जनरल सिंग यांना लक्ष्य कां केले जात आहे?

Submitted by sudhirkale42 on 18 May, 2012 - 18:55

जनरल सिंग यांना लक्ष्य कां केले जात आहे?
मूळ लेखकः RSN सिंग, अनुवादः सुधीर काळे
(या लेखात "जनरल सिंग" म्हणजे आपले लष्कर प्रमुख विजय कुमार सिंग व "कर्नल सिंग" म्हणजे या लेखाचे मूळ लेखक RSN सिंग. दोघांच्या नावांत "सिंग" असल्यामुळे गोंधळ होऊ नये म्हणून हा खुलासा केलेला आहे.)
भारतीयांसाठी आज प्रामाणिक असणे हा एक शापच झाला आहे. जर जनरल सिंग यांनी त्यांना देऊ केली गेलेली लांच खिशात टाकली असती तर ते सत्ता कंपूच्या गळ्यातला ताईत बनले असते आणि सेवानिवृत्तीनंतर एकाद्या राज्याचे राज्यपालपदही त्यांना मिळाले असते.
एका ले. जनरलने आपले लष्करप्रमुख जनरल सिंग यांना लांच देण्याच्या केलेला प्रयत्न त्यांनी एका राष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत उघड केला. ही घटना या लेखाचा मूळ लेखक (कर्नल RSN सिंग), कांही जाणकार पत्रकार मंडळी व इतर कांही जणाना आधीपासूनच माहीत होती. लांच देऊ पहाणारा ले. जनरल आणि जनरल सिंग यांच्यामधील या संभाषणाची ध्वनीफीतही उपलब्ध आहे ही बातमीसुद्धा कांहीं नवी नाहीं! भारतीय लष्कराला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार्या् लॉबीच्या वतीने आपले लष्करप्रमुख जनरल सिंग यांना लाच देऊ पहाणार्या् या ले. जनरलच्या प्रतापांची माहिती सदर लेखाचे मूळ लेखक कर्नल सिंग यांनी “Who’s trying to fix the Army Chief by raking up his age?” या त्यांच्या जुलै २०११ च्या लेखात दिलीच आहे. या लेखाचे वितरणही मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
"तात्रा" नावाच्या वाहनांची अवाच्या सवा किंमतीला विक्री करण्यासाठी दबाव आणणे हाच उद्देश ही लांच देण्यामागे होता. एक विशिष्ठ कंपनी जुनी, वापरलेली "तात्रा" वाहने खरेदी करत होती व ती "भारत अर्थ मूव्हर्स लि. (BEML) या कंपनीमार्फत दुप्पटीपेक्षा जास्त भावाने विकत होती. ३०-४० लाखाला विकत घेतलेली ही वहाने शस्त्रास्त्रे पुरविणारी "लॉबी" आपल्या लष्कराला सुमारे एक कोटी रुपयाला विकत होती असे सांगितले जाते. आपल्यासारख्या करदात्यांकडून जमा केल्या गेलेल्या पैशांचा असा दुरुपयोग करणे आणि लष्कराचे आणि देशाचे असे नुकसान करणे जनरल सिंग यांना पसंत नव्हते. मग या ले. जनरलने उपरिनिर्देशित १४ कोटी रुपयांची लांच जनरल सिंग यांना देऊ केली. तरी जेंव्हां जनरलसाहेब बधले नाहींत तेंव्हां या ले. जनरलने "ही ’तात्रा’ वहाने १९८६ पासून खरेदी केली जात असून जनरल सिंग यांच्या आधीच्या लष्करप्रमुखांनी असाच व्यवहार केला होता आणि त्यांचे उत्तराधिकारीसुद्धा असाच व्यवहार करतील" असे जनरल सिंगना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
जनरल सिंग यांनी ताबडतोब वरील माहिती आपल्या संरक्षणमंत्र्यांना दिली आणि ते जर लष्करप्रमुखपदासाठी योग्य नसतील तर त्यांनी आपला राजीनामा देण्याची तयारीही दाखविली. (जनरल सिंग यांच्या राजीनामा देण्याच्या तयारीतील आशय गर्भित आणि महत्वपूर्ण आहे आणि त्याचे धागेदोरे किती खोल आणि कुठेपर्यंत पसरले आहेत हे अजून उघडकीस यावयाचे आहे.)
वरील घटनेची माहिती आपल्याला देण्यात आलेली होती अशी कबूली आपले सद्सद्विवेकबुद्धीपूर्ण आणि पापभीरू संरक्षणमंत्री अँटनी यांनी राज्यसभेत दिली आणि आपले कपाळ आपल्या ओंजळीत टेकवले. त्यांची आपले कपाळ असे आपल्या ओंजळीत टेकविण्याची कृती त्यांच्या मनातील व्यवहारबुद्धी आणि सदसद्विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षामुळे होती कीं त्यांच्या वैयक्तिक सचोटी आणि राजकीय लाचारी यांच्यातील संघर्षामुळे होती?
जनरल सिंग यांच्या वैयक्तिक सचोटीमुळे संरक्षणमंत्र्यांना जनरल सिंग यांच्याबद्दल अतीशय आदर आहे आणि हे सहाजीकही आहे कारण स्वत: संरक्षणमंत्रीसुद्धा याबाबतीत त्यांच्यासारखेच आहेत. विधिमंत्रालयाकडून सुरुवातीला जनरल सिंग यांचा त्यांच्या वयाबाबतचा युक्तिवाद नि:संदिग्धपणे मान्य केल्यानंतर संरक्षणमंत्रांनी या वादात जनरल सिंग यांच्या बाजूने जवळ-जवळ निर्णय दिलाच होता पण यावेळी संरक्षणमंत्र्यांपेक्षा जास्त शक्तिशाली लोकांनी त्यांना आपला निर्णय मागे घ्यायला लावला आणि ही केस विधिमंत्रालयाकडे पुन्हा पाठवायची सक्ती केली. यामुळे संरक्षणमंत्र्यांना सदसद्विवेकबुद्धीची टोचणी तीव्रपणे जाणविली. अँटनी यांच्या सदसद्विवेकबुद्धीला याची टोचणी लागून राहिली होती व सत्य आणि न्याय यांच्याविरुद्ध जाणून-बुजून अनेक मार्गांनी केलेल्या कारवाईची भरपाई म्हणून त्यांना अनेक राजकीय प्रलोभने आणि आश्वासने देण्यात आली [असे कांही सूत्रांकडून या लेखाच्या मूळ लेखकांना (कर्नल सिंग यांना) समजले आहे.?]
आपल्या चारित्र्याबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी तडजोड स्वीकारणे जनरल सिंग यांना पसंत नव्हते. मध्यस्थांनी खूप प्रयत्न केले पण जनरलसाहेब या तडजोडीला तयार झाले नाहींत व त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यांनी यावेळी राजीनामा दिल्यास शस्त्रास्त्रे पुरविणार्या लॉबीच्या मर्जीनुसार ठरविलेला उत्तराधिकारी निवडण्याची योजना उधळली गेली असती. तसेच राजकीय पक्षांना मिळणार्या आर्थिक देणग्यांवर त्याचा परिणाम झाला असता आणि त्यातून प्रतिकूल आणि अस्वीकारार्ह परिणाम झाले असते अशी भीती स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजणारी नोकरशाहीला वाटत होती व ही नोकरशाही सातत्याने राजकीय नेतृत्वाला ढोसत होती. परिणामत: या नेत्यांकडून जनरल सिंग यांना धमक्या मिळू लागल्या कीं त्यांनी राजीनामा दिल्यास तो मंजूरच होणार नाहीं.
अशा परिस्थितीत जनरल सिंग यांना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाहीं.
सरकार व त्याहीपेक्षा संरक्षणमंत्री अँटनी यांच्याही ज्येष्ठ सत्ताधीशांची पाचावर धारण बसली कारण त्यांना माहीत होते कीं जनरल सिंग यांची केस अजीबात गुंतागुंत नसलेली, साधी, सरळसोट केस होती. मोठे-मोठे कायदेपंडित राहिले बाजूला पण अगदी विधिमहाविद्यालयातील पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यालासुद्धा याबद्दल खात्री वाटली असती. यानंतर जे कांहीं झाले सर्वांना सुपरिचितच आहे. भारतातील प्रत्येक संस्थेने जनरल सिंग यांच्या वयाबद्दलच्या या वादात स्वत:चे नाक कापून घेतले आहे!
लष्करातील अधिकार्यांच्या जन्मतारखांच्या चुकीच्या नोंदींतून उद्भवणार्याब समस्यांना याआधी लष्कराला तोंड द्यावे लागले नव्हते असे नाहीं. अशा केसेस नित्याच्या आहेत व त्यांच्याबद्दलचा निर्णय योग्यपणे व तांतडीने घेतला जातो. १९९०च्या दशकात सेवानिवृत्तीच्या फक्त एक दिवस आधी कर्नल रमेशचंद्र दीक्षित यांच्या हुबेहूब अशाच एका वयाबद्दलच्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यात आलेले होते. जनरल सिंग यांच्या केसला पहिला आणि शेवटचा अपवाद केले गेले आहे. "शेवटचा अपवाद" असे म्हणायचे कारण म्हणजे संरक्षणमंत्रालयाने किंवा सेनेच्या मुख्यालयाने जनरलासाहेबांच्या केसमध्ये एकदा का MS शाखेतील नोंदीप्रमाणे कारवाई करण्याचा निर्णय दिला कीं त्यानंतर कायदेशीर मार्गाने लष्कराची यादी किंवा MS शाखेची यादी AG शाखेपेक्षा जास्त ग्राह्य धरली जाईल असे कायदेशीर रीतीने ते म्हणूच शकत नाहीं.[१]
म्हणजेच जनरल सिंग यांच्या बाबतीतील निर्णय एक कपट, एक फसवणूकच होती. ही फसणूक इतकी अवाजवी आहे कीं या कारवाईने भारताला एक "बनाना प्रजासत्ताका"च्या [२]पायरीवर आणून बसविले आहे. कुणी रचले हे कपट कारस्थान? हे दोन पाठोपाठच्या माजी लष्करप्रमुखांनी रचले आहे! घृणास्पद आणि किळसवाण्या कपटी भानगडींत सामील झाल्यामुळे यांच्या इज्जतीच्या, प्रतिष्ठेच्या आज ठिकर्या उडाल्या आहेत. उदाहरणार्थ कारगिलच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांसाठी राखून ठेवलेल्या सदनिका हडप करणार्या आपल्या माजी लष्करप्रमुखांना काय म्हणाल आपण? अशा कृत्यांपेक्षा दुसरे कुठले नीच कृत्य असू शकते? याच माजी लष्करप्रमुखांनी आपल्या वडीलकीच्या नात्याने आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या जनरल सिंग यांच्यासारख्या अधिकार्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक सचोटीचे आणि नीतिमूल्यांचे रक्षण करायच्याऐवजी जनरल सिंग यांनी एक विशिष्ठ जन्मतारीख मान्य करावी म्हणून त्यांच्यावर सक्ती केली आणि त्यांनी असे मान्य न केल्यास हा विवाद वापरून त्यांच्या व्यावसायिक प्रगतीची आगगाडी रूळावरून घसरविली जाईल अशी गर्भित धमकीही दिली! या माजी लष्करप्रमुखांनी खरे तर लष्कराच्याच मुख्यालयातील एका शाखेने केलेल्या चुकांबद्दल जनरल सिंग यांची माफी मागायला हवी होती! संघटनात्मक निर्बंधांच्या नावाखाली वारंवार केलेल्या आवाहनांच्या दबावापोटी या चुकीच्या जन्मतारखेबाबत जनरल सिंग यांच्याकडून स्वीकृती मिळाल्यानंतर या माजी लष्करप्रमुखांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण आता शस्त्रास्त्रे पुरविणार्या लॉबीच्या पसंतीचा उत्तराधिकारी निवडण्याची योजना आता सुरक्षित झाली होती! जनरल सिंग यांनी संघटनात्मक निर्बंधांबाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठी केलेल्या नंतरच्या आवाहनाबाबत सर्वांनीच कानावर हात ठेवले.
तात्पर्याने अशा लष्करप्रमुखांच्या हाताखाली भारतीय लष्कर आणि लष्करातील अधिकारी सुरक्षित नाहींत.
नोकरशहा या प्रकारात ओढले गेले ते जनरल सिंग यांनी स्वत: लष्करप्रमुख झाल्यावर आपल्या जन्मतारखेच्या चुकीच्या नोंदीचा पाठपुरावा सुरू केल्यावरच. आदर्श चारित्र्य असलेल्या (impeccable credentials ) चार माजी सरन्यायाधीशांनी जनरल सिंग यांच्या बाजूने केलेले मतप्रदर्शनही मंत्रालयाच्या नैतिकतेवर परिणाम करू शकले नाहीं. विधिमंत्रालयाने जनरल सिंग यांची बाजू नि:संदिग्धपणे उचलून धरल्याचाही कांहींही उपयोग झाला नाहीं. हा प्रश्न त्यांनी कांहीं अतिरिक्त महिने काम करण्याचा नसून त्यांच्या इज्जतीचा आहे असे जनरल सिंग यांनी सांगूनही त्याचा उपयोग झाला नाहीं. केवळ राजकीय नेत्यांनी आणि नोकरशहांनीच त्यांची टर उडविली असे नाहीं तर कांहीं सेवानिवृत्त जनरल्सनीही त्यांच्यावर टीका केली.
वारंवार चित्रवाणीच्या वाहिन्यांवर जनतेने त्यांना पाहिलेले असल्यामुळे या सेवानिवृत्त जनरल्सचे चेहरे आता जनतेला चांगलेच परिचित झालेले आहेत. या सर्वांचे गतायुष्य संशयास्पदच आहे. बायकांच्या बाबतीत चारित्र्य चांगले नसल्याबद्दलच्या गुप्तहेरखात्याच्या अहवालामुळे त्यातल्या एकाला सक्तीने राजीनामा द्यावयास लागला होता. दुसर्यावर आपल्या वरिष्ठ अधिकार्याच्या पत्नीबरोबर पळून गेल्याचा ठपका होता आणि तिसरा त्याच्या पदव्या खोट्या असल्यामुळे अडचणीत आला होता. ही आहे जनरल सिंग यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणार्यांची लायकी!
हे आणि असले लष्करी अधिकारी आपल्या लष्करातली ही घाण कशी कित्येक वर्षांपासून साचलेली आहे याचीच ग्वाही देतात. कारगिलच्या युद्धानंतर यातल्या कांही जनरल्सनी निर्लज्जपणे स्वत:लाच कसे भूषवून घेतले यावरूनही हे स्पष्ट होते. कुठल्याही तर्हेचे शौर्य किंवा युद्धातील डावपेचांबाबतचे कसलेही कौशल्य त्यांनी दाखविलेले नव्हते. यातल्या कांहींना तर घरीच पाठवायला हवे होते. पण त्या काळातल्या राजकारणाने त्यांना वाचविले.
लष्करी सामुग्रीच्या खरेदीशी संबंधित भ्रष्टाचार कांहीं नवा नाहीं. त्याची सुरुवात तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच सुरू झाली होती. त्यात कृष्ण मेनन यांच्या काळात झालेले जीप खरेदीप्रकरणही होते. "तेहेलका"ने ध्वनीफितींवर आणि चित्रफितींवर "रंगे हाथ" पकडल्यामुळे प्रसिद्धीला आलेल्या भानगडीच्या मुळाशीसुद्धा असला भ्रष्टाचारच होता. मग आता जे बाहेर येत आहे यात नवे ते काय आहे?
आपला लष्करप्रमुख कोण असेल आणि त्याची कारकीर्द किती वर्षें चालेल हे ठरवू शकेल इतक्या उच्च थरावरील प्रभाव या लष्कराला शस्त्रास्त्रे पुरविणार्याी लॉबीला प्राप्त झाला आहे हीच नवी धक्कादायक आणि घातक गोष्ट म्हटली पाहिजे! या लॉबीची पोच, तिची पाळेमुळे सरकारच्या प्रत्येक महत्वाच्या संस्थांमध्ये अगदी खोलवर घुसली आहेत. या लॉबीने जनरल सिंग यांच्या जन्मतारीखेचे कुभांड टिकून रहावे म्हणून कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत असे बोलले जाते. या लॉबीचा प्रभाव इतका खोलवर घुसला आहे कीं प्रत्येक प्रामाणिक भारतीयाला नि:संदिग्धपणे माहीत असलेल्या सत्याचा विजय होण्यासाठी एकादा ईश्वरी हस्तक्षेप घडून यावा लागेल. आणि ते सत्य कोणते? ते आहे नैतिकदृष्ट्या आणि कायद्याच्या दृष्टीने जनरल सिंग यांची खरी जन्मतारीख १० मे १९५१ हीच आहे आणि दोन माजी लष्करप्रमुखांनी शस्त्रास्त्रे पुरविणार्या लॉबीच्या आज्ञेबरहुकूम त्यांच्यावर लादलेली १० मे १९५० ही त्यांची जन्मतारीख खरी नाहीं! आपल्या लष्करात इतक्या जास्त प्रमाणावर अप्रामाणिक अधिकारी आहेत ही गोष्टही नक्कीच नैराश्य निर्माण करणारी आहे.
या लॉबीने सर्वात आधी जनरल सिंग यांच्या जन्मतारीखेबद्दलचा विवाद उभा करून एक कट रचला, पाठोपाठ त्यांनी "जनरल सिंग-संरक्षणमंत्री" आणि "नोकरशाही-लष्करी अधिकारी" यांच्यात मतभेदांची दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यात आधी जनरल सिंग यांच्या सचोटीची वाखाणणी करून संरक्षणमंत्र्यांच्या अडमुठेपणावर भर दिला, मग परंपरा व आधीपासून रुळलेल्या प्रथा (precedences) वापरून जनरल सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये असा प्रयत्न केला, नंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका जनरल सिंग यांनी मागे घ्यावी यासाठी या लॉबीने मोहीम सुरू केली, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात जनरल सिंग यांच्या जन्मतारखेबद्दल कांहींच उल्लेख नव्हता म्हणून जनरल सिंग यांच्यावर राजीनामा देण्यासाठी मानसिक दबाव आणण्याचे प्रयत्न केले गेले आणि जेंव्हां जनरल सिंग यांनी राजीनामा देण्यास नकार दिला तेंव्हां त्यांच्या बडतर्फीसाठीही मोहीम याच लॉबीने सुरू केली!
संरक्षणमंत्र्यांच्या ऑफीसमधील संभाषण चोरून ऐकण्यासाठी जनरल सिंग यांच्या सांगण्यावरून तिथे एक छुपा माइक्रोफोन बसवला गेला होता या आवईकडेसुद्धा याच पार्श्वभूमीवरून पाहिले पाहिजे. पण हे कपट इतके निकृष्ठपणे योजले होते कीं ते लगेच कोसळले! हे कपट रचणारी माणसं मात्र अद्यापही शिक्षेची भीती नसल्यासारखे राजरोसपणे मिरवत आहेत. जनरलासाहेबांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातला मजकूर फुटल्याबद्दलच्या बातमीकडेही याच पार्श्वभूमीवर पाहिले पाहिजे. यासाठी लष्करप्रमुखांना नोकरीवरून काढून टाकण्याची अजब मागणीसुद्धा शस्त्रास्त्रे पुरविणार्या लॉबीच्या आज्ञेवरूनच करण्यात आली होती!
"जनरल सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे" ही मोहीम पूर्वी भारताच्या सुरक्षिततेला बाधा आणण्यास कारणीभूत झालेल्या आणि विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या एका जराजर्जर माजी मुत्सद्द्याला वापरून सुरू करण्यात आली पण हे करणार्यांना इतकेही माहीत नव्हते कीं अशी तरतूद लष्करासंबंधींच्या कायद्यात अंतर्भूतच नाहीं. या मुत्सद्द्याची स्वत:चीच स्थिती डळमळीत असल्यामुळे त्याला "जनरल सिंग यांना नोकरीवरून काढून टाकावे" असे सांगावेसे वाटले नाहीं. या सर्व प्रकरणाबाबत बोलण्याचा कांहींही अधिकार नसलेला आणि लष्कराच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल कांहींही माहिती नसलेला आणखी एक माजी मुत्सद्दी जनरल सिंग यांच्यावर टीका करण्यात खास उत्साहाने भाग घेत आहे. असे करण्यात या गृहस्थांना एकाहून जास्त हेतू आहेत हे उघड दिसत आहे. या मुत्सद्द्यानुसार जनरल सिंग यांच्याविरुद्ध उत्तर भारतातून प्रकाशित होणार्या एका दैनिक वृत्तपत्रातील ही अभूतपूर्व मोहीम पंतप्रधानांच्या मूक संमतीनेच होत आहे. हे जर खरे असेल तर एकाद्या पंतप्रधानाने आपल्याच लष्करप्रमुखाविरुद्ध अशा कारवाया करण्याची घटना फक्त "बनाना प्रजासत्ताकां"तच[२] होऊ शकते.
कांही वर्षांपूर्वी एक अधिकारी कमांडर नदीम यांना ते सकाळी शांति पथावरील हिरवळीवर आपला नेहमीचा "जॉगिंग"चा व्यायाम घेत असताना त्यांना एका ट्रकने उडविले होते. कांहीं संवेदनशील शस्त्रास्त्रांची खरेदी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. या घटनेमागेही शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारी लॉबीच होती असा दाट संशय त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता व त्या संशयाचे अद्याप निराकरण झालेले नाहीं. संरक्षण मंत्रालयातील एक अधिकारी कुमार यशकर सिन्हा आणि त्यांची पत्नी यांचा अलीकडेच झालेला मृत्यूही बुचकळ्यात पाडणारा आहे. आधी पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि मग स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्त्या केली असे पोलिसांना वाटले होते. पण त्या अधिकार्याच्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केल्यावर तो सुस्वभावी आणि अतीशय चांगल्या चारित्र्याचा गृहस्थ होता व त्याच्यात आणि त्याच्या पत्नीत चांगला वैवाहिक सुसंवाद होता असे आढळून आले. म्हणून त्याच्यात आत्महत्या करण्याची प्रवृत्ती असण्याची शक्यताच नसावी. गुन्ह्याच्या जागी मिळालेल्या पत्रात असलेल्या "कामात वरिष्ठ अधिकार्यांच्याकडून आलेला दबावा" या उल्लेखावरून पोलिसांना त्याच्या आत्महत्येचा संशय आला असावा. पण हे सारेच अजब आहे. कारण कामावरील तणावामुळे आपल्या पत्नीचा खून कुणीच करणार नाहीं. आपल्या पत्नीचा गळा दाबून खून करून कुणीच स्वत:ला पेटवून घेणार नाहीं. असा यातनामय मृत्यू पत्करण्यापेक्षा त्याने स्वत:ला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली असती. हा अधिकारी संरक्षणमंत्रालयातील एका माहिती मिळविण्याच्या अधिकाराच्या (RTI) केसवर काम करत होता. या अधिकार्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या हत्येमागेही शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारी लॉबी असण्याची शक्यता नाकारता येत नाहीं.
शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार्या लॉबीच्या कारस्थानांनी आपल्या लष्करातील अत्युच्च नेतृत्वाला बरेच डळमळीत करून टाकले आहे असे दिसते. एका माजी लष्करप्रमुखाने शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारी लॉबी, नोकरशाही आणि राजकीय नेते यांच्या दुव्यातून राजकीय देणग्या मिळविण्याच्या प्रथेचा प्रारंभ केला. बिनीच्या "खेळाडूं"ची आणि बिनीच्या संस्थांची हातघाई आणि क्रौर्य पहाता या मागे २०१४च्या निवडणुकांची प्रेरणाही असू शकेल.
शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार्या लॉबीच्या आदेशानुसार आपल्या लष्करातील उत्तराधिकाराची योजना बनत आहे ही फारच गंभीर आणि काळजी करण्यासारखी स्थिती आहे. उच्चपदावरील कांहीं अधिकार्यांना बाहेर काढण्यापुरता हा प्रश्न उरला नसून त्यांचा एका पाठोपाठ दुसरी अशी घटनांची शृंखला निर्माण होऊन त्यातून लष्कराच्या संपूर्ण निवड-प्रक्रियेतच बाधा येण्याची आणि परिणामत: भारताच्या संपूर्ण लष्करालाच दगाफटका होण्याची शक्यता आहे.
"एक देश म्हणून भारताचे अस्तित्व टिकून राहील ते केवळ भारतीय लष्कराच्या जिद्दीवर, चिकाटीवर" हे लॉर्ड वेव्हेल यांचे विधान आपले लष्कर एक परिणामकारक आणि निर्दोष संस्था आहे या आधारावर त्यांनी केले होते. ही संस्था आता केवळ तिच्या कडांवरच उसवू लागलेली नसून तिला आता अधिकार श्रेणीच्या शिखराकडूनच धोका निर्माण झालेला आहे. ही घसरण अशीच चालू राहिली तर संपूर्ण भारतच उसवून जाईल. खरे तर आता आपले सरकारच आपला नैतिक अधिकार झपाट्याने घालवत आहे. अशा परिस्थितीत जर हा शेवटचा बुरूजही कोसळला तर आपला देश खरोखरच एक "बनाना प्रजासत्ताक" म्हणूनच जिवंत राहील.
म्हणूनच आपण आपल्या लष्कराला आणि देशाला वाचविले पाहिजे.
---------------------------------------------------------
All opinions in this translated article are of the original author Mr RSN Singh.
(RSN Singh is a former military intelligence officer who later served in the Research & Analysis Wing. The author of two books: Asian Strategic and Military Perspective and Military Factor in Pakistan, he is also a columnist for Canary Trap. This post was first published on Firstpost on April 6, 2012)
Original article can be read on:
http://canarytrap.in/2012/04/06/why-is-gen-vk-singh-being-targetted/
---------------------------------------------------------
टिपा:
[१] इथे लिखाण उलट-सुलट झाले आहे असे वाटते. कारण जनरल सिंग यांच्या बाबतीत संरक्षण मंत्रालयाने AG शाखेच्या नोंदीनुसार निर्णय न घेता तो MS शाखेतील नोंदीनुसार निर्णय घेतला. म्हणजेच primacy मिळाली MS शाखेतील नोंदीला!
[२] आर्थिक दृष्ट्या फळे, खनिज द्रव्यें यासारख्या फारच मोजक्या साधनसंपत्तीच्या निर्यातीवर अवलंबून असलेल्या आणि संख्येने अगदी छोटा पण अतीशय श्रीमंत असा सत्ताधारी समाज (राजकारणी, उद्योगपती आणि लष्करशहा) आणि संख्येने प्रचंड पण अती गरीब असा कष्टकर्यांचा समाज अशी अतीशय विषम विभागणी असलेल्या राजकीय दृष्ट्या अस्थिर राष्ट्राला "बनाना रिपब्लिक" म्हणतात. अशा राष्ट्रात साधारणपणे "हम (सत्ताधारी) करेसो कायदा" असा सामाजिक न्याय असतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सैन्याला सरकारचे आदेश पाळावेच लागतात. नाही पाळले तर कोर्टमार्शल होऊ शकते. सैन्य म्हणजे कारखान्यातील कामगार नव्हेत की जे युनियनच्या आदेशावर काम बंद करतात. सैन्याने शिस्त व सरकारचे आदेश नाही पाळले तर देशाची वाट लागेल.

विष्णू भागवतांनी सरकारचा आदेश धुडकावून सरकारला आव्हान दिले होते. तत्कालीन सरकारने योग्य ती पावले उचलून त्यांना बडतर्फ करून त्यांचे निवृत्तीवेतनही रोखले होते. त्यावेळी त्यांनी अनेक मुलाखती देऊन सरकारवर आगपाखड केली व सरकारवर जातीयवादाचेही आरोप केले. (त्यांच्या पत्नी या मुस्लीम असून त्यांनी १९९२-९३ च्या मुम्बई दंगलीत व बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात बरीच प्रकरणे लावून धरली होती). २००२ च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी हिरिरीने मोदींविरूद्ध प्रचार केला. २००४ च्या लोकसभा निवडणुकीतही आपल्यावर या जातीयवादी सरकारने अन्याय केला असा कांगावा करून भाजप सरकारविरूद्ध प्रचार केला होता.

जनरल सिंग हे बरेचसे तसेच वागत आहेत. सरकारविरूद्ध न्यायालयात खटला दाखल करणे, प्रक्षोभक व सरकारला आव्हानात्मक मुलाखती देणे, आपल्याला लाच देण्यात येत आहे हे १४ महिन्यांनी जाहीर करणे, भारताची लष्करी सामग्री अत्यंत जुनाट व कालबाह्य आहे असा जाहीररित्या गौप्यस्फोट करणे असे अनेक वाद त्यांनी गेल्या काही महिन्यात निर्माण केले आहेत. असे वागणे हे सैन्याच्या सर्वोच्च अधिकार्‍याने सरकारला आव्हान देण्यासारखेच असून बंडासारखेच आहे.

२ वर्षांपूर्वी श्रीलंकेचे सैन्यप्रमुख फोन्सेको यांनी असाच अध्यक्ष राजेपक्षे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. पण राजेपक्षे यांनी तातडीने त्यांची तुरूंगात रवानगी करून 'हू इज द बॉस' हे दाखवून दिले होते. वाजपेयींनी देखील भागवतांना त्यांची जागा दाखवून दिली होती. पण दुर्दैवाने जनरल सिंग यांना आवर घालण्यात मनमोहन सिंग व अँटोनी अपयशी ठरले आहेत. ३१ मे ला निवृत्त झाल्यावर सिंग अजूनच चेकाळतील असे वाटते.

मास्तुरेंच्या वरच्या पोस्ट मधे खुप विसंगती आहे. अ‍ॅडमिरल भागवत यांच्या बाबत नक्की काय झाले हे वर्तमानपत्रात आले नव्हते, (माझ्या आठवणी प्रमाणे) त्यांनी सर्व मुलाखती किंवा "बंडाचा झेंडा" बडतर्फी नंतरच रोवला. बडतर्फीच्या आधी कुठली मुलाखत दिल्याचे आठवत नाही. त्यांच्या बायकोचे क्म्युनिस्ट विचारसरणींशी जवळिकता होती.

जनरल सिंग हे बरेचसे तसेच वागत आहेत. सरकारविरूद्ध न्यायालयात खटला दाखल करणे
----- जनरल सिंग यांचे प्रकरण संपुर्णत: वेगळे आहे. तुलना करणे योग्य वाटत नाही.

प्रक्षोभक व सरकारला आव्हानात्मक मुलाखती देणे, आपल्याला लाच देण्यात येत आहे हे १४ महिन्यांनी जाहीर करणे
------ जनरल सिंग यांनी १४ महिन्यांपुर्वीच (म्हणजे कुठलाही विलंब न लावता, तत्काळ) संरक्षण मंत्री अँटोनी यांना या प्रकरणाची माहिती दिली होती. अँटोनी यांनी स्वत: त्यांना अशी माहिती आपल्याला जनरल सिंग यांनी त्याकाळात पुरवली होती यास संसदेत कबुली दिलेली आहे. मतभेद कारवाई का केली नाही यावर आहेत. त्यांनी प्रोटोकॉल पाळला...

भारताची लष्करी सामग्री अत्यंत जुनाट व कालबाह्य आहे असा जाहीररित्या गौप्यस्फोट करणे
------- जनरल सिंग यांनी स्वत: जाहिर रितीने कुठलाही गौप्यस्फोट केलेला नव्हता. जनरल सिंग यांनी योग्य माध्यमाने पत्र पंतप्रधान (आणि संरक्षण मंत्री) यांना पाठवले होते, त्या पत्रात संरक्षणाच्या दृष्टिने नाजुक माहिती होती. ते पत्र कुठेतरी फुटले... आणि सर्व संशयाची सुई सरकारकडे जाते. पत्र फुटले नसते तर बातमी गुप्त राहिली असती ... पण पत्र फुटल्याबरोबर सर्वच राजकीय पक्षांनी (राजद किंवा कम्युनिस्ट) अपरिपक्वता दाखवत जनरल सिंग यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली होती. पवारांनी आणि भाजपाने सिंग याच्या पत्रप्रपंचावर नापसंती व्यक्त केली होती, काँग्रेस वातावरण कुठे झुकते आणि पुढचे फासे कसे टाकायचे याची आखणी करत होती.

जनरल सिंग यांना असे पत्र लिहायचे अधिकार आहेत का याबाबत मला माहिती नाही. पण हे पत्र "Official communication" होते असे माझ्या वाचनांत आले आहे. स्वतः सिंग यांनी पत्र फोडणार्‍या व्यक्तीने देशाचा विश्वासघात केला आहे असे म्हटले आहे. हे पत्र कॅबिनेट सेक्रेटरियट मधुन फुटले आहे अशा बातम्या आहेत. संशयाची सुई लष्कर प्रमुखांच्या कार्यालयाकडे वळत नाही म्हणुन आता या प्रकरणावर पडदा टाकणे सुरु आहे.
http://articles.economictimes.indiatimes.com/2012-05-13/news/31689645_1_...

भारता सारख्या देशांत हे सिद्ध करणे अत्यंत किचकट आहे... पण जनरल सिंग यांनी जाहिर केले असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल.

असे अनेक वाद त्यांनी गेल्या काही महिन्यात निर्माण केले आहेत. असे वागणे हे सैन्याच्या सर्वोच्च अधिकार्‍याने सरकारला आव्हान देण्यासारखेच असून बंडासारखेच आहे.
------- सैन्याच्या सर्वोच्च अधिकार्‍याने सरकारला आव्हान दिले आहे असे मला वाटत नाही. देशाची संरक्षण सिद्धता यावर प्रत्येक सैन्यप्रमुख हा पंतप्रधानांना त्याच्या कार्यकालाच्या शेवटच्या टप्प्यात माहिती पुरवतो. या मधे जनरल सिंग यांनी काही वेगळे केलेले नाही, तसेच त्यांनी काही वेगळी माहिती पण पुरवली नाही. त्यांनी सत्य परिस्थिती कथन केलेली आहे. ६२ साली आपल्या सैन्याकडे पायांत घालण्याचे हिवाळी बुटे पण नव्हती आणि आपले प्रधान चीनला आव्हान देत होते. मी येथे -४० सें मधे रहात आहे आणि साधे बुटे, हिवाळी बुटे, अत्यंत मजबुत हिवाळी बुटे घातल्यावर काय फरक पडतो हे अनुभवले आहे.

आपला देश जगांतला सर्वात मोठा आयातदार देश आहे आणि हजारो कोटींची सामग्री आपण विकत घेतो. ८६ मधेच बोफोर्सने तोफांच्या टेक्नॉलॉजी बाबतची सर्व कागदपत्र भारताला हस्तांतर केल्यावरही आज २५ वर्षांनंतर आपल्याला तोफा आयातच कराव्या लागत आहे यावरुन आपली संरक्षणाबाबतची सिद्धता आणि जागरुकता दिसते.

अक्षर शहा अक्षरशत्रू साहेब,
(आपले pseudonym आवडले!)
सध्या active service मध्ये असलेल्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने कर्नल सिंग यांचे MS Branch/AG Branch बद्दलचे म्हणणे बरोबर आहे असे मला सांगितले. पण अद्याप active service मध्ये असल्यामुळे ते या चर्चेत भाग घेऊ शकत नाहींत.
मी Col. RSN Singh यांच्या प्रतिसादाची वाट पहात आहे.

बंडासारखे वागणे आणि बंड यात फरक आहे. आपल्या वागण्याचे सैन्याच्या नीतीधैर्यावर काय परिणाम होतील याची तमा जनरलना नसली तरी त्यंना बडतर्फ केल्याने सैन्याचे नीतीधैर्य आणखी खचू शकते याची जाण सरकारला ठेवावी लागते.
इंडियन एक्स्प्रेसमधले संपादकीय
http://www.indianexpress.com/news/every-step-he-takes/953536/
गेल्या सहा महिन्यात बेताल वर्तनाची इतकी उदाहरणे देऊनही, तेही लष्कराच्या सर्वोच्च पदावर राहून, त्यांची भलामण करायला विचारवंत मानली जाणारी मंडळी पुढे सरसावत आहेत याचे नवल वाटते.

मास्तुरे-जी,
बर्‍याच दिवसांनी आपण दिलेला प्रतिसाद वाचून आनंद झाला. आपले म्हणणे मात्र योग्य वाटले नाहीं. त्याला उदयजींनी बरोबर उत्तर दिले असल्यामुळे पुन्हा लिहीत नाहीं.
माझ्या मते MS शाखा आणि AG शाखा यांच्यात एकवाक्यता नसणे-तेही आजच्या संगणकयुगात-ही लज्जास्पद बाब आहे. या दोन्ही शाखांमध्ये एकवाक्यता ठेवण्याची जबाबदारी संरक्षणखात्याची आहे. मग त्यांनी अशा वेगवेगळ्या नोंदी कशा काय ठेवू दिल्या गेल्या?
माझ्या वाचनात असेही आले आहे कीं बिक्रमसिंग यांना COAS बनविण्याचा एक कटच शिजत होता आणि त्याच्यामागची कारणे जी वाचण्यात येतात त्यांवरून आपल्या एकंदर सरकारी खाक्याची आणखीच लाज वाटू लागते. आता तर थेट पंतप्रधानांवर आरोप होत आहेत. जातियवादालाही यात ओढले जात आहे. एका सक्षम आणि लढाऊ संस्थेचे (फौजेचे) असे बारा वाजविणे बरोबर नाहीं.
ज. सिंग यांचे कुठे चुकले हे बरोबर कुणीच सांगत नाहीं. त्यांनी आपली जन्मतारीख बदलण्याचा अर्ज १९८५ सालापासून दिला होता असेही वाचनात आलेले आहे. मग २७ वर्षे हे भिजत घोंगडे का ठेवले गेले हे जनतेला समजले पाहिजे. उगीच दोरीला साप म्हणून झोडपणे गैर ठरेल.
क. सिंग यांच्याशी माझा प्रत्यक्ष संपर्क नाहीं. आहे तो Canary Trap या ब्लॉगद्वाराच आहे. व त्याचे मालक माझ्या लेखाला आलेल्या वाचकांच्या शंका त्यांना कळवतात व उत्तर आल्यावर मलाही पाठवितात. कांही दिवसापूर्वी आलेल्या शंकांबद्दल त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. ते आले कीं मी ते इथे देईन. ते परखडपणे उत्तर देतील कीं गुळमुळीत हे त्यांचे उत्तर मला मिळाल्यावरच मला कळेल. ते मी इथे देईनच.
माझ्या माहितीतल्या वरिष्ठ सेनाधिकार्‍यांना मी विचारले असता त्यांचे मत ज. सिंग यांच्या बाजूलाच झुकत आहे हे मात्र मी इथे पुनश्च नोंदवत आहे. पण त्यांच्याबद्दल माहिती मात्र देऊ शकत नाहीं! कारण मी ती चौकशी वैयक्तिक पातळीवर केवळ ज. सिंग यांच्याबद्दलच्या कुतुहलापोटी केलेली होती आणि त्यांचे नाव गुप्त ठेवण्याचे वचन मी त्यांना दिलेले आहे.

पुण्यात सीडीएओ चे कार्यालय आहे. तिथले निवृत्त अधिकारी माझ्या परिचयाचे आहेत. इथे आपण चौकशी करू शकता.

एमएस ब्रँचकडची नोंद ही बढतीसाठी अधिकृत मानली जाते. एजी ब्रँचकडच्या नोंदीला काहीही अर्थ नाही. एमएसब्रँच कडून हलगर्जीपणा झाला असेल तर इतर नोंदी तपासण्याचा अर्ज देता येतो. हा काही नियम नाही.

जनरल सिंह यांनी भरती होताना स्वतः जी तारीख दिली ती १९५० होती. भरती आणि बढत्या हे एमएसब्रँचचंच काम आहे. पुढे त्यांनी मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट दुरूस्त करून घेतलं आणि १९५१ ही तारीख ग्राह्य धरण्यात यावी असा अर्ज दिला.

या प्रकरणात एमएस ब्रँचकडून हलगर्जीपणा झाला आहे असं कुणीच म्हणत नाही. समजा भरतीच्या वेळी एखाद्याचे वय १७ असेल आणि चुकून त्याची जन्मतारीख एक वर्ष आधीची लागली असे प्रमाणपत्र सादर करून सरकारी नोकरी मिळाली तर सरकारी नोकरीची अट १८ वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच त्या इसमास नोकरी मिळेल.

पुढे आपण एक वर्ष लवकर निवृत्त होऊ या भीतीने त्याने अर्ज करून जन्मतारीख दुरूस्त केली तर त्याची कारकीर्द एक वर्षाने वाढेल. भरती होतानाच मी जी माहिती भरून देत आहे ती माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे, यात काही चूक झाल्यास कायदेशीर कारवाईस मी पात्र राहीन असं लिहून द्यावं लागतं. म्हणजेच चुकीच्या प्रमाणपत्रावर भरती होणे ही पहिली चूक आणि नंतर ती चूक दुरूस्त करण्यास सांगणे ही दुसरी चूक. दोन्हीकडे लाभ मिळावा हे कसं चालावं ?

काळे सर
माफ करा. कॅनरी ट्रॅप या संस्थळाबद्दल माझं मत सकारात्मक नक्कीच नाही. इतरांनी भेट देऊन ठरवावं....

The article was first published on "Firstpost" website. It was just repeated on Canary Trap. I mention Canary Trap because there is somebody from whom I can get permission and that person also has contact details of Col. RSN Singh.
I never use material without author's or publisher's permission.
We have to actually look at Col. RSN Singh's credentials who is ex-Army & ex-RAW person.
Let's wait till he replies.
Mayekar-ji, let me read the IE material.
Thanks.

उदय, काळेजी,

धन्यवाद! माझा प्रतिसाद जरा गोंधळात टाकल्यासारखा वाटलेला दिसतोय. मला थोडक्यात असे म्हणायचं आहे की, जनरल सिंग यांचे गेल्या काही महिन्यातले वागणे हे लष्कराच्या शिस्तीला धरून नाही. त्यांनी सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. सरकार व त्यांच्यातल्या शीतयुद्धाचा लष्करावर गंभीर परिणाम होऊ शकेल. सरकारला आपण न्यायालयात खेचून वाकवायचा प्रयत्न करू शकतो हा चुकीचा संदेश त्यांच्या वागण्यातून भविष्यकाळातील लष्करप्रमुखांना जात आहे. सरकारनेदेखील हे प्रकरण खूपच चुकीच्या पद्धतीने हाताळले आहे. सिंग यांचे प्रकरण सरकारने कठोर वृत्तीने हाताळायला पाहिजे होते. ३१ मे नंतर निवृत्त झाल्यानंतर सिंग यांनी तोंड बंद ठेवावे. भागवतांसारखा वाचाळपणा व उपद्रवी वृत्ती लष्करासाठी योग्य ठरणार नाही. गेल्या काही दिवसातील त्यांची वक्तव्ये बघता ही आशा फोल ठरण्याची शक्यता आहे.

मास्तुरे,

>> सरकारला आपण न्यायालयात खेचून वाकवायचा प्रयत्न करू शकतो हा चुकीचा संदेश त्यांच्या
>> वागण्यातून भविष्यकाळातील लष्करप्रमुखांना जात आहे.

असा वाद व्हायला नको होता, हे उघड आहे. कारण सैन्याच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होतो.

मात्र सरकारविरुद्ध न्यायालयात दाद मागणे हे चुकीचे नाही. अशामुळे चुकीचा संदेश जात नाही असं माझं मत. उलट भारतीय व्यवस्था निकोप आहे हेच सिद्ध होतं. काळ्या ढगाची चंदेरी किनार म्हणाना.

आ.न.,
-गा.पै.

आर्मीच्या सर्वोच्च पदाला पोहोचलेला माणूस निश्चितपणे best of the best असणार.
तरीपण मला वाटते कि जनरल सिंगना आर्मीचे नियम आणि सरकारची भूमिका यांची स्पष्ट कल्पना होती.
प्रश्न एवढाच उदभवतो कि त्यांना by hook or crook वाढीव १ वर्ष का पाहिजे होते?
All war is deception. तर या लढाईमागे त्यांचा अथवा केंद्र सरकारचा खरा उद्देश काय होता किंवा आहे?

फ्रंटलाईन वर बरेचदा चांगले रिपोर्ट्स सापडतात. या वादाच्या दोन्ही बाजू मांडणारा हा रिपोर्ट मला आवडला. नेट वर इतकी भिन्न भिन्न मतं सापडताहेत कि गांगरून जायला होतंय. अशा वेळी या लिंकचं महत्व औरच आहे..

http://www.flonnet.com/fl2903/stories/20120224290313000.htm

अक्षर शहा अक्षरशत्रू,

वरील दुव्याबद्दल धन्यवाद! खरोखरच उत्तम लेख आहे. दोन्ही बाजू पुरेश्या स्पष्टीकरणासह मांडल्या आहेत. सेनासचिव (MS) आणि सेनासहायक (AG) या दोघांत समन्वयाचा अभाव आहे. जनरल विजयकुमार सिंग यांनी सेनासचिवाची जन्मतारीख (१० मे १९५०) स्वीकारल्याचं पत्र ३१ जानेवारी २००८ ला दिलं होतं. तेव्हाच खरंतर या वादावर पडदा पडायला हवा होता. मात्र तरीही जनरल विजयकुमार सिंगांना हे प्रकरण परत का उघडावंसं वाटलं?

त्यांचे निकटवर्तीय म्हणतात की जनरल विजयकुमार सिंगांना १० महिन्यांच्या मुदतवाढीचं आकर्षण नाही. केवळ सरकारदरबारी स्वत:चा मुद्दा सिद्ध करायचा आहे. मात्र मला हे कारण पटत नाही. कुठेतरी नक्कीच पाणी मुरतंय.

जुन्या तारखेमुळे जनरल विजयकुमार सिंगांचा वारसदार बिक्रम सिंग असतील. अन्यथा शंकर घोष असतील. विशिष्ट व्यक्ती (=बिक्रम सिंग) वारसदार नसावी म्हणून तर जनरल विजयकुमार सिंग धडपडत नसतील? एकदा जुनी तारीख ग्राह्य मानल्यावर बिक्रम सिंगांचा सैन्यप्रमुखपदाचा मार्ग मोकळा होतो. तो रोखण्यासाठी न्यायालयात जाणे हा एकमेव पर्याय जनरल विजयकुमार सिंगांकडे उरला असावा.

जनरल विजयकुमार सिंगांनी न्यायालयात जाण्याबद्दल माजी सेनाधिकारी एस.के.सिन्हा यांनी औचित्याचं सूत्र उपस्थित केलंय. जनरल विजयकुमार सिंगांसारख्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकार्‍यास न्यायालयात जाऊन तमाशा मांडायची गरज का पडली असावी? स्वत:चा फायदा हा निकष फारसा सुसंगत दिसंत नाही. मात्र बिक्रम सिंगांचा मार्ग येनकेनप्रकारेण रोखणे हे उद्दिष्ट अधिक चपखल वाटतं.

थेट प्रश्न विचारतो. बिक्रम सिंग आणि त्यांच्या मागोमाग येणारे वारसदार भारतीय सैन्याला घातक ठरू शकतात का? त्यांचे लागेबांधे भारतहिताच्या मुळावर येण्याची शक्यता आहे का?

आ.न.,
-गा.पै.

सेनाप्रमुखांना जर वाटले कीं त्यांच्यावर अन्याय होत आहे तर काय त्यांनी गप्प बसायचे? हे बरोबर नाही. तेही या देशाचे नागरिक आहेत व त्यांनाही आपल्यासारखेच हक्क आहेत.
त्यांनी १९८५ पासून जन्मतारीख बदलण्यासाठी विनंती केली होती मग ते भिजत घोंगडॅ ठेवणार्‍या सरकारचीच चूक मोठी आहे.
ज. सिंग यांनी एकच चूक केली कीं वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दबावाखाली त्यांनी चुकीची जन्मतारीख मान्य केली. हे त्यांनी करायला नको होते. काय प्रकारचा दबाव त्यांच्यावर आणला गेला ते बाहेर येईल तेंव्हांच कळेल.
कधी-कधी विचार येतो कीं पाकिस्तानात सेनाप्रमुखाला अशी वागणूक दिल्यास पंतप्रधानच सौदी अरेबियाला एकाद्या 'निर्वासिता'सारखा पाठविला जातो.
तहलका प्रकरणानंतर एका ले. ज. च्या हुद्द्यावरील अधिकार्‍याला मी विचारले होते कीं जेंव्हा तुमच्या जवानांनासुद्धा त्यांचे वरिष्ठ अधिकारी इतके भ्रष्ट आहेत हे माहीत होते तेंव्हां ते जवान तुमच्या आज्ञेखातर आपला जीव द्यायला कां आणि कसे तयार होतात?
त्यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळले आणि तिरकस उत्तर दिलेले होते ते आजही मला आठवते.
ते म्हणाले होते कीं युद्धाच्या वेळी सैनिकाच्या डोक्यात मातृभूमी वगैरे विचार नसतात. त्यावेळी तो फक्त त्याच्या स्वतःच्या आणि त्याच्या बरोबरच्या सैनिकांच्या प्राणाचा विचार करतो.
म्हणजे मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देता मी न विचारलेल्या काल्पनिक प्रश्नालाच उत्तर म्हणून त्यांनी मला एक दुसरीच फिलॉसॉफी ऐकवली होती! असो.

हा दुवा वाचा. (http://www.eng.chauthiduniya.com/2012/05/generals-age-row-pm-his-wife-an...)
चौथी दुनिया हे वार्तापत्र कदाचित 'यलो जर्नॅलिझम'चा प्रकार असेल. पण त्याच्या शेवटी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबद्दलचे मत जरूर वाचा. हा लेख कुठे प्रकाशित झाला इकडे न पहाता त्यात काय लिहिले आहे ते पहा!
खाली दिलेली वाचकांची मतेही वाचावी!
सत्यासत्य मला माहीत नाहीं. मायबोलीच्या जाणकार वाचकांनी, खासकरून लष्कराबद्दल जाणकारी असलेल्या वाचकांनी, यावर त्यांचे मत जरूर लिहावे.

काळे सर

कुठलीही एक बाजू रेटून धरण्यात मला रस नाही. माझा वैयक्तिक लाभ नाही त्यात. म्हणूनच फ्रंटलाईन कडे वळालो आणि नेहमीप्रमाणेच एक तटस्थ विश्लेषण मिळाले. चौथी दुनियाला मी तरी यलो जर्नेलिझम म्हणणार नाही. जे मुख्य मेडीया टाळत असतो ते इथं मिळतं. चौथी दुनिया ने ईटीव्ही च्या राजस्थान , उत्तरप्रदेश, बिहार आदि हिंदी पट्ट्यातल्या वाहिन्यांचा शनिवारचा वेळ राखून ठेवला आहे. त्यात एका शनिवारी महागाई वरची त्यांनी केलेली फिल्म ही कौतुकास्पद होती. मुख्य प्रवाहातला मेडीया खूप शहाणा आहे असं मला म्हणायचं नाहीच.

मा सुधीर काळे, "त्यांनी १९८५ पासून जन्मतारीख बदलण्यासाठी विनंती केली होती मग ते भिजत घोंगडॅ ठेवणार्‍या सरकारचीच चूक मोठी आहे." असे आपण अनेक वेळा लिहिले आहे. इथे सरकार म्हणजे संरक्षण मंत्रालय आपल्याला अपेक्षित असावे.
मी आधी दिलेल्या एका लिंकध्ये नोंदलेल्या घटनाक्रमानुसार २००८ पर्यंत हा मुद्दा लष्कराच्याच वेगवेगळ्या खात्यांसमोर मांडला गेला. २००८ साली तत्कालीन लष्करप्रमुखांकडे मांडला गेला. त्यांनीही तो फेटाळल्यावर २०१० मध्ये संरक्षण मंत्रालयाकडे गेला, तोही एका त्रयस्थ व्यक्तीने दिलेल्या आरटीआय अर्जाच्या रूपाने. संरक्षण मंत्रालयाने नियमानुसार आणि अ‍ॅ.ज.च्या सल्ल्यानुसार हा दावा फेटाळला. पुढे सर्वोच्च न्यायालयातही तो फेटाळला गेला.

लष्कराचे दैनंदिन कामकाज आणि अधिकार्‍यांच्या नोंदी ठेवण्याचे काम संरक्षण मंत्रलयातून चालते असे आपण सुचवीत आहात का?

२००८ साली ज.सिंग यांनी आपला दावा मागे घेतला, तो दबावाखाली असा शोध आपण कसा लावला? लष्करप्रमुख होणारी व्यक्ती दबावाखाली येते हे वाचून बरे वाटले नाही.

मयेकर-जी,
मूळ लेखातील या उतार्‍यावरून माझा असा समज झालेला आहे.
याच माजी लष्करप्रमुखांनी आपल्या वडीलकीच्या नात्याने आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या जनरल सिंग यांच्यासारख्या अधिकार्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक सचोटीचे आणि नीतिमूल्यांचे रक्षण करायच्याऐवजी जनरल सिंग यांनी एक विशिष्ठ जन्मतारीख मान्य करावी म्हणून त्यांच्यावर सक्ती केली आणि त्यांनी असे मान्य न केल्यास हा विवाद वापरून त्यांच्या व्यावसायिक प्रगतीची आगगाडी रूळावरून घसरविली जाईल अशी गर्भित धमकीही दिली! या माजी लष्करप्रमुखांनी खरे तर लष्कराच्याच मुख्यालयातील एका शाखेने केलेल्या चुकांबद्दल जनरल सिंग यांची माफी मागायला हवी होती! संघटनात्मक निर्बंधांच्या नावाखाली वारंवार केलेल्या आवाहनांच्या दबावापोटी या चुकीच्या जन्मतारखेबाबत जनरल सिंग यांच्याकडून स्वीकृती मिळाल्यानंतर या माजी लष्करप्रमुखांनी सुटकेचा निश्वास सोडला. कारण आता शस्त्रास्त्रे पुरविणार्या लॉबीच्या पसंतीचा उत्तराधिकारी निवडण्याची योजना आता सुरक्षित झाली होती! जनरल सिंग यांनी संघटनात्मक निर्बंधांबाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठी केलेल्या नंतरच्या आवाहनाबाबत सर्वांनीच कानावर हात ठेवले.
आपण सगळेच (मीसुद्धा) इकडे-तिकडे वाचले आहे त्यानुसार आपली मते बनवत आहोत. म्हणूनच मी क. सिंग यांच्या उत्तराची वाट पहात आहे.

मयेकर-जी,
कर्नल सिंग यांनीसुद्धा हेच लिहिले आहे. ज. जे जे सिंग यांच्या निवडीपासून लष्करात राजकारण चालू आहे व त्याच्या मुळाशी प्रथमदर्शनी तरी भ्रष्टाचारी लॉबीच दिसते. तेच क. सिंग यांनी लिहिले आहे. तसेच ज. विजयकुमार सिंग यांच्यावर कुठल्या प्रकारे दबाव आणला गेला व त्यांनी तो कसा under protest स्वीकारला हे वाचून माझा त्यांच्याबद्दलचा आदर आणखीच वाढला! हा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद!
लष्कराची अशीच 'प्रगती' चालू राहिली तर आपल्या देशाचे कांहीं खरे नाही!
सरकार तमाशा पहात राहिले ही बाबही चिंताजनक आहे. 'बाबू लोकां'चेही 'हितसंबंध' त्यात अडकलेले असणार!
असो. आता क. सिंग यांच्या उत्तराची वाट पहात आहे. बहुदा ते उत्तर देणारच नाहींत असे वाटू लागले आहे. तुम्ही दिलेला दुवा मी त्यांना पाठविणार आहे!
पुनश्च धन्यवाद!
Even the officers behind these manipulative moves would be surprised at the success of their ploy for the so called controversy was actually laughable for the date entered in the UPSC form was corrected by the UPSC before the applicant went to NDA. Cadet VK Singh joined the Academy a week late as the error was then being corrected. A letter correcting the DOB from his father who was in 14 RAJPUT along with the school-leaving certificate was sent to the UPSC and this was accepted before the cadet joined the Academy. All relevant documents after passing out from NDA and IMA like ID card and record of service etc. reflected 1951 as the DOB.

सुधीर काळे,

>> ...हे वाचून माझा त्यांच्याबद्दलचा आदर आणखीच वाढला! हा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद!

१००% अनुमोदन. दुव्याबद्दल भरत मयेकरांना माझेही धन्यवाद! Happy

मात्र भरत मयेकर म्हणतात तसे हे केवळ सैन्यापुरते राजकारण नसून त्याची व्याप्ती थेट पंतप्रधानांच्या कार्यालयापावेतो आहे.

जन्मतारखेचा नसलेला घोळ उत्पन्न करून जनरल विजयकुमार सिंगांची कोंडी करायचा डाव आहे हे स्पष्ट दिसतं. यात प्रमुख भागीदार पंतप्रधानांचे कार्यालय आहे. टीकेए नायर १०+ वर्षे त्याचे मुख्यसचिव होते. हे पर्यायी सत्ताकेंद्र निर्माण करण्यासारखे आहे. बर्‍याच अनियमित घटनांचा उगम पं.का.त आहे.

पंतप्रधान बदलतात, मात्र कार्यालाचे मुख्यसचिव बदलले जात नाहीत. हे अनाकलनीय आहे. देश कोण चालवतो याचं उत्तर इथे मिळतं. कोणाच्या तरी आशीर्वादाने नायरबुवा इतकी वर्षे तळ ठोकून बसलेत. पं.का.चे पंख छाटले पाहिजेत.

देश चालवायची मंत्र्यांना काडीमात्र अक्कल नाही. घडीघडी सचिव लागतात. १६ जानेवारीच्या (रात्रौ) उच्चप्रत सेनाचमूच्या हालचालींच्या (elite troops movement) प्रकरणात काय घडलं असावं त्याचा अंदाज बांधूया. याच दिवशी जनरल विजयकुमार सिंगांनी न्यायालयात आपल्या जन्मदिनांकासंबंधी याचिका दाखल केली होती. त्याच रात्री बहुधा मनमोहन सिंग आणि त्यांच्या देशद्रोही टोळक्याने (चिदंबरम, कपिल सिब्बल, इत्यादि) काहीतरी बाष्कळ कृत्य करण्याचा निर्णय घेतला असावा. कदाचित जनरल विजयकुमार सिंगांना अटक करायचाही असू शकतो.

याची बातमी जनरल विजयकुमार सिंगांना लागली असावी. म्हणून त्यांनी स्वसंरक्षणार्थ दोन तुकड्यांना दिल्लीकडे कूच करायचे आदेश दिले असावेत. देशद्रोही टोळक्याला याचा सुगावा लागताच त्यांचे धाबे दणाणले असणार. नैतिक खच्चीकरण झालेल्या देशद्रोही टोळक्याला जनरल विजयकुमार सिंगांना तोंड दाखवायची हिंमत झाली नसणार. म्हणून संरक्षणसचिव शशिकांत गुप्तांना मलेशियाच्या दौर्‍यातून तातडीने माघारी बोलावण्यात आले असावे. मध्यस्थ म्हणून त्यांनी आपली कामगिरी चोख पाडली.

सांगायचा मुद्दा काय, की राजकारणी लोक आपत्कालीन परिस्थिती समर्थपणे हाताळू शकत नाहीत.

१६ जानेवारीच्या रात्री नक्की काय झालं याचा शोध लावणे मोठे रंजक ठरेल.

आ.न.,
-गा.पै.

गा पै तुमचा हा प्रतिसाद विनोद समजून वाचला. लष्कर प्रमुख स्वतःच्या संरक्षणासाठी लष्कराचा वापर करणार असेल तर त्याच्याबद्दलचे मत चांगले होत नाही.
तसेच पुढे पदोन्नती मिळवी म्हणून दबावाखाली चुकीची जन्मतारीख स्वीकारत असेल तर तेही चांगले मत बनायला उपयोगी ठरणार नाही.
जनरल व्ही के सिंग यांची नोंद इतिहासात लष्करातील भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करणारा नेता अशी न होता स्वतःच्या कार्यकालासाठी झगडणारा अधिकारी अशी होईल.

>>> पंतप्रधान बदलतात, मात्र कार्यालाचे मुख्यसचिव बदलले जात नाहीत. हे अनाकलनीय आहे. देश कोण चालवतो याचं उत्तर इथे मिळतं. कोणाच्या तरी आशीर्वादाने नायरबुवा इतकी वर्षे तळ ठोकून बसलेत. पं.का.चे पंख छाटले पाहिजेत.

दिल्लीत केरळी लॉबी अत्यंत भक्कम आहे असे अनेक लेखातून वाचले आहे.

भरत मयेकर,

१.
>> लष्कर प्रमुख स्वतःच्या संरक्षणासाठी लष्कराचा वापर करणार असेल तर त्याच्याबद्दलचे मत चांगले होत नाही.

हा केवळ अंदाज आहे. नक्की काय घडलं कोणालाच ठाऊक नाही. ज्याअर्थी सैन्यप्रमुखांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले, त्याअर्थी त्यांना दुसरा कुठलाही पर्याय दिसंत नव्हता. नेमक्या त्याच रात्री त्यांना सैन्यचमू लावावासा का वाटला? जर हे नित्यनेमिक भ्रमण असेल तर त्या रात्री दिल्लीत अनेक लोक अस्वस्थ का झाले?

२.
>> तसेच पुढे पदोन्नती मिळवी म्हणून दबावाखाली चुकीची जन्मतारीख स्वीकारत असेल तर
>> तेही चांगले मत बनायला उपयोगी ठरणार नाही.

त्यांन पदोन्नती मिळणारच होती. दबाव वेगळ्याच कारणासाठी आणला होता.

३.
>> जनरल व्ही के सिंग यांची नोंद इतिहासात लष्करातील भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करणारा नेता
>> अशी न होता स्वतःच्या कार्यकालासाठी झगडणारा अधिकारी अशी होईल.

नेमकं तेच व्हायला नकोय म्हणून जनरल विजयकुमार सिंग न्यायालयात गेलेत. कार्यकाल वाढवण्याची त्यांना हौस नाही, तर त्यांच्यानंतर गादीवर येणारे बिक्रम सिंग त्यांना नकोत. कारण बिक्रम सिंग शस्त्रदलालांच्या हातातले बाहुले असू शकतात. त्यामुळे स्वत:चा कार्यकाल वाढवून बिक्रम सिंगांचा पत्ता कापणे हा एकमेव मार्ग उरतो.

उद्या विजयकुमार सिंग निवृत्त होताहेत. लवकरात लवकर भ्रष्टाचार संपो.

असो.

मी व्यक्त केलेला आहे तो केवळ तर्क आहे. तो खरा असेलंच असं नाही. मात्र तो अन्वेषणासाठी एक उत्तम आरंभबिंदू (starting point for investigation) आहे.

आ.न.,
-गा.पै.

>>दिल्लीत केरळी लॉबी अत्यंत भक्कम आहे असे अनेक लेखातून वाचले आहे.
खरे तर पंजाबी लॉबी भक्कम असेल ना दिल्लीत ?

स्वत:च्या व्यक्तिगत संरक्षणासाठी किंवा दिल्लीश्वरांना जरब किंवा अजुन काही उद्देशाने जनरल सिंगांनी सैन्याची हालचाल केली असेल असे मला दुरन्वयेही वाटत नाही. तो बालिशपणा आहे, आणि एव्हढ्या उच्च पदावर पोहोचलेला व्यक्ती असे करणार नाही (ते नक्कीच मुर्ख नाही आहेत). दिल्लीत बसलेल्या राजकारणी लोकांच्या सुपिक डोक्यातल्या डावपेचाचा तो भाग असेल. वातावरण तयार करण्यासाठी दोन चार प्यादी हलवायला काय लागते ?

आदर्श गोटाळ्यात लष्कराच्या तसेच नौदलाच्या सेवेतुन निवृत्त झालेल्या प्रमुखांचे फ्लॅटस होते तसेच पं बंगाल मधे एका ले. जन. दर्जाच्या अधिकार्‍याने लष्कराच्या दृष्टीने मोक्याच्या असलेल्या जमीनीच्या घोटाळ्यामधे पदाचा गैरवापर (खुप सौम्य लिहीत आहे) केला होता. हे उदाहरणे द्यायचे कारण लष्करी अधिकारी म्हणजे धुतलेल्या तांदळासारखे असेलच असे अजिबात नाही.

गापै म्हणतात त्या प्रमाणे दलाल हा एक महत्वाचा घटक असायची शक्यता आहेच. शस्त्र खरेदी मधे मिळणार्‍या टक्यांवरुन पण आसनाचे महत्व जास्तच वाढते. जनरल सिंगांचे आकर्षण पदासाठी होते, हजारो कोटींच्या खरेदी व्यावहारांत मिळणार्‍या % साठी होते, का भविष्यात लष्कर प्रमुखपद सुरक्षित हातात रहावे या साठी होते हे काही काळात प्रकाशात येईल अशी अपेक्षा.

उदय,

१.
>> दिल्लीत बसलेल्या राजकारणी लोकांच्या सुपिक डोक्यातल्या डावपेचाचा तो भाग असेल. वातावरण
>> तयार करण्यासाठी दोन चार प्यादी हलवायला काय लागते ?

तरीपण चमू हलवायचा आदेश कोणी दिला? जर ही नित्यनेमी हालचाल असेल तर दिल्लीतील लोक काळजीत का पडले?

२.
>> स्वत:च्या व्यक्तिगत संरक्षणासाठी किंवा दिल्लीश्वरांना जरब किंवा अजुन काही उद्देशाने जनरल सिंगांनी
>> सैन्याची हालचाल केली असेल असे मला दुरन्वयेही वाटत नाही. तो बालिशपणा आहे, आणि एव्हढ्या उच्च
>> पदावर पोहोचलेला व्यक्ती असे करणार नाही (ते नक्कीच मुर्ख नाही आहेत).

जीवाची भीती पडली की बालिशपणाला काहीही अर्थ उरत नाही. जो माणूस सकाळी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतो, त्याला रात्री सैनिकांची गरज का भासावी? जनरल विजयकुमार सिंगांविरुद्ध दिवसभरात नक्कीच काहीतरी काळंबेरं शिजलं असणार.

३.
>> वातावरण तयार करण्यासाठी दोन चार प्यादी हलवायला काय लागते ?

जनरल विजयकुमार सिंगांच्या परवानगीविना सैन्यचमू चलन करू शकत नाही.

असो.

आता अजून काही गोष्टी पाहूया.

१. जनरल विजयकुमार सिंगांनंतर येणारे प्रमुख बिक्रम सिंग आहेत. त्यांची बायको आणि पंतप्रधानांची बायको या एकचुली (आते/चुलत/मामे/मावस) बहिणी आहेत.

२. जनरल विजयकुमार सिंगांच्या जन्मतारखेचा घोळ केव्हाच निस्तरला गेला आहे. सेनासचिव (MS) कार्यालयाने तारीख दुरूस्त करून घेतली होती. पण २००६ साली अचानक काही कारण नसतांना जुनी तारीख वापरायला सुरुवात केली. पंतप्रधान मनमोहन सिंग या प्रकरणाबद्दल तोड का उघडत नाहीत?

३. विजयकुमार सिंगांच्या अगोदर प्रमुख असलेले दीपक कपूर यांची कारकीर्द अनेक घोटाळ्यांनी बदनाम झालेली आहे. उदा: आदर्श घोटाळा, सुखना भू घोटाळा. दीपक कपूरच्या विरोधात जाऊन विजयकुमार सिंगांनी सुखना घोटाळ्याची चौकशी आरंभली होती. तीत अवधेश प्रकाश अडकले.

४. विजयकुमार सिंगांवर जुनी तारीख मान्य करण्यास अवधेश प्रकाश यांनी भाग पाडलं. पुढे ते (अवधेश प्रकाश) स्वत:च सुखना घोटाळ्यात अडकले आणि त्यांच्यावर निवृत्त्त्युत्तर सेनाभियोग चालवला गेला. यात ते दोषी ठरून त्यांची हाकलपट्टी करण्यात आली. (जरी निवृत्त असले तरी तशी करता येते. मग निवृत्तीलाभ पदरात पडत नाहीत. सर्व पुरस्कार आणि पदके आपोआप रद्दबातल होतात.)

५. जर विजयकुमार सिंग सैन्यप्रमुख बनले नसते तर बिक्रम सिंग सैन्यप्रमुख न बनता दुसरे कोणीतरी बनले असते. जर विजयकुमार सिंग यांची योग्य जन्मतारीख (१९५१) विचारात घेतली असती तर ते २०१३ साली निवृत्त झाले असते. मग तोवर बिक्रम सिंग देखील वय वाढून निवृत्त झाले असते. त्यामुळे विजयकुमार सिंगांना सैन्यप्रमुख बनवून नंतर त्यांच्या जन्मदिनांकाचा घोळ घातला आहे, तो केवळ बिक्रम सिंगांचं प्यादं पुढे सरकवण्यासाठीच.

असो.

उपरोक्त मुद्यांच्या आधारे भ्रष्ट देशद्रोही कंपू बिक्रम सिंगांद्वारे सैन्यावर ताबा मिळवण्यात यशस्वी झाला आहे, असं खेदाने म्हणावंसं वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

जनरल सिंह यांच्या प्रत्येक एसीआरवर १९५० हीच तारीख पडलेली आहे. विक्रम सिंह यांना लष्करप्रमुख करण्याचा कट २३ वर्षांपूर्वी शिजणे शक्य नाही. विक्रम सिंह हे भ्रष्टच असतील असे समजणेही योग्य नाही तसंच जनरल सिंह यांनी भ्रष्टाचाराविरूद्ध आपली कारकीर्द पणाला लावली आहे असंही समजणे योग्य नाही. तसं असतं तर त्यांनी ब्रिगेडीयर सुरिंदर सिंहांना उशिरा का होईना न्याय दिला असता. त्या वेळी ज्याप्रमाणे त्यांनी शिस्त पाळली तीच शिस्त आता पाळली नाही याचं कारण स्पष्ट व्हायला हवंय .

आपण सर्व अंदाज करत आहोत. दोन्ही बाजू जाणून घेणे आणि पुढं काय होतंय ते पाहणे हे योग्य राहील. जनरल सिंह जर राजकारणात किंवा टीम अण्णा अथवा रामदेवबाबा यांच्यासोबत जातात का, निवृत्तीनंतर ते शांत राहतात का ? आपली लढाई केवळ जन्मतारखेच्या वादाबाबत ठेवतात कि लष्कराचे मनोधैर्य खच्ची होईल अशा पद्धतीने लढा देतात यातून ब-याच प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

किरण+१. मात्र कॉन्स्पिरसी थिअरिस्ट्सवर कोणतीही मात्र लागू होत नाही.

१. जनरल विजयकुमार सिंगांनंतर येणारे प्रमुख बिक्रम सिंग आहेत. त्यांची बायको आणि पंतप्रधानांची बायको या एकचुली (आते/चुलत/मामे/मावस) बहिणी आहेत. : बिक्रम सिंग लष्करप्रमुख होताना नियमांचे , सिनियॉरिटीचे उल्लंघन झाले नसेल तर हा मुद्दा गैरलागू आणि खोडसाळपणाचा आहे. काही लोकांनी यात जातीयवाद (दोघांचा शीख धर्म) आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. भारतीय संरक्षणव्यवस्थेत सिंहाचा वाटा उचलणार्‍या शीख समुदायाचा अपमान आहे. तसेच माझ्या माहितीप्रमाणे हा मुद्दा न्यायालयात रद्दबातल झालेला आहे. अर्थात जनरल व्ही के सिंग यांचा/त्यांच्या पाठीराख्यांचा न्यायव्यवस्थेवरही विश्वास नसावा.

२. जनरल विजयकुमार सिंगांच्या जन्मतारखेचा घोळ केव्हाच निस्तरला गेला आहे. सेनासचिव (MS) कार्यालयाने तारीख दुरूस्त करून घेतली होती. : हे नवीनच आहे. स्त्रोत द्या.

३. क्ष व्यक्ती भ्रष्टाचारी आहे म्हणून तिने लष्करप्रमुखपदी येऊ नये म्हणून माझी जन्मतारीख सुधारून द्या अशी मागणी काही जनरल विजयकुमार सिंग करत नाही आहेत. ते लष्करप्रमुखपदी नियुक्त झाल्यापासून त्यांनी भ्रष्टाचार्‍यांविरुद्द स्वतःच्या अधिकारात काय कारवाई केली? केली असल्यास कधी केली?(तारीख का मामला है माय लॉर्ड Wink ) त्यांना स्वतःला लाच दिली जाण्याच्या एका प्रकरणाबाबत ते संरक्षणमंत्र्याशी बोलले. तिथे त्यांनी यापलीकडे जाऊन काय काँक्रीट अ‍ॅक्शन घेतली? अशी कारवाई/चौकशी करणे त्यांच्या अधिकारात नव्हते का? या प्रकरणाला मिडियासमोर वाचा फोडण्यासाठी त्यांना दोन वर्षांनंतरचा मुहूर्तच का मिळाला? लष्करप्रमुखाला काहीच अधिकार नसतात का?

भरत मयेकर,

१.
>> जनरल विजयकुमार सिंगांच्या जन्मतारखेचा घोळ केव्हाच निस्तरला गेला आहे. सेनासचिव (MS)
>> कार्यालयाने तारीख दुरूस्त करून घेतली होती. : हे नवीनच आहे. स्त्रोत द्या.

इथे म्हंटलंय की :

He also wrote that on two other occasions, in 1985 and 2002, he wrote to the M.S. branch to make corrections in the Army List and was told by the branch that since the records were maintained correctly by them, the needful would be done.

माझ्या माहितीप्रमाणे जनरल विजयकुमार सिंगांनी सेनासचिवाचे आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन देणारे पत्र न्यायालयात दाखल केले आहे.

मात्र तरीही न्यायालयाने हा पुरावा नाकारला. न्यायमूर्तींच्या म्हणण्याप्रमाणे प्रवेशकालीन नोंदी (threshold documents) सुधारायला हव्या होत्या. म्हणजे जनरल विजयकुमार सिंगांनी NDA, IMA मधील नोंदी सुधारायला हव्या होत्या. हे अति होतंय. NDA आणि IMA हे चाकरीदाते (एम्प्लॉयर) नाहीत. नोकरीशी संबंधित एका ठिकाणी (=सेनासहायक =AG) तारीख दुरूस्त केली आहे, तर दुसर्‍या ठिकाणी (=सेनासचिव =MS) आश्वासन मिळाले आहे. तरीही प्रवेशाच्या नोंदी सुधारण्याचा अट्टाहास कशास्तव?

सेनासचिव जन्मदिनांक सुधारण्याचे आश्वासन देतात. मात्र तसं न करता जुन्या बाह्य नोंदीस चिकटून राहतात. हे सर्वस्वी अनाकलनीय आहे. शिवाय विजयकुमार सिंगांवर दबाव आणून त्यांच्याकरवी जुनी तारीख मान्य करून घेण्यात येते. हा दबाव आणणारा अधिकारी (=अवधेश प्रकाश) पुढे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली (=सुखना भूखंड घोटाळा) सैनिकी न्यायालयासमोर (=कोर्टमार्शल) खेचला जाऊन (निवृत्त्युत्तर) पदच्युत होतो.

या घटनांची संगती काय लावायची?

२.
>> बिक्रम सिंग लष्करप्रमुख होताना नियमांचे , सिनियॉरिटीचे उल्लंघन झाले नसेल तर हा मुद्दा गैरलागू
>> आणि खोडसाळपणाचा आहे.

बिक्रम सिंग लष्करप्रमुख होताना नियमांचे , सिनियॉरिटीचे उल्लंघन झालेले नाहीच्चे मुळी! विजयकुमार सिंगांच्या जन्मदिनांकाच घोळ घातल्याने बिक्रम सिंगांचं सगळं कसं कायदेशीर होतं!!

३.
>> काही लोकांनी यात जातीयवाद (दोघांचा शीख धर्म) आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे.

याची सुरुवात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने केली होती. शिगुप्रसचे उद्दिष्ट कदाचित समर्थनीय असू शकेल, मात्र विधान स्फोटक आणि दुर्दैवी आहे.

वरील दुव्यात बिक्रम सिंगांचे काँगोतले 'प्रताप' वर्णिले आहेत. जरी ते भारताबाहेर असले तरी त्यांच्याकडे काणाडोळा करवत नाही. शेवटी भारतीय सैन्याचा प्रश्न आहे.

तसेच बिक्रम सिंगांची एक सून पाकिस्तानी आहे असं म्हणतात. ती शीख आहे की मुस्लीम ते माहीत नाही. परदेशी घरोबा करण्याआगोदर सेनेस लेखी स्वरूपात सूचित करावे लागते. बिक्रम सिंगांनी सूचित केले नाहीये हेही ऐकिवात आहे.

४.
>> अर्थात जनरल व्ही के सिंग यांचा/त्यांच्या पाठीराख्यांचा न्यायव्यवस्थेवरही विश्वास नसावा.

न्यायालयाचा निर्णय मानणं आणि त्याच्या विरोधात मत प्रदर्शित करणं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विरोधी मतप्रदर्शनाने न्यायालयाचा अवमान होत नाही.

न्यायालयास समोर आलेल्या पुराव्यावरूनच निर्णय द्यायचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे बिक्रम सिंगांसाठी लावलेली फिल्डिंग न्यायालयात सिद्ध होऊच शकत नाही. सगळं जर कायदेशीर आहे, तर सिद्ध काय करणार, डोंबलं? Proud

मात्र व्यवहारात आपण या घटनांची संगती लावली पाहिजे. कारण देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.

५.
>> क्ष व्यक्ती भ्रष्टाचारी आहे म्हणून तिने लष्करप्रमुखपदी येऊ नये म्हणून माझी जन्मतारीख सुधारून द्या
>> अशी मागणी काही जनरल विजयकुमार सिंग करत नाही आहेत. ते लष्करप्रमुखपदी नियुक्त
>> झाल्यापासून त्यांनी भ्रष्टाचार्‍यांविरुद्द स्वतःच्या अधिकारात काय कारवाई केली?

बिक्रम सिंग सैन्यप्रमुख म्हणून अप्रस्तुत आहेत याचसाठी विजयकुमार सिंगांचा जन्मतारीख सुधारण्याचा आटापिटा चालू आहे. त्यांनी स्वत:च्या अधिकारात आपल्या वरिष्ठांची (=दीपक कपूर) इच्छा धुडकावून सुखना घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. यातून पुढे दोन अधिकारी पदच्युत झाले.

६.
>> त्यांना स्वतःला लाच दिली जाण्याच्या एका प्रकरणाबाबत ते संरक्षणमंत्र्याशी बोलले. तिथे त्यांनी
>> यापलीकडे जाऊन काय काँक्रीट अ‍ॅक्शन घेतली?

ठाम कारवाई करण्यासाठी ठाम पुरावा हवा ना! विजयकुमार सिंगांन थेट लाच दिली नव्हती. तसं केवळ सूचित करण्यात आलं होतं. तेजिंदर सिंग पैश्याची थैली घेऊन घुसले नव्हते विजयकुमार सिंगांच्या केबिनीत!

या प्रकरणात तथ्य आहे असं अँटनी यांनी मान्य केलं आहेच. केंद्रीय अन्वेषकांनी (CBI) जनरल विजयकुमार सिंगांच्या गौप्यस्फोटानंतरच तपास सुरू केला आहे. अन्यथा हे प्रकरण धूळ खात पडलं असतं.

असो.

मी विजयकुमार सिंगांच्या बाजूने अथवा विरोधात नाही. मला केवळ खरं काय घडलं ते शोधून काढायचं आहे. त्याकरिता लागेल तितकी पार्श्वभूमी खोदून काढायला पाहिजे. वर दिलेल्या दुव्यांचे वाचन ठाम निकाल असे न करता पार्श्वभूमी उघड करण्याचा प्रयत्न या नात्याने करावं ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

Pages