काल पुन्हा

Submitted by वैभव फाटक on 14 May, 2012 - 04:05

काळजातल्या विझलेल्या ज्वाळा धगधगल्या काल पुन्हा
हसता हसता क्षणात झाले रडून ओले गाल पुन्हा

मनी ठरवतो 'विचार आता पक्का झाला कायमचा'
क्षणात येते अन चुकचुकते का शंकेची पाल पुन्हा ?

माणूस आणिक श्वान सारखे, वाटे 'तुम्हास' पाहुनिया
आज बदडले तरी उद्याला शेपुट हलवत याल पुन्हा..

गेल्या वर्षापासुन होता 'कर्तव्याचा' बेत मनी
पण पोहे खाण्यातच गेले निघून अख्खे साल पुन्हा

तुझ्यासंगती आळवले मी जीवनगाणे प्रेमाचे
तू गेल्यावर चुकले सारे आयुष्याचे ताल पुन्हा

भालावरची रेष सुखाची बहुधा पुसली गेलेली
एक विनंती तुला, "लिहावे, देवा माझे भाल पुन्हा"

--------- वैभव फाटक ( १२ मे २०१२) ----------

गुलमोहर: 

अतिशय उत्तम गझल, वैभवराव. कमी-अधिक प्रमाणात सगळेच शेर आवडले.
त्यातही शंकेची पाल आणि शेवटचे दोन शेर सुरेख वाटले. 'पोहे' हा मिश्किल शेरही आवडला. Happy

भालावरची रेष सुखाची बहुधा पुसली गेलेली
व्वा !

आणखीन गझला येऊ द्यात तुमच्या !

छान.

बरेच मिसरे प्रवाही वाटले.

आज बदडले तरी उद्याला शेपुट हलवत याल पुन्हा - अत्यंत सहज मिसरा.

भालावरची रेष सुखाची बहुधा पुसली गेलेली - रेष ऐवजी 'रेघ' असे वाचले, आधिक मस्त वाटले रेष सुखाची हे वाचताना बेसिक 'स' दोन्ही अक्षरांत असल्यामुळे अडकल्यासारखे होत आहे असे वाटले

शुभेच्छा!

माणूस आणिक श्वान सारखे, वाटे 'तुम्हास' पाहुनिया
आज बदडले तरी उद्याला शेपुट हलवत याल पुन्हा !

गेल्या वर्षापासुन होता 'कर्तव्याचा' बेत मनी
पण पोहे खाण्यातच गेले निघून अख्खे साल पुन्हा>>

हा हा हा, पहिला आवेशपूर्ण आणि दुसरा गंमतीशीर

गझल एकंदर ठीकठाक वाटली. वृत्त हाताळणी छान आहे

हसता हसता क्षणात झाले रडून ओले गाल पुन्हा>> वा वा, मस्त ओळ

शुभेच्छा

-'बेफिकीर'!

वैभवजी! तुमची गझल वाचली. छान वाटली! तुमचे शेरांमधील खयाल आवडले.
पण काही नम्र सूचना करत आहे...........

वृत्तावर पकड मिळवायचा प्रयत्न करावा. साधारणपणे शिस्त लागेपर्यंत अक्षरगण वृत्तात लिहावे. बरीच अक्षरगणवृत्ते सफाईदारपणे हाताळून झाली की, मग मात्रावृत्तांकडे वळावे, हा माझा अनुभव आहे. मात्रावृत्तात सफाईदारपणे लिहिण्यासाठी, लयीचे व यतीचे भान ठेवावे लागते. त्यासाठी गुणगुणण्याची सवय लावून घ्यावी.

सफईदार लिहिण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. –हस्वदीर्घाच्या चुका कटाक्षाने टाळाव्यात. अशा चुका गझलेत चालत नाहीत, गीतात त्या क्षम्य असतात. वृत्त अंगवळणी पडण्यासाठी, सुचलेल्या ओळी गुणगुणाव्यात! गुणगुणताना सुचलेल्या खयालास अनुरूप शब्द आपोआप मिळतात. पण त्यासाठी आपला खयाल हा नि:संदिग्ध असायला हवा! खयालातील काव्य प्रथम आपल्या काळजास हलवणारे असायला हवे. रियाजाने वृत्त वश होते व आपोआप सफाईदार व गोटीबंद लिहिण्याची सवय होते! वृत्तात बसविण्यासाठी –हस्वदीर्घाची सूट अजिबात घेवू नये. एकेका मिस-यासाठी अनेक पर्यायी मिसरे लिहिलेत तरी चालतील. योग्य
मिस-याची निवड, शेवटी, आपला आतला आवाज काय सांगतो, त्यावरून करावी!

प्रासादिकता वा लालित्य हा गझलेचा फार मोठा गुणविशेष समजला जातो. सोपे, सरळ, थेट व नेमके लिहिण्याचा प्रयत्न करावा. सोपे लिहिणेच अवघड असते. पण परिश्रमानंतर ते साधते.वृत्तामधली लय, यती लक्षात घ्यावे. त्यासाठी गुणगुणण्याची (मनात किंवा मोठ्याने) सवय करावी. असे केल्याने चपखल शब्द आपोआप ओठांवर येतात! वापरायच्या प्रत्येक शब्दाचे सखोल चिंतन करावे. शब्दांच्या अर्थांच्या छटा, त्यांची प्रसरणशीलता लक्षात घ्यावी. म्हणजे अचूक शब्दांची अचूक जागी योजना करता येते व मिस-याची व्यामिश्रता वा अर्थांचा बहुपदरीपणा व्यक्त करता येतो! असे केल्याने मिसरा शब्दांच्या पलीकडे जातो!

शेर वा गझल संपविण्याची घाई कधीच करू नये. कोणतीही गझल कधीच पूर्ण झाली असे समजू नये. अनेक शेर अजून लिहिले जावू शकतात, अनेक शेर बदलता येतात. प्रत्येक गझलेला सुधारण्याचा वाव असतो, व तो दिला गेला पाहिजे. गझल मैफिलीत पेश करताना वा प्रकाशित करताना, जे शेर कामयाब व नि:संदिग्ध असतील तेच घ्यावेत. लिहिलेल्या सर्व शेरांचा अट्टहास धरू नये.

आपल्याच गझलेकडे त्रयस्थाच्या नजरेने बघायला शिकावे. जे चांगले असेल ते शेंबड्या पोराकडूनही घ्यावे असे म्हणतात. असो.

थांबायची तयारी ठेवावी. प्रत्येक शब्द चव घेत घेत वापरावा. असे केल्याने लिहिलेल्या मिस-याला एक अलौकीक चव येते व श्रोत्यांसही ती अनुभवायला मिळते! शेवटी शेर वा गझल लिहिणे ही एक कठोर तपस्या आहे. ती किती करावी याला अंत नाही! असो.

आता मी तुमच्या या गझलेवरील माझे खयाल चिंतनासाठी देत आहे, पहा कसे वाटतात ते. त्यातून तुम्हाला, मी वर निर्देश केलेल्या, सर्व गोष्टींचा प्रत्यय येईल!

तुमच्या गझललेखनासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा! आज येथेच माझे पाल्हाळ संपवतो. तुम्हाला माझे विचार कसे वाटले, ते विस्ताराने कळवा. मला वाचायला आवडेल!

माझे खयाल खालील प्रमाणे...........

(शेर वाचताना शब्दांच्या समर्पकतेकडे, अर्थांकडे, शब्दकळेकडे, प्रासादिकतेकडे, कल्पनाविलासाकडे, मिस-यांच्या एकजीवतेकडे, लयीकडे लक्ष द्यावे. शेर वाचल्यावर डोळे मिटून सखोल चिंतन करावे. शेराशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे शेरातील जादू व सौंदर्य प्रत्ययास येईल. शेर कामयाब असेल तर तो तुमचा पिच्छा करेलच व आपण, वर लिहिलेल्या गोष्टींचा, आपोआप, पुन्हा पुन्हा प्रत्यय घेत रहाल!)
.........................................................................................................

काळजातले गार निखारे, का धगधगले काल पुन्हा?
हसता हसता क्षणात झाले रडून ओले गाल पुन्हा!

मन माझे म्हणते की, झाला विचार पक्का कायमचा!
दुस-या क्षणास का चुकचुकते, ही शंकेची पाल पुन्हा?

काय माणसा, फरक तुझ्या अन् श्वानामध्ये आज उरे?
किती बदडले तरी शेपट्या हलवत दोघे याल पुन्हा!

वर्षाच्या पहिल्या दिवशी मी, सोडावे संकल्प किती?
पहिले पाढे पंचावन! अन्, तसेच गेले साल पुन्हा!!

तुझ्या संगती जीवन गाणे म्हटले अन् सावरलो मी!
तू गेल्यावर, चुकले सारे आयुष्याचे ताल पुन्हा!!

भालावरची रेष सुखाची, धूसर बहुधा झालेली!
तुला विनवणी करतो देवा! लिही नव्याने भाल पुन्हा!!

.....................प्रा. सतीश देवपूरकर

@देवपूरकर सर,

तुमचे विवेचन/मार्गदर्शन आवडले. तुमची गझलविषयक मतेही (सरसकट नाही, पण) स्वीकारण्यासारखीच आहेत.

मात्र तुम्ही केलेल्या सुचवण्या/इस्लाह बद्दल मी हेच म्हणू शकत नाही. हे बदल अनावश्यक असून, प्रस्तुत गझलेचे सौंदर्य कमी करतात असे माझे मत आहे.
जरा विस्ताराने सांगतो-

१)पहिला शेर-

फक्त विझलेल्या ज्वाळांच्या जागी गार निखारे टाकून आणि पहिला मिसरा प्रश्नार्थक करून नक्की काय साधले? उलट आधीच्या शेरातला प्रवाहीपणा कमी झाला आहे, असे नाही का वाटत?
वरच्या मिसर्‍यात प्रश्न असेल तर पुढे त्याचे उत्तर, किंवा किमान संभाव्य उत्तराकडे निर्देश असायला नको का?

२)दुसरा शेर-

वरच्या ओळीत फक्त शब्दांची निरर्थक फेरफार आहे. अर्थाच्या किंवा लयीच्या दृष्टीने काहीही फरक नाही.
खालच्या ओळीत तर 'दुसर्‍या क्षणात..' या शब्दांमुळे निसर्गतः येणार्‍या चार गुरूंची लय पूर्ण बिघडवली आहे. दोन्ही शेर एकापाठी एक वाचले तर तुमचा दुसरा मिसरा चक्क लय बिघडवणारा आहे, हे लक्षात येईल.

३) तिसरा शेर-

यातले बदल तुलनेने ठीक वाटले. पण मूळ शेरामधे आशयाच्या आणि लयीच्या दृष्टीने कसलीच भर पडली नाही. असे नुसते शब्द बदलण्यामागचे प्रयोजन लक्षात येत नाही.

४) चौथा शेर-

हा संपूर्ण शेर तुम्ही नवाच लिहून काढला आहे. मूळ शेरातली 'लग्न जमत नसल्याची' गंमत तुम्हाला समजली नाही, की अशा प्रकारच्या शेराला गझलेत स्थानच नाही असे तुमचे मत आहे?

५) पाचवा शेर-

'तुझ्यासंगती आळवले मी जीवनगाणे प्रेमाचे' असा मूळ विचार आहे. त्यात तुम्ही बदल असा केला आहे की- तुझ्या संगती जीवन गाणे म्हटले अन् सावरलो मी!
हा जो 'सावरण्याचा' विचार आहे, तो मूळ शायराचा नाही. इस्लाह करतांना मूळ विचारात आपलेही विचार प्रक्षिप्त करणे (स्पष्ट शब्दात- घुसडणे) योग्य आहे का?
पुन्हा- आशयात / लयीत भर कसलीच नाही !

६) शेवटचा शेर-

शायर म्हणतोय की कपाळावरची सुखाची रेष पूर्ण पुसलीच गेली आहे. मग तुमचा ती नुसती 'धूसर' झाल्याचा अट्टाहास का म्हणून ?
खालच्या ओळीत फक्त शब्दांची फेरफार ! प्रयोजन ??

------------------------------------------

विचारल्याशिवाय इस्लाह करू नये, हेच माझे मत आहे. तुमच्यावर अर्थातच हे मत बंधनकारक नाही. आपण ३० वर्षांपासून गझल लिहिता, या एकमात्र निकषावर इतरांच्या गझलेत बेधडक वाटेल तसे बदल तसे करण्याचा आपल्याला अधिकार आहे, असे आपले मत असू शकेल. मला त्याबद्दल काही म्हणायचे नाही. मात्र आपण केलेले असे बदल कितपत आवश्यक आहेत, वाजवी आहेत आणि त्यांच्यामुळे मूळ शेरात / विचारात काय भर पडते, हे तपासून पहावे अशी विनंती करतो.

अर्थात, माझ्या सौंदर्यबोधाच्या आणि गझलविषयक आकलनाच्या क्षमतेतच बिघाड असण्याची शक्यता मी गृहीत धरलेली आहेच ! Wink

विचारल्याशिवाय इस्लाह करू नये, हेच माझे मत आहे. तुमच्यावर अर्थातच हे मत बंधनकारक नाही. आपण ३० वर्षांपासून गझल लिहिता, या एकमात्र निकषावर इतरांच्या गझलेत बेधडक वाटेल तसे बदल तसे करण्याचा आपल्याला अधिकार आहे, असे आपले मत असू शकेल. मला त्याबद्दल काही म्हणायचे नाही. मात्र आपण केलेले असे बदल कितपत आवश्यक आहेत, वाजवी आहेत आणि त्यांच्यामुळे मूळ शेरात / विचारात काय भर पडते, हे तपासून पहावे अशी विनंती करतो.
>>

+ १०

आणि आणखी एकः

इतरांच्या गझलेत बदल सुचवणे यातील मूळ हेतू काय? हे सांगाल का? (म्हणजे जोवर त्या माणसाने तुम्हाला विचारलेच नाही आहे की बदल सुचवा, तोवर असे बदल सुचवणे, पर्यायी शेरच्या शेर देणे यामागे तुमचा काय हेतू आहे?)

हेतू स्पष्ट आहे,

मला

सर्व/खूप

कळते

ज्ञानेश, बेफि - काहीही लिहीले तरी प्रोफेसर ऐकतील असे मात्र वाटत नाही.

प्रोफेसरांची इस्लाह स्वीकारून गझलेत अजूनपर्यंत नवोदितांनीसुद्धा बदल केल्याचे मायबोलीवर तरी माझ्या पाहण्यात नाही.

असो, उपाय काय हे कळत नाहीये

- सुन्न 'कणखर'

ज्ञानेशजी +१०

काही गोष्टींना "पर्याय" नसतो! Proud

तरिही "पर्यायी गझल" असा धागा सुरु करावा की काय असे वाटते... तिथे हवे तेवढे पर्याय सुचवा! वाचतय कोण! Wink

अप्रतिम गझल आहे वैभव... आधी वाचली होतीच.

विथ ऑल द रिस्पेक्ट टू देवपूरकर सर, मला ह्या गझलेत बदल करायची आवश्यकता वाटली नाही. एकाही ठिकाणी मी अडखळलो नाही की अर्थबोध होण्यास वेळ लागला नाही. बाकी गझल तुझी, निर्णय तुझाच!
शुभेच्छा!

प्रा.साहेब :आपली पर्यायी गझल निश्चितच उत्तम आहे ..........
किम्बहुना उजवी आहे असे म्हणावयास माझी हरकत नाही .....................

कारण : असे म्हणायला मला पैसे पडत नाहीत / मीही पैसे घेत नाही............ फुकटात हे काम करतो !!...............

वैभव रावः गझल छान करत आहात बाकी गोष्टीत लक्ष देवू नका.........

विचारल्याशिवाय इस्लाह करू नये, हेच माझे मत आहे. तुमच्यावर अर्थातच हे मत बंधनकारक नाही. आपण ३० वर्षांपासून गझल लिहिता, या एकमात्र निकषावर इतरांच्या गझलेत बेधडक वाटेल तसे बदल तसे करण्याचा आपल्याला अधिकार आहे, असे आपले मत असू शकेल. मला त्याबद्दल काही म्हणायचे नाही. मात्र आपण केलेले असे बदल कितपत आवश्यक आहेत, वाजवी आहेत आणि त्यांच्यामुळे मूळ शेरात / विचारात काय भर पडते, हे तपासून पहावे अशी विनंती करतो.
>> याला नुसते अनुमोदन!

अर्थात, माझ्या सौंदर्यबोधाच्या आणि गझलविषयक आकलनाच्या क्षमतेतच बिघाड असण्याची शक्यता मी गृहीत धरलेली आहेच !
>>> आणि याला डबल अनुमोदन! Happy

विषयांतराच्या गडबडीत मूळ गझलेबद्दल लिहायचे राहून गेले.
दुसरा शेर आवडला. बाकी ठीकठाक वाटली.
पुलेशु.

ज्ञानेशजी! आपण माझ्या प्रतिसादावर दिलेल्या सल्लात्मक व काटेकोर(?) प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आपण करून घेतलेल्या पूर्वग्रहाबाबत व गैरसमजूतीबाबत प्रथम खुलासा करतो व मग मी दिलेल्या(सुचवण्या केलेल्या नव्हे) खयालांवर/शेरांवर, रसग्रहणात्मक, विस्ताराने लिहितो.......

“विचारल्या शिवाय “इस्लाह” करू नये, हेच माझे मत आहे”<<<<
ज्ञानेशजी! मी कुणाच्याही गझलेचा इस्लाह वगैरे कधीच करत नाही. इस्लाह करण्या इतका मी महान नाही! मी फक्त कफिये, रदीफ व वृत्त तेच ठेवून माझे खयाल वाचकांसमोर केवळ आस्वादासाठी ठेवतो. कुठल्याही तुलनेचा त्यात हेतू नसतो किंवा मूळ गझलेत वाटेल ते बेधडक बदल करण्याचाही हेतू वा प्रयत्न नसतो. मुळात ते केवळ आणि केवळ खयाल आहेत, इस्लाह नाहीत. त्यामुळे मूळ शेरात वा विचारात काय भर पडते वा पडत नाही हे पहाण्याचा प्रश्नच नाही! कुणाच्या सौंदर्यबोधाबाबत वा गझलविषयक आकलनाच्या क्षमतेबाबत काहीही मत मांडणारा मी कोण? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शिवाय मी गेली ३० वर्षे गझल लेखन करत आहे हा माझा दोष नाही, व गुन्हा तर नाहीच नाही! किवा त्यामुळे मला इस्लाह करण्याचा वा कुणाच्याही गझलेत बेधडक बदल करण्याचा अधिकार आहे असे मला वाटत नाही. असो.

मी खयाल देताना मूळ गझलेतलाच विचार मांडेन वा मांडणारही नाही. मूळ गझलेतला विचार असला तरीही दोन पैकी एक मिसरा बदललेला असतो, अभिव्यक्ती बदललेली असते.
अजून एक सांगतो की, मी दिलेले (कुणाच्याही गझलेवरचे) खयाल मी कधीच माझे शेर वा माझी गझल म्हणून खपवत नाही. सुदैवाने इतके गझलदारिद्र्य माझ्याकडे नाही! मूळ गझलकाराने माझ्या खयालांचा वा अभिव्यक्तीचा वापर करून बदल करावा अशीही माझी अपेक्षा नाही. केवळ आस्वादासाठी मी खयाल देत असतो. मूळ गझल ही त्या गझलकाराचीच असते. कुणाच्याही बौद्धीक स्वामित्वावर मी अधिकार गाजवत नाही. असो. माझी प्रतिसादाची शैली जर आपणास पचत व रुचत नसेल तर माझा नाइलाज आहे.

दुस-याच्या गझलेवर तिस-याने दिलेल्या प्रतिसादावर चौथ्याने दिलेल्या प्रतिसादातला वैयक्तीक, सात्वीक(?) संताप मी समजू शकतो. पण दुर्दैवाने मी काहीही करू शकत नाही.
शेवटी हेच म्हणावेसे वाटते की.........
शैली जगावयाची माझी तुझी निराळी!
किंवा
इतकी अजून मोठी माझी तहान नाही!
इतका तुझ्याप्रमाणे मीही महान नाही!!
.........................................................................................................

आता मी दिलेला पहिला खयाल/शेर......

“काळजातले गार निखारे, का धगधगले काल पुन्हा?
हसता हसता क्षणात झाले रडून ओले गाल पुन्हा!”
आपल्या प्रतिसादावरून असे वाटते की, आपण हा शेर बारकाईने वाचलेला नाही. त्यात वापरलेल्या शब्दांचे चिंतन तर अजिबात केलेले दिसत नाही. शेरातील अभिव्यक्ती ही विधनात्मक वा प्रश्नात्मकही असू शकते. हा ज्याच्या त्याच्या शैलीचा प्रश्न आहे! शेरातील दोन्ही मिसरेही प्रश्नात्मक असू शकतात वा एक मिसरा प्रश्नात्मक असू शकतो. प्रश्नात्मक मिस-याच्या खाली उत्तरात्मक मिसराच येईल असे नाही. पण हे मात्र नक्की की, दोन्ही मिसरे, कुठल्याही स्वरूपात अभिव्यक्त झाले असले तरीही, त्यांच्यात एकजीवपणा असायलाच हवा! मी दिलेल्या या शेरातला प्रभावीपणा कुठेही कमी होत नाही असे मला वाटते. आपण तो स्वच्छ मनाने परत गुणगुणून पहावा.

आता मी योजलेल्या शब्दयोजनेबद्दल थोडेसे.........

मी वापरलेले शब्दप्रयोग...”काळजातले गार निखारे”, “का धगधगले”........
“निखारा” म्हणजे जळणारा “जिवंत” कोळसा किंवा विस्तव.
“निखारणे” म्हणजे धगधगणे, किंवा प्रज्वलीत होणे......
“निखारणे” मधे नाहीसे करणे/होणे किंवा पूर्णपणे घालवणे अशीही छटा आहे. असो.
निखारा हा वरून जरी गार झालेला दिसत असला तरी त्यात धग शिल्लक असू शकते, म्हणूनच तो मधूनच धगधगू शकतो, जोराने उडू शकतो, भडभड पेटू शकतो, चकाकू शकतो, अतिशय कढत होवू शकतो. म्हणून मी म्हटले आहे की, हे काळजातले (वरकरणी वाटणारे) गार निखारे काल का धगधगू लागले? निखारे आले की, धग आली, धगधगणे आले. त्यामुळे वर वापरलेले सर्व शब्दप्रयोग हे तर्कशुद्ध व अतिशय अनिवार्य असे आहेत.

मी दिलेला हा शेर एक उद्गार आहे, एक स्वगत आहे, जे मी पहिल्या प्रश्नात्मक मिस-यात व्यक्त केले आहे. असा उद्गार मी का काढला कारण हसता हसता, क्षणातच माझे गाल रडून पुन्हा ओले झाले आहेत ही परिस्थिती!
सौंदर्याचे रसग्रहण करायचे झाल्यास पहिल्या ओळीतील लय, नाद, एकारांती आलेले सूचक शब्दप्रयोग हे मिस-याचे सौंदर्य माझ्या मते वाढवितात. उदाहरणार्थ.....काळजातले / गार निखारे / का धगधगले ........

वर उल्लेख केलेला अर्थ हा शेराचा शारिरीक अर्थ वा शब्दश: अर्थ.
त्याच्या लाक्षणीक वा ध्वन्यार्थाकडे पाहिले तर शेर बरेच काही सांगून जातो!
इथे काळजातले गार निखारे, त्यांचे धगधगणे हे काय सूचीत करते यावर आपण विचार केलात काय? निखारे, धगधगणे...या प्रतिमा आहेत.

आपल्या काळजात अनेक कटू गोड अनुभव दडलेले असतात, ज्यांच्या कटू गोड स्मृती होतात, ज्या ब-याच काळ सुप्त राहू शकतात, पण कधीच नाहीशा होत नाहीत. जणू त्या स्मृती वा ते अनुभव हे एखाद्या सुप्त किंवा गार निखा-यासारखे असतात. त्यांच्यात असलेली धग पुन्हा उफाळून येवू शकते. म्हणजे विस्मृतीत गेलेल्या स्मृती परत एखाद्या ताज्या प्रसंगामुळे जाग्या होवू शकतात किंवा धगधगू शकतात. आता त्या स्मृती जर कटू अनुभवाच्या असतील तर परत वास्तवात माणसाच्या डोळ्यात पाणी येवू शकते व त्याचे गाल पुन्हा एकदा रडून ओले होवू शकतात.

आता तुलना करायचीच झाली (जी आपण करत आहात) तर........

विझलेल्या ज्वाळा काल पुन्हा धगधगल्या या मूळ गझलेतील प्रतिमा पहिल्या तर.......
ज्वाला किंवा ज्वाळा म्हणजे जाळ किंवा ज्योत. ज्या ज्वाळा विझलेल्या होत्या त्या पुन्हा धगधगल्या असे म्हणण्या पेक्षा वरकरणी गार निखारे, त्यांच्यात
असणा-या अंतर्गत धगीमुळे पुन्हा धगधगले असे म्हणणे मला जास्त तर्कशुद्ध, समर्पक व शास्त्रशुद्ध वाटत आहे. शिवाय विधानापेक्षा प्रश्नात्मक मिसरा शेराची उंची निश्चीतच वाढवतो.
मला वाटते इतके भाष्य या शेराच्या रसास्वादासाठी पुरे आहे. शेराचा प्रवाहीपणा कणभरही कमी होत नाही!
.........................................................................................................मी दिलेला दुसरा खयाल/शेर.......

“मन माझे म्हणते की, झाला विचार पक्का कायमचा!
दुस-या क्षणास का चुकचुकते, ही शंकेची पाल पुन्हा?”

या शेरात माणसाच्या मनाची चंचलता अभिव्यक्त करायची आहे. म्हणून अर्थ जरी मूळचाच असला तरी शब्दयोजना(अभिव्यक्ती) माझ्या पिंडानुसार बदलली आहे. आपणास ती निरर्थक फेरफार वाटली, हे आपले मत झाले, मला तसे अजिबात वाटत नाही. मूळ शेरातील दुस-या ओळीत क्षणात येते आणि मग नंतर शंकेची पाल का चुकचुकते असे म्हटले आहे. इथे क्षणात येते हे मला अनावश्यक वाटते. क्षणात शब्द ठीक आहे, पण “येते” अनावश्यक वाटते. महत्वाचे आहे ते शंकेच्या पालीचे चुकचुकणे.
उलट माझ्या दुस-या मिस-यात “दुस-या क्षणास” का चुकचुकते ही शंकेची पाल पुन्हा असे आहे. म्हणजे पालीचे येणे ही अनावश्यक शब्दयोजना टाळलेली आहे. शिवाय एका क्षणात एक विचार पक्का व दुस-या क्षणास उलटा विचार (शंकेची पाल चुकचुकणे) हा विरोधाभास दुस-या ओळीत ठळकपणे अभिव्यक्त झाला आहे.
दोन्ही ओळींचा समग्र विचार केल्यावर मनाच्या या चंचल स्वभावाचे थेट दर्शन घडते असे मला वाटते. दुसरा मिसरा आपण परत म्हटल्यास कुठेही या मात्रावृत्तातील लयीत बिघाड झाला आहे असे मला अजिबात वाटत नाही. “दुस-या क्षणात” नसून ‘दुस-या क्षणास” असा शब्दप्रयोग आहे. परत शेर वाचावा.
.........................................................................................................

मी दिलेला तिसरा शेर...........

“काय माणसा, फरक तुझ्या अन् श्वानामध्ये आज उरे?
किती बदडले तरी शेपट्या हलवत दोघे याल पुन्हा!”

या शेरावर आपण केलेली टिपण्णी अजिबात बरोबर नाही. “आशय, लय यात कसलीच भर नाही, अनावश्यक शब्दबदल वगैरे”<<<<<
आपले म्हणणे मला का पटत नाही ते सांगतो.......
मूळ शेरात –हस्वदीर्घाच्या चुका व वृत्तशरणता जाणवते. उदाहरणार्थ: “माणूस”-लय बिघडली, कारण लयीत यायला “माणुस” असे वाचायला लागते. “आणिक” शब्दही खटकतो. केवळ मात्रापूर्तीसाठी वापरल्यासारखे दिसते. “तुम्हास” शब्दाच्या मात्रा=२+२+१=५ आहेत. इथे लयीकरता १+२+१=४ असे करावे लागते, म्हणजे मात्रांचा हिशोब चुकतो. पहा गुणगुणून!
मूळच्या दुस-या ओळीत “शेपुट” शब्द आला आहे. तो शब्द “शेपूट” असा आहे. म्हणजे –हस्वदीर्घाची सूट घेतली आहे, जे गझलेत बोचरे वाटते. हे सर्व दोष काढण्यासाठी, मी, खयाल तोच ठेवून शब्दयोजना बदलली आहे.
मुळात हा शेर संवादात्मक केला आहे. मी(गझलकार) व माणूस यांमधला संवाद आहे, ज्यात माणूस व श्वान यांच्यातले साधर्म्य अधोरेखीत केले आहे. म्हणून माझ्या पहिल्या मिस-यात “काय माणसा” असे संबोधन आले आहे. माणूस व श्वान असे दोघे आल्याने “शेपट्या” चालू शकते. म्हणजे “शेपुट” हा चुकीचा शब्द टळला. एवढे स्पष्टीकरण शेराच्या प्रयोजनासाठी पुरे आहे. आता मला वाटते माझ्या शब्दप्रयोजनाचे (नुसते शाब्दीक फेरफार नव्हेत) कारण आपल्या लक्षात यावे! बाकी आपली मर्जी! शेवटी पसंद अपनी अपनी!
.........................................................................................................
मी दिलेला चौथा शेर (खयाल)............

“वर्षाच्या पहिल्या दिवशी मी, सोडावे संकल्प किती?
पहिले पाढे पंचावन! अन्, तसेच गेले साल पुन्हा!!”

हा शेर पूर्ण नवाच आहे, कारण साल हा काफिया व पुन्हा हा रदीफ घेवून पूर्ण नवा खयाल कसा वाटतो हे दाखविले आहे. या माझ्या शेरात “पहिले पाढे पंचावन” या वाक्प्रचाराचा यथार्थ उपयोग केला आहे. असो. याचा अर्थ मूळ शेर मला रुचला नाही किंवा असा शेर गझलेत चालत नाही असा होत नाही.
मूळ शेरातली “लग्न जमत नसल्याची गंमत(?) पूर्णपणे अभिव्यक्त झाली नाही असे मला वाटते. मला अर्थ समजला नाही हा आपला सोयीसकर गैरसमज आहे!
“गेल्या वर्षापासुन होता 'कर्तव्याचा' बेत मनी” यात “पासुन” शब्द चुकीचा आहे. “पासून” असा शब्द हवा. इथेही वृत्तशरणता expose होते! तोच शेर जर दुरुस्त करायचा झाला तर असा लिहिता यईल.....

“लग्नाचा मी बेत आखला, त्याला झाले वर्ष पुरे!
पण पोहे खाण्यातच गेले निघून अख्खे साल पुन्हा!!”
मूळ शेरातील “कर्तव्याचा बेत” हे संदिग्ध वाटते. खुले खुले वाटत नाही.
“लग्नाचा बेत” म्हटले की, विचार पहिल्या ओळीत स्पष्ट होतो व त्या पार्श्वभूमीवर पोहे खाण्यातच अख्खे साल पुन्हा निघून गेल्याची गंमत जास्त समर्थपणे कळून यईल!
.........................................................................................................

मी दिलेला पाचवा शेर...........

“तुझ्या संगती जीवन गाणे म्हटले अन् सावरलो मी!
तू गेल्यावर, चुकले सारे आयुष्याचे ताल पुन्हा!!”

इथे परत स्पष्ट करतो की, मी केवळ माझा खयाल देत आहे, तुम्ही म्हणता तसा इस्लाह वगैरे करत नाही किंवा मूळ विचारात काही प्रक्षेपीतही करत नाही किंवा मूळ गझलकाराच्या काही माथीही मारत नाही वा काही घुसडतही नाही. तेव्हा मी जे करतो(खयाल देतो) ते योग्य की अयोग्य हे ठरवायचा अधिकार ज्याचा त्याला आहे. आपणास माझी शैली पचत नाही त्याला माझा नाइलाज आहे. क्षमस्व! आशयात व लयीत कसलीच भर पडत नाही” हे आपले म्हणणे मात्र मला हास्यास्पद वाटत आहे! मला वाटते आपण शेर फार वरवर वाचता. आम्ही म्हणतो..... “गझलेमधे न कोठे वरवर कलाकुसर!”
असे मी का म्हणतो ते सांगतो......
तुझ्या संगती जीवनगाणे मी म्हटले व मी सावरलो. या ओळीत “प्रेमाचे” शब्द मुद्दाम टाळला आहे. त्यामुळे “सावरणे” शब्दास वाव मिळाला. “सावरणे” शब्दावर जर आपण चिंतन केले तर कळून यईल की, माझ्या जीवनाचा तोल, ताल वगैरे मला सांभाळता आला, कारण तुझ्यासवे मी जीवनगाणे म्हटले. असे केल्याने
दुस-या मिस-यात तू गेल्यावर आयुष्याचे ताल पुन्हा चुकले या ओळीस उठाव येतो. शिवाय “आळवणे” या शब्दाची खोगीरभरतीही टळली.

या शेराचा लाक्षणीक वा ध्वन्यार्थ लक्षात घेतला तर असे म्हणता यईल की, हे देवा!, किंवा हे प्रियतमे!, वा “हे जिवलगा!”, तू अन् मी मिळून जेव्हा जीवनगाणे म्हटले तेव्हा आयुष्य हे तालबद्ध वाटले, सुखकारक वाटले, तालात वाटले, समतोलात वाटले, सावरल्यासारखे वाटले. पण तूच जेव्हा नसतेस, तेव्हा माझ्या आयुष्याचा ताल व तोल दोन्ही ढळतात.
मला वाटते एवढी शेराची फोड पुरेशी आहे. बाकी आपली मर्जी!
आता शेर पुन्हा वाचून, शब्दांची समर्पकता व अनिवार्यता लक्षात घेवून, आशय व लय यात भर पडली का ते तपासून पहावे. तुमच्यातला गझलकार त्यास बरोबर उत्तर देईल!
.........................................................................................................
आता मी दिलेला ६वा व शेवटचा शेर.........

“भालावरची रेष सुखाची, धूसर बहुधा झालेली!
तुला विनवणी करतो देवा! लिही नव्याने भाल पुन्हा!!”

मूळ शेरात भलावरची सुखाची रेषा बहुधा पुसली गेली आहे असे म्हटले आहे. यात पूर्ण निराशावाद जाणवतो. (याबद्दल माझा काही आक्षेप नाही) मात्र माझी अशी धारणा आहे की, विधिलिखत हे कधीच पुसले जावू शकत नाही, आपल्याला तसे वाटते, पण ते चुकीचे असते. म्हणून आम्ही म्हणतो बहुधा सुखाची रेषा धूसर झाली आहे, कारण माझ्या देवास त्यामुळे ती रेषा दिसत नसावी. परत माझ्या भालावर लिहिलेले सुख माझ्या वाट्यास प्रत्यक्षात यावे म्हणून दुस-या ओळीत आम्ही देवाला विनवणी करतो की, ती सुखाची रेषा धूसर झाल्याने तुला ती जर दिसत नसेल तर, कृपया तू माझे भाल (म्हणजे विधिलिखित) पुन्हा एकदा नव्याने लिही. “तुला विनवणी करतो देवा! लिही नव्याने भाल पुन्हा!” ही माझी ओळ मूळ शेरातील दुस-या ओळीच्याच अर्थाची असली तरी तिची अभिव्यक्ती ही जास्त संवादात्मक व जास्त बोली अशी वाटते. विनंती ऎवजी “विनवणी” शब्दात जास्त आर्जव आहे. आता हे बारकावे ज्याने त्याने आपल्या सौंदर्यबोधानुसार जाणून घ्यायचे असतात. आपण विचारलेत म्हणून मला फोड करण्याचा खटाटोप करावा लागला. असो. तेव्हा
दुस-या ओळीतील शब्दांची फेरफार, प्रयोजन वगैरे एव्हाना आपणास उमगले असेल, असे मी गृहीत धरतो.

टीप: मी प्रतिसाद कसा द्यावा ही केवळ माझी मर्जी आहे. माझी शैली अशी आहे. कुणास ती पटत, रुचत वा पेलवत नसेल तर माझा नाइलाज आहे. तेव्हा आपण मला दिलेला मोफत सल्ला आपणास साभार परत करत आहे. क्षमस्व!

वैभव पाठक यांची ही गझल आहे. त्यांना काय वाटते ते मला जास्त महत्वाचे आहे. अर्थात आपल्या सारख्या जाणकारांचे मतही माझ्यासाठी मोलाचे आहे, म्हणून वर दिलेल्या माझ्या प्रदीर्घ स्पष्टीकरणाचा खटाटोप!
आपला लोभ असाच असू द्या! एका गझलकाराची कळकळीची विनंती!

..................प्रा. सतीश देवपूरकर

एक प्रामाणीक विनवणी........

माझ्या गझलांवर समस्त मायबोलीकर, त्यांचे खयाल/ शेर /पर्यायी शेर (मला या शब्दाचे अजिबात वावडे नाही) देवू शकतात. मी त्यांचे खुल्या दिलाने स्वागतच करीन. शेर जर काळजास चटका लावणारा असेल तर मी लिहिणा-याला त्रिवार वंदन करेन व लिहिणा-याचे नाव घेवून ते शेर मुशाय-यात सन्मानपूर्वक पेश करेन, व असे शेर काळजात कायम दागिन्यांप्रमाणे जपून ठेवेन. शेवटी शेरांवर गुळमुळीत प्रतिसाद देण्यापेक्षा, जर निखालस रसग्रहणात्मक प्रतासाद दिला गेला तर तो गझल लेखनास पोषकच ठरेल! वैयक्तीक अहंकार, प्रौढी, किती वर्षे गझल लेखन केले, औपचारीक शिक्षण, वय, पदव्या, हुद्दा या गोष्टी फारच गौण आहेत, ज्यांचा गझलेशी दुरूनही संबध नाही. तसे कोणी करत असेल तर ते फार दुर्दैवी व घातक आहे. शेवटी लेखनगर्भ निष्ठा, जिंदादिल असणे, जीवनातील कटू गोड अनुभव काव्यात्मकरित्या घेणे, शब्दांचे सखोल चिंतन करणे, शब्दांची आराधना करणे, जे जे चांगले आहे त्याचा निर्भयपणे आस्वाद घेणे व स्वत:चे साहित्यिक पोषण करणे, स्वत:ला संपन्न करणे हेच महत्वाचे! अलौकिक कव्य वा कलाक्रुती ही परमेश्वराची लीला वा करामत असते. आपण शायर फक्त माध्यम असतो त्या पांडुरंगाचे! कसला आला अहंकार? कसली आली प्रौढी? सर्व कर्तुत्व व करामत त्या पांडुरंगाची!
माझी पोटतिडीक मी व्यक्त केली! निर्णय मी रसिक मायबाप मायबोलीकरांवर सोडतो.
...............प्रा. सतीश देवपूरकर

@ देवपूरकर सर-

तुमचा प्रतिसाद ( संपूर्ण ) वाचला. मी त्याचा प्रतिवाद करू शकत नाही, हे मान्य करतो ! तुमचा एकूण एक शब्द खरा आहे. मला माझी चूक उमगली आहे. तुमच्या प्रतिसादावर/पर्यायी गझलेवर आक्षेप नोंदवण्यातला फोलपणा मला कळून चुकला आहे. हा गुन्हा परत माझ्याकडून होणार नाही, अशी ग्वाही देतो.
तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा !

मी फक्त कफिये, रदीफ व वृत्त तेच ठेवून माझे खयाल वाचकांसमोर केवळ आस्वादासाठी ठेवतो>>

प्रोफेसर साहेब, माफ करा, पण खरंच तुमच्या पर्यायी शेरांकडे मी तरी या दृष्टीने पाहिले नव्हते, केवळ एक तरहीसारखे वेगळे आस्वाद्य या दृष्टीने पाहिल्यास तुमचे आणि आमचे नक्की जमणार

आपण दोघेही पुण्यातच आहोत, नक्की भेटू या किंवा पुढच्या आठवड्यात

Happy

प्राध्यापक साहेब,
आपण दिलेले विश्लेषण वाचून खूप बरे वाटले.
पण आपल्या सर्व मतांशी मी सहमत नाही. आपण माझ्या मूळ गझलेची चिरफाड केलीत त्याला माझा मुळीच आक्षेप नाही ना कधी असेल. कारण मी इथे शिकण्यास आलो आहे...इथल्या दिग्गजांना मी आधीपासून वाचत आलो आहे. त्यामुळे सर्वांचे ( कौतुकाचे आणि परखड टीकेचे असे दोन्ही ) अभिप्राय माझ्यासाठी मोलाचे आहेत.
आपण सुचवलेल्या पर्यायी शेरांविषयी थोडे सांगू इच्छितो.
तुमच्या एकही शेराची मी माझ्या गझलेशी तुलना करणार नाही....तुलना कधी करावी जेव्हा आपण एकाच विषयावर दोन गझला लिहू तेव्हा आपल्याच दोन्ही रचनांची तुलना करण्यास हरकत नाही. दोन गझलकारांमध्ये तुलना करू नये मी तरी या मताचा आहे.
आपण दिलेला दुसरा शेर :
“मन माझे म्हणते की, झाला विचार पक्का कायमचा!
दुस-या क्षणास का चुकचुकते, ही शंकेची पाल पुन्हा?”

या आपण दिलेल्या पर्यायी शेरात 'ही' हा भरीचा अनावश्यक शब्द आला आहे. तो नक्कीच खटकतो. त्यामुळे निर्दोष शेर कोणता हे जाणकारच ठरवतील.

पाचवा शेर :

“तुझ्या संगती जीवन गाणे म्हटले अन् सावरलो मी!
तू गेल्यावर, चुकले सारे आयुष्याचे ताल पुन्हा!!”

या मध्ये आपण असे लिहिले आहे कि माझे आळवणे हा शब्द खोगीरभरती आहे.
आळवले ऐवजी म्हटले असे घेऊन तुम्ही आळवले या शब्दाला खोगीरभरती म्हणता आहात....ये कहाका न्याय हुआ प्रभू ???

आता शेवटच्या शेराविषयी बोलू :
आपण सुचवले आहे कि सुखाची रेष धूसर झाली आहे. हा निव्वळ तुम्ही केलेला बदल आहे.
मला सुख संपले आहे असे म्हणायचे असताना रेष धूसर झाली आहे हा शब्प्रयोग चुकीचा वाटतो.
धूसर होणे म्हणजे थोडेफार का होईना सुख आहे आयष्यात अजून...ही मूळ गझलेशी निव्वळ विसंगती आहे.

आणि आता र्हस्व आणि दीर्घ विषयी बोलू.
जिथे जिथे आपण र्हस्व आणि दीर्घ चे बदल सुचवले आहेत ते सर्व मला मान्य आहेत.
पण कुठेही त्या शब्दांना उच्चारताना मला तरी ओढाताण जाणवली नाही. शेवटी लय महत्वाची आहे.
नाहीतरी खुद्द सुरेश भट साहेबांनी अता आणि परंतू सारखे शब्द सर्रास वापरले नसते.
असो वर मांडलेली सर्व फक्त माझी मते आहेत. तुम्ही ती स्वीकारावीत हा माझा आग्रह नाही.
असाच लोभ राहूद्या.
धन्यवाद.

वैभवजी, आपला, वेळाने आलेला, माझ्या प्रतिसादावरील प्रतिसाद वाचला. प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो की, मी दिलेल्या खयालांवर द्न्यानेशजींनी जी विस्तारीत प्रतिक्रिया दिली, तिला उत्तर म्हणून, मी आपल्या या गझलेवर प्रदीर्घ स्पष्टीकरण दिले आहे. तुलना करायचा माझा हेतू नसतो हे मी आधीच लिहिले आहे. द्न्यानेशजी जेव्हा तुलना करू लागले तेव्हा मला शेरांची तुलनात्मक प्रदीर्घ फोड करावी लागली. या सर्व गोष्टींकडे एक रसग्रहणात्मक चर्चा म्हणून पहावे. ती चिरफाड वगैरे नाही. शब्दांच्या, प्रतिमांच्या शारिरीक, लाक्षणीक व ध्वन्यार्थाकडे मी फक्त लक्ष वेधले व योग्य शब्दांची अनिवार्यता दाखवून दिली. इथे ओघाने आलेली तुलना ही द्न्यानेशजींची मागणी होती. असो.

“ही शंकेची पाल पुन्हा” मधे “ही” आपणास अनावश्यक वाटत आहे. पण आपण जर शेराचा एकूण डौल पाहिला तर तो शेर म्हणजे एक स्वगत आहे. आपलेच आपल्याशी बोलणे. हा बोली भाषेचा प्रभाव वा बाज येण्याकरता, ही शंकेची पाल, अशी शब्दयोजना करण्यात आलेली आहे. “ही” शब्द टाळणे काही अवघड नाही. पण मला शेराचा बोलकेपणा कमी करायचा नव्हता. इथे कुठल्याही वृत्तपूर्ततेसाठी “ही” शब्द आलेला नाही! असो.

पाचव्या शेरावरचा माझा प्रतिसाद आपण पुन्हा बारकाइने वाचला तर “सावरणे” शब्दाची अनिवार्यता आपणास कळेल. द्विरुक्ती टाळण्यासाठी मी अजून या शेरावर काही लिहित नाही.

शेवटच्या शेरावरील माझा प्रतिसाद परत वाचावा कारण विधिलिखित कधीही पुसले जावू शकत नाही अशी माझी धारणा आहे. म्हणून “धूसर” शब्द मी वापरला आहे. म्हणून दुस-या ओळीत देवाला विनवणी केली आहे की, त्याने पुन्हा नव्याने माझे भाल म्हणजे विधिलिखित लिहावे. इथे मी तर्कशुद्धता व शास्त्रशुद्धता वगैरेंचा निर्देश केला आहे. कृपया ते वर्णन परत वाचून पहावे, म्हणजे उलगडा होईल.

आता –हस्वदीर्घाच्या चुकांविषयी बोलतो.......
गझल व गीत यांत बराच फरक आहे. गझलेचे व्याकरण, नियम, ताल, नखरे काही औरच आहेत. कामयाब गझल ही व्याकरणाच्या दृष्टीने निर्दोष, गोटीबंद व सफाइदारपणे लिहिलेली असते. कुठेही
–हस्वदीर्घाच्या चुका वा वृत्तशरणता वा अनावश्यक शब्दांची मांडणी चालत नाही. अनावश्यक शब्दांना शेरात जागाच नसते. लय ही नंतरची बाब झाली, जी आपोआप येते, जर वृत्तात गोटीबंद लिहिले असेल तर. –हस्वदीर्घाची वा इतर कुठलीही सूट वा सवलत घेवून लय साधू नये. वृत्तावर पकड असली की, लय आपोआप येते. लयीकरता कुठलाही वेगळा खटाटोप करावा लागत नाही. गीतात –हस्वदीर्घाची सोयीस्कर अलटापालट केली तरी चालते, गझलेत ते क्षम्य नाही! गझलेच्या याच नख-यांमुळे भलेभलेही गझलेच्या वाट्यास जायला बिचकतात. असो.

आता आपण कविवर्य सुरेश भट यांचा उल्लेख केलात म्हणून सांगतो......
>>>“अता” हा चुकीचा शब्द आहे. “आता” हे बरोबर! स्वत: दादांनी(सुरेश भटांनी) माझ्या बरोबर झालेल्या चर्चेत सुमारे २५ वर्षांपूर्वी हे कबूल केले आहे. ते म्हणाले ‘मी “अता” हा चुकीचा शब्दप्रयोग करून बसलो. मी चुकलो पण आपण चुकू नका.’ तेव्हापासून मी माझ्या गझलेत “अता” शब्द कधीही वापरलेला नाही. </strong>तसेच “परंतू” शब्द बहुतेक “परंतु” असा असावा. कदाचित वाक्याच्या शेवटी जर तो शब्द आला तर “परंतू” चालत असावे. मला खात्री नाही. शोधून सांगेन.

पण एक मात्र निश्चीत की, निर्दोष गझल लेखनासाठी वृत्तावरची पकड, शुद्ध लिखाण व शब्दांचे सखोल चिंतन हे आवश्यक असते. कुठलीच सूट गझलेत घेवू नये, या मताचा मी तरी आहे. प्रत्येकाची लेखनाची शैली वेगळी असते, कारण प्रत्येकाचा पिंड वेगळा असतो. असो. आपल्या गझल लेखनास माझ्या शुभेच्छा!

शेवटी फक्त माझा एक शेर देतो.....

“हा कसा मुळमूळ रडल्यासारखा पाऊस पडतो?
पावसाने पावसाच्या पायरीने कोसळावे!

................प्रा. सतीश देवपूरकर

'अता' आणि 'आता' हे दोन्ही शब्द बरोबर आहेत. दोन्ही शब्द मराठी शब्दकोशात आहेत,
सध्या ऑफिसात असल्यामुळे लिंक देऊ शकत नाही. पाहिजेच असेल तर नंतर शोधून देईन.

"कुठलीच सूट गझलेत घेवू नये, या मताचा मी तरी आहे" असे लिहून झाल्यावर दोनच ओळींनंतर 'मुळमूळ' हा शब्द तुम्ही शेरात वापरला आहे.
ही 'सूट' नसावी किंवा अशी सूट घेणे हे काही ठराविक लोकांनाच सूट होत असावे.

असो.

हुश्श................................................................................................................................................................................................................................................................

भालावरची रेष सुखाची बहुधा पुसली गेलेली
एक विनंती तुला, "लिहावे, देवा माझे भाल पुन्हा
सुरेख..
सुटे मिसरे छान..
गझल आवडली..