आताशा

Submitted by वैभव फाटक on 11 June, 2012 - 06:24

जरी गातो, तरी नाही सुरांचे भान आताशा
जनांचे राहुद्या, माझेच किटले कान आताशा

जरासा स्पर्श करता तू , विडा रंगायचा तेव्हा
अता कळले, मजा का देत नाही पान आताशा

जिभेचे चोचले पुरवायला हॉटेलच्या वाऱ्या
विसरलो भाकरी, खाऊन 'रोटी' 'नान' आताशा

किती होई सुनेला त्रास, सासूच्या रहाण्याने
चरायाला मिळेना मोकळाले रान आताशा

उभे आयुष्य गेले, ताठ बाणा सोडला नाही
भितीने मोडण्याच्या, वाकलेली मान आताशा

नसे खाण्यास काहीही, उपाशी राहतो हल्ली
नशीबी वाढलेले रोजचे 'रमजान' आताशा

-------- वैभव फाटक ( १ जून २०१२) ---------

गुलमोहर: 

जियो वैभवराव.....
मस्त गझल केलीत .सगळेच शेर अप्रतीम
पान .रोटी-नान खूप आवडले, रमजान एकमेवाद्वितीयच !
अभिनंदन व धन्यवाद

वैभव,
गझलचा मूड आवडला.पण सासू व नानचे शेर वेगळे काढल्यास ही गझल आणखी एकसंध होईल असे वाटते. तसेच आणखी शेर हवेत असेही वाटते.
जयन्ता५२

जयंता५२जींच्या मताचा पूर्ण आदर राखून माझे निरीक्षण नोंदवतो ................

मतला आणि 'वाकलेली मान' हे शेर वगळावेत कारण बाकीच्या शेरांचा येन-केन-प्रकारेण खाण्यापीण्याशी संबंध आलेला आहे त्यामुळे तेच जास्त एकसंध वाटतात (वैयक्तिक मत );)

जरी गातो, तरी नाही सुरांचे भान आताशा
जनांचे राहुद्या, माझेच किटले कान आताशा

जरासा स्पर्श करता तू , विडा रंगायचा तेव्हा
अता कळले, मजा का देत नाही पान आताशा>>>

छान