सखा (अभिवाचन दुव्यासह)

Submitted by दाद on 12 September, 2008 - 02:50

http://www.youtube.com/watch?v=lORUoKYwfvA

बसल्या जागेवरून कृष्णाने नजर फिरवली. ठाईठाई पांडवांच्या कर्तृत्वाच्या वैभवी खुणा दिसत होत्या. अश्वमेध यज्ञाच्या समाप्तीसाठी सजवलेलं इंद्रप्रस्थ! येणारा प्रत्येक राजा, मांडलीक डोळे विस्फारून सारं निरखित होता. कृष्णाने योजल्याप्रमाणे चाललं होतं... सारं काही.

उजव्या पायाच्या करंगळीने भुईला जोर देत तो मागे लोडाला रेलून बसला. झोपाळ्याच्या झोक्याबरोबर आजूबाजूचं सारं झुलू लागलं. हसून डोळे मिटून घेत कृष्णं मागच्या कडीला टेकला.

कडीपाटाच्या एकाच तालात वाजणार्‍या रूप्याच्या घुंगुरांच्या किणकिणाटातही त्याला सखीच्या वस्त्राची सळसळ ऐकू आली.... तिच्या पायातले पैंजण, मेखलेची किन्नरी, हातातले कंकण ह्या सार्‍यासार्‍यातून वेगळी काढू शकला तो... तिच्या पायघोळ वस्त्राची सळसळ!

डोळे उघडले तर दूरवर दिसली, लगबगीने त्याला भेटण्यासाठी हातात दह्याची वाटी घेऊन येणारी सखी....

’कृष्णा’!
सखी म्हणून म्हणतो झालं तिला, काहीतरी. पण ही कृष्णा नाही.... ही जणू लवलवती अग्नीशिखा. धगधगत्या अग्नीकुंडातून उमलली ती मुळात ज्वाळा बनूनच अन निवालीच नाही कधी...

'कृष्णे!'
म्हणून कृष्णाने परत डोळे मिटून घेतले. जणू त्याने मनात मारलेली हाक ऐकू आल्यासारखी तिची पावलं अधिक जलद चालत असल्याचं त्याला जाणवलं. आजच्या समारंभाच्या प्रसंगी केलेला साज-शृंगार, केवड्याच्या अत्तराचा घमघमाट..... किती आनंदात दिसतेय. इंद्रप्रस्थाची राणी... महाराणी द्रौपदी.

आता येऊन थबकून उभी राहील, उंबरठ्यात ओठंगून... एकटक माझ्याकडे बघत. हे तिचं मला निरखणं, किती सुखाचं ते सांगता येईना, माझं मलाच. आपलं हे कवतिक तीच करू जाणे.
आता भानावर येऊन पाऊल आत घालील. तिचं आपल्याला निरखणं आपल्याला ठाऊक आहे, हे तिलाही ठावे.... विचारलं तर मात्रं हसून नाकबूल होईल, अशी.

’ये, कृष्णे, बैस अशी’, डोळे उघडून तिच्याकडे बघत कृष्ण म्हणाला, ’आवरलं ना? छान पार पडलं, कार्य. मनासारखं झालं का सारं सारं? दमली असशील नाही?’

द्रौपदी किंचित हसली आणि दह्याची वाटी दोघांच्या मध्ये ठेवीत टेकली.
’कशी आहेस? निघालोच होतो. सार्‍यांचा निरोप घेतला, तूच राहिलीस’, उजव्या हाताच्या बोटावरला व्रण डाव्या हाताने कुरवाळीत कृष्णं म्हणाला. ही त्याची सवय, पांचालीला चांगलीच ठाऊक.... ते बोट ठाऊक, ती जखमही ठाऊक.
’निवांतपणे भेटलीच नाहीस अनेक दिवसात.’

काहीच न बोलता जिव्हाळ्याच्या उबदार छायेत, ती नि:शब्दं झुलत राहिली. सहज चाळा म्हणून पुढे घेऊ गेल्या वेणीच्या जागी तिच्या हाती आला... तिच्या सुट्ट्या सोडलेल्या केसांचा दुखरा संभार अन त्याबरोबर अंगांगातून सळसळत उठली... तीच ती परिचित... विखारी वेल. क्षणात संतापाचे, घृणेचे काटे अन द्वेषाच्या कळ्यांनी धुमारली.... पुढचा फुलोर्‍याचा आवेग थोपवणं द्रौपदीच्या हाती नव्हतं.

एक विव्हळणारा नि:श्वास टाकून तिनं तरी सहज स्वरात म्हटलं, ’एक विचारू?’

ह्या असल्या झंजावातातही, अजून तेच पारिजातकी हसू सांडीत कृष्णं म्हणाला, ’काय म्हणतेस कृष्णे, बोल’

मान वर करून त्याच्याकडे बघताच द्रौपदी भान हारपली. ’काय विचारत होत्ये बरं?’

हसून तिला जागं करीत कृष्णं म्हणाला, ’विचारीत ना होतीस काहीतरी? काय ते?’

अजून केसांतच गुंतलेली बोटं काढून घेण्याचा प्रयत्नं करीत द्रौपदी हळूच म्हणाली, ’रागे नाही ना यायचास?’

तटकन अंगठ्याने भुई टोकून झोक थांबवीत कृष्णं हळवं होत म्हणाला, ’तुझ्यावर रागवून जाऊ शकेन अशी जागा नाही, कृष्णे. बोल ना. असा कोणता सल खुपतो आहे?’

मान वर करीत त्याच्या नजरेत नजर गुंफीत द्रौपदीने शब्दं उच्चारले, ’'कृष्णा' म्हणतोस मला... तुझी सखी, म्हणवतोस. मग त्या दिवशी..... त्या काळ्या दिवशी, त्या निकराच्या क्षणी... का नाही आलास पहिल्याच हाकेला? किंबहुना मला हाक मारण्याची पाळीच का आणलीस? का?’

अश्रू पुसण्यासाठी झटक्यात मान वळवताना त्वेषाने वळलेली मूठ तशीच राहिली अन मोकळ्या केसांच्या न सुटलेल्या गुत्यांतून केस तुटून द्रौपदीच्या मुठीत आले.

’कृष्णे,’ तिला समजावत कृष्णं म्हणाला, ’किती त्रास करून घेशील? नको ना त्या वाटेला जाऊ... माझं...’,

’ती वाट?’, त्याला अर्ध्यावरच तोडत त्वेषाने द्रौपदी म्हणाली, ’मी गेले त्या वाटेनं?.... की खेचत, ओढत नेलं मला?...
कशी पुसू? माझ्या फरपटणार्‍या कायेनं रेखली ती वाट.... तीक्ष्णं शस्त्रानं कोरलेल्या घावासारखी मनावर उमटली ती वाट.....कशी पुसू? तुझ्या... तुझ्या त्या बोटावरल्या व्रणाइतकीच ही रेघही खरी आहे... फक्तं अधिकाधिक चरत जाणारी... एखाद्या विखारी शस्त्राची जखम....’

’विश्वास ठेव, सखे...... माझ्या हातात असतं तर... तर तुझी ती स्मृतीच नष्टं केली असती मी, खरच’,कृष्णं कळवळून म्हणाला.

’माझी स्मृती? स्मृतीच का? सगळच तुझ्या हातात होतं ना?.... तुझ्याच हातात सगळं असतं ना? सांग ना? माझी स्मृती नष्टं करणं तुझ्या हातात नाही म्हणतोस?
तू निर्दालन करू शकणार नाहीस असं काय आहे ह्या विश्वात, कृष्णा? का बोलायला लावतो आहेस मला?
एकवस्त्रा स्त्रीचे धिंदवडे पुरेसे वाटले नाहीत तुला धावत यायला? त्यातही ती दुसरी तिसरी कुणी नाही..... मी! स्वत: द्रौपदी, तुझी सखी! बोल रे आता तरी बोल!’,
उत्तरासाठी इतके दिवस तिष्ठलेली द्रौपदी, आता प्रश्नं विचारल्यावर एक क्षणही तिथे बसू शकेना..... गवाक्षाशी जाऊन डोकं टेकून ती गदगदत होती. जणू आता हिला उत्तर मिळालं नाही तर अशीच अश्रूंमध्ये विरघळत सांडून जाईल...

’कृष्णे.....,’ अतीव मायेने भरल्या स्वरात तिचं रितं होणं थोपवीत, कृष्णं जागीचा उठला. तोंडात भरजरी पाटवाचा बोळा कोंबून येणारे कढ दाबण्याचा प्रयत्नं करणार्‍या द्रौपदीच्या जवळ जाऊन कृष्ण नुस्ताच हात कटीवर घेऊन उभा राहिला.

बिन-उत्तराच्या प्रश्नासारखा झोका झुलतच राहिला.

’इकडे. माझ्याकडे, बघ! ....बघ ना.’, द्रौपदी सावकाश वळली. अश्रूंचे भाले फडफडवीत त्याच्याकडे रोखलेल्या नजरेत कृष्णाला आपली सखी दिसेचना कुठे, शोधूनही सापडेना.

’कृष्णे, कसं समजावू तुला?’,कमरेवर ठेवलेल्या हाताला शेल्यातली बासरीची रिकामी जागा लागूनही जराही विचलित न होता कृष्णं म्हणाला,’जिथे मी गुंतीन असं माझ्या नशीबी या जगात काही नाही.... माझ्यात गुंतलेल्या सगळ्यांसाठी हा जन्मं आहे..... आठवतो का तो दिवस? नीट आठव, पांचाली. अगदी पूर्णं आठव.’

आत्यंतिक वेदनेने द्रौपदीने डोळे मिटून घेतले.. नीट आठव? पूर्णं आठव?
आयुष्यातला सगळ्यात काळाकुट्टं दिवस...... कसा विसरायचा?
स्त्रीच्याच काय पण कुणाच्या शवाचीही करीत नाहीत इतकी विटंबना जित्या-जागत्या देहाची केली. एकवस्त्रा स्त्रीची लज्जा लाजाळूच्या पानाहूनही हळवी.
कसं विसरू? देहधर्माची बंधनं! ह्या.... ह्या... समाजानेच घालून दिल्या बंधनांचा मुकाट स्वीकार केलेल्या एका गृहिणीस तिच्या असहाय्य, लज्जित अवस्थेत, तिच्या केसाला धरून फरपटवीत राजसभेत आणणं? कसं विसरू?.....
कशा विसरू? उभ्या देहाला अजून आग लावतात त्यावेळी खाली वळलेल्या घरातल्या, राज्यातल्या वडिलधार्‍या नजरा?
अजून...... अजून नुस्त्या आठवणीने कानात घण घालतात, एका कुलीन स्त्रीला, पतिव्रतेला बोललेले अपशब्दं..... वेश्या, कुलटा, दासी....
उरावरलं वस्त्रं धरून ठेवणारे हात तसेच जोडून मदतीची सर्वत्र मागितलेली भीक...

कसा विसरेन? त्या नराधमाने कमरेच्या निरीला हात घालताच...... तिथे हजर असलेल्या प्रत्येकाच्या मनगटांवरचे केस...... शोभेचेही नाहीत हे ध्यानी आल्यावर फोडलेला टाहो, केलेला आकांत.....

कृष्णा, मधूसूदना धाव.....
नको अंत पाहूस आता, रुक्मिणीच्या नाथा रे....
जगद्नियंत्या, अजून कसली वाट बघतोस आता? धाव रे, तुझी द्रौपदी आज अनाथ झाली...
माझ्याच्याने नाही धीर धरवत आता ....
वैकुठाधीपती, ये रे..... आता कोणत्या उपाये बोलावू तुला?..... कुठे गुंतलास रे द्वारकेच्या राया?...

धाव... आता धाव रे....

नुस्त्या त्या विषारी आठवणींनी तडफडणारी आपली सखी बघून कृष्णाच्या डोळ्यांना करुणेची धार लागली.

हे अंतर्यामी, सख्या, माझ्या जीवीच्या जिवलगा....

द्रौपदीला लख्खं आठवलं.....
ज्याक्षणी तिनं त्याला सखा म्हटलं, अंतर्यामी म्हटलं.... ज्याक्षणी आपल्या असण्या-नसण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली त्याक्षणी आत-बाहेर उसळलेल्या अष्टगंधाच्या सुगंधाच्या लाटा, अंतर्मनाचा ढवळून निघाला डोह शांतवणारी पावरीची निळी गाज.... अन तिच्या अवघ्या अस्तित्वाला वेढणारी पितांबराची गहिरी मखमली सळसळ......

’कृष्णे, पाहिलस... पाहिलस मी कसा बांधलेला आहे ते? मनात आणलं तर काय करू शकणार नाही..... असा हा तुझा सखा! त्याला मनात वाट्टेल ते आणण्याचं स्वातंत्र्य नाही...
पांचाली, त्यासाठी तुझ्या भावनांनी मी बद्ध आहे, ती माझी मर्यादा आहे. तू द्वारकेच्या राजा म्हटलस तर मी द्वारकेत, वैकुठाधीपती म्हटलस तर मी तिथेही...
पण मी त्यापैकी कुठेच नाही, कृष्णे..... मी कुठेच नाही.... अंतर्यामी, तुझ्या चित्तात वसलेला, तुझा सखा म्हणायला किती वेळ घेतलास, सखे, किती वेळ...’, दोन्ही हात गवाक्षात ठेवून कुठेतरी अंतराळात बघत आता कृष्णं प्रश्नं विचारीत होता.... तिलाच की आणखीही कुणाकुणाला?

अचंबित, निश्चळ कृष्णा अपलक दृष्टीनं त्याच्याकडे पहात राहिली.

अळेबळे भानावर येत कृष्ण वळला. तिच्याकडे बघत म्हणाला, ’दही घालतेस ना हातावर? निघायची वेळ झाली’

आज आपल्या घरच्या पंगतीत शेवटी उष्टं काढलेल्या त्या हातांवर दही घालताना, द्रौपदीचे हात थरथरू लागले... अपार मायेने, भक्तीने, समाधानाने आतून भरून येताना जाणवलं की आत काही रितं नाही..... कुठेच रितं नाही.

दही खाऊन हात पुसण्यासाठी इथे-तिथे बघणाया कृष्णापुढे तिनं आपलं पाटव धरलं. हसून त्याला उष्टे हात पुसत, तो वळणार इतक्यात तिनं त्याला थांबवलं. संध्याकालच्या किरणांसारखं मंद, मऊ-मवाळ हसू सांडणाया ओठांच्या कडेस दही लागलं होतं. आपल्याच पाटवाने ते पुसत ती ओलं हसली. तिच्या डोक्यावर थोपटीत कृष्णं वळला आणि ती नजरेतल्या पाण्याच्या पडद्यावर त्याचं मोहनी रूप रेखून घेताघेतानाच दृष्टीआड झालाही....

डोळे कोरडे करण्यासाठी पदराचा शेव उचलला अन....
द्रौपदी तिथेच थबकली.... सकाळपासून घमघमणारा केवड्याचा गंध काही येईना.... आत-बाहेर उसळू लागल्या अष्टगंधाच्या सुगंधाच्या लाटा थोपवणं आता तिच्या हाती राहिलं नाही....

समाप्तं.

गुलमोहर: 

प्रतिक्रिया म्हणजे काय असतं कुणी सांगेल का?
नुसताच नि:शब्द झालोय हे वाचून..
एकच दाद देतो दाद,
वैभवच्या गझला, कविता वाचून जे होतं, तसंच काहीतरी होतं तुझं लिहिलेलं वाचताना..
आम्ही वाचणारे भाग्यवान आहोत हेच खरं !

शलाका विश्वास ठेव अथवा ठेवू नकोस....पण मुखपृष्टावर गुलमोहोरात नवीन साहित्याची लिस्ट पाहिली तिथे हे नुसत हेडींग वाचल....तिथनं इथे आणि सुरवातीच्या काही ओळी ... नजर झरझर खाली .....आणि हे तुझच लिखाण असु शकत याची खात्री पटली...... Happy
जिओ दोस्त!!!!!!

बाकी आफताबला अनुमोदन.

शलाका,
अप्रतिम, सुरेख, हळवं, मनाच्या तारा छेडणारं लिहितेस ग तू... सलाम तुला नि तुझ्या लिखाणाला..

तुझ्या गोष्टीवरून एक जुनं कुठेतरी वाचलेलें आठवलं...

द्रौपदीनं कृष्णाला असंच कळवळून विचारलं, 'मला तुझी सखी म्हणतोस.. नि माझी इतकी विटंबना होईपर्यंत का थांबलास रे तू?'

त्यावर तो हलकेच हसून म्हणाला, 'अग, तुला सभागृहात ओढत आणल्यापासून बाहेर उभाच होतो ग मी.. पण तू भीम, अर्जुन, नकुल सहदेव सार्‍यांना हाका मारत सुटलीस. मला पाच पती आहेत नि ते माझ्या केसालाही धक्का लावू देणार नाहीत हा विश्वास होता तुला... ज्याक्षणी तो विश्वास नाहीसा झाला नि मला आर्त हाक दिलीस त्याक्षणी आत आलो मी...'

खरंच, जगात समस्या आल्या की आपल्या सभोवतालच्या लोकांवर किती भरवसा असतो आपला.. तोच त्या परमेश्वरावर ठेवला तर?

श्यामली.. अगदी अगदी.. मी पण हेच लिहायला आलो.. Happy
दाद, तुझी ही शब्दांची वरात सुरवाती पासुन शेवटपर्यन्त पहावी अशीच असते.
- अनिलभाई

वा शलाका!!
महाभारत.माझा अत्यंत आवडता विषय. सर्वत्र संचार आहे तुमचा. विषय कोणताही असु द्या,तेवढ्याचं समर्थपणे मांडता. सुंदर!!

काय लिहितेस गं शलाका!!! पुन्हा पुन्हा वाचंत रहावसं वाटलं!!!!

सर्वांना मोदक.
अतिशय सुरेख! भावना नेमक्या शब्दात मांडायला अचूक जमतं तुम्हाला.
सुमॉ, बातमे प्वोईंट है!

नमस्कार दाद...
खुपच छान लिहिले आहे...वाचताना असे वाटते कि सगळा प्रसन्ग आपल्यासमोरच चालला आहे.
धन्यवाद!

दाद,

मला हि कल्पना आवडलि तुम्हि खुलवलि पण खुपच सुरेख पण मनाला काहि भावल नाहि कारण एकंदर ज्या घटनाक्रमाप्रमाणे तुम्हि हा संवाद चितारलाय त्या घटनाक्रमात गल्लत झाल्यासारखि वाटतेय. माझ्या माहितिप्रमाणे मुळ महाभारतातला घटनाक्रम असा:

मुळात युधिष्टिराने केलेला यज्ञ हा अश्वमेध नव्हता तर राजसुय होता दोन्हि मागिल तत्व एकच असल (चक्रवर्ति सम्राटाच्या वर्चस्वाचा पुरावा) तरिहि विधिंमध्ये काहि फरक होते उदा. अश्वमेधाच्या वेळि जी घोडा सोडण्याचि प्रतिकात्मक पध्धत होति (जो रामाने सोडला आणि लवकुशाने अडवला होता) तशि पध्धत राजसुय यज्ञात नव्हति. चार पांडवांनि एकेक दिशा पकडुन त्या दिशेतिल राजांना युध्ध करा अथवा मांडलिक व्हा अस आव्हान दिल. ह्या दिग्विजय मोहिमेचि सुरुवात म्हणुन भीमार्जुनांनि कृष्णासमवेत मगध देशात जावुन जरासंधाला मारण्याचा बेत आखला. भीमाने जरासंधाला मल्लयुध्धात मारल आणि त्याच्या बंदिवासात असलेल्या राजांचि मुक्तता केलि.

राजसुय यज्ञात द्रौपदिने दुर्योधनाचा अपमान केल्यामुळे संतापलेल्या दुर्योधनाने कुठल्यातरि यज्ञाच्या निमित्ताने पांडवांना हस्तिनापुरात बोलावल आणि द्युत खेळण्याच आमंत्रण दिल. ह्या द्युतात शकुनिने वापरलेले फासे हे जरासंधाच्या हाडांचे होते, भीमाच्या आवाजाने ते थरथरत आणि युधिष्ठिराचे दान चुकिचे पडत असे. ह्या सगळ्याचे परिवसन अखेर द्रौपदिच्या पणाला लागण्यात झाले. दु:शासन तिला केसांना धरुन फरफटत आणत असताना भीमाने त्याच्या रक्ताने द्रौपदिचे केस सावरिन अशि प्रतिज्ञा केलि म्हणुन पुढे वनवासाच्या काळात द्रौपदि केस मोकळे ठेवित होति. जे तिने दु:शासनाच्या वधानंतर बांधले.

काय लिहू.. आफताबशी सहमत.. खूप निशब्द करतेस तू..
प्लीज लिहीत रहा!

वाह दाद वाह !!!
तुझा '.....' चा वापरही किती चपखलपणे जाणवतो. वाचलेला संवाद जसाच्या तसा मनात संवादरूपी प्रकटतो.
सुरेख !!
तुला मानाचा मुजरा दाद !!
कितीही वाचले तरी समाधान होत नाही.

मला वाटते पांडवांनी दोन यज्ञ केले होते. पहिला राजसूय- ह्यात कृष्णाला अग्रपुजेचा मान देण्यावरुन वाद निर्माण झाला आणि शिशुपालाचा वध झाला. हा वाद जरासंधाने उकरुन काढला. हा यज्ञ पांडवांनी खांडववन जाळुन वसवलेल्या राज्याची (इंद्रप्रस्थ) ग्वाही फिरवण्यासाठी करण्यात आला. ह्याच यज्ञादरम्यान दुर्योधनाची फजिती झाल्यावर द्रौपदी त्याला हसली.

परंतु, पांडवांनी कुठल्या तरी यज्ञानिमित्ताने घोडा सोडला आणि तो अर्जुनाच्या पुत्राने (बभ्रुवाहन की काय असे नाव असलेला, नागकन्येचा मुलगा) पकडला आणि बाप्-लेकांत तुंबळ युद्ध झाले असे वाचल्याचे पण आठवते आहे. जर राजसूय यज्ञात अश्व सोडत नाहीत असे मानले तर हा दुसरा यज्ञ कदाचीत द्रौपदी वस्त्रहरणानंतर झाला आणि म्हणुन तिचे केस मोकळे होते. परंतु, वस्त्रहरणानंतर लगेचच वनवास, अज्ञातवास, युद्ध अशा घटना आहेत ना ? मग मधेच पांडव यज्ञ का आणि कुठला करतील ? युद्ध झाल्यानंतर केला का ? तसे असेल तर द्रौपदीचे केस मोकळे का ?

जाणकार माहिती देतील का ?

असो, दाद तुझे लिखाण मात्र नेहेमीप्रमाणेच. इतक्या सुंदर लिखाणाला प्रतिसादताना काय बरे शब्द निवडावेत अशा विचारात पाडणारे. सकाळी ऑफिसल्या आल्या आल्या बकाबका गोष्ट वाचली. इतक्या सुंदर लिखाणाला नुसते छान्/सुंदर अशी काय प्रतिक्रिया द्यायची म्हणुन काहीच लिहिले नाही. आत्ता निवांत परत वाचली तो मराठमोळीचे पोस्ट वाचले आणि भलत्याच विषयात शिरले Uhoh

दाद, अगं ललित काय... काव्य आहे काव्य..
संदर्भांबाबतीत आपल्याला फारसं खोलात माहित नाही, पण सगळेच शब्द, विराम चिन्हांसकट, अगदी आसूसून प्रेम करण्यासारखे... केवळ अप्रतिम!!

दाद,

प्रचंड सुंदर !!! खरचं खूप काव्यमय लिहिता तुम्ही !

मुळातच 'क्रिष्ण' माझा विकपॉईंट.

आणि त्यात तुमची ही तरल कविता ....वाचताना डोळे पाणावल्यागत झाले .

मराठमोळी, चूक झालीये खरी. आणि मनापासून धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल. आता सुधारण्यासाठी ह्या गोष्टीत काय बदल करावा लागेल त्याचा विचार करतेय.
मुद्दा तो नसला तरी, संदर्भ चूक असला की, दाताखाली खडा लागल्यासारखं होतं नाही? बघू कसं सुधारता येतं ते.

दाद, खुपच सुंदर!!!!

*******************************
If there is a way, I will find one.
If there is none, I will make one.

दाद.... मी इथे काहीही लिहिलं तरी त्या शब्दात तुझ्या शब्दांइतकी ताकद नसेल. आजकाल मायबोलीवर फार क्वचित येणं होतं, पण आले की काही ठराविक मायबोलीकरांनी लिहिलेला शब्दनशब्द वाचते...त्यात तू आहेस.

सलाम!!!

सगळ्यांचे खूप आभार!
बडबडी ( Happy ), मैफिलीतल्या त्या एका 'व्वा', चं 'व्वा' बोलणार्‍याला नाही पण ज्याच्यावर ते उधळलं, त्याला किती कौतुक ते काय सांगू? त्या 'व्वा'ची ताकद..... ती पुढच्या तानेत दिसते.... Happy
येत रहा गं.....

दाद, जे लिहिलेय ते इतके अप्रतिम आहे की शब्दच सुचत नाहियेत. पण यातून एक मी माझ्यासाठी वेचलंय, ते म्हणजे "तो" >>>>
कृष्णा, मधूसूदना धाव.....
नको अंत पाहूस आता, रुक्मिणीच्या नाथा रे....
जगद्नियंत्या, अजून कसली वाट बघतोस आता? धाव रे, तुझी द्रौपदी आज अनाथ झाली...
माझ्याच्याने नाही धीर धरवत आता ....
वैकुठाधीपती, ये रे..... आता कोणत्या उपाये बोलावू तुला?..... कुठे गुंतलास रे द्वारकेच्या राया?... <<<< हे सर्व असला तरी त्या विशेषणांमधे आपल्या व त्याच्यात अंतर दिसते. पण >>>>
हे अंतर्यामी, सख्या, माझ्या जीवीच्या जिवलगा.... <<< हे आपले व "त्या"चे नाते असायला हवे. Happy

अप्रतिम!!!!!!!
त्या घननीळ्या श्यामसावळ्याची प्रत्येक गोष्टच जीवाला वेड लावणारी....
तोच एकमेव अंतरीचा "सखा"
भावनांमध्ये गुंतणारं वेडं मन फक्त तोच जाणे.... अन त्यातून सोडवणही....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हजारों ख्वाइशें ऐसी
के हर ख्वाइश पे दम निकले...............

दाद, नेहेमीप्रमाणेच नितांत सुंदर... अंतर्यामी अष्टगंधाचा सुगंध दरवळवणारं...

दाद, अप्रतिमच गं.. सुरेख.. यावेळी तुझं लिखाण वाचायला उशीर झाला खरा..पण वाचता वाचता द्रौपदीच्या अश्रूंनी पार भिजवून टाकलेस गं..आणि त्यावर कॄष्णाचं निळसर हसू उमटल्याने अगदी पूजा करून झाल्यावर कसं थोडा वेळ प्रसन्न पवित्र वाटत राहतं ना.. तसं वाटतंय.. नैवेद्य दाखवून झाल्यावर धुपाचा उदबत्तीचा सुवास एकत्र दरवळत राहतात ना तसं..
असंच खूप खूप खूप लिहीत रहा.. Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल , पण लयलूट करायची ती सुगंधाचीच!
Happy

अरे, धन्यवाद सगळ्यांचेच. (अजून वाचताय?)
भक्तं आणि देवाचं नातं शब्दांच्या पलिकडलं. भक्ताच्या हट्टासाठी त्याला हव्या त्या रूपात, नात्यात भेटू येणारा.... हा विषय मला खूप भावतो. अशीच एक कथा धृवाची लिहिली होती. जुन्या मायबोलीवर. इथे टाकावी का नाही माहीत नाही... असो!
येत रहा...

दाद, खरे आहे ! त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव.

आणि नेकी और पुछ पुछ? लवकर टाका धृव.

दाद,

घटनाक्रम चुकीचा का बरोबर काहीच लक्षात राहिले नाही वाचताना! दिसत होते फक्त कृष्ण आणि त्याची सखी..

शिवाजी सावंतांचा "युगंधर" वाचतोय की काय असे वाटले. खुप खुप छान!

धन्यवाद.

वरच्या सगळ्यांना मोदक Happy बाकी काय बोलु Happy

जरासं शब्दबंबाळ वाटलं.

Pages