प्राक्तन

Submitted by वैभव फाटक on 29 May, 2012 - 00:06

वेढले या संकटांनी घोर आता
कापलेले प्राक्तनाचे दोर आता

'घे भरारी' सांगते दुनिया मलाही
संपला पंखातला या जोर आता

टाकुनी रस्त्यात निघुनी बाप गेला
पाप त्याचे भोगते हे पोर आता

चोरता तू भाग्य माझे खंगलो मी
क्रंदने वेचून थोडी चोर आता

पावसाची साद आली 'येत आहे'
नाच करण्या 'ना' म्हणाला मोर आता

पाहुनी कांती तुझ्या गोऱ्या कपोली
रुक्षली ती चंद्रम्याची कोर आता

वैभव फाटक ( २०-०२-२०१२ - वापी )

गुलमोहर: 

'घे भरारी' सांगते दुनिया मलाही
मलाही ऐवजी कितीही केलं तर अधिक योग्य वाटेल असं मावैम.

टाकुनी रस्त्यात निघुनी बाप गेला
पाप त्याचे भोगते हे पोर आता
पहिल्या ओळीत शब्दांचा क्रम जमल्यास बदलून बघा...

धन्यवाद नचिकेत,
आपण सुचवलेला पहिला बदल तितका पटला नाही..
दुसरा बदल जरुरी आहे...कारण ओढाताण कमी होईल त्याने. नक्की विचार करतो..
प्रतिक्रियेसाठी आभार...