स्कीम..

Submitted by Kiran.. on 10 June, 2012 - 12:53

.

स्कीम..
=====

" गुड इव्हिनिंग सर, मी मिशिकांत टोक"
" या या टोक. बरोबर सहा वाजता आलात "
" कंपनीची सक्त ताकीद आहे सर, वेळ पाळायची "
" गुड ! काही त्रास तर नाही ना झाला ?"
" छे हो ! त्रास कसला...अजिबात नाही "
" घर सापडलं ?"
" हो सापडलं. थोडंस शोधावं लागलं पण "
" अरेरे ! शोधावं लागलं म्हणताय ? त्रास झाला नाही का, माझ्यामुळे ! "
" स्सर..तुम्ही लाजवताय ! .. थोडंसं शोधावं लागतंच ! त्रास कसला त्यात. "
" जिना चढून आला असाल ना ? लिफ्ट बंद आहे म्हणून विचारलं"
" त्यात काय मोठंसं ! सवय असते आम्हाला "
" नाही हो, हा बारावा माळा आहे म्हणून म्हटलं "
" हे हे हे हे.. आमचं कर्तव्य आहे "
" कर्तव्य कसलं, सेल्समन असला तरी शेवटी माणूसच नाही का ? बीपी वगैरे नाही ना ?"
" नाही , नाही
" ह्र्दयरोग वगैरे ?"
" नाही "
" मधुमेह ? "
" नाही हो ! मी ठणठणीत आहे अगदी "
" असं वाटत असतं आपल्याला. वजन थोडं जास्त दिसतंय "
" सर ! काही नाही हो. "
" असं कसं ? आल्या गेल्याची चौकशी करणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे "
" बरोबर आहे , बरोबर आहे. पण सर .."
" दमा वगैरे ?"
" सर , प्लीज , काळजी नका करू . थँक्स ! अ‍ॅक्चुअली मी तुम्हाला आमची स्कीम सांगायला आलोय."
" अरे वा ! सांगा सांगा... "
" थँक्स ! एक सेकंद, काल तुमचं नाव नीटसं समजलं नाही फोनवर.. "
" नावात काय आहे ? आपण बोललो, मी पत्ता दिला, तुम्हाला सापडला, आता आपण दोघे भेटलो. आनंद झाला. एकमेकांना नावं ठेवून काय मिळणार ?"
" सर.. अगदी बरोबर. पण फॉर्म भरताना तर नाव लिहावं लागेल. "
" हम्म... तुरुंगातल्या कैद्याच्या बिल्ला नंबरसारखं नावसुद्धा एकदा चिकटलं ना कि चिकटलंच. सगळे नाव पाहतात, माणूस कुणी पाहतं का ? "
" अं..हो हो... आय मीन नाही नाही "
" हम्म. आता आलाच आहात तर नावही सांगेनच कि. आधी सांगा काय सांगत होतात ते "
" सर ! आमची कंपनी रिसॉर्टस चालवते. कंपनीची एक स्कीम आहे जी आज रात्री बारा वाजता बंद होतेय "
" अरेरे ! मग चालू राहणारी स्कीम सांगा "
" सर ! स्कीम चालूच राहतेय "
" नक्की काय ? चालू राहते कि बंद होते ?"
" चालू राहते सर "
" मग बंद होतेय का म्हणालात ?"
" सर म्हणजे चालू राहणा-या या स्कीमसाठीची नोंदणी आज बंद होतेय "
" अच्छा ! म्हणजे नोंदणी आज बंद होते असं म्हणायचं होतं का ? मग तसं स्पष्ट म्हणा कि "
" हो हो तेच ! आज नोंदणी केली तर फायदाच फायदा आहे. तुमचा फायदा व्हावा म्हणून धावत पळत आलो मी. "
" का बरं? गाडी नाही का तुमच्याकडे ?"
" आहे कि"
" मग धावत पळत का आलात ?"
" अहो म्हणजे , दोन अपॉइंटमेंट्स कॅन्सल करून आलो तुमच्यासाठी "
" च्च च्च... ? "
" अं ??"
" अपॉइंटमेंट्स कॅन्सल करू नयेत. तुम्ही त्यांना भेटून या बघू. मी थांबेन तुमच्यासाठी "
" अहो पण आता कॅन्सल केल्या ना मी त्या अपॉइटमेंटस ? खास तुमच्यासाठी !"
" तेच तर. मी कधी म्हणालो माझ्यासाठी इतरांच्या अपॉईंटमेंट्स कॅन्सल करा म्हणून ?"
" सर अ‍ॅक्च्युअली, तिकडे गेलो असतो, तर तुमचा फायदा कसा काय बघता आला असता आपल्याला ?"
" छ्या ! कुणाचं नुकसान करून माझा फायदा झालेला मला चालणार नाही. तुम्ही त्या अपॉइंटमेंट्स करूनच या "
" सर, प्लीज सर. खरं सांगू का ? तुम्ही मराठी असल्याने तुम्हाला प्रिफरन्स द्यावा असं कंपनीचं मत पडलं ?"
" का बरं ? या अखंड भारतात असा प्रादेशिक वाद का करते तुमची कंपनी ? काय नाव आहे सीईओचं ?"
" प्रदीप मेहता "
" डायरेक्टर्स कोण कोण आहेत ?"
" सुखबीर चढ्ढा, ए टू झेड मूर्ती, अँथनी मॅस्करान्हेस, चंदन बॅनर्जी "
" ए टू झेड मूर्ती ?"
" सर ! त्यांच्या नावात ए पासून झेड पर्यंत सर्व अक्षरं आहेत म्हणून त्यांना ए टू झेड मूर्ती म्हणतात "
" हम्म !कंपनीत मराठी कुणी आहे ?"
" आहे ना, अंत्या धापटे "
" काय करतात हे ?"
" कंपनी चालू राहणे, बंद होणे हे यांच्या हातात आहे "
" अरे बापरे ! पण म्हणजे नेमकं काय करतात हे ? भेट घेईन म्हणतो "
" भेट..?? नाही नाही, नको.
" का बरं ? भेटत नाहीत का ते कुणाला ?
" तसं काही नाही "
" मग नको का म्हणालात ?"
" सर ! अ‍ॅच्युअली . अंत्या वॉचमन आहे आमच्याकडे. तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी त्याला कशाला भेटायला जायचं ? "
" असं होय ! पण मग इतके मोठे निर्णय वॉचमन घेतात का तुमच्याकडे ?"
" सर.. आय मीन, ओपनिंग आणि क्लोजिंग त्यांच्याकडे असतं "
" मग तसं सांगायचं ना !"
" सॉरी सर ! "
" तुमच्या कंपनीत कुणीही मराठी माणूस चांगल्या हुद्द्यावर नसताना नसताना मला का प्रिफरन्स देते कंपनी ?"
" स्सर, आम्ही महाराष्ट्राला कर्मभूमी मानतो सर. उपकार आहेत आमच्यावर या मातीचे. म्हणूनच आज कंपनी मराठी माणसाचा.. आय मीन तुमचा... फायदा पाहते ते नुकसान पदरात घेऊनच.."
" थांबा..! "
" काय झालं ?"
" हे ऐकून मला गहिवरून आलं.. आणि एकदा गहिवर मोड ऑन झाला कि माझ्यामुळे कुणाचं नुकसान होऊ नये असं मला वाटतं.."
" सर, पण कंपनीला काहीच प्रॉब्लेम नाही .."
" पण मला आहे. नुकसान सहन केलं तर कंपनीचं दिवाळं वाजेल ना ?"
" सर...(बुडुक बुडुक)... पण, तुमच्यामुळे मराठी माणसं आमचे कस्टमर्स होतील ना !"
" ते कसं ?"
" तुम्ही सदस्य झालात कि तुमचे मित्र, नातेवाईक या स्कीममधे येतीलच "
" कसे काय येतील ?"
" तुम्ही सदस्य झाल्यावर ?"
" त्यांना कसं कळेल पण ?"
" काय ? Uhoh "
" मी सदस्य झालो म्हणून ?"
" तुम्ही सांगाल ना !"
" असं कधी म्हटलं मी ?"
" अहो पण, तुम्ही स्कीम घेतलीय म्हटल्यावर तुम्ही मित्रांना सांगणार नाहीत ?"
" नाही. मी का सांगू ? "
" पण , असं का का बरं ?"
" मग काय पेपरला पहिल्या पानावर जाहीरात द्यायची ? "
" तसं नाही, पण (बुडुक.. ) आपण मित्रांबरोबर शेअर करतोच कि नाही ?"
" मला मित्रं नाहीत "
" नातेवाईक ?"
" ते माझ्याकडे येत नाहीत, मी त्यांच्याकडे जात नाही "
" बरं ठीक आहे. कुणी नाही आलं तरी चालेल आम्हाला "
" मग माझा फायदा का करून देताय ?"
" सर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही त्यात. स्कीमच तशी आहे "
" अहो पण प्रश्न कायमच राहतो ना ? नुकसानीत धंदा केला तर दिवाळं वाजेल "
" सर , खरं तर नुकसान नाही कंपनीला. या स्कीममधे ना नफा ना तोटा तत्वावर प्रवेश देणं चालू आहे "
" मग तुमचे पगार वगैरे ?"
" त्याचं काय ?"
" कंपनीला नुकसान होत नाही हे ठीक आहे. पण फायदा होत नसेल तर तुमचा पगार कुठून द्यायचा ?"
" सर ! बँका आहेत ना.. "
" म्हणजे कर्ज ? "
" तसं समजा "
" म्हणजे कंपनी कर्जबाजारी होणार तर "
" नाही हो सर "
" कर्ज काढल्यावर होणार नाही का ?"
" सर म्हणजे थोडा फायदा होतो कंपनीला "
" मग ठीक आहे. माझ्यामुळं कुणी कर्जबाजारी व्हावं हे मला आवडणार नाही "
" सर ! प्लीज स्कीम तर ऐकून घेताय ना ?"
" हो तर ! पण तुम्ही सांगाल तर ऐकू ना !"
" तर ही स्कीम रात्री बारा वाजता बंद होणार आहे "
" एक मिनिट .."
" आता काय ?"
" ही स्कीम बंद झाल्यावर आमच्या पैशांचं काय ?"
" अहो सर.. या स्कीममधे सदस्यता घेण्याची मुदत आज रात्री बारा वाजेपर्यंत आहे. मी सांगितलं नाही का मघाशी ? तुम्हाला फायदे आज बारापर्यंतच मिळतील "
" अच्छा ! पण समजा, जर मी ही स्कीम अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी घेतली तर ?"
" सर, डेफिनेटली तुम्हाला फायदा मिळणार.. "
" पण कंपनीला कसं कळणार कि मी स्कीम घेतली म्हणून ?"
" म्हणजे ? Uhoh "
" अहो, बाराच्या आत कसं कळवणार ? अंत्या धापटे क्लोजिंग करत असेल ना त्याआधीच "
" ओह ! अ‍ॅक्चुअली, आमच्या अधिकारात आम्ही तुम्हाला नोंदवून घेऊ शकतो. तुमची सही झाली कि झालं"
" पण समजा. सही करेपर्यंत एक मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला तर ? "
" म्हणजे ?"
" म्हणजे अकरा एकोणसाठ ला सही सुरू केली आणि ती बारा वाजून एक सेकंदांनी संपली तर ?"
" चालेल ना !"
" काय चालेल ?"
" म्हणजे बारा वाजून एक सेकंदाने सही झाली तर काहीच प्रॉब्लेम नाही "
" अहो, पण स्कीम बारा वाजता बंद होतेय ना ?"
" सर ! मी आहे ना. मी घेईन ना अ‍ॅडजस्ट करून "
" पण हे चीटिंग आहे "
" अहो, सर यात चींटिंग काहिच नाही. इतकं तर चालतं हो "
" नाही नाही, मला नाही चालणार. बाकरवडी खाता ना ? "
" बाकरवडी ? "
" दुपारी एक वाजून एक सेकंदांनी चितळेंकडे बाकरवडी मागून पहा. मिळते ?"
" अं.. नाही "
" मग तुम्ही का नियम तोडताय ?"
" चितळेंचा काय संबंध कंपनीशी ?"
" काय संबंध ? म्हणतात ना, व्हेन इन रोम, डू अ‍ॅज रोमन्स डू.... व्हेन इन पुणे, डू अ‍ॅज चितळेज डू"
" पण सर ! आताशी पाच वाजताहेत. आपण कशाला त्या चितळेंचा, आय मीन त्या सिच्युएशनचा विचार करायचा ?"
" नाही कसा ? चीटिंग केलं कि नुकसान ठरलेलंच आहे. एक बोधकथा ऐकवतो...
" नको नको ! कंपनीचा फायदा तोटा हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे.. ते आम्ही पाहू "
" अरे वा वा ! अंतर्गत कसा ? मी पैसे गुंतवणार म्हटल्यावर कंपनीचा कारभार कसा चालतो हे नको का पहायला ? नियम तोडले तर कंपनी बुडेल आणि माझे पैसेही. "
" पण सर, आम्ही तुमची सोयच पहातोय. ग्राहकांची सोय हे आमचं सर्वोच्च ध्येय आहे. "
" बारं SSS ! त्या अपॉईंटमेंटसचं काय करताय ?"
" जाऊ द्या ना सर .."
" असं कसं जाऊ द्या. त्यांचा फायदा नको का पहायला ? "
" सर , तुमचं हे घर पुण्यातल्या ऑफीसपासून बावीस किलोमीटर दूर आहे आणि रस्त्यापासून तर पंधरा किलोमीटर आत आहे. इथून जाऊन पुन्हा वेळेत येणं शक्य नाही."
" बारा वाजायला खूप वेळ आहे अजून "
" सर, त्यापेक्षा तुमचं काम आधी झालं कि मग त्यांच्याकडे जाईन मी "
" बरं ! मी फोन करून विचारेन त्यांना. त्यांचा नंबर देता का मला ?"
" सर ! खरं म्हणजे, दुस-या कुणाला तरी पाठवेल कपनी "
" म्हणजे , माझ्यामुळं अपॉइण्टमेंटस कॅन्सल होत नाहीत ना ?"
" नॉट अ‍ॅट ऑल "
" मग सुरुवातीला तसं का सांगितलंत? "
" नाही म्हणजे , तसं म्हणायची पद्धत असते "
" कुणाच्यात ?"
" .............?"
" प S S द्ध S S त ..! कुणाच्यात असते ?"
" म्हणजे नसते "
" असते कि नसते ?"
" सर सोडा ना .."
" काय काय सोडायचं ?"
" सर.. या स्कीममधे सदस्यता घेण्याचा आज तुम्हाला जो फायदा आहे तो पहा. आज पैसे भरले तर फक्त दीड लाख रूपये, पण रात्री बारानंतर पैसे भरले तर तुम्हाला दोन लाख पंचाहत्तर हजार रूपये भरावे लागतील "
" वा वा ! फायदा तर आहे ब्वॉ, पण मी पैसे काढलेले नाहीत "
" चेक चालेल ना "
" पण तुम्ही पैसे भरायला सांगितलेत ना ? "
" म्हणजे चेकद्वारा पैसे .."
" पण चेक आज वटणार नाही. "
" चालेल ना "
" अरेरे "
" काय झालं ?"
" माझं चेकबुक नाही "
" अहो सर. असं नका म्हणू. मी इतक्या लांबून.."
" धीर धरा. मी आत्ता घरात नाही म्हटलं "
" मग कुठंय चेकबुक ?"
" माझ्या वाहनाच्या डिकीत आहे "
" खाली ?"
" घाबरू नका. तुम्ही बसा. मी घेऊन येतो..पण हा लंगडा पाय..वेळ लागेल हो जरा "
" सर. लिफ्ट चालू नाही. तुम्ही मला चावी द्या. मीच आणतो "
" हा बारावा माळा आहे "
" असू द्या. तुमचा पाय.....ग्राहकाची सोय.."
" हो हो. ध्येय नाही का तुमचं ! वाहन सापडेल ना ?"
" नंबर काय ?"
" नंबरचं काय घेऊन बसलात. एकच तर वाहन आहे खाली."
" दुचाकी कि चारचाकी ?"
" दुचाकीच.."
" हा गेलो आणि आलो "
" सावकाश जा.."

-----------------------------------------------------------------------------------------------------
२.

" अगाई गं !!! हाफ हाफ हाफ हाफ "
" काय झालं ?. असं ओरडताय का कुत्रं मागे लागल्यासारखं ?"
" स्सर " (हाफ..हुफ हाफ..हुफ हाफ..हुफ)
" एव्हढ्या धापा का टाकताय ?"
" सर कुत्रा सर ..आईगं "
" कुत्रा ?"
" सर. खाली एक एक महाकाय कुत्रा आहे...हाफ हाफ... कसला अक्राळविक्राळ जबडा... हाफ हाफ.. आणि नेमके माझ्याच छातीवर पाय ठेवले त्याने.... आईगं "
" तुम्हाला चंद्रमोहन भेटला का ?"
" कोण चंद्रमोहन ?"
" कुत्रा हो !"
" चंद्रमोहन कुत्रा आहे ?"
" ओ ! हळू बोला "
" का ?"
" तो खालचा जोश्या माझ्याकडे कुणी आलं कि छताला कान लावून बसलेला असतो "
" छताला कान ?? खालचा जोश्या ??? काहीच झेपलं नाही सर ?"
" त्याचंही नाव चंद्रमोहन आहे ना"
" त्याचंही म्हणजे ?"
" मा़झ्या कुत्र्याचं पण नाही का ?"
" ते कळालं पण त्याचंही म्हणजे कुणाचं ?"
" अहो जोशाचं !"
" ओह ! पण सर ..कुत्रा केव्हढा मोठा आहे. मला भीती वाटते कुत्र्यांची.."
" चंद्रमोहन हुषार आहे खूप ! "
" कोण जोशा ?"
" नाही. कुत्रा ! कोकणस्थ ग्रे हाऊंड आहे.
" कोकणस्थ ग्रे हाऊंड ?? हाफ..हाफ... ऐकलं नाही कधी !"
" भौतिक तिरोडकर म्हणून माझे एक कोकणी मित्र आहेत. त्यांनी लहान असताना मालवण वरून आणलाय चंद्रमोहनला "
" कोण लहान असताना? भौतिक तिरोडकर?.. हुफ हाफ हाफ................. "
" नाही. कुत्रा हो ! "
" हम्म.. हाफ हाफ हाफ हाफ "
" लिफ्टच्या ऐवजी कुणी जिन्याने खाली आलं ना कि त्याची जिज्ञासा जागृत होते. जिन्याने येणारा हा इसम आहे तरी कोण हे पहावं म्हणून तो समोर येतो. काही करत नाही बरंका "
" ओह ! स्मार्ट बॉय ...आई SSS "
" खूप दमलात ना ?"
" आई गं !! हो SSSS "
" बारावा माळा आहे हो. दमणारच! पण तुम्हाला जरा जास्तच दम लागलाय. आमच्यावेळी आम्ही उड्या मारत जायचो "
" बाराव्या माळ्यावर ? हाफ हाफ "
" पर्वतीवर हो "
" हम्म.... "
" चेकबुक आता मीच घेऊन येतो ."
" सर ! थांबा... . हाफ हाफ हाफ हाफ..या वेळी आणतोच मी. कुत्र्याला मात्र हटवावं लागेल "
" लगेच हटवतो "
" खाली न जाता ?"
" हा हा हा ! हे पहा. एक प्रयोग दाखवतो. ही फुंकणी आणि हे नरसाळं"
" याने तो इथून कंट्रोल होतो ??"
" ऐका हो ! तर हे नरसाळं या पाईपात घालायचं बाल्कनीच्या. या इकडे. बघताय ना ?"
" अं.. हो हो ! पण याने काय होतं ?"
" ऐकून घ्या ! रेन हार्वेस्टिंगचा आहे हा पाईप . खाली टाकीत नेलाय"
" हम्म "
" त्याला मी पार्किंगमधे एक टी जोईंट दिलाय आणि तिथं छोटं नरसाळं उलटं बसवलंय कर्णा म्हणून. आता या फुंकणीतून या नरसाळ्यात बोललं कि पाईपातून खाली चंद्रमोहनला ऐकू जातं. बघायचं ?"
" नको. "
" विश्वास ठेवा. या प्रयोगाची सिद्धता झालेली आहे "
" एचएमव्ही मधे पाहीलंय !
" काय म्हणालात ?"
" काही नाही. जाऊ म्हणता मग खाली ? "
" दमलात का ?"
" नाही, जातो "
" बरं..........."

------------------------------------------------------------------------------------------------------
३.

" सर....हाफ... हाफ .... हाफ ... मेलो "
" काय झालं ?"
" खाली ....हाफ हाफ... गेलेलो.... हाफ हाफ "
" चंद्रमोहन भेटला ?"
" नाही ..हाफ हाफ.. नाही "
" मग चेक बुक मिळालं ?"
" नाही ..हाफ हाफ.. नाही "
"अरेरे ! या वेळी वाईट हालत झालीय. बसा बसा. "
:" हाफ हाफ हाफ हाफ "
" खूपच दमलात हो ! हल्लीच्या पिढीमधे स्टॅमिनाच नाही राहीला. आमच्या वेळी काय स्टॅमिना होता "
" हाफ हाफ हाफ हाफ "
" सेल्समनला असा दम लागणं चांगलं नाही "
" हाफ हाफ हाफ हाफ "
" चंद्रमोहन पण एव्हढ्या धापा टाकत नाही"
" कुत्रा.. ?? हाफ हाफ "
" नाही. जोशा ! "
" हम्म.. हाफ हाफ "
" बोलू नका. ऐकत रहा."
" हा जोशा फारच हेरगिरी करायचा. अजूनही करतो. मा़झ्याकडं कोण येतं, काय करतं. नसत्या चौकशा याला ! आणि प्रत्येकाकडे तक्रारी करत बसतो. मग मोठं कुत्रच खाली बांधलं. पिल्लू असतानाच अक्राळविकाळ होतं बरं का ! तर पार्किंगमधे मला बघून म्हणाला.. कुत्रं कितीही मोठं असलं तरी जोशांच्या खानदानात घाबरायची परंपरा नाही हे कुणाला तरी कळायला पाहीजे ...मग भडकलोच मी. !
सरळ पट्टा काढला आणि सोडून दिला. त्याचं नावही चंद्रमोहनच ठेवलंय. आता दात ओठ खाऊन असतो माझ्यावर "
" कुत्रा ?"
" नाही जोशा. बोलू नका. तर या जोशाच्या पण अशाच फे-या व्हायच्या जिन्यावरून. उगा भोचकपणा.. पण एक दिवस... असाच तुमच्यासारखा दम लागला आणि माझ्या दाराबाहेरच पडला कि हो.."
" बाप रे... हाफ हाफ "
" बोलू नका हो. मग मीच त्याला नीट केला "
" कसा ? हाफ हाफ ..."
" हे बघा ! ही बाटली आहे ना ? "
" मोरांब्याची ?"
" नाही. मोरांबा नाही हा. हे आहे तपस्वी अमृत. माझं संशोधन आहे. एव्हढं चाटा बघू चमचाभर "
"......................"
" काही नाही होत. चाटा ..... हंगाश्शी.."
"............................"
" पाणी प्या. पाच मिनिट पडून रहा "
,
,
,
,

" कसं वाटतंय ?"
" अरे वा ! खरंच फ्रेश वाटतंय. मघाची दमछाक पण कमी झाली. "
" आहे कि नाही गंमत ! तुमच्या सारख्या सेल्समननं कसं फिट असलं पाहीजे. आणि फिट नसेल तरी किमान हे तपस्वी अमृत तरी जवळ बाळगायला पाहीजे. वेळ कधी सांगून येईल ......"
" हम्म..सर मी खाली गेलेलो ना "
" खाली गेला होतात नाही का ? सापडलं चेक बुक "
" सर खाली कुठलीच गाडी नाही . एकच चारचाकी आहे"
" असं कसं होईल? मी स्वतः डिकीत ठेवलंय ना "
" सर नाही हो. मी कोपरा न कोपरा शोधला. बाहेर रस्त्यावरही जाऊन आलो "
" मीटर जवळ नाही पाहीलत ?"
" पाहीलं ना.."
" मग कशी काय दिसली नाही ?"
" काय ?"
" दुचाकी !"
" सर .. नाही हो "
" अहो त्या मीटरला टेकवूनच ठेवलीये ना "
" टेकवून ?"
" स्टँड खराब आहे ना. "
" तिथं तर एक सायकल होती "
" हो मग त्याच सायकलच्या डिकीत होतं ना चेकबुक "
" अरे बाप रे ! तुम्ही सायकल बद्दल बोलत होता होय ?"
" दुचाकी म्हणजे सायकल नाही का ?"
" ओह माय गॉड ! आणि मी स्कूटर समजलो "
" असं काही मी म्हणालो नाही हं. मी दुचाकी म्हणालो होतो. स्पष्ट आठवतंय "
" अहो पण सायकल म्हणायच ना स्पष्ट "
" कशासाठी ? सायकल दुचाकी नाही का ? "
" अहो पण स्कूटरला काय म्हणता मग ?"
" स्कूटर ! "
" माझीच चूक आहे सर Sad आता पुन्हा बारा माळे.! "
" नाही नाही ! या वेळी तुम्ही नका जाऊ "
" सर, नाही कसं ? जावं तर लागेलच ना .. एक तर तुमचा पाय .. त्यात एक तास तर यातच गेला आणि मी अजून स्कीमबद्दल एक अक्षरही नाही सांगितलेलं "
" सांगा कि मग.. . मी कधी अडवलं ?"
" बरं. असंच करुयात. आधी स्कीम ऐकवतो. मग चेकबुक आणतो. "
" तुम्ही आधीच हे करायला हवं होतं. उगाचच दोन हेलपाटे झाले. बारावा माळा आहे हो "
" हम्म.. "
" साठेआठच्या आत होईल ना ?"
" कुठे जाणार आहात का ?"
" मी नाही हो. फ्युज उडणार आहे. "
" बिल्डींगचा? "
" नाही हो ! बरं जाऊ द्या , तुम्हाला काय करायचं आपण आपलं साडेआठचं टार्गेट ठेवू. कसं ? तुम्ही मोकळे मी मोकळा. "
" गुड सर ! असे कस्टमर्स कुठे भेटतात ?"
" पण काही कारणाने साडेआठ वाजले तर टेबलावरची डायरी वाचा हं "
" ओके ! काही विशेष ?"
" पण साडेआठ वाजवायचेच कशाला ?"
" ओह ! बरं बरं. तर आमची कंपनी एक नावाजलेली कंपनी आहे. तुम्हाला माहीतच असेल कि आम्ही दार्जिलिंगला रिसॉर्ट्स बांधतोय "
" नाही "
" अहो, खरंच बांधतोय "
" नाही म्हणजे तुम्ही बांधताय हे मला माहीत नाही "
" ओह ! सर तुम्ही फिरायला जातच असाल ना ?"
" रोज सकाळी आठ किलोमीटर "
" तसं नाही. बाहेरगावी सुटीला जाण्याबद्दल विचारतोय मी "
" हो, जातो कि "
" कुठे कुठे गेला होतात ?"
" अष्टविनायकाला गेलो होतो, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजाभवानी आणि तिरुपती बालाजी "
" नाही म्हणजे सुटी काढून हिलस्टेशनला रहायला कधी गेला होतात का ?"
" नाही ब्वॉ "
" दार्जिलिंग आवडतं का ?"
" कधी गेलोच नाही तर कसं सांगणार ? "
" अहो सर. दार्जिलिंग हे भारतातलं एक उत्कृष्ट हिलस्टेशन आहे . अशा ठिकाणी सुटीला जायचा ट्रेंड आहे हल्ली. तुमचा स्ट्रेस दूर होतो. आपण नव्या जोमाने कामाला लागू शकतो. कसं असतं ना, इथं शहरात रोजचं प्रदूषण, बॉसची कटकट, हवामान या सगळ्यापासून चार दिवस सुटका हवीच असते जिवाला "
" मग या जाऊन ..?"
" मी ?"
" मग कोण ?"
" सर ! तुमच्या जाण्याबद्दल चाललंय आपलं "
" पण मी कुठं चाललोय ?"
" दार्जिलिंगला नाही का सर ?"
" अरेच्चा ! मग मला कसं माहीत नाही ?"
" काय ?"
" कि मी दार्जिलिंगला चाललोय ते "
" व्हेरी गुड ! म्हणजे तुमचं ठरलं तर..."
" कशाचं ?"
" जायचं.."
" पण कुठे ?"
" अहो दार्जिलिंगला.."
" तेच तर म्हणतोय, मला कसं माहीत नाही मी चाललोय म्हणून ?"
" ओह सर ! आताच तर म्हणालात ना कि तुम्ही चाललाय ते "
" मी म्हणालो ? मला वाटलं तुम्ही चाललाय ! "
" सर ! माझं ऐका. तुम्ही जाऊन या एकदा या स्कीममधे "
" पण तुम्ही स्कीम सांगितलीच नाहीत अजून.."
" ओके ओके. मुद्यावर येतो "
" थांबा. तुम्ही फार टाईमपास करता बुवा. आता असं करतो.. चेक बुक घेऊनच येतो "
" पण सर.. "
" अंधार होत आलाय. नंतर सापडणार नाही.... "
" अ‍ॅज यु विश सर ! पण चेकबुक मीच आणतो"
" असं म्हणताय ? बरं ... सावकाश जा आणि लवकर या... . "
,
,
,
,
,
,
" हाफ हाफ हाफ हाफ... सर चेक बुक "
" मिळालं ?"
" नाही. तुम्ही पाठवलेलं ना आणायला.? हाफ हाफ हाफ...
अंधारात काहीच दिसत नव्हतं. हाफ हाफ हाफ...
खूप वेळ गेला. मोबाईलच्या प्रकाशात सायकल शोधली...हाफ हाफ हाफ...
तर चावी नव्हती खिशात मग ..हाफ हाफ हाफ...
आलो पुन्हा जिन्यावरून चढून..हाफ हाफ हाफ...
शोधत ... शोधत..... हाफ हाफ हाफ...
तर ... हाफ हाफ हाफ ... आठवलं..
चावी ... हाफ हाफ
तुम्ही माझ्याकडून ..हाफ हाफ.... घेतली होती "
,
,
,
" माझ्याकडेच होती का चावी ? अरेरे ! "
" हो सर ! हाफ हाफ हाफ... आता जातो पुन्हा "
" आराम करा हो थोडा...बारावा माळा"
" नाही..हाफ हाफ नाही..साडेआठ "
" हो हो साठेआठ ! सावकाश जा हो..."

..................................................................................................................
४.

" सर ! हाफ हाफ हाफ हाफ हाफ... चेकबुक !"
" चेकबुक ! कुणाचं ?"
" असं..हाय..हाय ... हाफ हाफ ... काय करताय सर ? तुमचं ... हाफ हाफ.."
" तुमच्याकडे कसं ?"
" सर आता खाली ...हाफ हाफ हाफ....जाऊन आणलं नाही का !! "
" पण का ?"
" तुम्हीच तर ..हाय हाय हाय.... हाफ हाफ... सांगितलंत "
" मी ? माझं चेकबुक तुम्हाला आणायला का सांगू ?"
" हाफ हाफ हाफ.. खरंच हो "
" पण तुम्ही कोण ?"
" मी.....हाफ हाफ.... ओळख दिलीये ना सर "
." माफ करा , मी ओळखलं नाही आपल्याला "
" हाफ हाफ हाफ...हाफ हाफ हाफ...हाफ हाफ हाफ... चेष्टा "
" करताय का ?"
" हाफ हाफ हाफ...मी नाही !"
" मग मी करतोय का ?"
" हाफ हाफ हाफ...अहो सर मी टोक "
" हा हा हा जोक करताय होय ?"
" नाही.. हाफ हाफ.. मी निशिकांत टोक .. हाफ हाफ..मेलो .. मरणार मी..... हाफ हाफ "
" किती दमलात ..बसा बसा "
"हाफ हाफ हाफ हाफ "
" कुठून आलात ? कोण पाहीजे ?"
" सर ! हाफ हाफ हाफ...तुमच्याकडेच नाही का आलोय मी ?"
" मग मला कसं कुणी सांगितलं नाही ?"
" सर... ! हाफ हाफ "
" अरे बापरे ! किती धापा टाकताय ! जिन्याने आलात का ? "
" हो सर.... हाफ हाफ"
" बारावा माळा आहे हा "
" स्सर.. अयाई गं... हाफ हाफ हाफ हाह हाफ हाफ "
" बसा बसा ! आपण ओळख नंतर करून घेऊ "
" स्सर.. हाफ हाफ... चार वेळा चढलो जिना...आई गं !! "
" क्का ? एकदाच चढला असतात तरी माझ्या घरी पोचला असतात. चार वेळा कशाला चढलात ? "
" स्सर ! छातीत ..अयाई गं...कळ .. हाफ हाफ हाफ "
" अरे अरे ! थांबा थांबा , औषध देतो तुम्हाला एक "
" तपस्वी अमृत... हाफ हाफ "
" अरेच्चा म्हणजे तुम्ही औषध न्यायला आलात होय ! "
" स्सर.. औषध..हाफ हाफ..द्या लौकर...आई !! "
" ओह ! अरे, एक खोललेली बाटली होती इथं.. कुठं गेली ?"
" अयाई गं !"
" थांबा हं. बाटली शोधतो. अरे पण ! "
" काय ????? "
" फक्त झाकणच आहे "
" अयाई गं "
" सॉरी हो ! चाटून घेता का ? "
" आ.. आ... चेक.. अयाई गं...काय ?"
" झाकण हो "
" आ आ आ. हाफ हाफ... लवकर ! "
" हो हो ! घ्या "
" ......................"
" गुड ! थांबा हं. देतो झाकण. हम्म .. घ्या, हा एक चमचा घ्या ! चाटून घ्या.
आता गप्प पडून रहा. हलू नका.. "

" हाफ हाफ हाफ "
,
,
" कसं वाटतंय आता ?"
" बरं वाटतंय ...एकदम झकास !"
" बोलू शकताय ना ?"
" हो हो.. पाच दहा मिनिटात बरं वाटलं हो "
" म्मग ! आता सांगा चेकबुक का आणलंत वर ?
" सर .. सर.. पाया पडतो सर. तुम्हीच सांगितलंत हो सर "
" हे पहा ! पाया पडला नाहीत तरी चालेल पण खोटं बोलू नका. बरं आता सांगा. तुम्ही इकडे कसे काय आलात ?"
" सर ! काल तुम्ही मला फोन केला होतात ! सहाची अपॉइंटमेंट होती आपली ."
" अच्छा ! मी फोन केलेला का ? आणि सहाची अपॉईटमेंट ? मला तर सहा कधी वाजतात हे कळतच नाही."
" म्हणजे ?"
" जाऊ द्या ! कशासाठी आला होतात ?"
" मी तुमच्याकडे स्कीमसाठी आलोय, हो कि नाही ?
" कसली स्कीम ? "
" ओ माय गॉड ! "
" काय ?"
" साडेआठ वाजून गेलेत ?"
" हो. रोजच वाजतात."
" सर ! साडेआठ सर.. डायरी देता का ?"
" येणारा प्रत्येक जण ही डायरीच कसा काय मागतो, काही कळत नाही.. घ्या "
" थँक्स...."
,
,
,
,
" ओह नो ! सर यात तर म्हटलंय तुम्हाला शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे म्हणून....."
" हो का ?... असं लिहीलंय खरं त्यात "
" बाप रे ! असंही लिहीलय कि दर तीन तासांनी तुमची मेमरी जाते. ती पुन्हा तीन तासांनी येते. या तीन तासांचं त्या तीन तासांना काहीच कळत नाही "
" हो का ? "
" म्हणजे साठआठचा संबंध.."
" बरोबर. साडेआठच्या आधीचं मला काहीच आठवत नाहीये. असं वाटतंय साडेपाचनंतर मी आताच झोपेतून उठलोय "
" म्हणजे आता साडेअकरा पर्यंत तुम्ही या मोडमधे राहणार ?"
" अगदी बरोबर "
" ओह माय गॉड !!"
" आता काय झालं ?"
" सर ! स्कीम रात्री बारा वाजता संपतेय सर ! "
" त्यात काय ? संपूदे ना "
" सर ! जाऊ दे ! जेव्हां तुम्ही ते तुम्ही व्हाल तेव्हां माझ्याकडे अर्धा तासच राहतोय "
" अरे वा ! मी हा मी नाही, मी कुणी औरच आहे असं म्हणायचंय का ? क्या बात है ! तुम्हाला तर सगळंच माहीत आहे. तुमची एव्हढी तयारी आहे म्हटल्यावर स्कीम सांगायलाच पाहीजे नाही का ?"
" स्सर.. तुम्ही सांगणार स्कीम? "
" म्हणजे काय ! तुमची अवस्था पाहूनही जर मी स्कीमबद्दल काहीही सांगितलं नाही तर काय उपयोग ?"
" हो हो , ते ही आहे म्हणा. तुम्हाला आधीच माहीत होती का स्कीम ?"
" होती म्हणजे काय ? होतीच "
" सांगा आता स्कीम ! साडेअकरापर्यंत नाईलाज आहे"
" हे पहा मिशिकांत टोक. मला तुम्ही बुद्धिवादी गृहस्थ वाटता. बरोबर..?"
" बरोबर "
" तुम्ही सत्याच्या शोधात निघालेले एक विवेकी गृहस्थ आहात असं मला वाटतं "
" अं ? सत्याचा शोध ?"
" हा हा ! हा तुमचा विनय मला आवडला. जिथे विवेक तिथे विनय आलाच नाही का ?"
" अं ! हो हो "
" मग सत्याच्या या शोधाचा प्रवास कुठवर आलाय आपला ?"
" सर ! ज्या दिवशी टार्गेट पूर्ण होतं आणि स्कीममधे सदस्यत्व कन्फर्म होतं तेच अंतिम सत्य !"
" वाहवा ! किती सोप्या शब्दात सांगितलंत. पण विज्ञान आणि व्यवहारातल्या अतींद्रिय विज्ञानातला फरक समजावून सांगण्याची ही स्कीम इतकी सोपीही नाही निशिकांता !"
" अगगं ! सगळं अवघडच अवघड आहे "
" हम्म ! अगदीच अवघड आहे असंही नाही म्हणता येणार."
" सर ! काय सोप्पं काय अवघड हे इथं आल्यापासून काही समजेनासं झालंय मला "
" असं बघा ....निर्गुणानिराकारादि मान्यअमान्यतांच्या पूर्वपीठिकांचं सिंहावलोकन करता आसेतुहिमाचल जे प्रवाह आढळतात तेच सप्तार्णवाभूमधेही आढळून यावे यास निश्चित एका योजनेचं प्रयोजन म्हणावं कि मानवी संस्कृतीचा विकास होताना सदसदविवेकबुद्धीचा वापर म्हणावा यावर आजही तत्त्ववेत्यांमध्ये आणि अध्यात्मवाद्यांमधे एकमत नसल्याचे हे निदर्शक आहे या मतावर सहमती होण्यास हरकत नसावी. अशी सहमती नसण्यासही कुणाचा आक्षेप असणे हे मानवी मनाच्या आंदोलनांचा धांडोळा घेणा-यास सृष्टीच्या अंतारंभाच्या परीघाच्या केंद्रावर उभे राहून सर्पाकार वळणे घेत आईनस्टाईनच्या सिद्धांतावर झुलल्यासारखे वाटावे यात नवल ते काय ? यातूनच श्रद्धावादी आणि विज्ञानवादी यांचा झगडा झाला असे कुणी म्हणेल तर ते दुर्दैवी ठरावे, कारण कालाय तस्मै नमः म्हणताना काल अविचल आहे आणि सापेक्षतावादाचा सिद्धान्त ज्या विश्वाची कल्पना करतो त्याच्या केंद्राशी सगळं एकतर सत्य तरी आहे किंवा मिथ्य तरी.."
" अयाई गं....."
" अहो टोक ! काय झालं ? उठा उठा...!!"
" सर... पाणी ...पाणी "
" घ्या ! सावकाश प्या "
" बरं वाटतंय का आता ?"
" हो "
" मी यावर एक पुस्तक लिहीलंय. थांबा हं मी वाचून दाखवतो "
" नको S S S S !"
" का बरं ?"
" सर ! मी नंतर वाचेन. तुम्ही मला द्या "
" असं म्हणता ? पण एकाच अटीवर ! या पुस्तकातलं पहिलं प्रकरण तुम्ही प्रत्येकाला सांगायचं आणि शेवटच्या भागावर प्रश्न विचारायचे "
" असं का सर ?"
" सोपं आहे ! उत्तर शोधण्यासाठी लोकांना पुस्तक विकत घ्यायला लावायचं .."
" पुस्तक बघू ?"
" बघा !"
" रान. तपस्वी ! हे नाव आहे या पुस्तकावर "
" रा. न. तपस्वी ! "
" पूर्ण रुप काय आहे नावाचं ?"
" काय करणार जाणून घेऊन. जोशा म्हणतो राऊडी नराधम तपस्वी ! काहीही म्हणतात लोक ! "
" हम्म.. ते ही खरंच म्हणा "
" मग पुस्तक खपवताय ना ?"
" मंजूर !"
" वचन देताय मला ?"
" दिलं सर वचन दिलं "
" वचन देण्यापेक्षा असं करा, ही एक हजार प्रतिंची लेटेस्ट आवृत्ती इथं आहे तीच घेऊन जा. "
" एक हजार ?"
" काय झालं ? बरं मी तुम्हाला वाचून दाखवतो पुस्तक एकदा "
" सर ! नको सर. मी एक हजार प्रती घेऊन जायला तयार आहे "
" पाच हजार रूपये द्या "
" कसला ?"
" अहो ! आगाऊ रक्कम नाही का ? घाबरू नका. बाकिची रक्कम जसजशा प्रती खपतील तशी द्या. "
" सर ! इतके पैसे नाहीत माझ्याकडे .."
" अहो मग चेक द्या "
" सर पण नंतर देईन पैसे.. विश्वास ठेवा हो माझ्यावर !"
" असं म्हणताय ! ब्बारं... अरे हो, चेकवरून बरं आठवलं, तुम्ही चेकबुक कुठून आणलंत माझं ?"
" खालून नाही का सर ? दुचाकी... दुचाकी म्हणजे सायकल...सायकलची डिकी.. डिकीत चेकबुक "
" तिथं कुणी ठेवलं पण ?"
" तुम्हीच !"
" काहीतरीच काय ! मग मला कसं माहीत नाही. दोन दिवस शोधतोय मी ते "
" अहो सर म्हणजे तुम्ही तुम्ही नसताना दुसरेच कुणी तुम्ही असताना ठेवलं असेल "
" काय बोललात ! माझ्या पुस्तकाचं संपूर्ण सार आलं या वाक्यात ! आता या प्रती घेऊनच जा "
" अं अं अं "
" नाही ? बरं हे चेकबुक पुन्हा जिथून आणलंत तिथं ठेवा बघू ! "
" सर... पुन्हा बारा मजले ?"
" तुम्हीच म्हणालात ना आत्ता ? मी मी नसून कुणी और आहे.. आणि कुणी और म्हणजे तो आहे. त्याने ठरवलेलं कर्म बदलणारे आपण कोण ?"
" अहो सर ! पाया पडतो हो सर....."
" थांबा ! पुस्तकातलं पहिलं प्रकरण तरी वाचून दाखवतो "
" सर ! मी जातो. "
" प्रकरण ..."
" द्या इकडे ते चेकबुक ! "
" अरेरे ! पुन्हा चाललात ? पण वर या हो पुन्हा "

-----------------------------------------------------------------------------------
५.

" सर ! हाफ हाफ हाफ हाफ हाफ हाफ हाफ हाफ हाफ.... वाचवा .... "
" आलो आलो... "
" दार... हाफ हाफ हाफ हाफ हाफ हाफ..... उघडा सर "
" अरे ! तुम्ही इथे दारात पडलात होय ! अरे बापरे, आणी किती दमलाय. काय अवस्था करून घेतलीये स्वतःची "
" आई आई गं... हाफ हाफ हाफ हाफ हाफ हाफ "
" बरं बरं ! बसा बसा "
" सर ...हाफ हाफ हाफ औषध सर ! "
" ओह... अरे या खोललेल्या बाटलीत काहीच शिल्लक नाही ! "
" हाफ हाफ हाफ हाफ..."
" झाकणात अगदी थोडं...."
" सर ! हाफ हाफ.... आणा ते....हाफ हाफ....इकडं "
" अरे हिसकावून कशाला घेताय. देतच होतो मी "
" हाफ हाफ हाफ हाफ...."
" शांत शांत.. पडून रहा... हंगाशी !"
" कसं वाटतंय ? "
" आता बरंच बरं वाटतंय. पण अजून थोडं औषध द्या ना प्लीज ! "
" नवीन बाटली पॅकिंगमधे आहे हो. सील असतं तिला. फोडायच्या आधी पंधरा हजाराचा चेक जमा करावा लागतो. देताय ?"
" काय ?"
" पंधरा हजाराचा चेक ?"
" अं.. नाही ठीक आहे मी आता. नेक्स्ट टाईम !"
" बर ! आग्रह नाही ! माझं दुकान नाही, समाजसेवा आहे. "
" हो हो ! अगदी अगदी "
" माझं चेकबुक मिळालं ?"
" सर ! मिळालं होतं पण तुम्हीच नाही का खाली ठेवायला सांगितलंत पुन्हा ? "
" अहो ! समजेल असं बोला हो ! एकतर मला कळेना मी मघाशी वर कसा पोहोचलो लिफ्टच्या स्विचजवळ ते आणि आता हा चेकबुकचा घोळ "
" हम्म...साडेअकरा !! आता पुन्हा तुम्ही तुम्ही आहात ना ?"
" हे काय विचारणं झालं ? मी मीच आहे, तुम्ही तुम्हीच आहात आणि चंद्रमोहन चंद्रमोहन आहे "
" जोशा ?"
" नाही कुत्रा !"
" सर, आता वेळ नाही. आता काहीही बोलू नका आणि ऐका प्लीज ! "
" मी केव्हाचा तयार आहे ऐकायला. तुम्हीच टाईमपास करताय "
" ओह्ह्ह्ह ..! तर सर...तुम्ही दार्जिलिंगला जाल तेव्हा हॉटेलमधे रहायचा खर्च किती होईल सांगा बघू ? "
" ते मी कसं सांगू ?"
" अंदाज हो "
" पण मी दार्जिलिंगला कुठं चाललोय ?"
" सर समजा हो प्लीज ! बारा वाजताहेत "
" बरं समजलो .."
" मग सांगा बघू आता चार दिवसांचा तुमचा खर्च किती होईल ते ?"
" सोळाशे ते दोन हजार !"
" सर ! चेष्टा करताय ना ?"
" नाही ब्वॉ ! रोजचे चारशे रूपये किंवा गेला बाजार पाचशे रूपये प्रमाणे इतकेच होतात "
" सर ! चारशे रूपयांच्या लॉजशी आमच्या रिसॉर्टची तुलना करताय सर तुम्ही ?"
" नाही बुवा. मी कधी केली तुलना ?"
" सर फाईव्ह स्टार हॉटेलचा खर्च विचारतोय मी "
" मला का विचारताय ?"
" अहो तुम्हीच जाणार ना ?"
" हे पहा ! मी मघाशीच सांगितलंय, मी नाही चाललो म्हंणून "
" सर ! समजा हो... प्लीज समजा "
" बरं ! ठीक आहे. पण मी फाईव्ह स्टार हॉटेलमधे जाणार नाही हं सांगून ठेवतो. अंथरुण पाहून पाय पसरावेत माणसाने. मी बघत सुद्धा नाही अशा हॉटेलांकडे "
" सर ! पण फुकट रहायला मिळालं तर ?"
" हां मग काही प्रॉब्लेम नाही "
" आमची कंपनी तुम्हाला मोफत स्टे देतेय, चार दिवस !"
" अरे वा ! भारीच आहे कि स्कीम !"
" आवडली ना ? ते ही दरवर्षी "
" वा वा ! तुम्ही तर देवदूतच आहात. पण जायचा यायचा खर्च ?"
" तो तुम्ही करायचा "
" बरं चला. तेव्हढं करू आम्ही. मग कधीपासून देताय ही स्कीम "
" गुड ! सर दहा मिनिटं राहीलीत. तुम्हाला बेसिक स्कीम हवी असेल तर दोड लाखाचा चेक द्या. पीक सीझनची गोल्ड हवी असेल तर अडीच लाखाचा चेक द्या "
" चेक कशाला ?"
" मेंबरशीपचा !"
" अहो पण आताच तर म्हणालात ना कि मोफत स्टे देताय म्हणून ?"
" बरोबर ! एकदा मेंबर झालात कि स्टे मोफतच आहे सर "
" मग पैसे कशाला घेताय ?"
" सर ! समजून घ्या हो "
" पण पैसे नाहीत ना माझ्याकडे "
" चेक ! चेक द्या सर. सांगितलंय मी तुम्हाला "
" चेकबुक तुम्हीच नाही का खाली ठेवलं म्हणालात ?"
" सर ! मी आणलं होतं...पण तुम्हीच... जौ द्या आता "
" मी तर घेऊन यायला सांगितलेलं "
" सर ! प्लीज सर ! कधी नाही इतका वेळ लागलाय इथे. त्यात इतक्या लांब आलोय आणि इतक्या वेळा बारा माळे चढलोय मी..."
" बर ! असं म्हणता ? मग चेक द्यायला हवा. खूपच त्रास काढला हो तुम्ही ! पण चेकबुक राहीलंय खाली.."
" सर ! आता प्लीज.."
" हो हो. मीच जातो. पण ह्या लंगड्या पायामुळं उशीर होईल बरं का ..बारा वाजायला "
" हरे राम ! आता लास्ट टाईम ! यानंतर काही मी जिना चढ उतार करणार नाही "
" चाललोय ना मी "
" नाही .. जाऊन येतो चटकन "
" सावकाश हो ! "
,
,
,
,
" अरेरे ! काय हो निशिकांत. इथेच निपचित पडलात ते ? आहात ना कि गेलात ?"
" अं..अं...अं...अं "
" आहे आहे. धुगधुगी आहे अजून. अरे बापरे ! धापाही टाकता येत नाहीयेत "
" अं..अं...अं...अं अं..अं...अं...अं अं..अं...अं...अं अं..अं...अं...अं "
" अजून का आला नाहीत म्हणून पहायला आलो तर तुम्ही जोशाच्या दारात पडलाय ! "
" अं..अं...अं...अं अं..अं...अं...अं अं..अं...अं...अं "
" बरं बरं... स्कीम सांगताय ना ?"
" अं..अं...अं...अं ..आह ! "
" अरे हो ! फारच वाईट अवस्था झालीय नाही का ? औषध देऊ का ?"
" आ आ आ आ उ ओ ओ ओ "
" आलो आलो..."

" हे पहा. एक खोललेली बाटली होती ती संपली. आता फक्त नवीन बाटली आहे. मात्र सील फोडायच्या आधी चेक घ्यायचा हा नियम आहे आमचा.. काय करताय ? फोडू ?"
" आ आ आ आ उ ओ ओ ओ ...ओ..ओ.ओ.. हो हो !"
" बरं ! होकार आहे असं समजतो. आणा बघू चेकबुक तुमचं !"
".............................................."
" हम्म. हा तुमचा चेक. सही करा. पंधरा हजाराचा आकडा टाकलाय "
" आ आ आ आ आ ई गं "
" किती विव्हळताय ? हे घ्या एक चमचा औषध. आचमन करा बघू "
" ............................."
" हम्म... हलू नका जराही. गप्प पडून रहा ...."

" कसं वाटतंय आता ? "
" हाफ हाफ... आता बरं वाटतंय "
" चला धापा तरी टाकायला लागलात. मला वाटलं चालले आता तुम्ही झुईं SSSS "
" सर ! अहो इथं माझा जीव चाललाय आणि तुम्हाला विनोद सुचतोय ?"
" पण आता वाचला ना जीव ? "
" अं हो हो ! पण सर ! पंधरा हजार जास्त होत नाहीत का ?"
" अहो, धावपळीचं आयुष्य तुमचं. पुन्हा असा प्रसंग आला म्हणजे ? पंधरा हजार जिवापेक्षा जास्त आहेत का ? "
" सर... पण "
" हे पहा ! आता औषध नसतं तर चालला होतात कैलासाला.. पुष्पक विमानात बसून ! आता जीव वाचलाय न ? पैशाची काही घाई नाही हो. आता नसतील तर चेक माझ्याकडे एक महिना ठेवीन. तोपर्यंत घ्या कुणाकडून तरी आणि बँकेत जमा करा ! बरोबर एक महिन्याने चेक वटवला जाईल. काळजी नको... "
" हम्म..."
" एक सांगा, तपस्वी अमृत किती गुणकारी आहे याचा अनुभव घेतलाय ना ?"
" हो हो"
" या औषधाने तुमची तब्येतही सुधारेल आणि..... आर्थिक परिस्थितीही "
" ते कसं ?"
" औषधाची किंमत आहे पंचवीस हजार रूपये. पण आपण आपल्या स्कीम मधे ते पंधरा हजार रूपयांना देतो "
" एक मिनिट ! तुम्ही या औषधाची स्कीम सांगताय का मला ?"
" अर्थात ! "
" अरेच्चा ! आणि मला वाटलं...."
" काय वाटलं ?"
" काही नाही . सांगा आता"
" तुम्ही आता काय करता ?"
" सर ! रिसॉर्टसाठी मार्केटिंग करतो. "
" किती मिळतात यात ?"
" एका कस्टमर मागे पाच ते सात हजार "
" आणि पॅकेज कितीचं ?"
" दीड लाख ते पाच लाख "
" कस्टमर्स किती मिळतात सरासरी ?"
" सर ! महिन्यात पन्नास व्हिजिटस केल्या तर पाच मिळतात "
" तुम्ही तपस्वी अमृतची एजन्सी घ्या. एका बाटलीमागे तुम्हाला सात हजार मिळ्तील... पंधरा हजारातून ! "
" सात हजार ???? "
" आहे कि नाही ? आणि विश्वास ठेवा माझ्यावर. मला तरी रोज किमान दोन ग्राहक मिळतातच या अशा ठिकाणी "
" काय सांगता ?"
" हे तर काहीच नाही. तुम्ही सबएजन्सी देऊ शकता. तुमच्या सबएजंटसच्या कमिशनमधून दोन हजार तुम्हाला मिळतील. प्रत्येक ग्राहकामागे "
" किती सबएजंटस नेमू शकतो मी ?"
" कितीही ! समजा दहा एजंटस नेमले आणि त्या प्रत्येकाने रोज दोन ग्राहक आणले तर रोजचे चाळीस हजार ..."
" बाप रे ! "
" तुम्ही जर शंभर सबएजंट्स..."
" बास बास ... चक्कर येतेय मला "
" काय करताय मग एजन्सीचं ?"
" सर ! इतकी वर्षे या रिसॉर्टच्या मार्केटिंगमधे शिव्या खाल्ल्या पब्लिकच्या. ही स्कीम नाही लॉटरी आहे सर !"
" मग दहा हजार रूपये भरताय ना ?"
" दहा हजार ?"
" डिपॉझिट हो "
" सर , एक कस्टमर कन्फर्म केलं ना कि चेक लगेच देतो "
" घाई नाही. चेक देऊन ठेवा. दहा हजाराची सोय झाली कि फोन करा. कसं ?"
" अं. बरं .."
" थांबा हं. हा चेक ठेवून येतो. तुम्ही हा फॉर्म भरून त्या फाईलमधे लावून टाका.... आलोच ! "
" तुम्ही कुठे चाललात ?"
" तुम्ही जिन्याने आलात न ?"
" हो "
" लिफ्ट चालू होती का ?"
" नाही सर ! बंद होती "
" हम्म. बहुतेक दुपारी मी वरचा स्विच ऑफ केला होता. आता चालू करून येतो. दमलात ना !"
" अरे बापरे ! म्हणजे लिफ्टला काहीही झालेलं नाही ?'
" नाही. "
" मग बंद कशाला केलीत ?"
" अहो त्या चंद्रमोहनसाठी "
" जोशा ?"
" बरोब्बर ! बरंच माहिती आहे कि तुम्हाला ..."
" हम्म... बरंच माहिती झालंय आता ! "
" काही म्हणालात ?"
" काही नाही. मी म्हणालो, लिफ्ट चालू झाली तर मेहरबानी होईल गरिबावर "
" असं का म्हणताय ? हा गेलो आणि आलो बघा. वरच तर आहे"

" सर ! चंद्रमोहन वर आला होता "
" कुत्रा ?"
" नाही जोशा !"
" हं ! काय म्हणत होता ?"
" हेच कि तुम्ही मार्केटिंगच्या लोकांना फोन करून बोलवता आणि तुमची स्कीम गळ्यात मारता म्हणून "
" राम राम राम ! तुम्हीच सांगा , मी तुमच्या मागे लागलो होतो का ? तुम्हीच मागितलं कि नाही औषध? या जोशाला सवयच आहे अशी. आणखी काय म्हणाला जोशा ?"
" म्हणाला कि, तुम्ही लोकांना जिन्यावरून पळवून पळवून दमवता , लाचार बनवता आणि औषध घ्यायला भाग पाडता "
" कसा हरामखोर आहे हा जोशा ! मी तर म्हणत होतो कि नाही मीच जातो म्हणून.. उलट तुम्हीच ऐकलं नाहीत माझं ! आणखी काय म्हणत होता ?"
" म्हणत होता कि, तुम्ही नाटकी आहात, ढोंगी आहात, मानभावीपणे मी जाऊन चेकबुक आणतो म्हणता पण जात नाही. तुम्हाला माहीत असतं सेल्समनला गरज आहे म्हणजे तो जाईल.."
" काय बोलायचं आता ? या चंद्रमोहनची जीभ कोण धरणार ?"
" जोशाची ?"
" बरोब्बर ! "
" सर ! तो म्हणाला कि या इमारती पण तुमच्याच आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही कस्टमर्स बनवता तसे बनवायचे असतील तर दहाव्या किंवा वरच्या मजल्यावरचे घर घ्या म्हणून आग्रह करता. "
" आणखी काय म्हणाला ?"
" काहीच नाही. पण सर ! हा जोशा इतका खार का खाऊन आहे तुमच्यावर ?"
" त्याची इन्शुरन्स पॉलिसी मी घेतली नाही ना !"
" का बरं ?"
" रात्री बाराला ती स्कीम बंद झाली !!"
" ओह ! समजलो. म्हणजे हा जोशा पण ?"
" मेंबर आहे स्कीमचा !"
" हम्म्म.."
" अरे तुमची स्कीम ?"
" सर ! आपले चरण कुठे आहेत ?"
" का हो ? सर आता आपणच आमचे गुरू !! "
" हा हा हा हा !....पण स्कीम साठी आलाच आहात इतक्या लांबून तर"
" सर ! ती स्कीम बारालाच बंद झाली. कायमची ! निघतो आता...एक मिनिट सर...ते रा. न. तपस्वी हे तरी खरं नाव आहे का तुमचं ? !"
" नाही नाही. मी आल्हाद भिडे !"
" अहाहा ! भिडलात सर ...अगदी आल्हाद . आता घरी गेल्यावर मार्केटिंगची पुस्तकं चुलीत घालतो आणि...."
" माझं पुस्तक तेव्हढं खपवा...!"
" अरे ! आता तुम्ही कोण आहात ?"
" रा. न. तपस्वी ! "
" तपस्वी का ? वा वा ! आणि ते तीन तासाचं चक्र ? ती शॉर्ट टर्म मेमरी... ?"
" अजून नाही समजलं ? "
" नाही !"
" जोशाला विचारा "
" अच्छा .....समजलं समजलं ! चांगलंच समजलं ! Proud "
" या आता ! आणि लिफ्टने खाली जा ... चालू केलीये लिफ्ट ;)"

- Kiran..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे !
मलाही वाटत होतं क्रमशः टाकावी म्हणून... पण निर्णय होत नव्हता. शेवटी आज पोस्टलीच Happy

सर्वांचे मनापासून आभार Happy

मलाही वाटत होतं क्रमशः टाकावी म्हणून..>>>>>>>> अशीच मजा आली.. क्रमशः मधे सगळी मजा गेली असती.. मग ते आपलं हाफ हाफ हाफ हाफ हाफ हाफ हाफ हाफ हाफ कसं झालं असतं...

रच्याक्ने किरण तपस्वी अमृत चं बघ रे काहितरी.. एखादी फोडलेली बाटली असली तर दे... Happy

आधी प्रतिसाद देतो............मग एका आठवड्यात वाचुन घेतो... Happy

अनघा, चिमुरी, आबासाहेब, मामी, वर्षु तै, गिरीश, भावना, अमेलिया, मोनाली पी, मी चिऊ, मोहन कि मीरा, बेफिकीर, शुभांगी कुलकर्णी, झकासराव ...सर्वांचे मनापासून आभार !
( हे लिखाण बरेच दिवसांपासून लिहून तयार होतं पण ऑनलाईन वाचनासाठी पोस्ट करावं कि नको हा निर्णय होत नव्हता. पण हिय्या केला आणि पोस्टलं. आता सगळं माबोकरांच्या हाती... Happy )

असं बघा ....निर्गुणानिराकारादि मान्यअमान्यतांच्या पूर्वपीठिकांचं सिंहावलोकन करता आसेतुहिमाचल जे प्रवाह आढळतात तेच सप्तार्णवाभूमधेही आढळून यावे यास निश्चित एका योजनेचं प्रयोजन म्हणावं कि मानवी संस्कृतीचा विकास होताना सदसदविवेकबुद्धीचा वापर म्हणावा यावर आजही तत्त्ववेत्यांमध्ये आणि अध्यात्मवाद्यांमधे एकमत नसल्याचे हे निदर्शक आहे या मतावर सहमती होण्यास हरकत नसावी. अशी सहमती नसण्यासही कुणाचा आक्षेप असणे हे मानवी मनाच्या आंदोलनांचा धांडोळा घेणा-यास सृष्टीच्या अंतारंभाच्या परीघाच्या केंद्रावर उभे राहून सर्पाकार वळणे घेत आईनस्टाईनच्या सिद्धांतावर झुलल्यासारखे वाटावे यात नवल ते काय ? यातूनच श्रद्धावादी आणि विज्ञानवादी यांचा झगडा झाला असे कुणी म्हणेल तर ते दुर्दैवी ठरावे, कारण कालाय तस्मै नमः म्हणताना काल अविचल आहे आणि सापेक्षतावादाचा सिद्धान्त ज्या विश्वाची कल्पना करतो त्याच्या केंद्राशी सगळं एकतर सत्य तरी आहे किंवा मिथ्य तरी........

>>>>>>>> अप्रतिम, घेरी यायची बाकी राहीली होती फक्त......

झक्कास आयडीया आहे मार्केटिंगची...

धन्यवाद मित्रांनो..

वाचकांची दमछाक व्हावी असा कुठलाही हेतू नसल्याने Happy आता ऑनलाईन वाचनासाठी सुलभ भावं म्हणून पाच भाग पाडले आहेत. टप्प्याटप्प्याने वाचायलाही कदाचित आता सोपं व्हावं... धन्यवाद.

आपला

किरण तपस्वी

खरच दमलो रे..... हाफ हाफ हाफ.... थांब कॉफी घेऊन येतो आणि मग उरलेला प्रतिसाद देतो Wink

रच्याकने - मस्त जमलि आहे Happy

Pages