काय पुरावा हवा तुम्हाला माझ्या बैल असण्याचा

Submitted by pradyumnasantu on 23 May, 2012 - 00:51

जनावरांची छावणी सुरू झाली अन्‌ माणसं राहायला आली...
वर्षा कुलकर्णी - सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, May 07, 2012 AT 01:30 AM (IST)
पुणे - जनावरांची छावणी सुरू झाली आणि लगोलग एका रात्रीत तिथे माणसं राहायला आली. जनावरांना मिळणारं पाणीच माणसं पितात. तिथेच दगड मांडून दोन घास रांधतात आणि जनावरांना वाचवताना आपणही उभे राहिलो, असं समाधान मानण्याची वेळ माणदेशी बाया-माणसांवर आली आहे. माण तालुक्‍यातील म्हसवड येथे जनावरांसाठी पहिली छावणी चेतना सिन्हा यांच्या माणदेशी फाउंडेशनने सुरू केली आहे.
दै. सकाळमधील वरील बातमीवरुन सुचलेली ही कविता.

जनावराच्या छावणीत तुमच्या घ्या भरती करून
आलो तुमच्यापाशी मालक हीच आशा धरून
*
नाव कशाला पुसता ते तर आहेच बैलोबा
’गुणी माझा बैल’ म्हणायचा मायेनं आजोबा
हक्क नाही का मुळीच मजला दुष्काळात हसण्याचा
काय पुरावा हवा तुम्हाला माझ्या बैल असण्याचा
*
शेत धन्याचे नांगरताना टेंगूळ आले भरून
टेंगुळ कसले वशिंड माझे बैलपणाची ही खूण
माणुस वाही जू मानेवर हा का विषय हसण्याचा
काय आणखी हवा पुरावा माझ्या बैल असण्याचा
*
पाण्याचा थेंबही मिळेना तहानलेल्या बैलाना
अन्नाचा तर दाणा नाही घरात माझ्या पोराना
गोठ्यामध्ये चोरुन काड्या रवंथ करीत बसण्याचा
काय आणखी हवा पुरावा माझ्या बैल असण्याचा
*
भर मध्यान्ही नांगरताना मुखही कोरडे पडलेले
पाणी मागता केले त्याने पुढती माझ्या घमेले
दुष्काळाने डावच धरला आयुष्याला डसण्याचा
काय आणखी हवा पुरावा माझ्या बैल असण्याचा
*
आलो तुमच्यापाशी मालक हीच आशा धरून
जनावराच्या छावणीत तुमच्या घ्या भरती करून
नकारू नका समय आला मग खाटकाकडे जाण्याचा
काय आणखी हवा पुरावा माझ्या बैल असण्याचा
**

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

आह!

आवडली कविता...!
खुद्द मुख्यमंत्र्यांच्या जिल्हात जनतेचे हे हाल, तर बाकी महाराष्ट्राने कुणाच्या तोंडाकडे बघावे.

आवडली कविता.
थोडासा दुष्काळ जरी पडला तरी त्याचे दाहक चटके शेतकर्‍याबरोबरच त्याच्या मुक्या जनावरांनाही सोसावे लागतात.

(चेतना गाला सिन्हा यांनी दोन दशकापूर्वी शेतकरी चळवळीत काम केले असल्याने बराच काळ त्यांच्या सहवासात काम करण्याचा योग आला होता.)

श्रीकांत: आभारी आहे.
किरण: दु:खी स्मायली आवडली. आभार.
वैभवजी: आभार, कसे आहात. 'आवडली नाही'चे प्रतिसादही मला आवडतीलच.
अज्ञातजी,सुप्रियाजी: मिनी प्रतिसादांबद्दल मॅक्सी आभार
विजयजी: खरंय आपण म्हणता ते.
mansmi18 अभिवादन
मुटेजी प्रणाम

आवडली !