येत जा, देवून थोडी कल्पना!! (तरही गझल)

Submitted by सतीश देवपूरकर on 14 June, 2012 - 10:22

नवीन तरहीत माझा विनम्र सहभाग.
तरहीसाठी सुंदर ओळ दिल्याबद्दल व वेगळा धागा काढल्याबद्दल डॉ. कैलास गायकवाड यांचे आभार!
.........प्रा.सतीश देवपूरकर
...................................................................
तरही गझल
ये सुखा! गुंडाळल्या मी वेदना!
येत जा, देवून थोडी कल्पना!!

ओठ माझे, दातही माझेच हे;
हाय! मी, माझीच केली वंचना!

तोंड पाटिलकी* करावी केवढी?
आज जो तो फक्त करतो वल्गना!

मी जगासाठीच केली भिक्षुकी;
माझियासाठी न माझी याचना!

दान असते गौण, तू दानत पहा;
शेवटी जी पोचते, ती भावना!

याच चिंतेने न लिहिले पत्र मी;
काय पत्राचा असावा मायना?

शायराच्या, जा प्रथम, वंशामधे;
मग तुला कळतील त्याच्या यातना!

शायरी म्हणतोस तू कोणापुढे?
संपल्या ज्यांच्यातल्या संवेदना!

नाव होण्यास्तव किती आटापिटा!
कोण करतो शायरीची साधना?

आपल्यासाठीच त्यांचे साकडे.....
कोण करतो का कुणास्तव प्रार्थना?

काय लिहिली जात आहे शायरी?
काय ती देणार मजला चालना?

मी मनाला दावणीला बांधले;
जाहल्या ओढाळ जेव्हा वासना!

शिखर तू आहेस, अन् मी पायथा!
आपल्यामध्ये कशाचा सामना?

एवढ्या वेळेस स्वप्ने भंगली;
आज नाही कोणतीही कामना!

श्वास कर्जाऊच सारे.....जाणतो!
हात दे, आता तरी, मज जीवना!!

माणसांमधली समजली अंतरे;
अंतरावरुनीच करतो वंदना!

रांगते वार्धक्य हे बाल्यापरी.....
येवुनी गेलास केव्हा यौवना?

माणसे येतील तुज छाटायला.....
साप परवडले अरे, ते चंदना!

जाहली पडझड, पळाले सोबती.....
फक्त उरलो मीच माझ्या सांत्वना!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१


*तोंड पाटिलकी करणे म्हणजे स्वत: स्वस्थ बसून इतरांस काम करावयास सांगणे, लुडबुडेपणाची वटवट करणे.
...................................................................

गुलमोहर: 

जा सुखा जा! साहिल्या मी वेदना...
येत जा, देवून थोडी कल्पना!!

मी मतला असा वाचून पाहिला...:-)

बरेच शेर आवडले.

छान

दान असते गौण, तू दानत पहा;
शेवटी जी पोचते, ती भावना! >> व्वा! मस्तच!

मतलाही छान! Happy

काही शेर ओरीजनल आहेत ते छान आहेत ,अभिनंदन
__________________________________________________________

याच चिंतेने न लिहिले पत्र मी;
काय पत्राचा असावा मायना?
????????????????????
इस्लाह बेफीजिन्ना मागितला होता मी तोही माझ्या तरहीत ..............आपण इथे दिलात. आभारी आहे .
__________________________________________________________

या शेराप्रमाणेच आपले इतरही अनेक तरही शेर इतर तरहीकारांच्या याच ओळीवरील त्यांच्या तरही शेरांवर, आपण पर्यायी द्यावेत तसे वाटतात
तरही हा जSSरा वेगळा प्रकार असतो सर
पर्यायी दुधाची तहान तरही ताकावर भागवून घेत आहात हे माझे स्पष्ट मत झाले आहे ही रचना पाहून
_________________________________________________________

काही शेर शेरोशायरीवर आहेत त्यातून तुम्हाला आलेले- तुम्ही दिलेले , प्रतिसाद डोकावतायत.

ते शेर प्रामाणिक वाटत आहेत

_____________________________________________________________
असो !
पुढील तरहीलेखनास शुभेच्छा !

मी मनाला दावणीला बांधले;
जाहल्या ओढाळ जेव्हा वासना!

माणसांमधली समजली अंतरे;
अंतरावरुनीच करतो वंदना!

रांगते वार्धक्य हे बाल्यापरी.....
येवुनी गेलास केव्हा यौवना?

<<<

सुंदर शेर

धन्यवाद बेफिकीरजी! गझलेत बरेच (१९) शेर होते. कुठे काही खटकत असेल तर जरूर कळवा.

बरेच प्रतिसाद आपले अर्धवटच राहिले आहेत. मी वाट पहात आहे ते प्रतिसाद पूर्ण होण्याची. “पावसाळा आपला” गझलेच्या मतल्याचे अर्थ जाणून घ्यायला खूप उत्सूक आहे!

टीप:
मला शेरांवर केलेली प्रांजळ चर्चा फार मोलाची वाटते. त्यातून बरेच काही तरी शिकायला मिळते. म्हणून हा प्रेमाचा आग्रह! वास्तवीक पहाता, प्रत्यक्ष बोलायला आवडेल, कारण प्रतिसाद लिहिण्यात माझा खूप वेळ जातो. पण राहवत नाही म्हणून तो वेळ मी काढतोच. आपण एकमेकांनीच एकमेकांना अशी वैचारीक मदत केली तर, गझललेखनात ती फार मोलाची ठरणार आहे. रोजच्या कामाच्या धांदलीत कुणाकडे जावून ही चर्चा करायला वेळच मिळत नाही. त्यामुळे पूर्वीसारखा जनसंपर्कही आता राहिला नाही. कवीसंम्मेलने, मुशायरे इत्यादी सार्वजनीक कार्यक्रमातही जायला फारसे जमत नाही. त्यामुळे इंटरनेट हेच एक सोयीचे माध्यम हाताशी उरले आहे. पण, इथेही अनेक लोकांचे प्रतिसादावरून समज/गैरसमज होताना दिसतात. क्षणभर विषण्णता येते. पण माझ्यातला गझलकार मला गप्प बसू देत नाही. असो. कधी तरी आपणासमोर मन मोकळे करायचे होते, म्हणून हा स्वल्प प्रयत्न! आपण सहकार्य कराल अशी आशा करतो.
..............प्रा.सतीश देवपूरकर
(कृपया आपला मो. न. sms करावा, आपली इच्छा असल्यास!)
...............................................................................................

रांगते वार्धक्य हे बाल्यापरी.....
येवुनी गेलास केव्हा यौवना? >>> जबरदस्त शेर

--- सुंदर गझल