ह्या तीराचे त्या तीराशी नाते समजत नाही
दूर राहती तरी बंध का कधीच उसवत नाही ?
तसेच काहीसे माझे अन तुझे आगळे नाते
परस्परांचे नसतानाही स्वतंत्र करवत नाही
ह्या मेघाच्या अन धरतीच्या मनात काय असावे ?
ह्याने व्हावे रिते-रिते अन तिला चिंब भिजवावे !
तसेच काहीसे माझेही तुला आठवुन झुरणे
तुझी आसवे मी ढाळावी तुझी वेदना व्हावे
ओढ समुद्राची सरितेला कशास ही लागावी ?
कडे-कपारी ओलांडुन वेडावुन धावत यावी
तसेच काहीसे तू माझ्यासाठी चंचल होणे
रोज मला पाहून मनातुन नवी उभारी घ्यावी
संध्येच्या कातर सूर्याला क्षितिजाने तोलणे
एक क्षणाची संगत असते तरी किती मोहणे !
तसेच काहीसे अपुले हे नजरबंद जपतो मी
पुन्हा पुन्हा अन त्याच क्षणाला फिरुन मनाशी जगणे..!
तुझ्या सोबतीने जगण्याचे स्वप्न पाहिले नव्हते
तुझ्याविना पण कुणीच इतके कधी भावले नव्हते
ह्या नात्याला कशास द्यावे नाव उगा काहीही ?
ह्या नात्याने बांध मनाचे कधी तोडले नव्हते..
....रसप....
२८ मे २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/05/blog-post_29.html
हा काव्यप्रकार उर्दूतही असतो
हा काव्यप्रकार उर्दूतही असतो ना जशी आपण गझलेत २ लाईन्स ची एक कविता करतो तशी ही चार लाईन्स ची कविता २ शेर एकात अशी.........................
मस्त आहेत सर्व ओळी.
वैभवराव, तसं पाहिलं गेल्यास,
वैभवराव,
तसं पाहिलं गेल्यास, माझ्या माहितीप्रमाणे मराठीत व्रुत्तबद्ध कवितांत चार ओळींचे एक कडवे, असाच पायंडा आहे. ह्याला कारण आपल्याकडे 'अर्धसमव्रुत्त'ही असतात, हे आहे की अजून काही की ही केवळ एक रुढ झालेली परंपराच आहे, नक्की ठाऊक नाही.
माझ्या मते 'गझल'चा प्रभाव म्हणूनच आजकाल लोक (मीही) व्रुत्तबद्ध कवितेत दोन-दोन ओळींची कडवी लिहित असतात.
असो. धन्यवाद!!
रुबाया?
रुबाया?
खूप सुंदर! संध्येच्या कातर
खूप सुंदर!
संध्येच्या कातर सूर्याला क्षितिजाने तोलणे
एक क्षणाची संगत असते तरी किती मोहणे ! >>> मस्त!
भरत सर, ह्या रुबाया नाहीत.
भरत सर,
ह्या रुबाया नाहीत. रुबाईची काही निश्चित अशी व्रुत्तं/ मीटरं आहेत. त्यात हे येत नाही.
तसंच रुबाई ची संरचनाही वेगळी असते.
ही रचना केवळ एक व्रुत्तबद्ध कविताच आहे.
धन्यवाद!
अर्रे!! सुंदर झालीये!
अर्रे!! सुंदर झालीये!
’नात्याला नाव नसणे’ ही कल्पना
’नात्याला नाव नसणे’ ही कल्पना मला फारशी पटत/आवडत नसून देखील
कविता आवडली. कारण जे मांडायचं आहे ते नेटकेपणे मांडलंय.
रसदार कविता आवडली.
रसदार कविता आवडली.
खूप आवडली ह्या तीराचे त्या
खूप आवडली
ह्या तीराचे त्या तीराशी नाते समजत नाही
दूर राहती तरी बंध का कधीच उसवत नाही ?
तसेच काहीसे माझे अन तुझे आगळे नाते
परस्परांचे नसतानाही स्वतंत्र करवत नाही >> व्वा! मस्तच!
पुलेशु