हँसता हुआ नुरानी चेहरा - लक्ष्मीकांत

Submitted by टवाळ - एकमेव on 25 May, 2012 - 01:02

सन १९७२-७३ ची गोष्ट. महालक्ष्मीच्या फेमस स्टुडीओमधे "वचन" या चित्रपटाच्या गाण्यांचे (कैसी पडी मार) रेकॉर्डींग चालले होते. फावल्या वेळात संगीतकार शंकर (एस्.जे.) हे एका निवांत जागी पान जमवत बसले होते. भोवती शारदा आणि ईतर गोतावळा होताच. ईतक्यात मशहूर ट्रंपेटवादक पं. रामप्रसाद शर्मा (प्यारेलालजींचे वडील) तिथे आले. शंकर-जयकिशन (जयकिशन तोपर्यंत हे जग सोडून गेले होते) हे ईंडस्ट्रीतल्या बर्‍याच जणांचे श्रद्धास्थान. त्यामुळे सहाजिकच शंकरजीना बघून ते थांबले. नमस्कार्-चमत्कार झाले. बोलता-बोलता लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा विषय निघाला. शंकरजींच्या आजूबाजूचे चमचे (शारदा सकट) अकारण कुचेष्टा करण्यात रमले. अचानक शंकर यांनी प्रश्न केला - "क्यो बाबाजी, बच्चोंका काम कैसे चल रहा है ?" यावर रामप्रसादजींचे उत्तर होते - "क्या बतायें, बस आप लोगोंने (एस्.जे.) पान खा कर थुंका हुवा चाट-चाटके दिन निकाल रहें है"

हा किस्सा शब्दशः सगळ्या संदर्भांसकट खरा आहे. कारण एस-जेंच्या ताफ्यात काम करणारे आणि त्यांना देवाच्या ठिकाणी मानणारे माझे दिवंगत मित्र त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि गंमत म्हणजे रामप्रसादजींच्या या उत्तराने केवळ शंकर यांचा अहंकार सुखावला असं नाही, तर तिथे उपस्थित सर्वांना ते पटलं. पण एका वडीलांनी नुकत्याच प्रसिद्धीला येणार्‍या आपल्या मुलाबद्दल ईतका हिणकस शेरा मारावा ईतके लक्ष्मीकांत-प्यारेलाल सुमार दर्जाचे होते का ? नुसत्या आकडेवारीत उत्तर द्यायचं झालं तर केवळ ३५ वर्षाच्या कारकिर्दीत ६३५ चित्रपट - म्हणजे साधारणतः ३५०० च्या वर गाण्यांना संगीत देउन एक-दोन नाही तर तब्बल सात फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणे, तेही लौकीकार्थाने कुठलेही संगीत शिक्षण पुर्ण न करता (संगीतच काय, त्यांचे शालेय शिक्षणही पुर्ण नव्हते) - हे काय सुमार दर्जाचे लक्षण आहे ? पण काही काही माणसांच्या कपाळावर जन्मतःच नियतीने नावडतेपणाचा शिक्का मारलेला असतो. नाहीतर बघा ना, एस.डी. बर्मन, नौशाद, मदन मोहन, रोशन, शंकर-जयकिशन या संगीतकारांची नावे जरी घेतली तरी ऊर भरून येणारी माणसे होती आणि आहेतही. पण लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या बाबतीत हे कधीच झाले नाही.

लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर - मुंबईच्या झोपडपट्टीत खाण्या-पिण्याची भ्रांत असलेल्या एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील लहानपणीच निवर्तल्याने लवकरच त्यांना पोटा-पाण्यासाठी काम करणे भाग पडले. अशातच कधीतरी ते मेंडोलीन वाजवायला शिकले. खरंतर मेंडोलीन वादनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांना घेता आलं नाही. तरीही केवळ मेहनतीने आणि अंगभुत हुशारीने ते लवकरच त्यात पारंगत झाले. अशाच एका कार्यक्रमात लहानपणीच त्यांनी लता दिदींना साथ केली. त्यावेळी या छोट्या मुलाची कर्तबगारी आणि वादनातील कौशल्य याने लता दिदी भारावून गेल्या आणि त्यांनी त्यांना मदत करायचे ठरवले. लता दिदी आणि लक्ष्मीकांत यांचा हा स्नेह लक्ष्मीकांतजींच्या मृत्युपर्यत अबाधीत होता. लता दिदींनी लक्ष्मीकांतजींना "सुरील कला केंद्र" या लहान मुलांना संगीतशिक्षण देणार्‍या संस्थेत पाठवले. तिथेच त्यांची भेट प्यारेलालजींशी झाली. वडील मशहूर ट्रंपेटवादक असले तरी का कोण जाणे, त्यांनी या कलेचा वारसा प्यारेलालजींना दिला नाही. अर्थात त्याने काही फरक पडला नाही. प्यारेलालजी व्हायोलीन वाजवायला शिकले.

लक्ष्मीकांत हे अत्यंत मृदूभाषी, लाघवी स्वभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांचे आडनाव कुडाळकर च्या ऐवजी "गोडबोले" शोभलं असतं असं गमतीने म्हटलं जायचं. गरीबीतून वर आले असल्याने शेवटपर्यंत त्यांचे पाय जमीनीवरच होते. संगीत देणे हे त्यांनी व्यवसाय म्हणून स्विकारले होते आणि शेवटपर्यंत या व्यवसायाशी ते ईमानदार राहीले. एक यशस्वी व्यावसायिक ज्या व्यावसायिक क्लूप्त्या वापरतो त्या सर्व त्यांनी बेधडक पणे वापरल्या. वर्षाला जवळ-जवळ १८-१९ चित्रपटांना संगीत देणे हे आजच्या कॉम्प्युटरच्या जमान्यातही अत्यंत कठीण आहे. पण ते त्यांनी यशस्वीपणे (गाण्यांच्या लोकप्रियतेच्या दृष्टीने) निभावले होते. आयुष्याची ५० हुन जास्त वर्षे या मोहमयी दुनियेत काढूनही ते कधी वाहावले नाहीत. प्यारेलालजींशी असलेली व्यावसायिक आणि वैयक्तीक मैत्री त्यांच्या मृत्युपर्यंत टिकली. अर्थात यामागे प्यारेलालजींचाही वाटा तितकाच महत्त्वाचा आहे. या दोघांचे स्वभाव एकमेकाला पुरक असे होते. लक्ष्मीकांतजी बोलघेवडे तर प्यारेलालजी मितभाषी. आपण बरे की आपले काम बरे असा या दोघांचाही खाक्या. त्यामुळे यशाचे एकाहून एक टप्पे पार करत असतानाही फिल्मी पार्ट्या, पेज थ्री कल्चर यात हे दोघेही रमले नाहीत. त्यांच्याकडे तेवढा वेळच नव्हता. आलेलं कुठलंही काम - मग भलेही तो चित्रपट बी किंवा सी ग्रेडचा असो, सामाजिक असो की मायथालॉजीकल - नाकारायचा नाही हे त्यांनी ठरवूनच टाकलं होतं. एका मुलाखतीत लक्ष्मीकांतजी म्हणतात की आम्ही दोघंही फारसे शिकलेलो नाही. संगीत देणं हे एवढं एकच काम आम्हाला जमतं. तेच फक्त आम्ही करतो. मग त्याबद्दल लोक काय म्हणतात याची पर्वा करायला आम्हाला वेळच नाही.

आलेलं काम नाकारायचं नाही हे धोरण जरी असलं तरी या दोघांनी नेहमी अव्वल गायकांनाच वापरलं. त्यातही रफी, लता आणि किशोरवर त्यांचे जास्त प्रेम. चित्रपटसंगीताचा सुवर्णकाळ संपल्यानंतर रफी आणि लता यांनी सर्वाधिक लोकप्रिय गाणी एल्.पीं.च्याच संगीतात दिली. चित्रपटाचं बजेट कमी असणं हे तर त्यांनी त्यांच्या पहील्या चित्रपटापासूनच अनुभवलं होतं. १९६३ च्या पारसमणी च्या ८ वर्षे आधी त्यांनी एका चित्रपटाला संगीत दिलं होतं. पण तो चित्रपट डब्यात गेला. १९४८ च्या "जिद्दी" पासून १९६३ पर्यंत या दोघांनी त्याकाळातल्या फक्त ओ.पी. नय्यर आणि शंकर-जयकिशन वगळता सर्व संगीतकारांकडे कधी नुसते वादक (मेंडोलीन आणि व्हायोलीन) तर कधी संयोजक म्हणून काम केले. पारसमणी नंतरही काही काळ त्यांनी कल्याणजी आनंदजी यांच्या कडे संयोजकाचे काम केले. पारसमणी हा तसा बी ग्रेड पोषाखी चित्रपट. त्या काळात त्याचे बजेट होते अवघे २५ लाखाचे. अशाही परिस्थीतीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी फुल ऑर्केस्ट्रा वापरून आणि लता, रफी, आशा आणि मुकेश या ए ग्रेड कलाकारांना वापरून त्याचे संगीत दिले. (पारसमणीची गाणी लोकप्रिय असली तरी त्यातले ऑर्केस्ट्रेशन हे काही वेळेला अनावश्यक आहे असं माझं वैयक्तीक मत आहे). हे शक्य झाले केवळ लक्ष्मीकांत यांच्या माणसं जोडण्याच्या कलेमुळे. या दोघांनाही भव्य-दिव्यतेची आवड ही शंकर-जयकिशन यांच्या संगीतामुळे निर्माण झाली. जयकिशन यांच्या मृत्युनंतर मात्र शंकर यांनी त्यांना कायम आपले प्रतिस्पर्धी मानले.

संगीतकार सी. रामचंद्र यांनाही या होतकरू मुलांबद्दल विशेष आस्था होती. "दोस्ती" चित्रपटासाठी एल.पी. ना त्यांचे पहिले-वहीले फिल्मफेअर अवॉर्ड जाहीर झाले ही बातमी द्यायला स्वतः सी. रामचंद्र त्यांच्या घरी गेले होते. आपल्या ड्रेसींग सेन्स साठी प्रसिद्ध असलेल्या चितळकरांनी या समारंभाला हजर राहण्यासाठी त्यांच्या आवडत्या टेलरकडून या दोघांसाठी सुट शिववून घेतला होता. मैत्रीची, स्नेहाची ही अशी उदाहरणे लक्ष्मीकांतजींच्या आयुष्यात जागोजागी सापडतील. आणि अर्थात हा "गिव्ह अँड टेक" मामला असल्याने एल.पी. नी ही केलेल्या सहकार्याचीही उदाहरणे मिळतील. आपल्या जुन्या वादक सहकार्‍यांना फ्री लान्सींगच्या जमान्यातही टिकवून ठेवणे त्यांना बरोबर जमत असे. लाला पाठारी आणि अब्दूल करीम (संगीतकार गुलाम महंमद यांचे धाकटे बंधू) हे दोघे ढोलकपटू म्हणजे एल.पीं.च्या संगीताचा ट्रेडमार्क. ढोलकचा एल्.पी. पॅटर्न लोकप्रिय होण्यामागे या दोन कलाकारांचा सहभाग मोठा आहे. पैकी लाला पाठारी यांनी काही चित्रपटांना लाला-सत्तार (सारंगीवादक) या नावाने संगीत दिले त्या वेळी एल.पीं. नी त्यांच्याकडे निव्वळ वादक म्हणून मेहनताना न घेता काम केलं. डोक्याने थोडा अधू असणार्‍या आणि ईंडस्ट्रीमधे "येडा करीम" म्हणून ओळखला जाणार्‍या अब्दूल करीमला (त्यांना खाँसाहेब हे देखील तोंडदेखलं नाव होतं) देखील त्यांनी असाच सांभाळला. मुळचा खानदानी तबलजी असलेल्या करीमच्या ढोलकने राजा और रंक चित्रपटातल्या "मेरा नाम है चमेली" गाण्यात अशी काही जादू केली आहे की गाण्याच्या रेकॉर्डींगनंतर खुद्द लता दिदींनी त्याना तिथल्या तिथे ५०० रुपये बक्षीस दिले होते. पं. हरीप्रसाद चौरसीया यांची आणि लक्ष्मीकांत यांची दोस्ती देखील अशीच स्ट्रगलींग च्या काळातली आणि अखेर पर्यंत टिकलेली.

लेखाच्या सुरवातीला मी उल्लेख केलेल्या माझ्या दिवंगत मित्राने सांगीतलेला आणखी एक किस्सा. मी एक दिवस असाच जुनी गाणी ऐकत / पहात बसलो होतो. या माझ्या मित्राला शंकर-जयकिशन म्हणजे देवस्थानी. त्यामुळे अकारण एल्.पी. ना दुय्यम लेखण्याचा त्यांचा प्रयत्न. पण त्यामागे काही लॉजीक होतच. तर झालं असच. "सुनो सजना, पपीहेने कहाँ सबसे पुकारके" हे आये दिन बहार के चं टायटल साँग ऐकताना त्यातल्या बासरीच्या तुकड्यांनी मी भारावलो. आणि एक खवचट विचाराने माझ्या मित्राला फोन लावून त्यांना ते गाणं फोनवर ऐकवलं. आणि विचारलं की तुम्ही एल.पी. ना नेहमी दुय्यम दर्जाचे मानता. आता हे गाणं ऐकल्यावर तरी असं म्हणण्याची ईच्छा तुम्हाला होते का ? यावर माझा मित्र उसळला आणि म्हणाला "अरे, हरीप्रसाद चौरासियांना तीन तास या लक्ष्मीकांत ने स्टुडीओत बसवून ठेवलं होतं, पंडीतजी नया कुछ सुनाओ, नया कुछ सुनाओ म्हणत. शेवटी कंटाळून त्यांनी ही धून ऐकवली. बस, मग काय ? तो लक्ष्मीकांत तर भेळवालाच आहे. बाकीची भेळ त्याने उत्तम जमवली."

हे सगळं जरी खरं असलं तरी देखील माझ्या मनात मात्र माझ्या त्या मित्राईतके एल.पी. ना तुच्छ लेखण्याचे विचार कधीच आले नाहीत. याचं कारण ज्या मासेस नी, सर्वसामान्य रसिकांनी त्यांची गाणी उचलून धरली, वारंवार ऐकली त्यांचाच मी ही एक भाग होतो. त्यांचे सुरवातीचे चित्रपट नविन असताना माझा जन्म झाला नसल्याने मी पाहू शकलो नाही , मी ते रिपीट रन ला बघीतले. पण सरगम रिलीज झाल्यावर "डफली वाले" या गाण्यावर धुंद नाचत थिएटर मधे पैसे उधळणारं पब्लीक मी माझ्या डोळ्यांनी बघीतलय. शेवटी चित्रपट हा एक व्यवसाय आहे. ज्यांची कुवत असते पैसे वाया घालवण्याची ते क्लासेस साठी चित्रपट बनवतात आणि तो पडला तरी उच्चभ्रु वर्तुळात मानाने मिरवतात. पण सुभाष घई, मनमोहन देसाई, बॉबी पासून राज कपूर - यांनी या व्यवसायात राहूनही आम जनतेला रिझवण्याचा प्रयत्न केला. आणि यात त्यांना लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनीच खरी साथ दिली.

आजही हिरो मधली ती बासरी, कर्जमधली गिटारची धून, दोस्तीमधले माउथ ऑर्गनचे पीस (जे आर.डी. बर्मन यांनी वाजवले होते) कुठेही ऐकले तरी मान आपोआप डोलायला लागते. तुम्हाला संगीतातले कळो अथवा न कळो, बेसावध क्षणी जे संगीत तुम्हाला डोलायला लावते ते नेहमीच जास्त आपलं वाटतं. आणि हेच लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं खरं यश आहे. शेवटी "थुंका हुवा चाट-चाट के" या ईंडस्ट्रीत ३५ यशस्वी वर्ष काढता येत नाहीत, ३५०० च्या वरती गाणी देता येत नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मरणानंतर असं किर्तीरूपाने उरता ही येत नाही.

आज दि. २५ मे रोजी लक्ष्मीकांतजींचा १४ वा स्मृतीदिन. त्या निमित्ताने या "आपल्याशा" संगीतकाराला मानाचा मुजरा !

एल.पी. ची माझी आवडती काही गाणी -

तुम गगन के चंद्रमा हो- सती सावित्री (मन्ना डे / लता)
अल्लाह ये अदा कैसी है - मेरे हमदम मेरे दोस्त (यातली सगळीच गाणी आवडती)
मेरा नाम है चमेली - राजा और रंक
खुबसूरत हसीना जानेजां जानेमन - मि. एक्स ईन बाँबे
मेघवा गगन बिच झांके - राजा हरिश्चंद्र (पडद्यावर पृथ्वीराज कपूर आणि हेलन)
मेरे दिवानेपन की भी दवा नही - मेहबूब की मेहंदी
फुल बन जाऊंगा शर्त ये है मगर - प्यार किये जा
कोई नजराना लेकर आया हूं मै दिवाना - दो रास्ते
कान्हा, आन पडी मै तेरे द्वारे - शागिर्द
वो है जरा, खफा़ खफा़ - शागिर्द
नजर न लग जायें - नाईट ईन लंडन
मै आया हुं, लेके साज हाथोंमे - अमिर गरीब
सुनो सजना पपीहेंने, कहां सबसे पुकार के - आये दिन बहार के
किसी को पता ना चलें बात का - लुटेरा

ही लिस्ट खरंतर अमर्याद आहे. पण ईथेच थांबतोय. Happy

*****************************************************
आधीच्या लेखांच्या लिंक्स -
http://www.maayboli.com/node/34700 - मन्ना डे
http://www.maayboli.com/node/34742 - नौशाद
http://www.maayboli.com/node/34833 - तलत मेहमूद
http://www.maayboli.com/node/34857 - कैफी़ आझ़मी
http://www.maayboli.com/node/34897 - प्रेम धवन
http://www.maayboli.com/node/35174 - मजरूह सुलतानपुरी

गुलमोहर: 

लक्षीकांत प्यारेलाल, खुपदा उपहासाचे धनी झाले खरे पण त्यांना संधी मिळाली तेव्हा उत्तम संगीत दिले त्यांनी

सूरसंगम.. हा माझ्यासाठी त्या अर्थाने सुखद धक्का होता. ज्या काळात शास्त्रीय संगीत मागे पडले होते त्या काळात त्यांनी, अशी उत्तम गाणी दिली. आणि नवल म्हणजे, या गाण्यांवर शंकराभरणम ची छाया नाही.

टवाळा, लेख मस्त जमलाय. मला संगीतातलं इतकच माहीत आहे की जे गाणं कानातून मनात पोहोचतं ते उत्तम आणि जे कानातून डोक्यात जाते ते ... असो. थोडक्यात, एलपींची अनेक गाणी मनापर्यंत पोहोचलेली आहेत. Happy

एलपी.नी रफीला कायम दिलेली साथ ही माझ्या दृष्टीने त्यांच्या मोठेपणाचे उदाहरण आहे. १९६९ नंतरच्या किशोरवादळातही रफीला सतत उत्तम गाणी देउन टिकवून ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
एलपीची उपेक्षा होण्याचे कारण कदाचित त्यांच्या संगीतातील साधेपणाच असावा. त्यांनी कधी कोणता ट्रेंड सुरु केला किंवा काही नवे प्रयोग केले असे फारसे ऐकीवात नाही. त्या बाबतीत त्यांचा समकालिन आरडी फारच मोठा ठरतो. पण सतत बदलत्या इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी लागणारे व्यावसायिक शहाणपण हा त्यांचा प्रचंड मोठा अ‍ॅसेट होता.

संगीताची गोडी लागणे हीच माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे. त्यात एखाद्याला गाता येणे वा वाद्य वाजवता येणे ही फारच मोठी भाग्याची गोष्ट. त्यापुढे "संगीत देणे" ही तर किती दुर्मिळ गोष्ट.....
माझ्या सारख्या सामान्य रसिकाचे अशा थोर व्यक्तिंना दंडवतच. दुसरे असे की प्रत्येक कलावंताची एक कुवत असते, नशीबही असते - त्यामुळे तुलना कशाला करायची वा कोणाला हीन तरी का लेखायचे ? सगळेजण आपापल्या ठिकाणी उच्च स्थानावरच आहेत - आपण त्यांच्या कलेचा आस्वाद तर घ्यायला शिकू यात....
या लेखामुळे लक्ष्मीकांतजी किती झगडून वर आले ते कळले - इतरही अनेक चांगल्या गोष्टी समजल्या....

असेच इतर कलाकारांवरचे अभ्यासपूर्ण, दर्जेदार लेख वाचायला मिळावे याकरता मनापासून शुभेच्छा.

या लेखाकरता मनापासून धन्यवाद......

छान.

अतिशय सुंदर लेख..

नाहीतर बघा ना, एस.डी. बर्मन, नौशाद, मदन मोहन, रोशन, शंकर-जयकिशन या संगीतकारांची नावे जरी घेतली तरी ऊर भरून येणारी माणसे होती आणि आहेतही. पण लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या बाबतीत हे कधीच झाले नाही. >>>>>या वाक्याला +१००००००००

तुम्ही हे लेख इतके सुंदर लिहित आहात की वाचतच राहावेसे वाटते.
दुर्दैवाने आपल्याकडे यशस्वी होणे याला सन्मान्य होणे असे समजले जात नाहीत. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ३५ वर्षे अशा इंडस्ट्रीमध्ये टिकून कित्येक सुमधूर गाणी देणार्‍याला तितका मान मिळायलाच हवा. (फिल्मफेअर वगैरे सोडा.... अत्यंत भंकस आणि टुकार अ‍ॅवॉर्ड असतात ते. )
वरती शशांक म्हणाल्याप्रमाणे या गाण्यांनी आपल्याला किती आनंद दिला यातच त्या संगीतकाराचे महत्त्व आले...... Happy

तुम्हाला संगीतातले कळो अथवा न कळो, बेसावध क्षणी जे संगीत तुम्हाला डोलायला लावते ते नेहमीच जास्त आपलं वाटतं. आणि हेच लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचं खरं यश आहे. >> +१. सुंदर लेख.

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! Happy
हा खरं तर माझ्या मनात खुप वर्षापासून असलेला विषय (लक्ष्मीकांत-प्यारेलाल) होता. त्याला या निमित्ताने वाट मिळाली. तो आपणा सर्वांना आवडल्याचे कळवलेत याबद्दल पुनःश्च धन्यवाद ! Happy

आगाऊ +१
टवाळ, तुम्ही हा लेख स्मृतिदिनाच्या निमित्ताने लिहिला आहे आणि एलपी हे तुमचे आवडते संगीतकार आहेत हे वाचल्यावर प्रतिसाद देऊ का नको अशा द्विधा मन:स्थितीत आहे. तुम्हाला प्रतिसाद खटकला तर कळवा. उडवेन.

तुम्ही लेख छानच लिहिला आहे. एलपी या व्यक्ती आणि व्यावसायिक संगीतकारांबद्दल या लेखात मिळालेली माहिती वाचून छान वाटले. सतत लोकप्रिय ठरणारे संगीत त्यांनी दिले. तेही प्रदीर्घ काळ, बदलत्या कालानुरूप. पारसमणीपासून एक दूजे के लिए आणि खलनायकपर्यंतचा पट खूपच मोठा आणि भरगच्च आहे. पण जर संगीतकाराचे महत्त्व सांगायला त्यांची अजरामर गाणी न सांगता त्यांनी किती चित्रपट केले, किती गाणी दिली आणि किती फिल्मफेअर(!) पुरस्कार जिंकले हे सांगायला लागले तर त्यांनी भरपूर आणि मिडियॉकर संगीत देण्यात धन्यता मानली असेल का, तेही प्रतिभा आणि टॉपचे गायक जवळ असताना असा प्रश्न पडतो. एल्पीची गाणी कानावर पडली तर रेडियोचा कान मी पिळणार नाही पण आवडती गाणी ऐकायला बसलो तर त्या यादीत त्यांची गाणी क्वचितच येतील.
सुनो सजना, सत्यम शिवम सुंदरम आणि अंखियों को रहने दे(बॉबी) ही त्यापैकी काही. दोस्ती आणि मिलन हे आणखी दोन चित्रपट कदाचित.
आर डी आणि एलपी या दोघांनी आनंद बक्षींबरोबर सारखेच काम केले असावे. पण 'अमर प्रेम'सारखी गीते (काव्य?) एलपीच्या संगीतात झाली नाहीत असे मला वाटणे हा माझा पूर्वग्रहही असू शकेल.

तुमचा या मालिकेतला आत्तापर्यंतचा सर्वात जास्त आवडलेला लेख, कारण तुमचेच वाक्य - एस.डी. बर्मन, नौशाद, मदन मोहन, रोशन, शंकर-जयकिशन या संगीतकारांची नावे जरी घेतली तरी ऊर भरून येणारी माणसे होती आणि आहेतही. पण लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या बाबतीत हे कधीच झाले नाही.

शंकर जयकिशनच्या प्रभावातून बाहेर पडायला त्यांना तसा वेळच लागला. पण नंतर त्यांना मिळालेले यश नक्कीच उल्लेखनीय होते. नुसती चित्रपटांची / गाण्यांची संख्या आणि पुरस्कारांची यादी हा निकष वापरायला मी धजावणार नाही पण त्यांच्या संगिताची मला जाणवलेली आणि आवडलेली बलस्थाने -

१. त्यांची कारकिर्द अशा काळात घडली की जेंव्हा बच्चनचा उदय होत होता. बच्चन कितीही महान असला तरी त्याचे सुपरस्टार होणे सिने-संगिताला हानीकारकच ठरले. त्याच्या सिनेमात गाणी ही अतिशय गौण गोष्ट असायची. अशा काळात टिकून रहाणे खरेच कौतुकास्पद होते.

२. सिने-संगिताच्या सुवर्णकाळात असलेला लताचा आवाज एल.पी. च्या काळापर्यंत बदलला होता. म्हणजे लता बेसुरी कधीच गायली नाही आणि कोणतीही चाल तिने आपल्या आवाजावर बेमालुमपणे चढवली. पण तिच्या आवाजातली कोवळीक वयापरत्वे कमी होत गेली. पण याच बदललेल्या आवाजाचा सुयोग्य वापर करून घेणारे आणि त्यानुसार चाली बांधणारे दोनच संगितकार - छोटे बर्मन आणि एल.पी.

३. पॉझेस (दोन ओळींमधली जागा ज्यात निव्वळ शांतता असते) चा इतका सुंदर वापर एल.पी. सोडून दुसर्‍या संगीतकारांनी क्वचीतच केलेला आढळतो (ऐका - तेरे कारन तेरे कारन)

मला अत्यंत आवडणारी त्यांची गाणी. आणि ही गाणी माझ्या आवडत्या संगीतकारांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीयेत.

१. मन क्यू बहका री बहका
२. जब भी चाहे नयी दुनीया बसा लेते है लोग
३. आ जाने जा (लताच्या आवाजात चक्क कॅब्रे? मानलच पाहिजे)
४. चार दिनोंका प्यार
५. सांज ढले गगन तले
६. शिरडीवाले साईबाबा (गाण्याचे शब्द, त्यातला अर्थ, रफीसाहेबांचा आवाज आणि संगीत अंगावर रोमांच आणते. अगदी लोकलमध्ये भिकार्‍याने म्हटले तर रोमांच नाही येत Happy पण ठेका धरावासा वाटतोच.)
७. बिंदीया चमकेगी

काहीसा उशीराच हा लेख पाहिला/वाचला.

शंकर-जयकिशन यांच्या कारकिर्दीचे गुण गाईले जाणे आवश्यकच आहे, इतका त्यांचा महत्वाचा वाटा 'लोकप्रिय' संगीत देण्यामध्ये होता. १९५९ ते १९६५ या सहा वर्षात त्यानी ३१ असे चित्रपट दिले होते की त्या सर्वच्या सर्व चित्रपटातील गाणी तुफान गाजली होती. बिनाका त्यांच्याशिवाय सुरूही होत नव्हती आणि बंदही होत नव्हती.

मात्र कदाचित हेच यश त्यांच्या (त्यातही शंकर यांच्या) डोक्यात गेले की काय, त्यांच्या वर्तणुकीत एकप्रकारची गुर्मी आल्याचे दाखले या व्यवसायातील बुजूर्ग देत होते (वर एक किस्सा टवाळ यानी दिला आहेच). विशेषतः 'रात और दिन" (१९६७) या काहीशा रखडलेल्या चित्रपटाला संगीत देण्यापूर्वी त्यानी 'प्रदीप कुमार' सारख्या दुय्यम दर्जाचा नट असलेल्या चित्रपटाला आम्ही संगीत देणार नाही अशी दर्पोक्तीही केली होती. शेवटी नर्गीसने त्यांच्यावर डोळे वटारल्यावर (तिचा तो अधिकारही होता) ते 'कसेबसे' तयार झाले.

एस.जे. यांची कारकिर्द अगदी जवळून पाहिलेल्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल यानी कधीही स्वतःला 'ग' ची बाधा होऊ दिली नाही हे त्यांच्या विनम्रतेचे चांगले उदाहरण. प्रसाद प्रॉडक्शनने त्याना भरपूर संधी दिली म्हणून 'सी' दर्जाचे चित्रपटही त्यानी कधी सोडले नाहीत वा त्यानी "मिळाला आहे चित्रपट तर देऊ या संगीत" अशीही कधी मनी भावना बाळगली नाही. राज कपूरने त्याना 'बॉबी' साठी घेतले त्याचवेळी एस.जे. चा खर्‍या अर्थाने पराभव झाला होता.

'फिल्मफेअर' च्या शर्यतीत त्यानी नेहमी एस.जे. यांच्याबरोबरीनेच "ईर्षा" बाळगली आणि ते मिळविण्यासाठी ज्या काही क्लृप्त्या कराव्या लागत होत्या....व्होटिंगची पद्धत होती त्या काळात....त्याही केल्या, धंद्याची बाब म्हणून. मात्र 'दोस्ती' चे पारितोषिक हे त्यांच्या गुणवत्तेचे खणखणीत नाणे होते.

'दोस्ती' च्या वेळी मदन मोहनच्या 'वह कौन थी' विषयी लता मंगेशकर खूप हळव्या झाल्या होत्या. त्याना पक्की खात्री होती की मदन मोहन याना आजपर्यंत हुकलेले ते पारितोषिक निदान वह कौन थी साठी तर मिळणारच. पण ते 'दोस्ती' ला गेले....जे योग्यही होते. मात्र पुढे या रॅट रेसच्या नादापायी जेव्हा 'आराधना' ला डावलून 'जीने की राह' साठी एल.पी. नी फिल्मफेअर मिळविले त्यावेळी मात्र काहीसा खेद जरूर झाला होता.

अर्थात जिथे "पाकिझा" सारख्या संगीत सुवर्णाला डावलून ते एस.जे. "बेईमान" साठी मिळवितात, अशा पारितोषिकाची काय महती ?

असे असले तरी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यानी एकाहूनी एक अशी सुरेल संगीताने नटलेली गाणी कानसेनांना भरभरून दिली त्याबद्दल संगीतप्रेमी त्याना कधीही विसरू शकत नाहीत. त्यातल्या बर्‍याच गाण्यांचा वर उल्लेख झालेला आहे, त्यात थोडीशी भर.

१. "गुडियाँ हमसे रुठी रहोगी...." लता - दोस्ती
२. "आज दिलबर की रुसवाई...." लता - खिलौना
३. "आप मुझे अच्छे लगने लगे...." लता - जीने की राह
४. "दो दिन की जिंदगी...." लता - सत्यकाम
५. "निंद कभी रहती थी आँखोमे...." लता - आसरा

अशोक पाटील

छान वाटला लेख! आपल्याकडं एकंदरीतच व्यावसायिकतेला तुच्छ मानण्याची आणि व्यावसायिक अपयशांचं उदात्तीकरण करण्याची प्रवृत्ती आहे. असो. माधव यांच्या प्रतिक्रियेतल्या 'पॉझेस'च्या मुद्द्याबद्दल एकदम सहमत!

कुणाला हि खासियत वाटली का त्यांची ? त्यांच्या प्रत्येक गाण्याचे शब्द अगदी सुस्पष्ट ऐकू येतात. बहुतेक त्यांचाच तो आग्रह असणार.

छान लेख टवाळ.

राज कपूरने शंकर जयकिशन बरोबर ९ चित्रपट केल्यानंतर १९७३ मधे बॉबी साठी त्यांना डावलुन लक्ष्मिकांत प्यारेलालना निवडल्यामुळे कदाचित शंकर नाराज झाले असावेत. कदाचित जयकिशनजींच्या मृत्युमुळे राज कपूरने तसा निर्णय घेतला असावा. पण लक्ष्मिकांत प्यारेलालनी बॉबीला खरच मस्त म्युझिक दिले. म्हणुन राज कपूरने नंतर त्यांना सत्यम शिवम सुन्दरम व प्रेमरोग साठीही निवडले. असो.

माझ्या लहानपणी लक्ष्मिकांत प्यारेलालची गाणी सदैव विविध भारतीवर लागलेली असायची त्यामुळे आजही त्यांची गाणी ऐकताना माझे बालमोहन मधले शाळेतले दिवस व एकंदरीतच माझे लहानपण डोळ्यापुढे येते. त्यांच्या गाण्यातली सहजता व तो नोस्टाल्जिया.. या दोन्ही कारणानी मला त्यांची गाणी खुप जवळची वाटतात. त्यांची खुप गाणी गाजली.. त्यातली ही ३० मोजकी मला आवडणारी गाणी..

१. आ जाने जा
२. कैसी रहु चुप की मैने पी ही क्या है(दोन्ही गाणी इंतकाम मधली)
३. नी यार मनाना नी.. लोग बोले
४. जब भी जी चाहे नयी दुनिया..
५. मेरे दिल मे आज क्या है.(ही तिनही गाणी दाग मधली)
६.आने से उनके आयी बहार्(जिने की राह)
७. ना मांगु सोना चांदी
८. मैन शायर तो नही..
९. बेशक मंदिर मसजिद तोडो( वरील तिनही बॉबी मधली)
१०.बिंदिया चमकेगी
११.छुप गए तारे
१२. मेरे नसीब मे ए दोस्त्(वरील तिनही गाणी दो रास्ते मधली)
१३. अजनबी.. तुम जाने पहचाने से लगते हो( हम सब उस्ताद है)
१४.चलो सजना जहा तक
१५. छलकाये जा.. आइये..(वरची दोन्ही मेरे हमदम मेरे दोस्त)
१६.धिरे धिरे बोल कोइ सुन ना ले(गोर और काला)
१७. गम का फसाना बन गया अच्छा (मनचली)
१८.झिल मिल सितारों का आंगन होगा( जिवन मृत्यु)
१९.प्यार तेरी पहली नजर को सलाम.
२०. तेरे मेरे बिच मे कैसा ये. (वरची दोन्ही तेरे मेरे बिच मे)
२१.क्या मिलिये ऐसे लोगों से जिनकी फितरत (इज्जत्)
२२. लंबी जुदाइ.. (हिरो)
२३. मेरे मेहबुब कयामत होगी आज रुसवा.,,(मिस्टर एक्स इन बाँबे)
२४.परदा है परदा( अमर अकबर एंथनी)
२५.मुबारक हो सबको समा ये सुहाना
२६.सावन का महिना (वरची दोन्ही मिलन मधली)
२७.वो जब याद आये बहोत याद आये(पारसमणी)
२८.डफली वाले(सरगम)
२९.सच्चाई कभी छुप नही सकती बनावट की.. (दुश्मन)
३०.राही मनवा दुख की चिंता(दोस्ती)

वा मुकुंद, गाण्यांची नुसती यादी वाचूनसुद्धा मस्त वाटतंय. वर दिलेल्या गाण्यांबरोबर माझी आवडती आणखी दोन गाणी - 'दर्द-ए-दिल दर्द-ए-जिगर' (कर्ज) आणि 'हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे' (अमर अकबर अँथनी) Happy

गाण्यांची यादी मस्त आहे. माझी आवडती गाणी - उडके पवनके संग चलूंगी, वो है जरा खफा खफा (दोन्ही शागीर्द), मै शायर तो नही (बॉबी), मेरी दोस्ती मेरा प्यार (दोस्ती), चोरी चोरी ये बात बढी तो लोग क्या कहेंगे (पारसमणी), खत लिख दे सावरिया के नाम, मेरे दुश्मन तू मेरी दोस्तीको तरसे (दोन्ही आये दिन बहार के)

एल-पी च्या बाबतीत एक खरं आहे की नाव घेतल्याक्षणीच पटकन आवडतील अशी गाणी लगेच डोळ्यासमोर येत नाहीत..जरा स्मरणशक्तीला ताण द्यावा लागतो. Sad