प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे सेम नसतं...४

Submitted by मेधा on 13 September, 2008 - 05:37

आनंद अन कांचन बॅगेज क्लेमपाशी पोचायच्या आधीच अस्मिता तिथे उभी होती. तिला पाहिल्याबरोबर कांचन जवळजवळ धावतच तिच्यापाशी पोचली होती. ' मी दोनचार दिवस कुठे बाहेरगावी जाउन आलो तरी माझ्यासाठी असं धावत नाही हां ही' आनंद खोट्या रुसव्याने म्हणाला.

'अरे किती दिवसांनी भेटतोय आम्ही. आपल्या लग्नाच्या अगोदर भेटलो होतो त्याच्यानंतर आज.' कांचन फुरंगटून म्हणाली.

'जळू नकोस रे आनंद माझ्यावर, कांचन अँड आय गो बॅक अ लाँग वे. चला सामान उचला आपापलं. ' अन मग कांचनच्या दोन्ही खांद्यांना धरून तिच्याकडे निरखून पहात अस्मिता म्हणाली
' लग्न मानवलेलं दिसतंय हो तुला! चेहर्‍यावर तेज आहे नववधू असल्याचं. अन हे मंगळसूत्र, कुड्या , जोडवी, पाटल्या असलं नेहमी घालतेस की काय ? कौतुक आहे हं तुझं.!'

दोन छोट्याशाच बॅगा कांचन अन आनंदने त्या सामानाच्या बेल्टवरनं उचलल्या तशी अस्मिता वळून बाहेर निघाली.

' अहो बाई, अहो शुक शुक! मुख्य सामान राहिलंय ना. थांबा अजून, निघालात कुठे?' आनंदने तिला बॅगेजक्लेम भोवतीच्या गजबजाटात जरा ओरडूनच सांगितलं. इतरांच्या नजरांकडे पूर्ण दुर्लक्ष करत त्याने बेल्टवर नुकताच आलेला मोठा खोका कसाबसा उचलून खाली ठेवला अन अस्मिताला म्हणाला

' आता कार्टचे तीन रुपये तूच दे.'

त्याच्याकडे वैतागाने पहात कांचन जाऊन कार्ट घेउन आली.

तो मोठा खोका अन दोघांच्या बॅगा कार्टवर स्थानापन्न करुन निघाल्यावर अस्मिता म्हणाली ' अजून काही राहिलं नाही ना? नाहीतर मी यू हॉलचा ट्रक आणते पटकन. दोनच दिवसासांठी आलायत ना? सगळा संसारच भरून आणलेला दिसतोय.'

'ते आता घरी गेल्यावर बघशीलच. मला फक्त हमाली दे व्यवस्थित म्हणजे झालं. तिथे घरापासून गाडीत मग तिथल्या एअरपोर्टवर अन आता इथे, उचलून उचलून दमलो मी. '

'आता आपल्याला घरी पोचायला वीसेक मिनिटं लागतील. वाटेत तुला स्टेडियम्स दाखवीन हां आनंद. सिझन मधे आलास तर गेमला गेलो असतो. आता काय फक्त बेसबॉल चालू आहे अन ते सुद्धा होम गेम नाहीत काही या आठवड्यात.' गाडीत बसल्या बसल्या अस्मिता म्हणाली.

'तू जातेस का गं गेम बघायला वगैरे एरवी ?' आनंद ने जरा अविश्वासाने विचारलं.

'एक दोन तरी होम गेम बघतेच रे, आमच्या कंपनीचा बॉक्स आहे स्टेडियमवर. कधी कधी क्लायंटसना घेउन जावं लागतं. आमचे बरेच क्लायंटस पण सीझन तिकिटं घेणार्‍यातले आहेत. कधी कधी ते पण तिकिटं देतात आम्हाला'

'जरा बघ तुझ्या मैत्रिणी कडे अन थोडं शीक तिच्याकडनं!' आनंदने कांचनला सुनवण्याची संधी सोडली नाही. कांचनला बेसबॉल, बास्केटबॉल, फूटबॉल या कशात फारसा इंटरेस्ट नव्हता. आनंदला मात्र सगळे गेम्स आवडायचे. स्टेडियम मधे जाउन गेम बघणे किंवा निदान एखाद्या मोठ्या स्पोर्टस बार मधे गेम पहायला जाण्याकरता तो नेहमी तयार असायचा. कांचनला मात्र हे खेळ घरी बसल्या बसल्या टी व्ही वर पहायला सुद्धा कंटाळा यायचा.

'बरं , बरं, पुरे तुमची गेमची कौतुकं. अस्मिता तू काहीतरी न्युज आहे म्हणाली होतीस ते सांग आधी.'

' अहं, इथे गाडीत नाही, घरी गेल्यावर. आय वॉन्ट टु इन्ट्रोड्युस यू टू समवन.'

' अरे वा! कोण आहे ? कुठे भेटलात? कधी पासून ओळखता एकमेकांना ? नाव तरी सांग ?'

'अहं . आता नाही म्हणजे नाही.' अस्मिता रस्त्यावरची नजर न हलवता म्हणाली. मागे बसलेल्या आनंदला आरशातून तिच्या चेहर्‍यावर काळजी झाकोळून गेल्याचा भास झाला क्षणभर. पण लगेच अस्मिताने टूर बस वाल्याचं भाषण सुरू केलं मग आनंद अन कांचन फिलाडेल्फियाचा इतिहास ऐकू लागले.

यू सी एल ए मधे शिकतानाची या तिघांची मैत्री होती. अस्मिता आर्किटेक्चरमधे मास्टर्स करत होती तेंव्हाच कांचन अन आनंद तिथनं एम बी ए करत होते. शिकतानाचं शेवटचं एक वर्ष अन नंतर सुद्धा दोन वर्षं कांचन अन अस्मिता रुममेट्स होत्या. दोन वर्षांनी अस्मिताला लंडन मधली असाइनमेन्ट मिळाली . एक वर्षभर लंडनमधे होती अस्मिता. तिथनं आल्यानंतर लगेच तिने न्यू यॉर्कच्या एका फर्म मधे नोकरी धरली होती. तिथल्या कामाच्या निमित्ताने पण ती इटली, स्पेन, मेक्सिको, ब्राझील अशा देशातनं फिरली होती.

सहाच महिन्यांपूर्वी तिने न्यू यॉर्क सोडून फिलाडेल्फियाच्या एका फर्म मधे नोकरी धरली होती. त्या दोन नोकर्‍यांच्या मधल्या काळात दोन आठवडे कांचनकडे येऊन राहिली होती लॉस अँजिलिस मधे. तेंव्हाच तर नाही का आनंदने कांचन ला लग्नाची मागणी घातली होती. बर्‍याच वर्षांची मैत्री होती दोघांची , पण दोघं एकमेकांशी लग्न करतील अशी पुसटशी शंकाही आली नव्हती कोणाला. त्यांनी आपण लग्न करणार असं सांगितलं सगळ्या मित्र मैत्रिणींना तेंव्हा कोणाचाच विश्वास बसला नव्हता.

अस्मिताने ' किस हर देन.' म्हटल्यावर सगळे हसले होते खदखदून अन आंनदने पडत्या फळाची आज्ञा मानून कांचनच्या गालावर हलकेच ओठ टेकवले तर सगळे इतके शांत झाले होते की बस. अस्मिताने मात्र तरिही विश्वास ठेवला नव्हता. 'नॉट धिस, अ रियल किस! फ्रेंच किस!' हसत हसत तिने सांगितल्यावर आनंद म्हणाला होता ' माय प्लेझर मॅडम.'
मग मात्र सगळेच आ वासून राहिले होते किती तरी वेळ.

आत्ता त्या आठवणीनीं परत कांचनच्या गालावर लाली चढली.

'आलो आपण घरी. पार्किंगची जागा एकदम लहान आहे. तुमचं सामान आधीच काढून घ्या गाडीतनं. ' घराच्या दारा समोर गाडी लावत अस्मिता म्हणाली.

रस्त्याच्या दुतर्फा झाडं, छोटी छोटी दुमजली, तिमजली; घरं शंभर एक वर्षं तरी जुनी असावीत.

' फिलाडेल्फिया, सिक्स्थ सेंस वगैरे सिनेमे पाहिले असशीलच. ह्या अन आसपासच्या गल्ल्यांचं शूटिंग आहे ते सगळं. या, आत या, गाडी मी करीन नंतर पार्क. वेलकम टू माय हंबल अबोड.'

'कित्ति क्युट आहे गं ? उगीच हंबल कशाला म्हणतेस? अन किम्मत काही हंबल नसणार अजिबात!' कांचनला ती गल्ली, तिथली जुनी घरं, सगळ्या घरांचे विंडॉ बॉक्सेस वगैरे एकदम आवडलं होतं. आनंद सुद्धा अगदी कौतुकाने सगळं बघत होता.

'चला तुम्हाला तुमची रुम दाखवते. मग तुम्ही जरा फ्रेश होऊन या. मी चहा टाकते तोवर.'

'अगं पण तू कोणाला तरी भेटवणार होतीस ना ?'

' ऑल इन गूड टाइम . चहा होउ दे आधी. दमली नाहीयेस का इतक्या लांबच्या फ्लाइटनंतर ?'

चहा पिता पिता कांचन ने तो मोठा खोका उघडून त्यातलं सगळं सामान अस्मिताला दाखवायला सुरुवात केली. आपल्या लग्नाची म्हणुन तिला घेतलेली साडी, तिच्या पहिल्या घरासाठी म्हणून भारतातनं आणलेला मोठा चंदनी गणपती, एल ए मधल्या अस्मिताच्या आवडत्या अँटीक दुकानातनं घेतलेल्या वस्तू असं सगळं देऊन झाल्यावर शेवटी एक चांदीचा कुंकवाचा करंडा हातात घेउन म्हणाली ' आता ओळ्ख करून दे बाई लवकर अन लग्न कधी करताय ते सांग. हे त्यानिमित्त.'

जराशा नाराजीनेच अस्मिताने करंडा हातात घेतला असं आनंदला वाटलं. कदाचित भारतीय नसेल 'तो', मग करंड्याचा काय फायदा असा विचार करुन तो गप्प बसला.
तेव्हढ्यात दार उघडून एक त्यांच्याच वयाची मुलगी आत आली.

'हाय..'

'शिवानी! किती उशीर?' तिला मधेच तोडत अस्मिता म्हणाली.

'सांगितलं नाहीस का अजून ?'

'नाही ना.मी किती वेळा विचारलं तिला. फोनवर तर काही म्हणाली नाहीच अन आताही अजून काही सांगितलं नाही. अरे हो, मी कांचन अन हा आनंद माझा नवरा. आता तूच सांग लवकर. कोण आहे तो?'

'अं , अं' अस्मिताला काय बोलावं, कुठून सुरुवात करावी ते कळेना.

' तो नाही , ती आहे, अन ती मीच आहे .' अस्मिताच्या बाजूला उभी रहात शिवानी म्हणाली.

' बघ मी तुला सांगितलं नव्हतं की असं एकदम थेट सांगायला नको.' आनंद अन कांचनची काहीच प्रतिक्रिया नाही म्हटल्यावर अस्मिता शिवानीला म्हणाली.

'अस्मिता, डु यू नो व्हॉट शी इज सेयिंग ? दॅट यू आर, यू आर , यू नो लाइक एलन, लाइक डोरी?' कांचनच्या तोंडून तो L word काही निघेना. आनंद तर अगदी अचंबित झाला होता.

'कांचन, लिसन टू मी. खरंय शिवानी सांगतेय ते. '

'अगं का पण? कधीपासून? अन आपण एकत्र रहात होतो तेंव्हा ?' कांचनचे विचार अन प्रश्न फारचं भेंडोळी झाली होती सगळ्यांची.

'शिवानी, तू आवरून ये सावकाश. तोपर्यंत माझं कोर्ट मार्शल संपलेलं असेल.' अस्मिता म्हणाली.

कांचनच्या प्रश्नांचा रोख , तिचा रोष आपल्यावर नसला तरी तिच्या बोलण्यामुळे आपल्याला वाईट वाटू नये म्हणुन अस्मिता आपल्याला कटवतेय हे शिवानीच्या लक्षात आलंच पण कांचनला पण कळलं.

'बरं, आता जरा पहिल्यापासून सांगते म्हणजे तुझ्या, तुमच्या शंका कमी होतील. शिवानी पिडीयाट्रिशियन आहे. मी न्यू यॉर्क मधे असताना काही हेल्थ सेंटर्सचं काम करत होते. तेंव्हा शिवानीशी ओळख झाली. तिला आर्किटेक्चर ची माहिती नसली तरी सोशल वेलफेअर च्या दृष्टीतनं अर्बन प्लॅनिंग विषयाची बरीच माहिती होती. न्यू यॉर्कमधे असताना माझ्या सगळ्या ओळखी कामानिमित्त झालेल्या होत्या. त्यात देशी मंडळी फारच कमी. अन त्यात मराठी तर कोणी नव्हतंच. शिवानीची अन माझी वेव्हलेंग्थ पण जुळली. आम्ही कामाशिवाय इतरवेळी पण भेटू लागलो. अशीच हळू हळू ओळख वाढली.'

'अगं पण ओळख, मैत्री तर आपली पण होतीच की. इतरही तुझ्या मैत्रिणी होत्या. मुलांचिही कमी नव्हतीच तुला. तो आमचा सिनियर होता की रघु. किती तुझ्या पुढे पुढे करत असायचा. त्याला कधी भाव दिला नाहीस ?
अन तो बार्सेलोनावाला. त्याची किती कौतुकं असायची प्रत्येक इमेल मधे . कोण तो फॅबिओ ?'

'रेनाल्डो' आनंदने त्या बार्सेलोनावाल्याचं नाव सांगितलं.
' तोच तो, अगदी फाबिओ सारखा दिसायचा ना. त्यालाही इंटरेस्ट होता की. मग त्याला सोडून हे काय ? ही सगळी ना अमेरिकन लोकांची खुळं आहेत गं. यांना स्त्री पुरुष संबंध इतके सहज अन सोपे झाले आहेत की त्यात काहीच थ्रिल वाटत नाही. मग हे असलं काही तरी वाह्यात.'

'अगं असं एकदम नावं ठेवू नकोस तिला. अन अशी स्टिरिओटाइप विधानं करु नयेत.' आनंद कांचनचा राग, तिची नाराजी जरा सौम्यपणे व्यक्त करायला सांगत होता तर ती त्याच्यावर उखडली.

'तू गप रे., मला माहीत आहे ऑल यू गाज हॅव अ फसिनेशन, मॉर्बिड फॅसिनेशन फॉर धिस. बट शी वॉज माय रूमी. वी लिव्हड टुगेदर. तेंव्हा तिला असलं काही वाटलं असलं तर ? ग्रोस!' तिला नक्की राग कसला आहे ते आनंदला कळेना.

हे आता तूच निस्तर अशा आविर्भावाने त्याने अस्मिताकडे पाहिलं.

'कांचन, सांगितलं ना तुला की शिवानीला भेटेपर्यत मला असं काही वाटलं नव्हतं कोणाबद्दल. रघुला मी भाव दिला नाही याची कारणं दोन एकतर माझ्यामते तो जर्क होता, आहे. अन दुसरं म्हणजे त्या दिवसात तुला त्याच्यावर क्रश होता हे दिव्याच्या खांबांना सुद्धा माहित होतं. इतकं असून तो माझ्या पुढे पुढे करत होता तो जर्क नाही तर काय ?'

' आय हॅव ट अग्री विथ यू. दॅट रघू वॉज अ जर्क आय मीन.' कांचन अन आनंदच एकमेकांवर प्रेम होतं, दोघांच लग्नही झालेलं होतं तरी तिच्या क्रशला नावं ठेवण्यात तो कसा मागे राहील.

' मग फाबिओ? तो तर जर्क नव्हता ना ? अन मी तर त्याला कधी पाहिलं पण नाही , मग माझा क्रश कुठून असणार ?'

'खरं सांगू,त्याच्याशी मैत्री होती चांगलीच. पण त्याच्याबद्दल वेगळं काही आकर्षण वाटलं नाही कधीच. जशी तू तसाच तो वाटायचा मला. त्यालाही ते कळलं असावं. शिवाय तो स्पॅनिश,मी मराठी कसं जुळलं असतं गं आमचं ?
शिवानी पुण्याचीच आहे. तिची माझी जेवणाखाण्याची आवड सारखी आहे. दिवाळी, दसरा, गणपती , नाट्य संगीत, हिंदी सिनेमे, क्रिकेट किती आवडी निवडी पण सारख्या आहेत. अ हं थांब, मला सांगू दे सगळं. आवडी निवडी बर्‍याच जणांच्या सारख्या असतात, प्रत्येकाशी लग्न करता येत नाही, पण असे जर कॉमन धागे असले ना की ती रिलेशनशिप तितकीच मजबूत असते गं'

'पण आपले संस्कार, आपला धर्म, आपले रीत रिवाज , त्यांचं काय?'

'अगं ते सगळं सुद्धा बदलत असतंच ना ? सती जाणे, केशवपन करणे या प्रथा कालबाह्य झाल्याच ना. साधी गोष्ट, बायकांची घरातली शिवाशिव पण बंद झालीय ना आता. अजून पंचवीस-तीस वर्षांनी कोणाला कळणार पण नाही कावळा शिवला म्हणजे काय ते. जेंव्हा या प्रथा बदलल्या तेंव्हा किती त्रास झाला असेल. पण आज आपल्याला ते बदल किती साहजिक , किती अनिवार्य वाटतात. आणखीन शंभर वर्षांनी हे ही बदल समाज मान्य होतील की ?'

'ओफ्फो, अजूनही तुमची चर्चाच चालु आहे का? मला वाटलं संपलं असेल एव्हाना कोर्ट मार्शल. चला आटपा लवकर. आपल्याला जेवायला बाहेर जायचंय अन मग रात्रीच्या वेळचं फिली दर्शन . रिझर्वेशन जाईल आपलं.'

शिवानीने सगळ्यांना घाई करून बाहेर काढलं. त्यांच्या घराजवळच्याच एका रेस्टॉरंट मधे जायचं ठरलं होतं. तिथला शेफ अन त्याची बायको ऑर्गॅनिक पदार्थ वापरण्याकरता प्रसिद्ध होते. शिवानी अन अस्मिता ला ते दोघे चांगले ओळ्खत असावे कारण यांना पाहून तो शेफ येऊन त्यांच्याशी दोन मिनिटं बोलून गेला. जेवण झाल्यावर मग बोट हाउसेस ची रोषणाई पाहून रॉकी ज्याच्या पायर्‍या चढत असे त्या म्युझियम पाशी आले. त्या पायर्‍या पाहिल्यावर आनंद सुद्धा तसाच पळत पळत पायर्‍या चढायला लागला. बाकी तिघी जणी सावकाश येऊन पायर्‍यांवर बसल्या.

अस्मिता अन शिवानी एकमेकींचे हात हातात धरून बसल्या होत्या. समोर पसरलेलं शहर, उजवीकडे नदी, मागे म्युझीयमची भव्य इमारत. निशब्द बसले होते सगळे. थोड्या वेळाने अस्मिता म्हणाली
'कांचन तुला एकदम धक्का बसला असेल. मी तुला थोडी तरी कल्पना द्यायला हवी होती कां गं? अजून आम्ही दोघींच्याही घरी सांगितलं नाही. कसं सांगावं, त्यांची प्रतिक्रिया काय होईल याच विंवचनेत आहोत आम्ही. बरं फार दिवस न सांगता पण राह्ता येणार नाही. दोघींच्या घरनं लग्नाकरता तगादा आहेच.'
शिवानी म्हणाली 'इथल्या कायद्यांप्रमाणे आम्हाला लग्नही करता येणार नाही. नाहीतर लग्नालाच बोलवलं असतं सगळ्यांना.'

'आमच्या इथे करता येईल ना तुम्हाला लग्न. तुम्ही तिथे या. मी सगळी व्यवस्था बघतो.' आनंद एवढा वेळ फारसं बोलत नव्हता.पण त्याचा या सगळ्याला पाठिंबा असेल याची कांचनलाच काय अस्मिताला पण कल्पना नव्हती.

' मघासपासून पाहतोय मी. एकमेकींची काळजी घेतायत दोघी. तू पाहिलंस का, शिवानी ने अस्मिताची गाडी न सांगता आत नेऊन लावली. जेवताना दोघी एकमेकींना काय हवं नको बघत होत्या. इथे चढताना मी पळत पळत पुढे आलो तुला सोडून, पण त्या दोघी हातात हात धरुन चढत होत्या. सज्ञान आहेत, सुजाण आहेत. त्यांनीही बराच विचार केला आहे तर आपण विरोध का करतोय ? नवीन काही ऍक्सेप्ट करताना थोडं विचित्र वाटेल पण त्याची सवय होते हळू हळू. लाइफ, लिबर्टी अँड पर्सूट ऑफ हॅपिनेस विसरलीस का ?'

अस्मिता अन शिवानी दोघी आनंदला थॅन्क्यू म्हणत होत्या. आनंद म्हणाला
'नॉट सो फास्ट, यू किस हर फर्स्ट अस्मिता ऍन्ड आय बिलिव्ह यू नो व्हॉट आय मीन !'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>आंनदने पडत्या फळाची आज्ञा मानून अस्मिताच्या गालावर हलकेच ओठ टेकवले .

ह्यात 'कांचनच्या' हवं होतं ना..

जरी मला स्वत:ला हे संबंध पटत्/आवडत नसले तरी गोष्ट आवडली. मॅच्युअर आहे.

सायो, सुधारलंय गं ते. किती नावांचा गोंधळ तो Happy

शोनू,

कथेमधले संवाद लिहायची तुझी शैली खूपच छान आहे. कथेचा विषय थोडासा हटके आहे...... पण आवडली...

हम.......... वेगळी गोष्ट... लिहिलीयेस छान.

वेगळी गोष्ट.. मोजक्या पात्रात छान फुलविली आहेस.

हुश्श! किती धाकधूक होती लिहिताना मनात! अजून तरी अंडी टॉमॅटो, दगड-दोंडे काही आलं नाही. जीव भांड्यात पडला.
धन्यवाद मंडळी....

अंडी-टोमॅटो कशाला?
छान आहे कथा..
हल्ली हे फारसं धक्कादायक नाही राहिलेलं..
आणि कथेची हाताळणीही मस्त आहे..

शोनू, अंडी, टोमॅटो मारावेसे वाटले तरी तुझ्यापर्यंत कसे पोचणार ते? त्यामुळे नाईलाज आहे. Wink Proud

शूनू,
तुझी ही कथा वाचून I am amazed . is it just coincidence?
ही गोष्ट मी माझ्याच ओळखीच्या मुलीची वाचतेय असे वाटले चक्क नी धक्का बसला. नावांचे फेरफार केलीस का असा विचार आला. पण म्हटले छे ही तर कथा आहे तुझी.का कुणास ठावूक मला तरी असले संबध अजून'ही' कसेसेच वाटतात.

अगदी ह्याच ओळखीच्या ह्या मुलीचे पाहून आणि अगदी कथेत लिहिल्या प्रमाणे तसेच्या तसेच झाले होते. एकदम मद्रासी अय्यंगार थाटात वाढलेली नी इथे US मध्ये master कराययला येवून ३ -४ वर्षात तिने चक्क प्रेम आहे सांगून एका मुलीशी विवाह केला ca मध्येच.
पहीली गोष्ट म्हणजे किंचीतही असे काही signs वाटले नाही का दिसले नाहीत तिच्यात तेव्हा
मग असे नक्की काय होते नी हा बदल होतो एकदम ३-४ वर्षात ह्याचेच कोडे आहे मला तरी. ह्या गोष्टीनंतर आम्हा friends मध्ये, हा बदल नक्की genes का fascination (अगदी कथेत म्हटल्याप्रमाणेच) ह्याच्यावर चर्चा रात्री रात्री चालली होती. ......... अजून कोणालाच कळले नाही पण शेवटी its her life म्हणून accept करून आपापल्य्य मार्गाने गेलो.

शूनू, तु UCLA मध्ये होतीस का? (if you like,then you can answer this Qs).

तू एकदम बर्‍याचश्या कथा आजूबाजूला घडतात अश्या लिहिल्या आहेस.

शोनू,सगळ्याच कथा मस्त झाल्या आहेत..
आणि ह्या कथेबद्दल अंडी, टोमॅटो येण्याची शक्यता कमीच आहे.. अर्थात काही अपवाद असतीलच..
लोकप्रभाची ह्या वेळची मुखपृष्ठकथा ह्याच विषयावर आहे...
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे

नमस्कार मि नविन आहे वरिल लिखान वाचल छान आहे.

अंडी टोमॅटो नक्कीच नाही, असा विवादास्पद विषय मांडण्याचं धाडस दाखवल्याबद्दल आणि तो जबाबदारीनं इमानेइतबारे वाटला तसा उतरवल्याबद्दल तुझं कौतुकच वाटतंय.
फक्त कांचनचं 'अमेरिकन खुळ' हे विधान जरा विसंगत वाटलं तेव्हा एकदम तेंडुलकर/पटेल/ स्मिता पाटीलचा १९८२ चा खेड्यात घडणारा 'उंबरठा' आठवला. पण आनंद म्हणाला तसं तिचं विधान स्टिरिओटाइप असावं.

कथा आवडलि. शीर्षकाशी सुसंगत आहे एकदम.

"तू पाहिलंस का, शिवानी ने अस्मिताची गाडी न सांगता आत नेऊन लावली. जेवताना दोघी एकमेकींना काय हवं नको बघत होत्या. इथे चढताना मी पळत पळत पुढे आलो तुला सोडून, पण त्या दोघी हातात हात धरुन चढत होत्या. सज्ञान आहेत, सुजाण आहेत. त्यांनीही बराच विचार केला आहे तर आपण विरोध का करतोय "

ही कारण मात्र अजिबात पटलि नाहित. सुजाण, सज्ञान अश्या दोन व्यकिंच्या प्रेमाचि प्रत इतक्या वरवरच्या गोष्टिंतुन ठरणार? गैरसमज नसावा, एखाद्या नात्यात ह्या गोष्टि असतिल तर छानच पण फक्त ह्यातुनच प्रम व्यक्त होत का? मुळात अश्या मॅच्युअर्ड व्यक्तिंना ते अश्या पध्धतिने व्यक्त करण्याचि गरज वाटते का? माझा अनुभव असा आहे कि सुरुवातिला ह्या गोष्टिंच खुप अप्रुप असत पण काहि काळानंतर ते ओसरत, नात मात्र दोघांच्या मनात खोलवर रुजत जात.

शोनू बोल्ड नक्कीच आहे कथा.. लोकप्रभेचा हाच विषय आहे ह्या आठवड्यात.. मागे दक्षिणा ने ह्याविषयी एक पुस्तक परिक्षण लिहिलं होतं.. कथा चांगली लिहिलेयस, कथा बीज.. हं.. वेळ लागेल थोडा आपल्या इथे तरी..
चारही कथा, त्यातली पात्र, त्यांच्यातले संबंध दाखवण्याची हातोटी सगळंच खूप आवडलं.. लिहिती रहा अशीच... शुभेच्छा Happy

शोनू कथा छान आहे, प्रस्तावनेला अनुसरून आहे. वाचक म्हणून नावांचा खूप गोंधळ उडतो, सर्व नावं लक्षात राहत नाही. अवतरणांचा वापर कमी करता आला तर पहा.

अशा समलिंगी लग्नांचं पुढे काय होतं यावर मी कधीच काही वाचलेलं नाही. अशी लग्न कितपत टिकतात?

बी सारखाच मलाही प्रश्न पडला की ही लग्न कितपत टिकतात आणि त्यातून काय साध्य होते. असो.....

शोनू, चारही कथा एकदम सुरेख.... तू ह्या विषयावर एकदम छान आणि चौफेर लेखन केलेस त्याबद्दल तुझे अभिनंदन.

<<<'नॉट सो फास्ट, यू किस हर फर्स्ट अस्मिता ऍन्ड आय बिलिव्ह यू नो व्हॉट आय मीन !'>>>
ह्या आनन्द्ला आवरा जरा कोणीतरी......

शोनू,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे सेम नसतं>>> मग हे काय आहे?? केवळ लस्ट? Sad

नैसर्गिक संबंध असतात नं? मग हे काय कमी आहे? मला वाटत मानव सोडून कुणीही समलिंगी संबंध ठेवत नसेल...
अजून तरी अंडी टॉमॅटो, >> बादवे भाज्या, अंडी महाग आहेत त्यी फुकट का घालावायच्या Happy Biggrin

त. टी.
कुठल्याही बदलांच आपण कसं स्वागत करतो ते इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असत अस मला वाटत!

"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

कुलदीप,
>>>
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे सेम नसतं>>> मग हे काय आहे?? केवळ लस्ट?
>>>

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे सेम नसतं ह्याचा अर्थ प्रेम म्हणजे प्रेम नसतं असा नसून प्रत्येक प्रेमकथेतील प्रेम हे सेम नसतं असा आहे.
उदा: प्रेम हे जर एक फंक्शन मानले तर,
प्रेम (सिनॅरिओ१) = प्रेम (सिनॅरिओ२) हे विधान बहुतांश सिनॅरिओज मध्ये चूकीचे ठरेल..

शोनू....

इथे या विषयावर कथा लिहिण्याच्या तुझ्या धाडसी प्रयत्नाचे कौतुक वाटले. आणि कथा लिहीलीयंस पण छान. Happy

पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा!

>>>मला वाटत मानव सोडून कुणीही समलिंगी संबंध ठेवत नसेल...>>>
कुलदीप, तुझ्या माहीतीसाठी सांगते, माशांपासून माकडापर्यंत अनेक प्राण्यांमध्ये समलिंगी संबंध आढळले आहेत.

कथा आवडली.

>> शिवानीला भेटेपर्यत मला असं काही वाटलं नव्हतं कोणाबद्दल
एकदम पटणारे आणि आधी ऐकलेले वाक्य. Happy

बाकी कांचनचे प्रश्न अगदीच बाळबोध वाटले. रीतीरिवाज वगैरे..