महाराष्ट्राची लोकधारा

Submitted by विशाल कुलकर्णी on 29 May, 2012 - 11:34

काही दिवसांपूर्वी धाकट्या बहिणीच्या पिल्लांना घेवून गणेश कला क्रिडा मंचावर भरलेल्या बालजत्रेला जायचा योग आला. लहान मुलांना भुलावून घेतील, मोहवतील अशा अनेक गोष्ट होती. आमच्या सौ., बहिण, तिची पिल्लं मस्त रमली तिथे. पण माझ्या मनात भरलं एक छोटंसं शिल्पकलेचं प्रदर्शन. बहुदा शाडु किंवा प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या काही मोजक्याच सुबक मुर्ती. पण केवळ शिल्पकला एवढीच त्या प्रदर्शनाची ओळख नव्हती. त्याचं वैशिष्ठ्य होतं त्यातल्या महाराष्ट्राच्या लोकधारेतील काही महत्त्वाच्या आणि आजकाल अस्तंगत होत चाललेल्या घटकांचं, परंपरांचं चित्रण ! मुर्ती काही फार सुबक वगैरे नव्हत्या पण जे काही होतं ते विलक्षण सुखावणारं, त्याहीपेक्षा आपल्या संस्कृतीची, तिच्या काही घटकांची ओळख करुन देणारं होतं. श्री. विनोद येलारपुरकर यांच्या 'व्यक्तीशृंखला' नावाच्या या प्रदर्शनाची एक झलक मायबोलीकरांसाठी....

वासुदेव :
आजही खेड्यापाड्यातून सकाळच्या प्रहरी मोराची टोपी घातलेला एक माणुस येतो . हरिनाम बोला हो वासुदेव बोला म्हणत लोकांमध्ये धर्मभावना जागृत करण्याचं, दिवसाची सुंदर , पवित्र सुरुवात करुन देण्याचं काम हा 'वासुदेव' इमाने इतबारे करत असतो. कुणी मावल्या मग त्याच्या झोळीत पसाभर धान्य टाकतात आणि तो संतुष्ट होवून 'वासुदेव बोला, हरिनाम बोला' करत पुढच्या दाराकडे वळतो. डोक्यावर मोरपिसांची किंवा निमुळती होत गेलेली कपड्यांची लांब टोपी, गळ्यात कवड्याच्या माळा, घोळदार अंगरखा,त्याखाली धोतर, कमरेला शेला, त्यात रोवलेली बासरी, पायात चाळ, एका हातात पितळी टाळ तर दुसर्‍या हातात चिपळ्या आणि मुखात अखंड हरिनाम घेत दिवसाची प्रसन्न सुरूवात करुन देणारा वासुदेव आजकाल तसा दुर्मिळच होत चालला आहे. खेडोपाडी अवचित दिसतो तरी, शहरांतून मात्र तो कधीच अदृष्य झाला आहे. मुळातच कृष्णभक्ती हा त्याच्या आयुष्याचा पाया असल्याने त्याच्या मुखात शक्यतो कृष्णलीला वर्णन करणारीच गाणी असतात. खरेतर वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी एक संस्थाच आहे, होती असे म्हणायला हरकत नाही. अर्थात 'वासुदेव' या परंपरेची सुरुवात नक्की कधी झाली कुणास ठाऊक पण ती किमान १०००-१२०० वर्षापुर्वीची तरी नक्कीच असावी. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी' वासुदेवावर' लिहीलेली रुपके आजही उपलब्ध आहेत.

मुरळी :
देवदासी, भाविणी, जोगतिणी यांच्याच पंथातील अजुन एक मुख्य व्यक्तित्व म्हणजे मुरळी. श्री खंडोबाच्या सेवेत आपले सर्व आयुष्य वाहणार्‍या वाघ्याची सखी, जोडीदारीण. महाराष्ट्रातील अनेक प्रथा - परंपरांप्रमाणे ही एक प्रथा. कायद्याने बहुदा आज या प्रथेवर बंदी आहे. तरीही आजही महाराष्ट्रात, गोव्यात भाविणी, जोगतिणी, देवदासी आणि मुरळ्या आढळतातच. प्रथेनुसार यांचे देवाशीच लग्न लागलेले असते. आयुष्यभर देवाच्या सेवेत आपले सर्वस्व वाहून सेवा करत राहायचे हे यांचे जीवनमान. (अर्थात या प्रथा परंपरांचा तत्कालिन समाजाच्या अर्ध्वयुंकडून बर्‍याच प्रमाणात गैरफायदाही घेतला गेला, घेतला जातो) असो. ओचे न सोडता नेसलेले नऊवारी लुगडे, गळ्यात कवड्यांच्या माळा आणि लल्लाटी भंडार म्हणजेच भंडार्‍याने माखलेले कपाळ, एका हाताने घोळ (म्हणजे एक प्रकारचे घंटावाद्य) वाजवत, नाचत देवाचे नाव घेणारी मुरळी. पुर्वी अपत्यप्राप्तीसाठी केलेला नवस फेडण्यासाठी आपले पहीले मुल देवाच्या चरणी वाहीले जाण्याची एक प्रथा होती. त्यांनी देवाच्या सेवेत आपले आयुष्य व्यतित करायचे असा संकेत असे. हेच वाघ्या आणि मुरळी.आपल्याकडे महात्मा फुले आणि त्यांच्यासारख्या इतर काही समाज सुधारकांनी समाज प्रबोधन करुन या प्रथेवर कायद्याने बंदी आणली तेव्हापासून वाघ्या-मुरळीची ही प्रथा बंद करण्यात आली. तरीदेखील आजही काही भागात वाघ्या - मुरळी आढळतातच.

वारकरी :
'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल' किंवा 'ग्यानबा तुकारम' च्या गजरात हातातल्या टाळ चिपळ्या वाजवत बेभान होत त्या सावळ्या विठुची आळवणी करणारे वारकरी कुणाला माहीत नाहीत? वारकरी संप्रदायाची सुरुवात बहुदा ८०० वर्षापुर्वी झाली असावी. ज्ञाना - नामा - चोख्याच्या कालखंडादरम्यान. दरवर्षी पंढरपूरात चैत्र, आषाढ, माघ आणि कार्तिक महिन्यात भरणार्‍या यात्रेत आजही दर वर्षी भक्तजनांची संख्या वाढतेच आहे. या यात्रेला जावून, विठुच्या पायी मस्त्क टेकवून, त्याचे सावळे मनोहर रुप डोळ्यात ठसवत घरी परत येणे याला वारी असे म्हटले जाते. आणि अशा वारीला नियमीतपणे हजेरी लावणारा, विठुच्या भक्तीत लीन होणारा, त्याच्या सावळ्या वर्णात आकाशाची निळाई शोधणारा भक्त म्हणजे वारकरी. साधा सदरा, धोतर, पायी चपला हातात टाळ् - चिपळ्या कधी मृदंग तर कधी पखवाज, डोक्याला टोपी किंवा पागोटं असं वारकर्‍यांचं सर्वसाधारण रुप असतं. स्त्रीयांही मागे नाहीत बरं का. आळंदीपासून डोईवर तुळशी वृंदावन घेवून पंढरपूरापर्यंत चालत वारी करणार्‍या स्त्रीयांची संख्या पुरुषांच्या बरोबरीने असते बरं. आजकाल देशातल्या सुशिक्षीत, शर्ट - पँट, बुट घालणार्‍या तरुणाईलाही त्या विठुचं वेड लागलेलं दिसून येतं. त्यामुळे एखाद्या वारीतल्या मुक्कामी आपला लॅपटॉप उघडून बसलेला वारकरी दिसला तर नवल करु नका. राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहुन हे वारकरी बहुतांशी चालतच विठुमाऊलीच्या भेटीची ओढ मनात घेवून निघतात. ओठात कधी ज्ञानबाच्या ओव्या, कधी तुकोबा - चोखोबांचे अभंग, कधी नामयाची भारुडे अगदीच काही नाही तर अखंड विठुनामाचा गजर करत ही भाविक मंडळी आपल्या विठुमाऊलीच्या दर्शनाला निघतात. एकदा वारीत उतरलात की तिथे लहान, मोठा, गरीब, श्रीमंत, काळा गोरा असले कुठलेही भेद राहत नाहीत. तिथे प्रत्येक जण फक्त विठुचा भक्त असतो. एवढेच काय तर वारीत एकमेकांशी बोलताना देखील एकमेकांना 'माऊली' म्हणूनच संबोधायची पद्धत आहे. आयुष्यात एकदातरी हा अनुभव घ्यायलाच हवा प्रत्येकाने. मुक्कामाच्या ठिकाणी मग वारकरी कधी भजन, प्रवचन, किर्तन करुन तर कधी रिंगण, चक्रीभजन यासारखे खेळ खेळून दिवसभराचा शिणवटा घालवतात. रात्रभर कुठल्यातरी गावात मुक्काम करुन सकाळी परत पुढच्या प्रवासाला निघतात. अशा वेळी मुक्कामाच्या ठिकाणी त्या त्या गावातील लोक वारकर्‍यांच्या राहंण्याची, भोजनाची सोय करतात. त्यातुनही वारी केल्याचे पुण्य मिळते असा समज आहे. अशा वेळी खेडेगावातील घरा घरांमधुन वारकर्‍यांना आपल्या घरी मुक्कामाला, जेवायला घेवून जाण्यासाठी लोकांची चढाओढ लागते.

पिंगळा :
पिंगळा किंवा पांगुळ ही एक भिक्षेकर्‍यांची जात आहे. सुर्यदेवाचा शरीराने पांगळा असलेला सारथी 'अरुण' याचे प्रतिनिधी म्हणून हे पिंगळे ओळखले जातात. अरुणाचे प्रतिनिधी म्हणून ते अरुणोदयाच्या आधीच दारात येतात आणि 'धर्म जागो' अशी शुभकामना व्यक्त करुन दान मागतात. देवाला वाहीलेल्या पांगळ्या मनुष्यापासुन, अरुणापासून त्यांची उत्पती झाली म्हणुनही त्यांना पांगुळ म्हटले जात असावे. शक्यतो हे पांगुळ पहाटेच्या वेळी झाडावर किंवा भिंतीवर बसून येणार्‍या जाणार्‍यांकडून दान मागतात. खांद्यावर घोंगडी, धोतर, डोक्यावर रंगीबेरंगी गोधड्यापासून बनवलेली टोपी, काखेला झोळी, हातात घुंघराची काठी आणि कंदिल असा त्यांचा पोषाख असतो. महानुभावांच्या लीळाचरित्रात, तसेव नामदेव्-ज्ञानदेवांच्या साहित्यात पांगुळांचे उल्लेख आढळतात. हे 'पांगुळ' मुख्यत्वेकरुन दक्षीण महाराष्ट्रात आढळतात. त्यांच्या बायका गोधड्या शिवतात, घोंगड्या तुणतात व त्या विकुन तसेच पांगुळांनी मागुन आणलेल्या भिक्षेवर, दानावर त्यांची गुजराण चालते.

फकिर :
स्वत; भणंग राहून, भिक्षा मागुन मोहम्मद पैगंबरांची शिकवण समाजात रुजवण्याचे महत्कार्य करणारा हा एक पंथ. अल्लाचे सच्चे उपासक असलेले फकिर हजरत पैगंबरांच्या शिकवणीनुसार संन्यस्त वृत्तीने, निरपेक्षपणे आपले काम काम करत असतात. अंगात हिरवी किंवा काळी कफनी, डोक्यावर रुमाल बांधलेला, गळ्यात रंगी बेरंगी काचमण्यांच्या माळा, हातात मोरपीसांचा गुच्छ, धुपदाणी, खांद्याला अडकवलेली भिक्षेची झोळी आणि मुखी अल्लाहतालाचे पवित्र नाम असे फकिरांचे सर्वसाधारण स्वरुप असते. डोक्यावर केस आणि दाढी कायम राखलेली असते. भारतासह अनेक राष्ट्रांमध्ये पसरलेल्या मुस्लिम संप्रदायाबरोबरच हे फकिरही जगभर पदरलेले असतात.

आराधी आणि गोंधळी :
गोंधळी, आराधी, भोप्ये किंवा भुत्ये हे तसे तुळजापूरची भवानी आणि माहुरची रेणुकामाता यांचे भक्त. त्यामुळे त्यांच्या गीतांमध्ये तुळजाभवानी आणि रेणुकामाता या दोन्ही देवतांचे एकात्मक रुप आढळते. भुत्या किंवा गोंधळींप्रमाणे आराधीही देवीचा गोंधळ घालायचे काम करतात. बहुतांशी वेगवेगळ्या देव देवतांच्या किंवा तत्कालिन सामाजाशी संबंधित असलेल्या छोट्या छोट्या कथा, गाणी हे आराधींच्या वांड़मयामध्ये प्रामुख्याने आढळतात. तुळजापुराच्या भवानीमातेच्या पुजा-उपासनेमध्ये आराधींना खुपच महत्व आहे. देवीच्या बिछान्याच्या वेळी हातात पोत घेइन देवीच्या समोर नाचण्याचा पहिला मान आराध्यांचा असतो. नवरात्रात देवीच्या घटांमध्ये जमा झालेला पैसा या आराध्यांना देण्याची पद्धत आहे. (सद्ध्या मात्र हा सगळा पैसा देवीच्या पुजार्‍यांच्याच घशात जातो)

पोतराज आणि कडकलक्ष्मी :
'दार उघड बया आता दार उघड' असं आई मरिआईला आवाहन करत हातातल्या कोरड्यानं (चाबुक) स्वतःच्याच शरीरावर प्रहार करत स्त्री वेशात दारी येणारा पोतराज. जटा वाढवून मोकळे सोडलेले केस किंवा कधी अंबाडा घातलेला, कपाळभर हळदी-कुंकवाचा मळवट भरलेला, कंबरेला अनेक चिंध्यांपासून तयार झालेले घागरावजा वस्त्र पांघरलेले आणि हातात 'कोरडा', गळ्यात मण्यांच्या माळा, कंबरेला सैलसर घुंघराची माळ बांधलेली आनि पायात खुळखुळ्या घातलेला हा पोतराज लहान मुलांमध्ये भीतीचे ठिकाण ठरतो. आपल्या हातातील कोरड्याचे कधी स्वतःच्याच शरीरावर प्रहार करीत तर कधी नुसतेच हवेत 'सट सट' आवाज काढीत तो मरिआईच्या नावाने दान मागतो.

पोतराजाबरोबर बहुतांशी त्याची जोडीदारीण म्हणजे पत्नीही असते. गुडघ्यापर्यंत नेसलेली नऊवारी साडी, हळदी कुंकवाचा मळवट भरलेला, गळ्यात कवड्यांच्या माळा आणि हातामध्ये टिमकी अथवा मृदंगासारखे एखादे चर्मवाद्य आणि डोइवर मरिआईचा पेटारा (बहुदा लक्ष्मीचे उग्र रुप म्हणून मरिआईला कडकलक्ष्मी असेही म्हटले जाते.) घेवुन ते वाजवत, बेभान होवून नाचणार्‍या पोतराजाबरोबर तीही त्याची साथ देत असते. पोतराज आपल्या वैविद्ध्यपुर्ण नृत्याने आणि हातातल्या 'कोरड्याच्या' फटकाराने पोतराज देवीची अवकृपा तसेच संकटे, विपत्ती दूर करतो असे मानले जाते.

आणि या प्रदर्शनातले हे शेवटचे शिल्प. याबद्दल काहीच सांगण्याची गरज नाही. आजपर्यंत मायबोलीवर यांच्याबद्दल इतके काही बरेवाईट लिहीले गेले आहे की त्याबद्दल काही भाष्य करण्याची गरज आहे असे मलातरी वाटत नाही.

विशाल कुलकर्णी

गुलमोहर: 

अरे विशाल, त्यात थॅन्क्स कसले ? किंबहुना तू हा जो 'लोकधारे'चा विषय निवडला आहेस त्याबद्दल इथल्या सदस्यांनी तुझ्याप्रती कृतज्ञताच व्यक्त करणे आवश्यक आहे, इतका मोलाचा हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे, जो कुणीतरी जपत आहे, आणि त्याच्याविषयीची माहिती तुझ्यासारखी व्यक्ती तिला व्यापकता देऊन योग्य ती प्रसिद्धीही देत आहे.

काहीवेळी मनस्वी वाईटही वाटते की ज्या प्रमाणावर अशा धाग्यांना भरभरून प्रतिसाद मिळणे (निदान माझ्या दृष्टीने तरी...) आवश्यक असते तितके ते मिळत नाहीत....म्हणून इथे कुणी त्या धारेविषयी त्या संदर्भात अधिकची चौकशी केली तर तुझ्यापेक्षा मलाच जास्त आनंद होतो आणि मग त्याला सविस्तर खुलासाही करणे मला भावते, इतकेच.

अशोक पाटील

Pages