सनम - १

Submitted by बेफ़िकीर on 28 May, 2012 - 08:00

"सही कर"

"ह....म्या..."

"हम्या हे नांव आहे तुझ???? हनुमान कदम लिही..."

"बरं... ह .. नु.. मा .. न... क ..द.. म.."

"हं... ही घे कॅश..."

"उपकार झाले साहेब...."

"हं... निघा आता... सरकारचे जावई..."

"... हे... हे कितीयत???... तीनच आहेत..."

"मग??? सगळ्यांना तीन हजारच देतायत..."

"पण... दहा हजार आहे ना अनुदान पुरात सगळं गेलेल्यांना???"

"ही सगळी यंत्रणा, माणसं, सगळं चालवायला त्यातलेच पैसे वापरते सरकार... दिल्लीतल्या झाडांना पैसे लागत नाहीत... अनुदानाचे वाटप अनुदानाच्याच रकमेतून करावे लागते... जेवढे प्रत्यक्ष हातात पडते तेवढेच मानायचे अनुदान... सगळेजण तीन हजारच घेतायत..."

"अहो पण.. पण मग सही तीन हजारावरच घ्या ना?"

"होय काय? बसा आता आमच्या खुर्चीवर...आं?"

"तसं नाही साहेब... आम्ही लोक काय... पाच सहा यत्ता शिकलेलो आहोत... पण इतकं समजतं की जेवढ्या रकमेवर आपण सही करतोय तेवढी रक्कम मिळायला हवी..."

"बरंच समजतं तुला... मग मला सांग... मला पगार कोण देणार??? ही शेड उभारली अनुदान वाटपाला ह्याचा खर्च कोण देणार्???मंत्रीसाहेब इथे येऊन अनुदानाची घोषणा करून गेले त्यांच्या दौर्‍याचा खर्च कशातून निघणार? तुमच्या अनुदानावर इन्कम टॅक्स बसतो तो सरकार कुठून मिळवणार???"

"सात हजार??? सात हजार कापले त्यासाठी??? "

"म्हणून तर म्हणतोय तू इथे बस आणि आम्हाला हिशोब शिकव..."

"साहेब... तीन हजर घेऊन मी काय करू??"

"नको असले तर तेही परत देऊन टाक.. आग्रह नाहीये सरकारचा.. हे अनुदान आहे... हे फुकट असते...राबल्याशिवाय मिळालेत ना तीन हजार का होईनात??"

"अहो सगळं घर गेलं माझं...."

"देवाची करणी आहे ती... तरी आपल्याच देशाचे नागरीक म्हणून तीन हजार देतंय सरकार ते कमी आहे का? एकरकमी कधी तीन हजार बघितलेत का तुमच्या गावात कोणी? का तू पाहिलेस?? का पिढीजात पाटील आहेस तू?? आं?"

"साहेब.. तुम्ही म्हणताय ते ... ते पटत नाही असं नाही... म्हणजे... अनुदान पोचवायलाही खर्च येणार हे समजतं मला... पण... असा किती खर्च येणार आहे?? दहा हजारी फार तर एक हजार.. दिड हजार... सात हजार म्हणजे सगळं अनुदानच गेलं की आमचं..."

"अरे तू काय मोठा शेतात राबल्याचे पैसे मागतोयस का??? हे फुकट पैसे आहेत..."

"अहो पण... माझं सगळं घरदार वाहून गेल्यावर सरकारने दिलेली मदत आहे ती... ती पूर्ण तर मिळायला पाहिजे ना?"

"अच्छा... म्हणजे देश कर्जबाजारी झाला.. सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला तर तू पदरचे पैसे घालणार का त्याच्यात???"

"साहेब... हे चुकीचे आहे...."

"काय चुकीचे आहे बाबा??? तीन हजार फुकट मिळाले हे?? आम्हाला शहरं सोडून तुम्हा अडाण्यांना सरकारने घोषित केलेली मदत वाटायला इथे यावं लागतंय... सहा हजार बेसिकवर आम्ही आयुष्यभर राबायचे... आणि तुम्हाला तीन हजार फुकट मिळाले तर ते चूक आहे होय??? तुझ्या मागे ऐंशी माणसं उभी आहेत रांगेत... चल पुढे... पैसे मिळाले ना???"

"नाही पण एकशे सव्वीस जणांचे सात सात हजार गेले म्हंटल्यावर किती रक्कम गेली खर्चात या वाटपाच्या?"

"मग काय करू???"

"साहेब... कृपा करा... आणि सगळ्यांना दहा दहा हजार द्या..."

"तू पुढारी आहेस काय??? पुढारी आहेस??? बाकीच्यांची काळजी तू का करतोयस??? सगळे तीन तीन हजार घेऊन हासत नाचत चाललेत माघारी...."

"पण... पण यात ...यात भ्रष्टाचार नाही कशावरून?????"

अधिकारी तांबडे लाल डोळे करून ताडकन उभा राहिला आणि म्हणाला....

"भडव्यांवं... बायका पोरं तुमची उघड्यावर आली म्हणून मदत करतोय.. आम्हालाच जाब विचारतोयस??? तुझ्या बापाचं सरकार आहे काय??? दिड दमडीचं झोपडं वाहून गेलं तर तीन हजार कमी पडतायत... कोण तू??? तू कोण मला विचारणार भ्रष्टाचार कशावरून नाही म्हणून??? तुझा नोकर आहे मी??? च्यायला आमच्या गावात पूर येत नाही ही जणू काय आमचीच चूक... तुमच्यासाठी उन्हातान्हात इथे तासनतास ऐसे वाटत बसायचे... आणि तुझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायची??? चल हो पुढे....."

अंति, म्हणजे हनुमानाची बायको गरीब चेहरा अजूनच घाबरलेला करून हनुमानाला तिथून बाजूला करू लागली. एकंदर वातावरण तापत आहे हे पाहून गरीब स्वभावाचा हनुमान हळूहळू बाजूला झाला. तो पार दिसेनासा होईपर्यंत अधिकारी तांबडेलाल डोळे करून त्याच्या दिशेला पाहून शिव्या पुटपुटत होता. हनुमान दिसेनासा झाल्यावरच त्याने पुढच्या माणसाची सही घेऊन आणि ओळखपत्र व इतर शहानिशा करून त्याला कॅश तीन हजार दिले. ते देतानाही त्याने तोंडाचा पट्टा सोडलाच. उगाचच.

"मिळतायत ते घ्यायचे... बापाचा माल समजू नका.. गांधी नेहरूंनी रक्त सांडलंय देशासाठी... तुम्ही भाडखाऊ साले जावई जणू सरकारचे... नाही तिथे घरं बांधायची आणि नदी फुगली की रांगेत उभे भीक मागायला.. चल हो पुढे... ए... कार्डं दाखव.... काय नांव तुझं???"

गरीबीमुळे रक्तातले चैतन्य गमावलेले गरीब लोक तीन हजार घेऊन अधिकार्‍याला वाकून नमस्कार करून पुढे निघत होते. दहा हजाराचे नियोजन केलेल्यांना आता तीन हजारात काय काय बसवायचे याची चिंता भेडसावत असली तरी हनुमानाला झालेली शिवीगाळ पाहून एकाचीही सवाल करण्याची हिम्मत नव्हती.

इकडे अंति थोडेसे अवशेष राहिलेल्या घरी परत आल्यावर हनुमानाला समजावून सांगू लागली.

"आपल्याला घेणंय का देणंय त्या भ्रष्टाचाराशी??? अख्खं गांव तीन हजार घेतंय.. तुम्ही एकटे आहात काय? आपण दोघं आणि आपली तीन मुलं आहेत... उद्या तुम्हाला गजाआड घातलंन तर आम्ही काय करायचं?? तोंड सांभाळून नाही होय बोलता येत चारचौघात??? तीन तर तीन हजार. काय कमी नाहीत... चार महिन्याची भाजी येतीय त्यातून.. पुढचं पुढं.... जिभेला नाही हाड... त्या साह्यबानं दिला असता फटका तर ह्ये एवढंसं तोंड करून माघारी आला असतात... बसा आता गपचूप... चहा घ्या आणि जा तालुक्याला काम शोधायला... नांव हनुमान असलं तरी आपण जिंद्गीच्या लढाईत मरणारी माकडंच साधी... छातीत रामाच्या तस्वीरीऐवजी मूकपणा ठिवायचा आणि गरीबीच्या रावणाशी झुंजायचं.... हे ध्यानात ठेवा कायम..."

हनुमान मात्र मान खाली घालून भुईकडे पाहात होता... मुंग्यांची रांग होती... त्या काय शोधत होत्या माहीत नाही.. पण चिकाटी सहज कळत होती... चिवट होत्या... हनुमानाला लाज वाटली... माणसासारखे माणूस आपण.. दुसर्‍या माणसालाच घाबरतोय.. तो काही मोठा वाघ नाही तो साहेब म्हणजे... एक साधा माणूस... त्याला भीती का नाही वाटत ??? आपल्यालाच का भीती वाटावी???

"अंत्ये... मी आंदोलन करणार... सरकारने दहा हजार सांगितलेत ना??? .. मी दहा हजार मिळवणारच...आपण जरी देशासाठी काही केललं नसलं तरी या देशाचे नागरीक आहोतच की?? या देशातली नदी घराचं वाटोळं करून गेली तर आपण कोणाकडं पाह्यचं??? आपला काय दोष आपण उघड्यावर पडलो यात??? आपण शिकायला तयार होतो... शहरासारख्या नोकरीला तयार होतो... पण शेती करावी लागली... शेती हे महत्वाचे काम आहे असे सरकार म्हणाले... मग शेतकरी बुडला तर सरकारने पैसे पुरे द्यायला पाहिजेत ना??? मी आंदोलन करणार..."

डोळे फाडून अंति हनुमानाकडे बघत असतानाच वेडा हनुमान उठला आणि चहाचा विचार विसरून उठला आणि चालू लागला.

"आबाजी आहेत का??"

"काय काम आहे???"

"जरा भेट घ्यायची होती..."

"झोपल्यात... सांजंला ये..."

"वहिनी... सांजेपर्यंत वेळ नाहीये... त्ये साहेब लोक गावातून जातील तोवर..."

गोदावरी ही आबाजींची बायको. पिवळ्या धमक उन्हासारखी तेजाळलेली. तिच्याकडे मान वर करून बघता येणार नाही कोणाला. महालक्ष्मीचा अवतार. दागिन्यांनी मढलेली. आणि आबाजी गावचा पुढारी. एका पक्षाचा कार्यकर्ता. त्याच्याबद्दल बरंच काही चांगलंवाईट ऐकायला मिळालेलं होतं. पण गावचं पुढारीपण तेवढं वारश्याने त्याच्याकडे होतं.

दहा मिनिटांनी आबाजी डोळे चोळत खाली आला. पायरीवर बसलेल्या हनुमानाला बघून म्हणाला

"काय रे... काय भानगड??"

"आबाजी... साहेब दहा हजाराच्या अनुदानापैकी तीनच हजार देतायत गावकर्‍यांना..."

दोन क्षण आबाजी हनुमानाकडे रोखून बघत राहिला. आणि त्याने एकदम चकीत होऊन रागावून विचारले.

"का???"

"काय माहीत... म्हणतायत खर्च होतो सरकारचा अनुदान वाटपात... तो कापला..."

"सात हजार???"

"होय..."

"आणि गावकरी काय म्हणतायत????"

"कोण काय बोलतच नाहीये आबाजी... मी एकट्यानेच मुद्दा काढला तर मला शिव्या देऊन दिलं हाकलून तिथून.."

"मग तू तीन हजार घेतलेस का तेही सोडलेस???"

"तेवढं घेऊन आलो की?? पण ... सात हजाराचं काय आबाजी????"

झोपेतून उठलेला आबाजी पाच मिनिटें उंबर्‍याआत खुर्चीवर बसून राहिला. हनुमान बाहेरच पायरीवर होता. गोदावरीने आबाजीच्या हातात चहाचा कप दिला. तो कप तुटलेला तर नव्हताच, पण श्रीमंती समजेल असा होता. हनुमानाने आबाजीला चहा पिताना विचार केला. अंति चहा देत होती तर आपण तो तसाच टाकून निघालो. आबाजी मात्र आपले काम निवांत चहाबिहा झाल्यावर करणार. आबाजीने हनुमानाला चहा विचारला नाही. पण गोदावरीने पायरीजवळ उंबर्‍याबाहेर एक जुना फुटलेला कप तेवढा ठेवला. आपल्या घरातल्या फुटलेल्या कपात आणि या उंबर्‍याबाहेर ठेवलेल्या फुटक्या कपात खूप मोठ्ठा फरक आहे हे हनुमानाला जाणवले. दोन्ही कप फुटलेलेच, पण एक प्रेमाने हातात दिला जातो आणि दुसरा कसाबसा उंबर्‍याबाहेर ठेवून कपाळावर आठ्या चढवत बाहेरच धुतला जावा अशी अपेक्षा ठेवली जाते. मात्र तो कप्पाहून आबाजी गोदावरीला तिरसटासारखा म्हणाला..

"हनुमंता चहा घेत नाही... दौलत वर आली काय तुझी?? भावाला सांग चहाचा मळा पिकवायला.. उचल तो कप... अन फेकून दे चहा..."

घाबराघुबरा झालेला एक हात उंबर्‍याबाहेर आला आणि तो कप उचलला गेला आणि चहा हनुमानाच्यादेखत अंगणात फेकला गेला. हनुमान नुसता बघत राहिला. आपण चहा घेत नाही असे आबाजीला का वाटले हे त्याला समजले नाही.

आबाजीचा चहा भुरकून पिऊन झाल्यावर त्याच हातात तो रिकामा कप अदबीने उचलला गेला आणि आबाजी हनुमानाकडे पाहात तुच्छतेच्या स्वरात म्हणाला...

" तीन हजारात झोपडं उभं राहात नाही का तुझं???"

"कसं राहील आबाजी?? तीन पोरं आहेत.. चार्वस्तू, धान्य, लागतंच की गरीबालाही..."

मिश्यांना पीळ देत अवाढव्य आबाजी उठला आणि म्हणाला...

"ऐ...जाऊन येतोय आम्ही.. रातचे जेवायला तीन जण आहेत... मांसाहारी जेवण पाहिजेल... सरकारी साहेब लोक आहेत सगळे... समजले काय???? चल रे हनुमान...भेटू त्या साह्यबाला..."

ताडताड चालत निघालेल्या आबाजीच्या मागून अदबीने काही अंतर राहून चाललेल्या हनुमानाला हे समजेना की जे लोक रात्री जेवायला आबाजीकडे आहेत त्यांनाच हा काय झापणार?

आंदोलनाची व्याप्तीच वाढवायला हवी आहे असे हनुमानाला वाटले.

वाटेत आबाजी त्याच्याशी एक शब्द बोलला नाही. दहा मिनिटात ते शेडपाशी पोचले. आबाजीबरोबर हनुमान पाहताच गावकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आणि अधिकारी मात्र वैतागला. त्याने सर्वांदेखत आबाजीला 'आत चला जरा' असे दरडावत आतल्या खोलीत नेले आणि काहीतरी समजावून सांगितले. दोन पाच मिनिटांतच दोघे बाहेर आले आणि तो अधिकारी पुन्हा पुढच्याला पैशांचे वाटप करू लागला.

आबाजी पंतप्रधानांसारखा तिथे भाषणाला उभा राहिला आणि त्याची ती 'पोझ' सगळ्यांना समजली. आता आबाजी सगळ्यांना 'अ‍ॅड्रेस' करणार हे हनुमान आणि इतरांच्याही लक्षात आले.

"बंधू आणि भगिनींनो... सरकार मायबाप खास आपल्या गावी आलेलं आहे ते आपल्याला आर्थिक मदत करायला.. आज या ठिकाणी आपण सर्वे जमलेलो आहोत ते सरकारला दुवा द्यायला.. आपल्या पक्षाच्या सरकारला... ह्या सरकारने प्रत्येक पूरग्रस्तासाठी दहा दहा हजार रुपयंची मदत जाहीर केलेली आहे.. हे पैसे दिल्लीच्या तिजोरीत असतात... आज आपल्या सरकारवर परकीय चलन, म्हणजे अमेरिका बिमेरिकाचे जे रुपये असतात.. ते महाग असतात.. त्याचा बोजा आलेला आहे.. ठिकठिकाणी रस्ते, शाळा, हॉस्पीटलं हे सगळं उभं केलं जात आहे.. सामान्य माणसाला तीस टक्के तर आयकरच भरावा लागतो... त्यासाठी तो कष्ट करतो... फुकट दिलेल्या अनुदानाला मात्र पन्नास टक्के आयकर लागू होतो... अशा तर्‍हेने पाच हजार नुसते इतर सामाजिक कार्यासाठीच वापरले जातात.. नदीला पूर येण्यात सरकारचा हात नाही.. नदी पावसाने फुगतीय... आपल्या गावातल्या पावसाचा इतर गावांना हेवा वाटतो... आजवर पूर आलेला नव्हता.. आजवर सरकारने आपल्या गावाला हे कधीही विचारले नाही की तुम्ही इतके पाणी का वापरता... शहरात या पाण्यावर कर असतोय.. आपल्याला गेली पंचवीस वर्षे एक पैसाही कर म्हणून भरावा लागलेला नाही... ही अशी अनुदाने आपल्यापर्यंत पोचतात तेव्हा काही समाजकंटक लोक वकील लावून सरकारवर खटला भरतात की एखाद्याच गावाला अशी मदत का म्हणून?? तीही फुकटात??? मग सरकारला तो खटला चालवावा लागतो.. त्यात ते जिंकतात की हारतात ते समजते पंधरा वर्षांनी... पण तोवर न्यायालय सरकारकडून अनुदानाच्या पंधरा टक्के रक्कम जप्त करते... आता राहिले साडे तीन हजार.. त्यातले पाच टक्के या लोकांचा प्रवास.. साहेब लोकांना एक शेड.. मंत्रीसाहेबांचा दौरा... यात जातात... उरलेले तुमच्या हातात ठेवण्यात येत आहेत.. उद्या न्यायालयाने जर विचारले की प्रत्येकी किती रुपये अनुदान दिले गेले??? तर दाखवायला म्हणून या दहा हजारावरच्या सह्या आहेत... जर तीनच हजारावर सही घेतली तर न्यायालय जप्त केलेल्या रकमेच्या फक्त तीसच टक्के, म्हणजे पन्नास हजार प्रत्येकी परत देईल... तेही खटला सरकार जिंकले तर... दहा हजारावरची सही दाखवली तर दिड लाख परत मिळतील आणि परत त्यावर व्याज... दुनियेत हेवा करणार्‍यांची कमी नाही... आपल्या गावाला मदत झाली की ज्यांच्या गावाला झाली नाही ते नालायक लोक खटला भरतात.. आज सरकार मायबाप तुमच्या आसवांना पुसायचा एक लहानसा का होईना प्रयत्न करत आहे.. आज प्रत्येक पूरग्रस्ताला प्रत्येकी तीन हजार मिळत आहेत... ज्यांचे पुरात काहीही नुकसान झाले नाही त्यांनीही आपले नांव त्या यादीत घुसडले हे स्पष्ट दिसत आहे... त्या लोकांना तुम्ही काय म्हणाल??? याच रांगेत तेही लोक उभे आहेत... इतका दुर्दैवी प्रकार आजवर आम्ही आणि आपल्या गावाने पाहिलेला नाही... या देशानेही पाहिलेला नाही... भ्रष्टाचार त्या लोकांच्या मनात आहे ज्यांचे काहीही नुकसान झालेले नसताना ते या रांगेत उभे राहिलेले आहेत तीन हजारांसाठी... बंधू भगिनींनो... आपल्याच सरकारवर भ्रष्टाचाराचे आपण आरोप करत आहोत... आणि पुन्हा मदतही घेत आहोत... मी आत्ताच आत जाऊन हिशोब पाहून आलो.. एकरकमी तीन हजार पाहिलेले आपल्या गावात दहा टक्केही लोक नाहीत... हनुमान म्हणतो ते कोणाला पटतंय का??? "

थोड्याश्या कुजबुजीनंतर स्पष्टपणे आवाज येऊ लागले.

"न्हाई... आम्ही तीनच हज्जार घ्यू... हनुमानाला गप करा आबाजी..."

गावाचे एकमत झालेले पाहून त्या अधिकार्‍याने आणि आबाजीने हनुमानाच्या प्रत्येकी एक अशी कानाखाली वाजवली आणि घाबरलेला हनुमान तिथून धावत घरी निघाला... तो कुठे जात आहे हे पाहायला चौकशी करत घरातून आलेल्या त्याच्या बायकोने, अंतिने, सगळा प्रकार पाहिला होता आणि तीही त्याच्या मागून धावत निघाली....

आंदोलनाचा पहिला टप्पा संपला होता..

==============================

उरलेल्या आडोश्याला चुलीवर भाकरी टाकताना मागे दारातून एक अवाढव्य सावली पडतीय म्हणून अंतिने वळून पाहीपर्यंत बिडीचा धूर झोपडीत शिरला. आबाजी आज चक्क हनुमानाच्या घरीच आला होता. हे खरे की खोटे हेच अंतिला समजत नव्हते. एवढा मोठा माणूस आपल्या दारात आल्याच्या धक्क्यामुळे तीन दोन तीन क्षण नुसती बघतच राहिली. आणि नंतर लक्षात आल्यावर ताडकन उठली आणि दोन पोरांना बाहेर हाकलत डोक्यावरून पदर घेऊन हात जोडून आबाजीपासून लांबवर उभी राहिली.

"हनुमान कुठाय???"

"तालुक्याला गेलेत..."

"कशाला??? भ्रष्टाचाराच्या चौकशीला???"

अंतिच्या पायाखालची जमीन सरकली. बोलती बंद झाली. आत्ताचा आबाजीचा आवाज जरब बसवणारा होता.

"पोरं किती तुला???"

"तीन... दोन मुलं... सर्वात पाठची ही पोरगी..."

"आन तुझ्या नवर्‍याला म्हात्मा गांधी व्हायचंय... आं???"

हादरलेली अंति ही वेळ कशी टळेल याचा विचार करत होती.

"तुला विधवा व्हायची फार हौस दिसतीय..."

अंतिच्या पोटात गोळा आला. कालच रात्री आबाजीकडे सगळ्या सरकारी अधिकार्‍यांसाठी मटणाची पार्टी झाली होती हे तिला समजले होते. हनुमान वैतागून तालुक्याला काम शोधायला गेला होता. तो रात्री येईल तेव्हा त्याच्याकडे पन्नास एक रुपये तरी असावेत असे अंतिला वाटत होते. पन्नास रुपये मिळाले तर धाकट्या मुलीसाठी एक औषध आणायचे होते. वीस तीसच मिळाले तर नुसतेच मीठ मसाल्यावर भागवायचे तिने ठरवलेले होते. पण अचानक आबाजी दारात आल्यावर ती थरथरू लागली.

आबाजी सरळ आत आला. ज्या जातीच्या लोकांना त्याच्या उंबर्‍यावरही पाय टाकायला परवानगी नव्हती त्या जातीच्या हनुमानाच्या तो बिनदिक्कत घरात आला आणि पुरात वाहून गेलेल्या आणि उजाड झालेल्या घराची अवस्था आतून पाहात म्हणाला...

"हे एवढं बांधायला तीन हजार पुरेनात होय रे भाडखाऊंनो तुम्हाला... ??? आं??? तुमच्यायला तुमच्या... गावात जागा घेऊ देतोय आम्ही तेच उपकार चुकले आमच्या वडिलांचे म्हणायचे... आं?? "

आबाजीच्या तोंडाचा देशीचा वास झोपडीत पसरला तसे अंतिला मळमळून आले.

" चहा.... चहा करू काय???"

अंतिच्या तोंडातून जेमतेम फुटलेलं हे दुसरं वाक्य. तिचं तिलाही ऐकू गेलं नसेल.

"तुझ्या हातचा चहा आम्ही पिऊ???"

आता अंतिची मान इतकी खाली गेली की हनुवटी गळ्याला चिकटली.

आबाजीचे संतप्त डोळे तिच्यावर रोखले गेले होते. आबाजीने अंतिचा दंड पकडला आणि तिला खेचत दाराबाहेर नेले.

खाली जमीनीकडे हात करत तिला म्हणाला..

"हे काय आहे???? काय आहे हे???"

अंतिला घाम फुटलेला होता. हा आपल्याला मारतो की काय असे वाटू लागले होते तिला. आजवर तिला हनुमाननेही मारलेले नव्हते.

"काय आहे हे????"

"जमीन..."

"जमीन??? तुझ्या बापाची का??? ही माती आहे माती....दिसत नाही???? ही माती घेऊन बांधता येत नाही भिंत तुला अन तुझ्या नवर्‍याला????"

बाहेर खेळत असलेली अंतिची दोन्ही पोरे भित्र्या सशासारखी ते दृष्य बघत होती.

"अनुदानं हवीत भडव्यांना... सरकार पैसे देणार म्हंटले की हे भिकार्‍यासारखे रांगेत... कुठे ठेवलेत ते तीन हजार हनुमानानं????"

अंतिचा आवाज फुटत नव्हता. पण उत्तर दिले नसते तर या आबाजीने काय केले असते ते सांगता येत नव्हते. त्यामुळे घाबरत म्हणाली...

"घेऊन गेले संगं... "

"सगळे????"

"नाही.... दोन हजार आहेत घरात..."

"मग तीन हजारातले एकच हजार तो घेऊन गेल्यावर 'घेऊन गेले संगं' म्हणतेस होय तू???"

"आहेत... दोन हजार..."

"आण ते इकडे..."

आबाजीने तसेच अंतिला घरात ढकलले... धडपडत आत आलेली अंति स्वतःच्याच मुलीच्या अंगावर पडणार होती... कशीबशी तोल सावरत दुसरीकडे गेली आणि एका भिंतीला धरून उभी राहिली... डोक्यावरचा पदर आता खांद्यावर आला होता... तो पुन्हा डोक्यावर घेऊन तिने एका पेटीत हात घातला आणि नोटा काढल्या आणि दरवाजात आली...

आबाजीने नोटा हातात घेतल्या आणि म्हणाला...

"हनुमानाला सांग... अनुदान वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला तो चुकीचा होता व माझी चूक मला समजली असे लिहून दिल्यावर हे पैसे मिळतील... अन तेही अर्धेच... नाहीतर विसर म्हणाव... काय समजलीस???"

अंति नाही 'हो' म्हणू शकत होती नाही 'नाही'... नुसतीच हादरून जमीनीकडे बघत ती आबाजी जायची वाट पाहू लागली..

हनुमानाला शिव्या देत आबाजी ताडताड निघून गेला तशी अंति कोसळली. आलेला प्रसंग भयंकर होता. आबाजीने काहीही केले असते तरी काहीच विरोध करता आला नसता. आबाजी आपल्या घरात कधी येऊ शकेल असे हनुमान आणि अंतिला स्वप्नातही वाटले नसते. आज आबाजीने आपला मुडदा पाडला असता तरी गावात खुनाची बोंब झाली नसती हे अंतिला ज्ञात होते. पोरांना ओढून आत घेत आणि कुजलेले दार लावून घेत ती भिंतीशी बसून खूप रडली. दोन हजारांपैकी एकच हजार आता मिळणार होते...

गावात असलेले हे श्रेष्ठ व श्रेष्ठ नसलेल्यांमधले अधिकारांचे, हक्कांचे आणि कायद्यांचे अंतर तिला असह्य झालेले होते. रात्री हनुमान परत आल्यावर त्याला हा प्रसंग सांगितला की तो तडक त्याच क्षणी आबाजीकडे निघेल हे तिला माहीत होते. हनुमान तसा सरळ असला तरी डोके फिरले तर काहीही करेल असा माणूस आहे हे अंति जाणून होती. त्याला थांबवणे शक्य होणार नाही हे तिच्या लक्षात आले. त्याचबरोबर हेही तिला जाणवले की हनुमान आल्याआल्या पुन्हा ते दोन हजार मोजून बघायला पेटीत हात घालेल. एक आबाजी खतम झाला तर आबाजीचा पोरगा मिनार गावात धुडगूस घालेल आणि दहशत माजवेल हेही अंति जाणून होती. मिनार आता चांगला विशीचा होता, पण त्याचे पराक्रम पाहून त्याच जातीतली मुलगी मिळायला जरा वेळच लागत होता. विशीतल्या मुलाचे लग्न लांबत आहे म्हणून आबाजी गावात बोंब मारत होता आणि मुलगी मिळतच नाही या नावाखाली मिनार गावातल्या आणि बाहेरच्या पोरींवर धाक ठेवून फिरत होता.

गावचा पोलिस पाटील नामा यादव आबाजीच्या ताटाखालचे मांजर असल्याने त्याची चंगळच होती.

आपल्या नवर्‍याच्या, हनुमानाच्या कल्पित आंदोलनात काहीच दम नाही हे अंतिला समजले होते.

आंदोलनाचा दुसराही टप्पा संपला होता...

कुठून नदीला अगदी लागून घर बांधले याचा राग येऊन अंति उठली आणि पडक्या घराच्या मागे गेली आणि समोर वाहात असलेल्या नदीला उद्देशून तोंडातल्या तोंडात शिव्या देऊ लागली... तेवढ्यात...

नदी जणू डचमळलीच.... नदीचे पाणी उन्हात चमकत होते... पण ते फिके पडावे असे एक कमनीय शरीर सळसळत त्या प्रवाहात आले... लांबसडक केस पाण्यावर पसरलेले होते... हात पाण्यावर सपसप पडत होते... पोटर्‍यांच्या वर गेलेले पातळ लाथा पाण्यावर बसल्या की आणखी थोडे वर जाऊन पुन्हा खाली सरकत होते....

अंति ते पाहताना भीतीने थिजलेली होती.... कारण ते शरीर अंतिच्याच... गुताड या गावातील सर्वात शेवटी असलेल्या घरासमोरच्या काठावर येऊन थांबले... आणि चांगली साडे पाच फूट उंचीची... गोरीपान आणि डोळ्यात भरेल अशा तारुण्याची एक स्त्री दोन्ही हात काठावर रेटून धरत एका उडीत वर येऊन अंतिसमोर उभी राहिली होती...

त्या जहाल सौंदर्याविष्काराकडे... जशा प्रकारचे सौंदर्य आणि तारुण्य बाजूच्या शंभर गावात पाहायला मिळणार नाही... अंति बघतच बसली... ती एक मुलगी होती... अठरा एकोणीस वर्षांची...

इकडे तिकडे पाहात त्या मुलीने पदर झटकला... नंतर केस झटकले... पातळ नीट करून आपले चित्रात असतात तसे मोठे कमनीय डोळे अंतिवर रोखत म्हणाली...

"साडीय का एखादी????'

अंति भूत पाहिल्यासारखेच बघत बसली होती... त्या मुलीचा आवाज नाजूक वगैरे नव्हता... होता गोड, पण चांगला खणखणीत...

अंति स्वतः स्त्री असून तिच्यावर भाळली असावी अशा पद्धतीने डोळे रोखत म्हणाली...

"तू...???... तू कोण आहेस?????"

प्रवाहाबरोबरच... पण सतत तीन तास पोहून आली होती ती मुलगी... अनार गावाहून... पूर्वी तिथे कोणीतरी म्हणे डाळिंबांची बाग केली होती... आता काहीच नव्हते या नदीच्या दौलतीशिवाय... दमल्यामुळे जोरजोरात श्वास घेत असली तरी त्या मुलीच्या चेहर्‍यावरचे भाव अगदीच सामान्य, सहज आणि नेहमीसारखे होते...

ओल्या केसांचाच सरळ अंबाडा बांधत ती मुलगी क्षितीजाकडे कुठेतरी पाहात अगदी सहज सांगतात तश्या स्वरात म्हणाली...

"सनम... अनारहून पोहत आले... सासरच्या सगळ्या पाचजणांचा खून करून... साडी दे एखादी कोरडी...."

=========================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

कादंबरी पूर्ण झाल्याशिवाय निदान मी तरी वाचणार नाही. क्षमस्व.

वाचकांना गॄहीत् धरल्याबद्दल निषेध.

--- 'अर्धवट भुक्कड पुर्ण होण्याचीही आशा सोडलेला अविकुमार'.

Opening एकदम मस्त मोठी inning खेळा आता राव
भुक्कड वर सुद्धा काम चालू ठेवा. अर्धवट सोडु नका
मला तुम्हे याद हो के ना याद हो चे सगळे भाग कुठे मिळतील?

बेफिकीर,

झोपलात का तुम्ही, पुढचा भाग लवकर टाका. आणि भूक्कड कादांबरी तुम्ही अपूर्ण च ठेवली, भाग 16 नंतर एक ही भाग टाकला नाही तुम्ही.

अपूर्णा नका सोडू ती कादांबरी, ती पण पूर्ण करून तो ही भाग लवकर प्रकाशित करा.

झोपा नका काढू

<कलाची लढाई, बना, ड्रेसिंग रुम आणि भुक्कड ---- चार अर्धवट राहील्या आहेत कादंबर्‍या>

पहिल्यांदा अपूर्ण कादंबर्या पूर्ण करा.नाही तर मा.बो. वरून काढून टाका.

मित्रानो,

बेफिकिर सध्या निद्रावस्तेत गेलेले आहेत त्यामुळे कुणिहि त्याना कादंबरी पूर्ण करा असे म्हणु नये.

बेफिकीर, मी तुमच्या बरेच लेख वाचले आहेत. खूप चं छान लेखन आहे. कृपया वाचकांना टांगणीला लावू नका. सनम चा पुढचा भाग लवकर येउद्या.