ना समुद्रपक्षी आले -एक एकांतगीत

Submitted by भारती.. on 3 June, 2012 - 13:27

ना समुद्रपक्षी आले -एक एकांतगीत
http://www.youtube.com/watch?v=2sr52KOfh6k

कलावन्ताला स्वतःच्या अंतर्यामाचा शोध कलेतूनच घेण्याची एक असोशी असते.जाणिवेच्या स्तरावर न मिळणारी उत्तरे मग नेणिवेच्या डोहातून हाताशी येतात/आल्यासारखी वाटतात.

उंचावरच्या घराच्या बाल्कनीतून दिसणारा एक समुद्राचा तुकडा.वर विशाल आकाश ,खडकाळ किनारा ,रस्त्यांच्या डांबरी रेषा पलिकडच्या बाजूला.शहर आपल्याच तंद्रीमध्ये रहदारीचे गाणे गातेय. दिवसाची गत ही अशी.ओसाडलेली.उदासलेली.समुद्र भरवस्तीशेजारीच उपे़क्षित. इतका मोठा,इतका गहन,इतका वेगळा ,कदाचित म्हणूनच इतका उपेक्षित.

रात्र येते,काळोखाचा निबिड पडदा सर्वत्रावर पडतो.शहर आता निद्रा-प्रहराकडे सरकतेय हळुहळू.पण हा काळ्यानिळ्या पाण्याचा तुकडा मात्र आता काहीतरी जादू झाल्यासारखा जिवंत झालाय ..कारण शहरातल्या इमारतीमधल्या अणि रस्यावरच्या वाहनांच्या दिव्यांची प्रतिबिंबे त्याच्या पात्रात हेलकावताहेत.रंगीबेरंगी रुंद प्रतिबिंबांच्या रोषणाईने कसलेतरी मंत्रभारित सौंदर्य या द्दृष्याला आलेय.हा उदास ओसाड समुद्र,जणू वाळीत टाकलेली त्याची जळराशी या क्षणी सम्राज्ञीसारखी झगमगतेय. ही संपन्नता त्याच्याच विरक्त अंतर्यामातून प्रकटलीय्.उपेक्षा पचवून एकान्तसाधना करून तो स्वतःलाच इतकं समृद्ध केलंय की सर्व अपेक्षांच्या तो पलिकडे गेलाय.

हे रूपक एखाद्या चिर-उपेक्षित कलावंताचं तर नाही?ज्याच्या कलेची कदर झाली नाही म्हणून खंत न बाळगता जो कलेच्या देवतेची एकांतसाधना करत राहिला,स्वतःमध्येच परिपूर्ण झाला..कृतार्थ झाला.किंवा खरं तर कुणीही उपेक्षित मानव-मात्र ,खोल खोल स्वतःच्या अंतर्यामातच आयुष्याचा आनंद आणि अर्थ ज्याला सापडला..

ना समुद्रपक्षी आले वार्‍यावर गाज विराली
तो तृषार्त सागर आहे माझ्याच घराच्या खाली

पण रात्र साठता येथे चेटूक दिव्यांचे घडते
लाटांच्या वैराग्याशी बिम्बांची ओळ झगडते..

चांदण्यात कोमल होती ते खडक किनार्‍यावरले
अन नांगरल्या होड्यांशी हितगुज तयांचे चाले..

मग स्नेहसौम्यश्या प्रहरी घनगंभीर एकान्ताशी
किती जिवलग उत्कटतेने संवादती त्या जळराशी..

ना समुद्रपक्षी आले तरी तृषार्त सागर माझा
सजला आंतरसौंदर्ये तो कृतार्थ साजण माझा..

भारती बिर्जे डिग्गीकर

'ना समुद्रपक्षी आले' ही कविता माझे स्नेही श्री मिलिंद मधुसूदन सोमण यांनी तितक्याच तोलामोलाच्या सुंदर संगीताने स्वरबद्ध केलीय.'चन्द्रस्वप्न एकले' या ध्वनीफितीमधील माझ्या रचनांपैकी ही एक. ही लिन्क या write-up सोबत दिली आहे....आभार लाजो..

भारती.

गुलमोहर: 

ह्या गाण्यातील ओळीं माझ्या मनात एक विशिष्ट संगीत उमटवतात. तेमाझ्या मनातील संगीत आणि ध्वनीफितीमधील संगीत एकदम वेगळे वाटते.

पण ध्वनीफित विकत घेईनच.

आभार मित्रहो..मित्र म्हणजे मैत्रिणीही निंबुडा,नाही तरी अकोल्याला बायका पुल्लिंगी क्रियापदे वापरतात ना ? :))