सेकंड इनिंग

Submitted by तुमचा अभिषेक on 27 June, 2012 - 12:19

बायको माहेरी जाऊन आज पाचवा दिवस उजाडला होता. गेले चार दिवस तिचे आयुष्यात नसणे फारसे जाणवले नाही, कारण कामाच्या व्यापात गुंतलो होतो, किंवा स्वताला गुंतवून ठेवले होते म्हणालात तरी चालेल. सकाळी उठल्याऊठल्या टॉवेल शोधण्यापासून चहा गरम करून देण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींवरून तिची आठवण यायची पण फारशी कमी जाणवायची नाही. आपले आपणच काहीतरी करू शकतो हे माहीत असायचे. दुपारी जेवताना आज डबा नाही तर बाहेर खावे लागणार म्हणून पुन्हा ती आठवायची, पण रोज रोज घरचा डबा खाण्यापेक्षा चार दिवस बाहेरचे खाऊन जीभेचे चोचले पुरवुया हा विचार करून बरेही वाटायचे. घरी परतताना आज बरोबर ती नाही आणि आई घरी मालिका बघण्यात व्यस्त म्हणून ऑफिसला उशीरापर्यंत थांबायचो, पण तेवढाच ओवरटाईम यावेळी जास्त येणार हे समाधान जोडीला असायचे. घरी आलो की नेहमीसारखा लॅपटॉप उघडून बसायचो पण आज मात्र त्यावरून कोणी कटकट करायला नाही म्हणून रात्री मस्त उशीरापर्यंत टाईमपास ही चालायचा. काल शनिवारी देखील सुट्टी असून घरी काय करणार म्हणून एक्स्ट्रा वर्क करायला ऑफिसमध्ये गेलो, त्यामुळे तो ही दिवस गेल्या चार दिवसांसारखाच मजेत कटला. दुसर्‍या दिवशी रविवारची सुट्टी आणि झोपायची जराही घाई नाही म्हणून रात्रभर जागून काही जुनी गाणी ऐकली, काही ईंटरनेटवरून डाऊनलोड केली. काही नॉस्टॅल्जिक मेमरीज जाग्या झाल्या त्या उगाळतच उत्तररात्री कधीतरी झोपेच्या अधीन झालो.

उशीरा झोपण्याची परीणीती उशीरा उठण्यात झाली. आळस झटकायचे कष्ट न घेता केलेली तयारी होईस्तोवर मध्यान्ह झाली. पेपर चाळून झाला, टीवी वरचे सारे चॅनेल फिरून झाले. काल रात्रभर कुशीत घेतलेला लॅपटॉप आता परत उघडायची इच्छा होत नव्हती. जेवण होईपर्यंत कशीबशी वेळ खेचून नेली. जेवल्यावर नाही म्हणायला थोडीफार सुस्ती आली पण सकाळी उशीरा उठल्याने झोप काही लागत नव्हती. आतासे कुठे चार वाजत होते पण मला मात्र कातरवेळ झाल्यासारखे वाटू लागले. काहीतरी चाळा म्हणून कॉफी बनवून तो कप हातात घेऊन व्हरांड्यात येऊन उभा राहिलो. पावसाळ्याचे दिवस असल्याने दुपारची वेळ असूनही बर्‍यापैकी अंधारून आले होते. बारीक बारीक बूंदाबांदीही होत होती. उबदार चादर घेऊन बिछान्यात पडून राहावे असे आळसाचे वातावरण तयार झाले होते. पण खाली मैदानात मात्र याची पर्वा न करता कॉलनीतील काही मुले क्रिकेट खेळत होती. पंधरा-सोळा ते वीस-बावीस वयोगटातील, म्हणजे माझ्यापेक्षा फार काही लहान होती असे म्हणता आले नसते. काही वर्षापूर्वी मी जेव्हा त्यांच्या जागी क्रिकेट खेळत होतो तेव्हा ती मला "दादा फोर, दादा सिक्स" बोलून चीअर करत असायची. आज त्यांचे खेळायचे दिवस होते, चीअर करणारी लहान मुले बदलली होती, आणि मी मात्र प्रेक्षकांच्या भुमिकेत शिरलो होतो. इतक्यात एका मुलाचे लक्ष गेले आणि त्याने मला सहज हाक मारून खेळायला बोलावले. मी तितक्याच सहजपणे नकार दिला आणि त्याने तितक्याच सहजपणे त्याचा स्विकार केला. जणू काही ही नुसती औपचारीकता होती. मी खेळायला जाणार नाही हे मला ठाऊक होते तसेच ‘दादा’ काही खेळायला येत नाही हे त्यालाही ठाऊक होते. आणि त्यात त्याची काही चूकही नव्हती. चार वर्षे झाली असावीत मला शेवटचे बॅट हातात घेऊन. ते ही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला जेव्हा शेवटचे खेळलो असेल तेव्हा स्वतालाही कल्पना नसावी की हे क्रिकेट खेळणे आपल्या आयुष्यातील शेवटचे असू शकते.

महिन्याभरापूर्वीचीच बातमी की राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. किती हळहळ वाटली होती त्या दिवशी. यापुढे कधी राहुल द्रविडला खेळताना बघायला मिळणार नव्हते म्हणून. जेव्हा पासून क्रिकेट समजायला लागले तेव्हा पासून सचिन, राहुल आणि सौरव यांनीच माझे क्रिकेटविश्व व्यापले होते. सौरव काही वर्षापूर्वीच निवृत्त झाला, आता राहुलही झाला, आणि सचिनच्या निवृत्तीची चर्चा तर दर दुसर्‍या दिवशी चालूच असते. यांच्यानंतर मी क्रिकेट नक्की कोणासाठी बघणार हा प्रश्न होताच. त्यांचे क्रिकेट खेळणे न खेळणे हा सर्वस्वी त्यांचा निर्णय होता जो त्यांना कधी ना कधी घ्यायचा होताच. त्यावर माझे किंवा कोणत्याही क्रिकेटप्रेमीचे नियंत्रण नव्हते. अन्यथा तसे असते तर त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळावे अशीच प्रार्थना देवाकडे केली असती. कारण त्यांच्या जाण्याने क्रिकेटचे सामने बघण्यातील रस आपसूकच कमी झाला होता. पण नक्कीच काही काळाच्या उदासीनतेनंतर त्या खेळाडूंची जागा नवीन खेळाडू घेऊन मी पुन्हा पहिल्यासारखेच क्रिकेट सामने बघणे एंजॉय करू लागेल याची शक्यताही होतीच. पण माझ्या क्रिकेट खेळण्याचे काय..? कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही बातमी न बनवता, स्वताच्याही नकळत मी चार वर्षांपूर्वी गल्ली क्रिकेटमधून एक प्रकारची निवृत्तीच नव्हती का स्विकारली? त्याचे काय? पुन्हा कधी मी आता बॅट हातात घेऊन मैदानावर उतरेल की नाही हे मला स्वताला देखील ठाऊक नव्हते. किंवा ती शक्यता शून्यच होती म्हणा ना, कारण आता समोर मुलांना क्रिकेट खेळताना बघूनही मला त्यांच्यात उतरावेसे वाटत नव्हते यातच सारे आले होते.

काही वर्षापूर्वी ज्या मुलासाठी क्रिकेट खेळणे म्हणजे जीव की प्राण होता त्याची ही आजची मनस्थिती होती. लहानपणी क्रिकेट खेळणार्‍या मुलांचा आवाज कानावर पडला तरी पाय थार्‍यावर राहत नसे. शाळा-कॉलेजमध्ये अभ्यासाचे तास केवळ या खेळाच्या वेडापायीच बुडवले जायचे. शाळेतून घरी आल्याआल्या बॅग तशीच फेकून खेळायला पळायचो कारण थोड्याच वेळात अंधार पडणार हे माहीत असायचे आणि त्या आधी जास्तीत जास्त खेळून घ्यायचे असायचे. अनवाणी पायाने, उन्हातान्हाची पर्वा न करता, अर्धा-अर्धा तास पायपीट करायलाही तयार असायचो ज्याच्या मुळाशी याच खेळाचे वेड होते. वडापाव खाण्यासाठी मिळालेला पॉकेटमनी वाचवून ते दोन रुपये नवीन बॉल घेण्यासाठीचे कॉंट्रीब्यूशन म्हणून वापरायचो कारण हा खेळ मला तहान-भूक विसरायला लावायचा. आणि आज भरल्या पोटीही मला या खेळासाठी वेळ काढावासा वाटत नव्हता. असे नक्की काय बदलले होते.. माझी मानसिकता, आयुष्यातील प्राथमिकता, की आजूबाजुचे वातावरण.. क्रिकेट खेळायची आवड संपली होती की आजही मी खेळू शकतो हा आत्मविश्वास हरवला होता.. की आजही मी तेवढ्याच ताकदीने फटके मारू शकेन का, तेवढ्याच वेगात चेंडू फेकू शकेल का याची भिती वाटत होती.. खरे पाहता तेवढे माझे वयही झाले नव्हते ना तेवढा मी शारीरीकदृष्ट्या कमजोर झालो होतो, आणि झालो असलो तरी ते खरेच तेवढे मॅटर करत होते का? कुठे मला स्पर्धात्मक खेळात उतरायचे होते? मग नक्की काय चुकत होते. एकच मुद्दा होता की माझ्या वयाचे सारे मित्र आपल्या कामात, आपल्या संसारात व्यस्त झाले होते. पण तरीही माझे खेळने न खेळने त्यांच्या सहभागाशी बांधील होते का? समोर मुले खेळत होती. माझ्यापेक्षा काहीच वर्षे लहान. मी त्यांच्यात सामील झालो तर शक्य आहे सुरुवातीला त्यांना वेगळे वाटेल, मला अवघडल्यासारखे वाटेल. पण एकदा का खेळ सुरू झाला आणि मी त्यांच्यातीलच एक बनून गेलो तर नक्की हे अवघडलेपण कुठच्या कुठे पळून जाईल. कदाचित माझ्या बरोबरीचे जे असेच आज आपल्या बाल्कनीमध्ये बसून आपले दिवस आठवत असतील ते ही पुढच्या रविवारी माझ्या जोडीने खेळायला उतरलेले दिसतील. गरज होती ती एकाने पुढाकार घ्यायची आणि ती देखील इतर कोणासाठी नाही तर स्वतासाठी.. स्वताचे काहीतरी हरवलेले गवसण्यासाठी..

याच विचारात पेल्यातील कॉफी कधी थंड झाली समजलेच नाही. मगासच्या रिमझिम पावसाने आता मुसळधार तडाखा द्यायला सुरुवात केली होती. क्रिकेट थांबले होते आणि त्याच जागी पावसाळी फूटबॉल सुरू झाला होता. आता मात्र मला खरेच धीर धरवत नव्हता. हा खेळ तसा फारसा आवडीचा नव्हता. एक फूटबॉलचा दर चार वर्षाने येणारा विश्वचषक वगळता कधी टी.वी. समोर बसल्याचे आठवत नव्हते. त्यातही एक ब्राझीलचा संघ आणि त्यांचा रोनाल्डो सोडून दुसर्‍या कोणाला चेहर्‍याने मी ओळखू शकेल याची श्वाश्वती नव्हती. तरीही दर पावसाळ्यात चिखलपाणी, कपड्यांची पर्वा न करता, हातपाय तुटण्याची चिंता न करता हा खेळ बेभान होऊन न चुकता खेळला मात्र जायचा. तसे तर व्यवस्थित कोणालाच खेळता यायचे नाही, ना सारे नियम कोणाला माहीत असायचे. पण अट फक्त एकच असायची की जो पर्यंत आकाशातून कोसळणारा पाऊस थकत नाही तो पर्यंत कोणाचे पाय थकले नाही पाहिजेत. फूटबॉल हे केवळ एक कारण असायचे ज्याच्या तालावर नुसता धिंगाणा घातला जायचा, पावसात भिजायचा आनंद लुटला जायचा.

आज मी देखील तेच करत होतो. बघता बघता मी कधी खाली उतरून त्या मुलांच्यात मिसळलो हे माझे मलाच कळले नव्हते. सकाळपासून, खरे तरे गेले चार दिवसांपासून किंवा चार वर्षांपासून अंगात भरलेली सुस्ती केव्हाच झटकली गेली होती. घड्याळाचे काटे चार वर्षे मागे फिरवणे तर शक्य नव्हते पण येणारा प्रत्येक क्षण त्याची भरपाई करण्यासाठीच मी खेळत होतो. किती गोल केले आणि किती खाल्ले याचा हिशोब मी ठेवतच नव्हतो. कारण मला माहीत होते की ही तर फक्त सुरुवात होती. एका नवीन इनिंगची.. एका सेकंड इनिंगची.. जसे कसोटी क्रिकेटमध्ये सेकंड इनिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवणे कठीण असते कारण चार दिवस खेळून शरीर थकले असते, खेळपट्टी ही खराब झाली असते, सारी परिस्थिती प्रतिकूल झाली असते तरीही ती ईनिंग खेळल्याशिवाय सामना काही पुर्ण नाही होत तसेच काहीसे माझे झाले होते. ही इनिंग मला खेळायचीच होती. नाहीतर आयुष्यात काही आठवणी अर्धवटच राहिल्या असत्या, काही जगायचे बाकी राहिले असे सतत वाटत राहिले असते. आज मारलेल्या प्रत्येक फटक्याबरोबर ती खंत मनातून दूरवर भिरकावली जात होती. कदाचित उद्या माझी बायको माहेरहून आल्यावर पुन्हा तेच ते पहिल्याचे रूटीन सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण या सार्‍या जर तर च्या शक्यता नाकारून आज तरी मी माझ्या सेकंड इनिंगला मोठ्या जोमात सुरुवात केली होती...

- तुमचा अभिषेक

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सह्हीच... जमलंय अगदी.....
पावसात फुटबॉल - सगळ्यात धम्माल येते ती या खेळालाच........

अभिषेक.. सेकंड ईनिंग.. सुपर्ब.. ग्रेट !!
अशीच जोमात चालू राहिली पाहिजे नेहमी.. रूटीन मधे अडकून कधी कधी अचानक मधे कित्येक वर्षं निघून जातात.. अगदी हाताशी , जवळच असलेल्या संधी ही आपण रूटीन लाईफ च्या नावाखाली हरवून बसतो..

आई तर घरी रोजचीच आहे म्हणून ऑफिसला उशीरापर्यंत थांबायचो. >> तिसरी इनींग खेळणार्‍या आईकडे दुर्लक्ष करून नायकाला स्वतःच्याच दुसर्‍या इनिंगचे कौतुक? Uhoh

आई तर घरी रोजचीच आहे म्हणून ऑफिसला उशीरापर्यंत थांबायचो. >> तिसरी इनींग खेळणार्‍या आईकडे दुर्लक्ष करून नायकाला स्वतःच्याच दुसर्‍या इनिंगचे कौतुक?

>>>>>>>>>>>

खरे आहे मित्रा.. आई रिटायर्ड आहे.. तिच्या सिरीअलमध्येच अडकली असते, आणि मी माझा लॅपटॉप घेऊन पडलो असतो.. नेहमी बायको घरी जाताना बरोबर असते म्हणून वेळेवर निघणे होते.. पण बायको नसेल तर ऑफिसातून निघायची फारशी घाई अशी नसते..

तू जो अर्थ काढला आहेस तो चुकीचा काढला आहेस.. तो मलाच काय जगातल्या कुठल्याच मुलाला लागू होत नाही..

असो, मध्यंतरी मी आईवर काहीतरी लिहायला घेतले होते, पण एखादा पॅराग्राफ लिहून ते तसेच पडून आहे.. कारण आजवर जगभरात एवढे लिहिले गेले आहे ना आईवर की त्यापेक्षा वेगळे असे शब्दच सापडत नव्हते मला..

तरीही माझ्या एका कथेत, एका पॅराग्राफमध्ये माझ्या आईचा आणि आमच्यातील नात्याचा ओझरता उल्लेख आहे, त्याची लिंक देतो, ते वाचशील.. तेवढीच माझ्या कथेची जाहीरात समज.. Happy

लिंक - http://www.maayboli.com/node/33981

सहावा पॅराग्राफ वाच.. Happy

आवडले......... सेकंड इनिंग पहिल्यावर काय वृद्धाश्रमांवर लिहिलेस की काय असे वाटले. पण ललित वेगळे आणि छान लिहिलेस. Happy
अशीच सेकंड इनिंग उत्साहात जगता आली पाहिजे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद निखिल....

खरे पाहता सेकंड इनिंग हे नाव तसे वृद्धाश्रम कन्सेप्टवरूनच वापरले आहे बोलू शकतोस... पण तेव्हाच ही सेकंड इनिंग का सुरू करायची.. कोणत्या खेळात पहिल्या आणि दुसर्‍या इनिंग्जमध्ये एवढा मोठा कालावधी असतो.. बर्‍याच गोष्टी असतात ज्या काळाच्या ओघात सुटल्या असतात त्या जेव्हा आठवतील तेव्हाच ही इनिंग वेळ न दवडता सुरू करायची.. Happy

कारण हा खेळ मला तहान-भूक विसरायला लावायचा. आणि आज भरल्या पोटीही मला या खेळासाठी वेळ काढावासा वाटत नव्हता. असे नक्की काय बदलले होते... माझी मानसिकता, आयुष्यातील प्राथमिकता, की आजूबाजुचे वातावरण>>> एक नंबर. मजा आली. Happy

अभिषेक खूप छान लिहिले आहेस. तुझा लेख वाचल्याबरोबर मी आधी लिंक माझ्या नवरयाला पाठवली.. ....
काही वर्षापूर्वी ज्या मुलासाठी क्रिकेट खेळणे म्हणजे जीव की प्राण होता त्याची ही आजची मनस्थिती होती. लहानपणी क्रिकेट खेळणार्‍या मुलांचा आवाज कानावर पडला तरी पाय थार्‍यावर राहत नसे. शाळा-कॉलेजमध्ये अभ्यासाचे तास केवळ या खेळाच्या वेडापायीच बुडवले जायचे. तू लिहिलेल्या ओळी वाचून त्याला नक्कीच स्वतःचे मनोगत वाटेल.

सामी --- धन्यवाद, आणि एखाद्याशी हे रीलेट दोनच परीस्थितीत होऊ शकत नाही, पहिले म्हणजे ज्याला ही जाणीवच नसेल, अश्यांबद्दल वाईट वाटण्यापलीकडे काही करू शकत नाही, आणि दुसरे म्हणजे ज्यांना हे उमजलेय आणि जे तसे जगत आहेत, अश्यांचा मात्र मला जाम हेवा वाटतो.. तुमच्या मिस्टरांनाही आवडावे अशी अपेक्षा करतो..

निवात पाटीलभाऊ -- धन्स.. Happy

Khup chan lihilay Abhi, mast aahe. aavadle. agdi lahan pan aathvle, lahan pani mi hi khup khelayche, pan aata sagle visrlo.

छान लिहिलं आहे!! Happy
मी माझ्या शाळा कॉलेजात केलेल्या वक्तृत्व आणि नाटक, नृत्य या सर्वांशी रीलेट करू शकले. पण मी नशिबवान समजेल स्वतःला की मला देशाबाहेर का होईना, हे सर्व एक्-दोनदा पुन्हा ट्राय करायला मिळाले, तब्बल ६-७ वर्षांनी!

वैशाली, आशू, वनराई.. धन्स..

आशूजी.. सहीच.. लगे रहो.. सध्या मी सुद्धा बायकोच्या मागे लागलोय की आपला चित्रकलेचा छंद जोपास म्हणून.. Happy

वैशाली, आशू, वनराई.. धन्स..

आशूजी.. सहीच.. लगे रहो.. सध्या मी सुद्धा बायकोच्या मागे लागलोय की आपला चित्रकलेचा छंद जोपास म्हणून.. Happy

नेहमीप्रमाणेच सुंदर ओघवति लिखानशैली. गुंतवुन ठेवतोस तु वाचकाला.
लोकांना माहितच नसतं की नक्की त्यांना काय हवय. जगणं खर्या अर्थानं जगतच नसतात ते.
तुला तेच उमगलं म्हणुन तु लकी म्हणायचा.
<<<ही इनिंग मला खेळायचीच होती. नाहीतर आयुष्यात काही आठवणी अर्धवटच राहिल्या असत्या, काही जगायचे बाकी राहिले असे सतत वाटत राहिले असते>> विषेश भावली ही ओळ Happy