जिंदगीस वाट विचारत श्वासांनी प्रवास केला!

Submitted by सतीश देवपूरकर on 27 June, 2012 - 10:34

गझल
जिंदगीस वाट विचारत श्वासांनी प्रवास केला!
घेवून किनारा सोबत लाटांनी प्रवास केला!!

अव्याहत ऎकू येते नि:शब्द हाक कोणाची?
पांगळे तरीही माझ्या शब्दांनी प्रवास केला!

झुंडीवर झुंडी आता चालतात त्यांच्या मागे.......
पण हयातभर एकाकी शिखरांनी प्रवास केला!

माझ्या तुझ्यात आकाशा! हाकेचे अंतर होते;
तुजसाठी युगे युगे मी पायांनी प्रवास केला!

व्रण झाले फिके परंतू सल तसेच उरले मागे;
कोणाला कळू न देता जखमांनी प्रवास केला!

नादातच त्याच्या त्याच्या सुख आले अन् गेलेही;
मग माझ्या बरोबरीने दु:खांनी प्रवास केला!

किलकिली तरी कर दारे अन् खिडक्या तुझ्या मनाच्या
मैलो न मैल तुजसाठी किरणांनी प्रवास केला!

रुचल्या न कधी पायांना या पायघड्या सुमनांच्या;
मी जन्मभरी काटेरी रस्त्यांनी प्रवास केला!

सत्याचे केवळ मृगजळ पाहिले दूरवर....त्यांनी;
इतक्याच शिदोरीवरती स्वप्नांनी प्रवास केला!

अद्याप लागला नाही तळ तुझ्या मनाचा पुरता;
सोसणार नाही इतका स्मरणांनी प्रवास केला!

सोडला हात झाडांनी, फांद्याही पहात होत्या;
वा-याच्या झोतावरती पानांनी प्रवास केला!

त्या मानस सरोवराचा ओढाच असा होता की,
टाकून नभाला मागे पक्ष्यांनी प्रवास केला!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

प्रा. देवपूरकर, तुमचा प्रत्यक शेर अतिशय आवडला. याचे कौतुक ही शब्दांच्या पलीकडचे आहे.
फारच अफलातुन Happy .... धन्यवाद.

सोडला हात झाडांनी, फांद्याही पहात होत्या;
वा-याच्या झोतावरती पानांनी प्रवास केला!

त्या मानस सरोवराचा ओढाच असा होता की,
टाकून नभाला मागे पक्षांनी प्रवास केला!

............................हे खासच.

किलकिली तरी कर दारे अन् खिडक्या तुझ्या मनाच्या
मैलो न मैल तुजसाठी किरणांनी प्रवास केला!

अफलातुन

पक्षांनी प्रवास केला की पक्ष्यांनी प्रवास केला?

पक्षांनी = राजकीय पक्ष

पक्ष्यांनी = पक्षी

==============

अचूक गझल>>>

मला ही गझल 'फक्त अचूकच' वाटली

-'बेफिकीर'!

मला ही गझल 'फक्त अचूकच' वाटली>>>>>>>>>>:हहगलो:

मला ही गझल अजून बरीच काही वाटली Rofl
_______________________________________________________________

गझलेचा एक नवीन नियम ..
...............
लोक सन्धी करून (शब्द जोडून ) नवे शब्द रचून गझलेत टाकतात(उदा: विठ्ठलाळलेले - वै व कु यान्चा एक शब्द)हे गझलेला चालत नाही -एक प्रमेय !!

.........यावरून संधीविग्रह(शब्द्फोड) करून तयार केलेले शब्द चालतात --व्युत्क्रम (converse of the theorem ) आपोआप सिद्ध होत असावा ...........

कसा तो पहा ........

मैलो न मैल तुजसाठी किरणांनी प्रवास केला!(मैलो न मैल= 'मैलोन्मैल' ची शब्द्फोड.... )

....................................................................केवळ वृत्तासाठी का असेना चालते म्हणे !!

Angry Angry :राग:(:G Biggrin :खोखो:)

तात्पर्यः माझ्या मते विग्रह चुकला आहे ........मैल अन् मैल असे हवे बहुधा (आग्रह नाही आहे एक सहज सुचले म्हणून दिलेले मत आहे

तसेच रागही नाही आहे सहज सुचली म्हणून केलेली थट्टा आहे ............प्लीज गैर्समज करून घेवू नये )

"असो ">>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> बेफीजी मलाही हेच पटते
असो तर असो आपल्याला काय??................ बरोबर कि नै ????......................मग मीही तेच म्हणतोय Wink

सहज सुचली म्हणून केलेली थट्टा आहे ............प्लीज गैर्समज करून घेवू नये

बेफिकीरजी! आपण सुचवलेला शब्द बरोबर आहे. घाईत पक्षांनी लिहिले होते. चूक सुधारली आहे. धन्यवाद!

मला ही गझल 'फक्त अचूकच' वाटली<<<<<<
हा मला हाणलेला शालजोडीतला का?
कृपया माझ्या गझलेत आपणास खटकलेले नि:संकोचपणे कळवावे. मला माझ्या लिखाणात सुधारणा करायला मदत होईल. आपली मते माझ्या दृष्टीने खूप मोलाची आहेत.

परवा,
नभी मेघ हिंडायचे बंद झाले!
वनी मोर नाचायचे बंद झाले!!
या मतल्यावरही आपण फक्त एक भावमुद्रा धाडलीत. मी एवढा हुशार नाही हो त्याचा अर्थ समजायला. कृपया आपली परखड मते कळवावीत.

छंदमुक्तांना.... गझलेवर मी दिलेला प्रतिसाद आपण वाचलात का? आपण काहीच बोलला नाहीत. आमचे काही चुकले काय?

आपल्या अनेक चर्चा अनेक धाग्यांवरच्या अपु-याच राहिल्या आहेत. असो.

उद्या डॉक्टरसाहेबांकडे यायला मला अशक्य आहे, कारण M.Sc. ची प्रवेशपरिक्षा व सुमारे ७० जणांच्या मुलाखती आहेत. कृपया मला माफ करावे.
फिर कभी फुरसतसे मिलेंगे! जमल्यास डॉक्टरसाहेबांनाही कळवावे, म्हणजे गैरसमज टळतील.
.......प्रा.सतीश देवपूरकर
................................................................................................