आईची भूमिका जगतांना (संयुक्ता मातृदिन २०१२)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 13 May, 2012 - 02:42


Mothers day resized.jpg

संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्‍यांत मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहाने साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
line.pngआईची भूमिका जगतांना

प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात दोन भूमिका बजावत असते/तो. लहानपणी आईवडिलांच्या मायेत लहानपण अनुभवणे आणि मग आपण आईबाबा झाल्यावर आपल्या मुलांचं लहानपण पालकांच्या भूमिकेतून अनुभवणे. विशेषतः दुसर्‍या टप्प्यावरची भूमिका पार पाडताना, कुठे ना कुठे आपल्या मनात आपल्या आईचं, तिने दिलेल्या शिकवणीचं, तिनं केलेल्या संस्कारांचं स्मरण होत असतंच, नाही का? कधी सारख्याच प्रकारचे पेचप्रसंग उभे राहतात, त्यावेळी आपल्या आईनं घेतलेला निर्णय एक पालक म्हणून आपल्याला मार्गदर्शक ठरतो तर कधी आपल्या लहानपणीची परिस्थिती आता बदलल्याने आपल्याला आपली भूमिका बदलून घ्यावी लागते.

हे सगळं मुद्दाम ठरवून होत नाही नक्कीच. पण आजच्या मातृदिनाच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यातल्या या दोन टप्प्यांकडे विचारपूर्वक बघूयात.

तुमच्या बालपणीची शिदोरी आताच्या प्रवासात कितपत आणि कशी उपयोगी पडत आहे? आपल्या आईच्या आणि आपल्या भुमिकेत काळानुरूप, परिस्थितीनुरूप, विचारानुरूप कसा फरक पडला आहे? आपल्यावर लहानपणी आईवडिलांनी केलेले संस्कार जसेच्या तसे पुढच्या पिढीत संक्रमित करणं शक्य आहे असं वाटतं का? त्याची गरज वाटते का? दोन पिढ्यांचे संघर्ष-विषय बदलले आहेत असं वाटतंय का? आणि आपल्या या बदलेल्या भूमिकेबद्दल आपल्या आईची काय प्रतिक्रिया असते? यावर चर्चा करूयात.

मातृदिनाच्या निमित्ताने आपल्या आईबद्दलच्या आणि आईपणाबद्दलच्या /वडिलपणाबद्दलच्या भावना सर्वांपर्यंत पोहचवणार ना? विचार मांडणे सोपे जावे म्हणून आम्ही काही प्रश्न देत आहोत.

  1. आईच्या स्वभावातील कुठली गोष्ट लहानपणी विशेष आवडत असे ?
  2. आईच्या स्वभावातील कुठली गोष्ट लहानपणी खटकत असे / आवडत नसे ?
  3. आता स्वतः पालकत्वाच्या भूमिकेत शिरल्यावर त्या गोष्टी अजूनही चूक किंवा बरोबर वाटतात का ? की भूमिका बदलल्यावर, वय वाढल्यावर मतही बदलले ?
  4. आईने शिकवलेली कुठली गोष्ट तुम्हाला पालकत्व निभावताना सर्वात जास्त उपयोगी पडते ?
  5. आईच्या संगोपनातील न आवडणारी / खटकणारी बाब तुम्ही पालक म्हणून टाळण्याचा प्रयत्न करता का ?
  6. आत्ताच्या काळात आईने केलेले संस्कार किती प्रमाणात कालबाह्य वाटतात / वाटत नाहीत ? वाटत असतील तर नक्की कुठल्या बाबतीत ?
  7. तुमची पालकत्वाची शैली ( parenting style ) तुमच्या आईला पटते का ? की तिथे जनरेशन गॅप आडवी येते ?

चला तर मग, उत्तरं शोधण्याच्या निमित्ताने आपल्या बालपणात डोकावून पाहता येईल. शिवाय इतके वर्षं दुसर्‍या बाजूने पाहिलेली पालकत्वाची भूमिका स्वतः जगताना त्यात आईचं, तिच्या विचारांचं योगदान किती हेही चाचपता येईल.
आपल्या प्रतिसादांची वाट पाहत आहोत.

-संयुक्ता व्यवस्थापन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा खुप छान उपक्रम Happy
आधी इतल्या प्रश्नांच्या अनुषंगाने :

१. आईच्या स्वभावातील कुठली गोष्ट लहानपणी विशेष आवडत असे ?
आईचे वाचन, तिचे भरतकाम, शिवणकाम, विणकाम, आमच्या शाळांमध्ये तिचे येणे, शिक्षकांशी असलेला तिचा संवाद, आमचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम ती बसवायची ते, तिचे लांब केस, तिचा आजूबाजूच्या आयांपेक्षा वेगळा असणारा काहीसा व्यवहारी- वैज्ञानिक-गणिती-व्यवस्थापनाचा स्वभाव !

२. आईच्या स्वभावातील कुठली गोष्ट लहानपणी खटकत असे / आवडत नसे ?
आईला तिच्या अंगाशी आलेले फारसी आवडायचे नाही. तिच्या मांडीवर लोळणे तर अजिबात नाही. पण मी धाकटी असल्याने 'घुसून' असायची Wink

३. आता स्वतः पालकत्वाच्या भूमिकेत शिरल्यावर त्या गोष्टी अजूनही चूक किंवा बरोबर वाटतात का ? की भूमिका बदलल्यावर, वय वाढल्यावर मतही बदलले ?
ह्म्म्म... ही इतकी वैयक्तिक गोष्ट होती की त्याबद्दल चूक-बरोबर अशी कोणतीच भावना नाही. हं तो तिचा स्वभाव अन आवड, बस इतकच Happy

४. आईने शिकवलेली कुठली गोष्ट तुम्हाला पालकत्व निभावताना सर्वात जास्त उपयोगी पडते ?
कोणतीही गोष्ट अत्यंत वस्तुनिष्ठपणे स्विकारणे तिनेच शिकवले. हे सर्वात उपयोगी पडले सार्‍या आयुष्यासाठीच.

५. आईच्या संगोपनातील न आवडणारी / खटकणारी बाब तुम्ही पालक म्हणून टाळण्याचा प्रयत्न करता का ?
हो, मला आवडते लहान मुले अंगाखांद्यावर खेळवायला. काहीं जणी नक्की नाकं मुरडतील पण आजही १८ वर्षाचा माझा मुलगा गळ्यात पडतो माझ्या. अन लेकच नाही तर माझे भाच्या, भाची अन आता तर भाचे सूनही गळ्यात हात टाकून 'माई, काल ना ...' असं म्हणतच सुरुवात करतात भेटले की Happy

६. आत्ताच्या काळात आईने केलेले संस्कार किती प्रमाणात कालबाह्य वाटतात / वाटत नाहीत ? वाटत असतील तर नक्की कुठल्या बाबतीत ?
नाही तिने केलेला एकही संस्कार कालबाह्य नाही झालेला.

७.तुमची पालकत्वाची शैली ( parenting style ) तुमच्या आईला पटते का ? की तिथे जनरेशन गॅप आडवी येते ?
हो पटते तिला. काही बाबतीत आहेत आमचे मतभेद. पण माझे वागणे पटले नाही तरी माझी त्यामागची भूमिका तिला समजते. "वुई अ‍ॅग्री टू डिफर" हे तत्व तिला चांगले माहिती आहे.

आता काही इतर :
आमची आई त्या काळाच्या तुलनेत बर्‍यापैकी वेगळी. त्या काळात, त्या परिस्थितीत, एकत्र कुटुंबात ( ४ दिर, १ जाऊ, ५ नणदा, सासू ) राहूनही स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवलेच तिने. म्हणजे पहिला काही काळ, अगदी आम्ही मुली मोठ्या होई पर्यंत संसाराव्यतिरिक्त नाही फारसे ती करू शकली. पण घरच्यांच्यासाठी म्हणुन का होईना आपला छंद शिवण, विणकामातून तिने जपला. मला आठवतं तेव्हापासून एकी कडे रेडिओ ऐकत स्वयंपाक करणारी आई, दुपारी झोपा काढायच्या ऐवजी हातात शिवण/ विणकाम करत रेडिओवर बातम्यांपासून नाटकं, गाणी ऐकणारी आई आठवते मला Happy

तिचा वर उल्लेखलेला काहीसा व्यवहारी-वैज्ञानिक-गणिती-व्यवस्थापनाचा स्वभाव हे तिचे वेगळेपण. प्रत्येक अडचणीतून ती उभी राहिली ती हा स्वभाव घेऊन. आम्हा चौघी बहिणींना वाढवतानाही तिची हीच वृत्ती होती. म्हणूनच आम्ही चौघी मुली असूनही आम्ही कधी 'बायकी' राहिलो नाही. नाटक असेल, भोसला मिल्ट्री स्कूल असेल, कथ्थक डान्स असेल, सतार असेल, क्रिकेट असेल, कब्बड्डी असेल, बॅडमिंटन असेल,... वेगवेगळी क्षेत्रे तिने आम्हाला दाखवली, आणि आम्ही निवडलेल्या प्रत्येक क्षेत्र तिने आनंदाने स्विकारले.
आज मी ज्या अनेक गोष्टी करते, करू शकते याचे सर्वात मोठे श्रेय तिलाच .
धन्यवाद संयुक्ता व्यवस्थापन, आज तुमच्यामुळे मी आईसाठी हे सगळे लिहू शकले Happy
Aai Ani amhi 4.jpg

छान प्रतिसाद अवल. विशेषतः शेवटचे छायाचित्र. एकदम मस्त. त्यातली सगळ्यात चिमुकली म्हणजे अवल का? Happy

खूप छान लिहिलंय अवल. आम्हालाही खूप प्रेरणादायी आहे. आणि आईचा फोटो खासच. किती सात्विक आहेत त्या. आणि चार छोटुकल्या पण गोड. Happy

आईच्या स्वभावातील कुठली गोष्ट लहानपणी विशेष आवडत असे ?
माझी आई अतिशय प्रॅक्टीकल विचार करते. जेव्हढे जरूर आहे तेव्हढेच बोलणे(उगीच पाल्हाळ नाही) व जेव्हा जरूरी आहे तेव्हा नक्कीच बोलणे या दोन गोष्टी तिला खासच जमतात! आमच्या घरात आज्जी असल्याने पूर्वीचा काळ, रितीभाती, आजीचा सोवळ्या ओवळ्यातला स्वयपाक इत्यादी गोष्टी झाल्याच घरी, पण तेव्हढेच नवीन विचारांचे स्वागत आमच्याच घरी झाले. आईनी मला कधीही कशालाही नाही म्हटले नाही, तरीदेखील मी स्पॉईल्ड झाले नाही याचे श्रेय आई(व बाबांनाच) जाते. आईबाबा घरात (दोन्ही साईडला) लहान. त्यामुळे कायमच मोठ्यांचा आदर ठेवणे, नमस्कार करणे या गोष्टी त्यांना करताना पाहूनच आमच्या अंगात भिनल्या.

आईच्या स्वभावातील कुठली गोष्ट लहानपणी खटकत असे / आवडत नसे ?
मिलिटरीची शिस्त! Happy लहानपणी खूप वैतागले आहे यावर. पण आमची इन्नीआजी(आईची आई) देखील अशीच कडक शिस्तीची. आई याच वातावरणात वाढली व तेच आमच्याकडे. प्रत्येक गोष्ट वेळेवर झालीच पाहिजे, अमुक पद्धतीने झालीच पाहिजे(अमुक डाव अमुक भाजीला, कुंडा कोशिंबीरीला, कपड्यांच्या घड्या करणे, कपडे वाळत घालताना एकही सुरकुती नसणे, बाहेर जाताना व्यवस्थितच कपडे, टापटीप राहणे, कोणाकडेही जाताना मोकळ्या हाताने न जाणे.. खूप खूप गोष्टी आहेत. इतक्या भिनल्या आहेत आता की लक्षातही येत नाही वेगळं) हे आईचे पर्फेक्शनिस्ट वागणे तेव्हा विशेषतः टिनेजर असताना जरा डाचायचे.

आता स्वतः पालकत्वाच्या भूमिकेत शिरल्यावर त्या गोष्टी अजूनही चूक किंवा बरोबर वाटतात का ? की भूमिका बदलल्यावर, वय वाढल्यावर मतही बदलले ?
पण आता स्वतः आई झाल्यावर तिच्या प्रत्येक आग्रहाचे कारण समजते. व ते तिचे वागणे किती बरोबर होते ते कळते. स्वतःचा संसार करताना खरंच तिच्याएव्हढं जमत नाही पण इच्छा तर आहे. जमेल तसस प्रयत्नही करते मी.

आईने शिकवलेली कुठली गोष्ट तुम्हाला पालकत्व निभावताना सर्वात जास्त उपयोगी पडते ?
शिस्त उपयोगी पडते. रूटीन पाळणे हे किती महत्वाचे आहे हे तिच्याकडूनच कळले मला. घरी कोणी येणार असेल तर कुठपर्यंत तयारी करावी लागते हेही तिच्याकडूनच शिकले मी. वाचन या प्रकाराचे महत्व आधी बाबा शिकले आईकडून. मग आईबाबांचे ते अफाट वाचन, चिंतन, मनन, डिस्कशन चाललेले असते ते पाहून माझ्यातही तेच जीन्स आलेत. आईनी कधीही माझ्या वाचनाला अडथळा आणला नाही. अफाट वेड्यासारखे पुस्तकाची पानं खाणारी बुकवर्म झाले होते तरी एकदाही "मुलीच्या जातीला हे बरं नाही" अशा टाईप वाक्यं फेकली नाहीत याबद्दल तर खूपच धन्यवाद देते मी आईला. आयुष्यात 'कला' व खेळ किती महत्वाचे आहेत हे समजणे ही आईची देणगी. आमच्या घरात सतत संगीत चालू असते. कधी रेडीओ,कॅसेट प्लेयर तर कधी आईच गात असते. त्यामुळे आमच्या कानावर ते वेगवेगळ्या प्रकारचे संगीत पडले व आम्हा दोन्ही भावंडांना गाणं ऐकायला आवडते. चित्रकला, मेंदी,रांगोळी काढणे, पेटी/सिन्थेसायझर/गिटार वाजवणे, गोष्टी नीट ऑगनाईझ करणे, पोहणे,बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल सर्व प्रकारच्या खेळात मी माहिर होते. हे सगळे गुण आम्हा भावंडांत आईमुळेच आलेत. कित्येक वर्षं शनीवार्,रविवार सकाळी आम्ही चौघेहीजणं बॅडमिंटन खेळायला बाहेर पडायचो. आणि मला माझ्या मुलाला वाढवताना असेच बाळकडू द्यायचे आहे. छंद असले की माणूस कधी एकटा पडत नाही ही आईची शिकवण.

आईच्या संगोपनातील न आवडणारी / खटकणारी बाब तुम्ही पालक म्हणून टाळण्याचा प्रयत्न करता का ?
तसं खटकत काहीच नाही. पालक म्हणून टाळण्याचा प्रयत्न इत्यादीचा प्रश्नच नाहीये. मला इतका अनुभव नाहीये पेरेंटींगचा. व माझ्यासाठी आई रोल मॉडेल, आयडॉल आहे. मला जमले तर मी अगदी तिच्याचसारखे वागीन बर्‍याच बाबतीत!(जमत नाही हा भाग वेगळा!)

आत्ताच्या काळात आईने केलेले संस्कार किती प्रमाणात कालबाह्य वाटतात / वाटत नाहीत ? वाटत असतील तर नक्की कुठल्या बाबतीत ?
संस्कार काहीच कालबाह्य वाटत नाहीत. काही विचार वाटतात. उदाहरणार्थः ग्रहणाच्या काळात ती जरा अतीच करते. Proud पण आजीबरोबर ३५-३६ वर्षं राहिल्याचा तो परिणाम असेल असं म्हणून मी हसण्यावारी नेते. Happy

तुमची पालकत्वाची शैली ( parenting style ) तुमच्या आईला पटते का ? की तिथे जनरेशन गॅप आडवी येते ?
आई खूप खुष आहे माझ्या पेरेंटींग स्टाईलवर. मी स्टे अ‍ॅट होम मॉम आहे याचे तिला खूप कौतुक आहे. कारण मला माझ्या मुलाचे सर्व बालपण, सर्व अनुभव बघायला, अनुभवायला मिळतात. जे तिला नाही मिळाले कारण ती कायमच नोकरी करत आली व आम्हा भावंडांना पाळणाघरात ठेवावे लागले किंवा घरी सांभाळायला बाई/मुलगी असायची. बाकी, मुलगा अजुन लहान आहे, १.५ वर्षाचा. पण एव्हढ्या काळात तिला काही खटकलेले नाहीये. उलट खूप अभिमान आहे मी छान सांभाळते याबद्दल. Happy

धन्यवाद सर्वांना Happy मृदुला बरोबर ओळखलस की Happy
आम्हा चौघीनचे फ्रॉक आईनेच शिवलेले.
बस्के कित्ती छान लिहिलस ग Happy एकदम मनातल. वाचनाचा मुद्दा अगदी आमच्या घराची आठवण करुन दिलिस ग.
अशा गुणी मुलीचा अभिमान वाटणारच आईला Happy

अरारा.. पोस्टीत अ‍ॅड करताना पुसली गेली... छ्या.. पुन्हा आता वेळ काढून लिहावं लागणार... लिहिते थोड्या वेळाने.
सॉरी..

मस्त.. छान लिहीलय अवल, बस्के Happy अवल, मावशींचा चेहेरा किती बोलका अन सात्विक आहे. अन तोंडात बोट घातलेली अवल गोड आहे. Happy

धन्यवाद सर्वांना Happy आईचा तो फोटो तिच्या लग्नातला Happy अन हो माझा 'शेंडेफळ' ते 'अवल' प्रवास आता तुम्हाला कळला ना
Wink

1.आईच्या स्वभावातील कुठली गोष्ट लहानपणी विशेष आवडत असे ?
घर अगदी १ खोलीचे होते. पण तरी ही कुठली गोष्ट एका जागेवर पाहीजे. असा दंडकच त्यामूळे बराच वचक होता आम्हावर.

2.आईच्या स्वभावातील कुठली गोष्ट लहानपणी खटकत असे / आवडत नसे ?
अशी विशेष नाही पण आजीवरून किंवा आजीच्या स्वभावामुळे त्याची होणारी भाडणे आवड नसत. कोणीही नमते घेत नसत. मला समजत असले तरी सांगताना लहान असल्यामुळे कसा सांगणार. आणि विशेष म्हणजे लहान भावाला दुर शिक्षणाला पाठविले नाही हे ही खटकत असे.

3.आता स्वतः पालकत्वाच्या भूमिकेत शिरल्यावर त्या गोष्टी अजूनही चूक किंवा बरोबर वाटतात का ? की भूमिका बदलल्यावर, वय वाढल्यावर मतही बदलले ?
काही अंशी तिचे बरोबर वाटतेही , शेवटी आपुलकीच ना. परंतू कधी कधी अती व्हायचे.

4.आईने शिकवलेली कुठली गोष्ट तुम्हाला पालकत्व निभावताना सर्वात जास्त उपयोगी पडते ?
आहे त्या परिस्थितीत निभावुन नेणे.

5.आईच्या संगोपनातील न आवडणारी / खटकणारी बाब तुम्ही पालक म्हणून टाळण्याचा प्रयत्न करता का ?
नाही मुळीच नाही.

6.आत्ताच्या काळात आईने केलेले संस्कार किती प्रमाणात कालबाह्य वाटतात / वाटत नाहीत ? वाटत असतील तर नक्की कुठल्या बाबतीत ?
असे कोणतेही संस्कार कालबाह्य वाटत नाहीत. आपल्या संस्कॄतीने दिलेले सर्वच संस्कार आजही उपयोगी पडतात. मी, मुलगा आजही संध्याकाळचा देवाचा नमस्कार करतोच.

7.तुमची पालकत्वाची शैली ( parenting style ) तुमच्या आईला पटते का ? की तिथे जनरेशन गॅप आडवी येते ?
नाही पटत. मला १० वर्षाचा मुलगा आहे. मी जरी त्याचा अभ्यास घेत नसलो तरी ही 'सौ' घेते. त्या काही आले नाही तर ही मारते. त्यामुळे तो रडतो . रडला आजी आजोबा दोघे चिडतात. अभ्यास घेणे जिवावर येते आणि नुसते मारता. यावरुन वाद होतो. असे काही प्रसंग येतातच. पण एवढे पुरे.

धन्यवाद !