‘गुगल अर्थ’वरून किल्ल्याचा शोध

Submitted by मीरा जोशी on 27 May, 2012 - 05:26

‘गुगल अर्थ’वरून किल्ल्याचा शोध

' गुगल अर्थ ' च्या नकाशात औरंगाबादच्या अंतूर किल्ल्याची माहिती घेत असताना अजंठा आणि सातमाळ डोंगराशेजारच्या एका टेकडीवरील आजवर अज्ञात असलेल्या किल्ल्याचा शोध ठाण्यातील राजन महाजन आणि नाशिकच्या हेमंत पोखरणकर या दोन गिरिमित्रांना लागला आहे. बुरूज , तटबंदी , पाण्याच्या टाक्या , वाडा असे बांधकामांचे अवशेष , तसेच काही प्राचीन लेणीही तेथे आढळली असून , जेष्ठ इतिहास अभ्यासकांनी या शोधमोहिमेच्या निष्पत्तीला दुजोरा दिला आहे.
चाळीसगाव सिल्लोड रस्त्यावरील नागद गावाजवळ हा दुर्ग आहे. महादेव टाका डोंगर म्हणून हा भाग ओळखला जातो. या डोंगरावर पाण्याच्या १० टाक्या असून सर्वात मोठ्या टाकीची रुंदी ५८ फूट , तर लहान टाक्यांची रुंदी २० फुटांच्या आसपास आहे. पश्चिमेला ४० फूट रूंद , ३८ फूट लांब आणि सहा फूट उंच अशी गुहा आहे. गुहेचा मार्ग कातळ खोदून कल्पकतेने तयार केलेला असून डाव्या बाजूला पाच खांब असलेले गुहाटाके आहेत. या गुहेत अलिकडच्या काळातील शिवलिंग असून काही भाविक इथे दर्शनासाठी येत असतात अशी माहिती महाजन यांनी दिली या डोंगराच्या माथ्यावर जोत्याचे अवशेष आहेत. वाड्याच्या कोपऱ्याकडील भिंती आजही तग धरून आहेत. पाण्याच्या टाक्यांच्या पूर्वेस सलग तटबंदीचे अवशेष आढळले. त्यातला बराच भाग मातीमुळे झाकलेला आहे. तटबंदीचा दगड घडीव असल्याचे आढळले , अशी माहिती महाजन यांनी दिली. याबाबतची अधिक माहिती घेत असताना औरंगाबादच्या गॅझेटीअरमध्ये या दुर्गाचा ' लोंघा ' असा नाममात्र उल्लेख आढळला. गावांच्या यादीतही या भागातल्या गावाचे नावही ' लोंझा ' असे असे असून , नकाशात त्याचा उल्लेख ' निर्मनुष्य गाव ' असा आहे. या पुराव्यांमुळे डोंगरावर एक किल्ला असल्याच्या आमच्या दाव्यास पुष्टी मिळते , असे महाजन यांनी सांगितले. इतिहास अभ्यासकांच्या मार्गदर्शनानुसार काही ऐतिहासीक संदर्भसाधनांचा अभ्यास केला. मात्र , त्यात कुठेही किल्ल्याचा उल्लेख आढळत नाही. किंबहुना इथली लेणीही अज्ञात असल्याचे आमच्या निदर्शनास आले. येथील लेणी हिनयान पंथीय बौद्ध लेणी असून राजकीय बदल किंवा अन्य काही कारणांमुळे त्यांचे काम अर्धवट सोडल्याचे दिसते. किल्ल्याचे बांधकाम मुस्लिम राजवटीपुर्वीचे असून दुर्गावरील खांबगुहा , लेणी पाहता हा दुर्ग अंतूरपेक्षाही प्राचीन असल्याचे महाजन यांचे म्हणणे आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users