सखा (अभिवाचन दुव्यासह)

Submitted by दाद on 12 September, 2008 - 02:50

http://www.youtube.com/watch?v=lORUoKYwfvA

बसल्या जागेवरून कृष्णाने नजर फिरवली. ठाईठाई पांडवांच्या कर्तृत्वाच्या वैभवी खुणा दिसत होत्या. अश्वमेध यज्ञाच्या समाप्तीसाठी सजवलेलं इंद्रप्रस्थ! येणारा प्रत्येक राजा, मांडलीक डोळे विस्फारून सारं निरखित होता. कृष्णाने योजल्याप्रमाणे चाललं होतं... सारं काही.

उजव्या पायाच्या करंगळीने भुईला जोर देत तो मागे लोडाला रेलून बसला. झोपाळ्याच्या झोक्याबरोबर आजूबाजूचं सारं झुलू लागलं. हसून डोळे मिटून घेत कृष्णं मागच्या कडीला टेकला.

कडीपाटाच्या एकाच तालात वाजणार्‍या रूप्याच्या घुंगुरांच्या किणकिणाटातही त्याला सखीच्या वस्त्राची सळसळ ऐकू आली.... तिच्या पायातले पैंजण, मेखलेची किन्नरी, हातातले कंकण ह्या सार्‍यासार्‍यातून वेगळी काढू शकला तो... तिच्या पायघोळ वस्त्राची सळसळ!

डोळे उघडले तर दूरवर दिसली, लगबगीने त्याला भेटण्यासाठी हातात दह्याची वाटी घेऊन येणारी सखी....

’कृष्णा’!
सखी म्हणून म्हणतो झालं तिला, काहीतरी. पण ही कृष्णा नाही.... ही जणू लवलवती अग्नीशिखा. धगधगत्या अग्नीकुंडातून उमलली ती मुळात ज्वाळा बनूनच अन निवालीच नाही कधी...

'कृष्णे!'
म्हणून कृष्णाने परत डोळे मिटून घेतले. जणू त्याने मनात मारलेली हाक ऐकू आल्यासारखी तिची पावलं अधिक जलद चालत असल्याचं त्याला जाणवलं. आजच्या समारंभाच्या प्रसंगी केलेला साज-शृंगार, केवड्याच्या अत्तराचा घमघमाट..... किती आनंदात दिसतेय. इंद्रप्रस्थाची राणी... महाराणी द्रौपदी.

आता येऊन थबकून उभी राहील, उंबरठ्यात ओठंगून... एकटक माझ्याकडे बघत. हे तिचं मला निरखणं, किती सुखाचं ते सांगता येईना, माझं मलाच. आपलं हे कवतिक तीच करू जाणे.
आता भानावर येऊन पाऊल आत घालील. तिचं आपल्याला निरखणं आपल्याला ठाऊक आहे, हे तिलाही ठावे.... विचारलं तर मात्रं हसून नाकबूल होईल, अशी.

’ये, कृष्णे, बैस अशी’, डोळे उघडून तिच्याकडे बघत कृष्ण म्हणाला, ’आवरलं ना? छान पार पडलं, कार्य. मनासारखं झालं का सारं सारं? दमली असशील नाही?’

द्रौपदी किंचित हसली आणि दह्याची वाटी दोघांच्या मध्ये ठेवीत टेकली.
’कशी आहेस? निघालोच होतो. सार्‍यांचा निरोप घेतला, तूच राहिलीस’, उजव्या हाताच्या बोटावरला व्रण डाव्या हाताने कुरवाळीत कृष्णं म्हणाला. ही त्याची सवय, पांचालीला चांगलीच ठाऊक.... ते बोट ठाऊक, ती जखमही ठाऊक.
’निवांतपणे भेटलीच नाहीस अनेक दिवसात.’

काहीच न बोलता जिव्हाळ्याच्या उबदार छायेत, ती नि:शब्दं झुलत राहिली. सहज चाळा म्हणून पुढे घेऊ गेल्या वेणीच्या जागी तिच्या हाती आला... तिच्या सुट्ट्या सोडलेल्या केसांचा दुखरा संभार अन त्याबरोबर अंगांगातून सळसळत उठली... तीच ती परिचित... विखारी वेल. क्षणात संतापाचे, घृणेचे काटे अन द्वेषाच्या कळ्यांनी धुमारली.... पुढचा फुलोर्‍याचा आवेग थोपवणं द्रौपदीच्या हाती नव्हतं.

एक विव्हळणारा नि:श्वास टाकून तिनं तरी सहज स्वरात म्हटलं, ’एक विचारू?’

ह्या असल्या झंजावातातही, अजून तेच पारिजातकी हसू सांडीत कृष्णं म्हणाला, ’काय म्हणतेस कृष्णे, बोल’

मान वर करून त्याच्याकडे बघताच द्रौपदी भान हारपली. ’काय विचारत होत्ये बरं?’

हसून तिला जागं करीत कृष्णं म्हणाला, ’विचारीत ना होतीस काहीतरी? काय ते?’

अजून केसांतच गुंतलेली बोटं काढून घेण्याचा प्रयत्नं करीत द्रौपदी हळूच म्हणाली, ’रागे नाही ना यायचास?’

तटकन अंगठ्याने भुई टोकून झोक थांबवीत कृष्णं हळवं होत म्हणाला, ’तुझ्यावर रागवून जाऊ शकेन अशी जागा नाही, कृष्णे. बोल ना. असा कोणता सल खुपतो आहे?’

मान वर करीत त्याच्या नजरेत नजर गुंफीत द्रौपदीने शब्दं उच्चारले, ’'कृष्णा' म्हणतोस मला... तुझी सखी, म्हणवतोस. मग त्या दिवशी..... त्या काळ्या दिवशी, त्या निकराच्या क्षणी... का नाही आलास पहिल्याच हाकेला? किंबहुना मला हाक मारण्याची पाळीच का आणलीस? का?’

अश्रू पुसण्यासाठी झटक्यात मान वळवताना त्वेषाने वळलेली मूठ तशीच राहिली अन मोकळ्या केसांच्या न सुटलेल्या गुत्यांतून केस तुटून द्रौपदीच्या मुठीत आले.

’कृष्णे,’ तिला समजावत कृष्णं म्हणाला, ’किती त्रास करून घेशील? नको ना त्या वाटेला जाऊ... माझं...’,

’ती वाट?’, त्याला अर्ध्यावरच तोडत त्वेषाने द्रौपदी म्हणाली, ’मी गेले त्या वाटेनं?.... की खेचत, ओढत नेलं मला?...
कशी पुसू? माझ्या फरपटणार्‍या कायेनं रेखली ती वाट.... तीक्ष्णं शस्त्रानं कोरलेल्या घावासारखी मनावर उमटली ती वाट.....कशी पुसू? तुझ्या... तुझ्या त्या बोटावरल्या व्रणाइतकीच ही रेघही खरी आहे... फक्तं अधिकाधिक चरत जाणारी... एखाद्या विखारी शस्त्राची जखम....’

’विश्वास ठेव, सखे...... माझ्या हातात असतं तर... तर तुझी ती स्मृतीच नष्टं केली असती मी, खरच’,कृष्णं कळवळून म्हणाला.

’माझी स्मृती? स्मृतीच का? सगळच तुझ्या हातात होतं ना?.... तुझ्याच हातात सगळं असतं ना? सांग ना? माझी स्मृती नष्टं करणं तुझ्या हातात नाही म्हणतोस?
तू निर्दालन करू शकणार नाहीस असं काय आहे ह्या विश्वात, कृष्णा? का बोलायला लावतो आहेस मला?
एकवस्त्रा स्त्रीचे धिंदवडे पुरेसे वाटले नाहीत तुला धावत यायला? त्यातही ती दुसरी तिसरी कुणी नाही..... मी! स्वत: द्रौपदी, तुझी सखी! बोल रे आता तरी बोल!’,
उत्तरासाठी इतके दिवस तिष्ठलेली द्रौपदी, आता प्रश्नं विचारल्यावर एक क्षणही तिथे बसू शकेना..... गवाक्षाशी जाऊन डोकं टेकून ती गदगदत होती. जणू आता हिला उत्तर मिळालं नाही तर अशीच अश्रूंमध्ये विरघळत सांडून जाईल...

’कृष्णे.....,’ अतीव मायेने भरल्या स्वरात तिचं रितं होणं थोपवीत, कृष्णं जागीचा उठला. तोंडात भरजरी पाटवाचा बोळा कोंबून येणारे कढ दाबण्याचा प्रयत्नं करणार्‍या द्रौपदीच्या जवळ जाऊन कृष्ण नुस्ताच हात कटीवर घेऊन उभा राहिला.

बिन-उत्तराच्या प्रश्नासारखा झोका झुलतच राहिला.

’इकडे. माझ्याकडे, बघ! ....बघ ना.’, द्रौपदी सावकाश वळली. अश्रूंचे भाले फडफडवीत त्याच्याकडे रोखलेल्या नजरेत कृष्णाला आपली सखी दिसेचना कुठे, शोधूनही सापडेना.

’कृष्णे, कसं समजावू तुला?’,कमरेवर ठेवलेल्या हाताला शेल्यातली बासरीची रिकामी जागा लागूनही जराही विचलित न होता कृष्णं म्हणाला,’जिथे मी गुंतीन असं माझ्या नशीबी या जगात काही नाही.... माझ्यात गुंतलेल्या सगळ्यांसाठी हा जन्मं आहे..... आठवतो का तो दिवस? नीट आठव, पांचाली. अगदी पूर्णं आठव.’

आत्यंतिक वेदनेने द्रौपदीने डोळे मिटून घेतले.. नीट आठव? पूर्णं आठव?
आयुष्यातला सगळ्यात काळाकुट्टं दिवस...... कसा विसरायचा?
स्त्रीच्याच काय पण कुणाच्या शवाचीही करीत नाहीत इतकी विटंबना जित्या-जागत्या देहाची केली. एकवस्त्रा स्त्रीची लज्जा लाजाळूच्या पानाहूनही हळवी.
कसं विसरू? देहधर्माची बंधनं! ह्या.... ह्या... समाजानेच घालून दिल्या बंधनांचा मुकाट स्वीकार केलेल्या एका गृहिणीस तिच्या असहाय्य, लज्जित अवस्थेत, तिच्या केसाला धरून फरपटवीत राजसभेत आणणं? कसं विसरू?.....
कशा विसरू? उभ्या देहाला अजून आग लावतात त्यावेळी खाली वळलेल्या घरातल्या, राज्यातल्या वडिलधार्‍या नजरा?
अजून...... अजून नुस्त्या आठवणीने कानात घण घालतात, एका कुलीन स्त्रीला, पतिव्रतेला बोललेले अपशब्दं..... वेश्या, कुलटा, दासी....
उरावरलं वस्त्रं धरून ठेवणारे हात तसेच जोडून मदतीची सर्वत्र मागितलेली भीक...

कसा विसरेन? त्या नराधमाने कमरेच्या निरीला हात घालताच...... तिथे हजर असलेल्या प्रत्येकाच्या मनगटांवरचे केस...... शोभेचेही नाहीत हे ध्यानी आल्यावर फोडलेला टाहो, केलेला आकांत.....

कृष्णा, मधूसूदना धाव.....
नको अंत पाहूस आता, रुक्मिणीच्या नाथा रे....
जगद्नियंत्या, अजून कसली वाट बघतोस आता? धाव रे, तुझी द्रौपदी आज अनाथ झाली...
माझ्याच्याने नाही धीर धरवत आता ....
वैकुठाधीपती, ये रे..... आता कोणत्या उपाये बोलावू तुला?..... कुठे गुंतलास रे द्वारकेच्या राया?...

धाव... आता धाव रे....

नुस्त्या त्या विषारी आठवणींनी तडफडणारी आपली सखी बघून कृष्णाच्या डोळ्यांना करुणेची धार लागली.

हे अंतर्यामी, सख्या, माझ्या जीवीच्या जिवलगा....

द्रौपदीला लख्खं आठवलं.....
ज्याक्षणी तिनं त्याला सखा म्हटलं, अंतर्यामी म्हटलं.... ज्याक्षणी आपल्या असण्या-नसण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली त्याक्षणी आत-बाहेर उसळलेल्या अष्टगंधाच्या सुगंधाच्या लाटा, अंतर्मनाचा ढवळून निघाला डोह शांतवणारी पावरीची निळी गाज.... अन तिच्या अवघ्या अस्तित्वाला वेढणारी पितांबराची गहिरी मखमली सळसळ......

’कृष्णे, पाहिलस... पाहिलस मी कसा बांधलेला आहे ते? मनात आणलं तर काय करू शकणार नाही..... असा हा तुझा सखा! त्याला मनात वाट्टेल ते आणण्याचं स्वातंत्र्य नाही...
पांचाली, त्यासाठी तुझ्या भावनांनी मी बद्ध आहे, ती माझी मर्यादा आहे. तू द्वारकेच्या राजा म्हटलस तर मी द्वारकेत, वैकुठाधीपती म्हटलस तर मी तिथेही...
पण मी त्यापैकी कुठेच नाही, कृष्णे..... मी कुठेच नाही.... अंतर्यामी, तुझ्या चित्तात वसलेला, तुझा सखा म्हणायला किती वेळ घेतलास, सखे, किती वेळ...’, दोन्ही हात गवाक्षात ठेवून कुठेतरी अंतराळात बघत आता कृष्णं प्रश्नं विचारीत होता.... तिलाच की आणखीही कुणाकुणाला?

अचंबित, निश्चळ कृष्णा अपलक दृष्टीनं त्याच्याकडे पहात राहिली.

अळेबळे भानावर येत कृष्ण वळला. तिच्याकडे बघत म्हणाला, ’दही घालतेस ना हातावर? निघायची वेळ झाली’

आज आपल्या घरच्या पंगतीत शेवटी उष्टं काढलेल्या त्या हातांवर दही घालताना, द्रौपदीचे हात थरथरू लागले... अपार मायेने, भक्तीने, समाधानाने आतून भरून येताना जाणवलं की आत काही रितं नाही..... कुठेच रितं नाही.

दही खाऊन हात पुसण्यासाठी इथे-तिथे बघणाया कृष्णापुढे तिनं आपलं पाटव धरलं. हसून त्याला उष्टे हात पुसत, तो वळणार इतक्यात तिनं त्याला थांबवलं. संध्याकालच्या किरणांसारखं मंद, मऊ-मवाळ हसू सांडणाया ओठांच्या कडेस दही लागलं होतं. आपल्याच पाटवाने ते पुसत ती ओलं हसली. तिच्या डोक्यावर थोपटीत कृष्णं वळला आणि ती नजरेतल्या पाण्याच्या पडद्यावर त्याचं मोहनी रूप रेखून घेताघेतानाच दृष्टीआड झालाही....

डोळे कोरडे करण्यासाठी पदराचा शेव उचलला अन....
द्रौपदी तिथेच थबकली.... सकाळपासून घमघमणारा केवड्याचा गंध काही येईना.... आत-बाहेर उसळू लागल्या अष्टगंधाच्या सुगंधाच्या लाटा थोपवणं आता तिच्या हाती राहिलं नाही....

समाप्तं.

गुलमोहर: 

भगवान व्यासांच्या थोर प्रतिभेचा अविष्कार - महाभारत! दोन ओळींच्यामध्ये पण खूप गहिरा आषय असतो - अलिखीत! समजून घ्यायला कधिकधि वर्षानुवर्ष लागतात.

अध्यात्माचे सार असा हा विषय तुम्ही इतक्या सोप्या आणि तरल भाषेत मांडलात. तुमच्या प्रतिभेला सलाम!

फक्त "उभ्या देहाला अजून आग लावतात त्यावेळी खाली वळलेल्या घरातल्या, राज्यातल्या वडिलधार्‍या नजरा?" ह्यात ? हवे होते का?

अपलक ह्या शब्दाचा अर्थ काय?

madhavam, ते प्रश्नचिन्ह नसलं तरी चालेल... धन्यवाद, तुमच्या प्रतिक्रियेसाठी.

'अपलक' म्हणजे पापणी न मिटता.
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

दाद गं दाद............
कृष्ण उभा केलास डोळ्यासमोर्....झोक्यावर अलगद डोळे मिटुन बसलेला गहीरं हसु असलेला निळा कृष्ण !

दाद - मी आईला तुझा हा लेख पाठवलेला. तिलाही खूपच आवडला.

इतक छान लिहिलय कि घटनाक्रम चुकलाय हे मराठ्मोळीच पोस्ट वाचेपर्यंत कळलच नव्ह्त. Happy

दाद
फारच छान
धावाच अंतरीचा प्रतीसाद द्रौपदीला
र्हदयस्थ श्रीहरीने दिली दाद द्रौपदीला

काय काय, काय बरोबर ते तो कृष्णच जाणे.
पण मला वाटते महत्व घटनाक्रमाला नसुन त्या घटनेला आहे आणि इथे सादरीकरणाला.
जे लिहिलेस ते योग्य जागी विनाविलम्ब पोचले आणि विश्वास ठेव डोळ्यात पाणी आले माझ्या.
खुप सुन्दर, अप्रतिम.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

शब्द नाहीत प्रतिक्रिया द्यायला...
..प्रज्ञा

ऐतिहासिक ही लिहीता? सिंपली ग्रेट! Happy

वा! दाद अप्रतिम!

बापरे, अजून वाचताय, लोक्स! धन्यवाद!
घटनाक्रम चुकलाय. मी खूप विचार केला पण बदलायचं धाडस झालेलं नाही.... होईल कधीतरी.

दाद,

घटनाक्रमाचे एवढे मनाला लावून घेउ नका..वाचताना ते लक्षातही येत नाही.

बर्‍याच दिवसात तुमचे नवीन काही वाचायला मिळाले नाही. वाट पाहत आहे.(तुमचे आणि चाफ्फा चे लिखाण मी अतिशय आवडीने वाचतो.)

बाय द वे, "सातो बार बोले बन्सी" च्या अर्थाचीही वाट पाहत आहे:) वेळ मिळाला तर जरूर कळवा..

धन्यवाद..

दाद, व्यासपर्व मधे असे आले आहे की पांडवांनी युद्ध संपल्यावर अश्वमेध केला.

manasmi18, धन्स रे.

घटनाक्रमाचं लेखाच्या ओघात लक्षात आलं नाही तरी... चूकच. मला अजूनही हा लेख कसा बदलला तर घटनाक्रम बरोबर होईल ते डोक्यात येत नाहीये.... म्हणजे माझ्या डोक्यातल्या इतर गोष्टींमधे ह्याचा अजून पहिला नंबर लागल नाहीये Happy

ते 'सातोबार बोले बन्सी', मी शब्द लिहून घेतलेत... त्याचही तसच. अजून गाणं ऐकलं नसल्याने, त्याचे संदर्भ लागत नाहीयेत... आहे रे, माझ्या लक्षात "नीट्"च आहे. नक्की त्यावर काम करेन. मला स्वतःला ती कविता अतिशय अतिशय भावली.

सींडे, होय गं....
अजून वाचताय तुम्ही लोक्स?... आणि नुस्तं वाचून सोडून देत नाहीये... आवर्जून कळवताय... काय म्हणू? अनुराग असाच असो.... आणि हो! राग सुद्धा अनुरागाचीच दुसरी बाजू Happy तेव्हा तोही आला तर कळवाच!

शलाका, व्वा! इतकं सुंदर लिहिलंयस.

अप्रतिम!

शरददा

दाद !! कितीही वेळा वाचलं तरी आतपर्यंत पोचणारं हे लिखाण तुझं.
अशीच लिहीत रहा. जियो !!

घटनाक्रम चुकला हे कळलं होतं लगेच, पण मांडणी इतकी ओघवती आहे की बाकीचे संदर्भ सोडून दिले तरी काही हरकत नाही असंच वाटलं...
दाद, छान लिहिलं आहेस.

डोळे कोरडे करण्यासाठी पदराचा शेव उचलला अन....
द्रौपदी तिथेच थबकली.... सकाळपासून घमघमणारा केवड्याचा गंध काही येईना.... आत-बाहेर उसळू लागल्या अष्टगंधाच्या सुगंधाच्या लाटा थोपवणं आता तिच्या हाती राहिलं नाही .... >>
हे अस कस काय सुचत ??!!

सुरेख फुलवला आहे प्रसंग. संवादांना मात्र 'मोगरा फुलला' चा टच आहे (’रागे नाही ना यायचास?’) Happy

एक गोष्ट आठवली
यशोदा माई कॄष्णाला दहिभात भरवत असते. तोच बाहेर मोठाच गलका होतो. कोणी नवखा गोकुळात आलेला असतो आणि सगळे बाळ गोपाळ त्याला दगड गोटे मारुन त्रास देत असतात. तो कॄष्णाचा धावा करु लागतो. कॄष्ण यशोदा माई ला म्हणतो मला गेले पाहिजे आणि दहिभात अर्धा टाकुन धावतो त्याच्या मदतीला.

माघारी आलेल्या कॄष्णाला यशोदा विचावते वाचवलेस तुझ्या भक्ताला. त्यावर कॄष्ण उत्तर देतो, नाही. मी पोहोचे पर्यंत त्याने स्वरक्षणार्थ दगड उचलला होता.

काय गं दिदी.. कसं सुचतं हे सगळं..
कृष्ण.. माझा अवडता विषय आहे.. पण इतकं ताकदी ने लिहीतेस गं..
असं वाटतं त्याच झोपाळ्या जवळच्या कोपरया तुन.. बघत आहे मी त्या सावळ्या ला.. त्याच्या प्रिय सखी ला समजावताना... आणि डोळे वाहु लागतात..

का आला नाहिस.. हे विचारणं सोप्प आहे ना.. पण हाक दिलीच नाही तर??..
सख्या ला त्याची बंधने आहेतच की..

धावा केलाच नाही तर ...??
तरी ही अंतरयामी आहे ना तु.. मग 'सखा' म्हणायची वाट का रे पाहीलीस??
का?

असो..

वेगळ्याच विश्वात नेलंस दाद!!!
धन्कु.. खूप धन्कु..

आणि हो.. प्लीज हे बदलु नका..
ह्यात ज्या भावना आलेल्या आहेत.. त्या अशाच राहुद्या प्लीज...

आज तुमचे सारेच लेख वाचले...अगदि भान हरपून गेले. फारच सुन्दर लिहिता तुम्हि....

:):)

keep going....

पु. ले. शु.

फालतू लिखाण माबोच्या पहिल्या पानावर बघण्यापेक्षा आज तुझंच उरलं सुरलं सगळं वाचून काढते.

तेच तेच प्रतिसाद नाही देत बसत, समजून जा.

हे मला आत्तच गावलं. घटनाक्रम चुकिचा असला तरी दाताखाली खडा आल्यासारखं खरच नाही वाटलं दाद. त्या संवादांमध्ये अगदी हरवून जायला झालं. प्लीज रोज काहितरी लिहित जा ना...

दाद
सुरेख गोष्ट. तुमच्या २ जुन्य गोष्टी वाचायला मिळाल्या.
जर तुम्हाला घटनाक्रम सुधारयची इच्छा असेल तर अभिमन्यु उत्तराचा विवाहप्रसंग घेता येइल.
पण घटनाकाळ असा आहे
१) राजसुय यज्ञ (दुर्योधनाची फजिती)
२) द्युत - वस्त्रहरण
३) दुसर्यांदा द्युत - वनवास
४) महाभारत युद्ध
५) अश्वमेध (अर्जुन फक्त अभिमन्युला मुलगा मानुन बभ्रुवाहनास आपला मान्ण्यास नकार देतो.
यात तर बभ्रुवाहन अर्जुनाला हरवतो.
पुढे ताम्रध्वज बभ्रुवाहन आणि अर्जुन दोघांना हरवतो.)
६) क्रुष्ण इह्त्याग.
७) पांडव स्वर्गयात्रा.

यात अभिमन्यु उत्तराचा विवाह झाल्यानंतर क्रुष्ण द्रौपदीला माहेरी (युद्धाची चर्चा तिथे होते) भेटायला येतो. ती एकच वेळ अशी आहे की द्रौपदीची वेणी घातली नसणार आणि ती क्रुष्णाला महालात भेटली असणार.

गोष्टीत घटनाक्रम एवढा महत्वाचा नसला तरी असेच आपले.

Pages