गझलेवरील निष्ठेने आपली मते मांडतात . त्यात जसी स्पष्टता असते तसे दुसर्‍याला जपणेही आहेच की . त्यामुळे मन:पूर्वक मत मांडत जा . तुम्हा मंडळीची ही स्पष्टता तुम्ही सभ्यतेच्या आजारापासून दूर असल्याची ओळखून आहे . मला तुम्ही सगळे आवडतात . तुमच्या चर्चा आवडतात . मला नेटवर फार गती नसल्याने मी आपल्या चर्चेत उतरत नाही . थांबू ? एवढे लिहायला मला दीड ते दोन तास लागलेत . असो थांबतो .

अत्ता समजला मूळ अर्थ .............धन्यवाद देसले साहेब .

एकदा गामा पैलवान म्हणाले गझलेचे मूळ रूप कोणते ................
मी म्हणालो ( अशावेळी गप्प बसायचा स्वभाव नसल्याने केवळ......बाकी काही नाही,कृ.गै.न.!!:)): "अर्थातच ती गझल करता करताच त्या त्या गझलकाराने जे सर्वात आधी पाहिलेले असते ते ...............!!"

त्यावेळच्या माझ्या या मताला अधिक बळकटी दिलीत त्याबद्दल धन्यवाद ...................

हो, अजून एक =माझ्यासाठी इतका वेळ देवू नका इतक्या वेळात(दीड तास !!) एक दोन गझला नक्की झाल्या असत्या ..................
तथा आमच्या प्रतिसादाकडे जास्त लक्ष न देता गझलेची अशीच सेवा करत रहावी ही विनंती

मस्त गझल..

येथल्या न्यायालयांची एक ही शोकांतिका ;
न्याय नाही, लाभती पण तारखांवर तारखा ..

आपल्या दोघातले जाहीर झाले मैत्र हे ;
काफियाची तू अलामत मी रदीफे सारखा..

सही...