आई बिझी आहे (संयुक्ता मातृदिन २०१२)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 13 May, 2012 - 02:41


Mothers day resized.jpg

संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्‍यांत मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहाने साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
line.pngआई बिझी आहे

कधी कामानिमित्ताने आईला पुष्कळ वेळ कुटुंबापासून दूर, मुलांवेगळे रहावे लागते; कधी सतत अनेक महिने प्रवास करावा लागतो; या ना त्या निमित्ताने नात्यांचे नि वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागते. अश्या वेळी आई म्हणून तुम्ही ह्याला कसे सामोरे जाता किंवा एखाद्या आईने परिस्थितीला कसे तोंड दिले याचे अनुभव यावर्षीच्या मातृदिनाच्या निमित्ताने लिहूया.

आपल्या आईच्या कामाच्या वेळा, तिने संगोपनाचे, इतर कामांचे नियोजन कसे केले, बाबा आणि घरातल्या इतर सदस्यांची मदत कशी घेतली (किंवा नाही) हे तर सांगावेच पण मुख्य म्हणजे, "मला त्यावेळी तिच्या या सगळ्या धावपळीबद्दल असे वाटे आणि आता असे वाटते" हे लिहावे.दूर असताना मुख्य कोणत्या गोष्टींची काळजी वाटते, केव्हा खूप छान वाटले असे 'आईपण' स्पेशल प्रसंग लिहावेत

स्वतः या अनुभवातून जात असलेल्या आयांनी आपले अनुभव लिहावेत तसेच बिझी आईच्या प्रवासाला साक्षीदार असणार्‍या कुठल्याही मुलामुलीने, नवर्‍याने, ओळखीच्यांनी तिच्याबद्दल लिहावे.

तुमच्या प्रतिसादांची वाट पाहत आहोत.

-संयुक्ता व्यवस्थापन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या आईच्या 'सामाजिक जाणिवे'ची कल्पना मला लहान असतानाच आली होती. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या निवडणुकांसारख्या गोष्टींपर्यंत अनेक स्तरांवर तिचा सहभाग असे. मी लहान असताना तिने एका निवडणुकीत मोहन धारियांचा प्रचार केल्याचे आठवत आहे. इंदिरा गांधींचाही केला होता बहुतेक. अगदी पत्रके वाटणे, घरोघरी फिरणे इ. पर्यंत. पण तिच्या या ''सामाजिक भाना''ची खरी चुणूक दिसू लागली ते इ.स. १९८५ नंतर. प्राध्यापकी करता करता तिला इतर क्षेत्रेही खुणावत होती.

तिच्या भरीव योगदानाची सुरुवात झाली ते हुजूरपागेच्या शताब्दी समारोहाच्या निमित्ताने! जवळ जवळ संपूर्ण वर्ष - दीडवर्ष ती शताब्दी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तिची नोकरी सांभाळून तन-मन झोकून देऊन काम करत होती. त्या सर्व कार्यक्रमात तिने खजिनदाराची व स्वयंसेविकेची जबाबदारी निभावली. शताब्दी कार्यक्रमा अगोदर एक-दीड महिना तर ती शाळेत अगदी रात्री ९-९ वाजेपर्यंत कामात असायची. खांद्यावर अगदी दीनवाणी वाटावी अशी झोळी व त्यात हजारोंची कॅश या थाटात जिथे गरज असायची तिथे कामासाठी धावणारी आई मला या काळात पाहायला मिळाली. कित्येकदा तिच्याबरोबर मी व धाकटी बहीणही सायंकाळी शाळेत थांबत असू. मग आमच्या पोटाची काळजी तिच्या सहकारी, शाळेच्या माजी विद्यार्थिनी - माजी शिक्षिका किंवा इतर आजी शिक्षिका घ्यायच्या. आम्हाला तर जाम मजा वाटायची. ती खूप बिझी होती त्यामुळे अभ्यासासाठी आम्हाला दामटू शकायची नाही.... मग काय आनंदी आनंद!! Happy

शताब्दीनंतर काही कामाच्या निमित्ताने तिची प्राध्यापक संघटनेशी ओळख झाली व वाढली. तिला तिथे काम करावेसे वाटू लागले. मुळात इतर सहकारी प्राध्यापक स्त्री + पुरुषांप्रमाणे ती फक्त नोकरी + संसार यात रमणारी अजिबात नव्हती व नाही. त्यामुळे प्राध्यापक संघटनेच्या कामात तिचा प्रवेश झाल्यावर काहीच दिवसांत ती त्या कामात प्रचंड बिझी होऊन गेली. संघटनात्मक कार्याचा तिला स्वतःच्या युक्रांदच्या दिवसांमुळे जवळचा परिचय होता. आणि इथे तर तिच्या जिव्हाळ्याचा विषय होता. सहकारी प्राध्यापकांच्या नोकरी संबंधित समस्या सोडविणे, वेगवेगळे उपक्रम राबविणे याखेरीज आईमधील नेतृत्व गुणांना खरा वाव मिळाला तो प्राध्यापकांच्या राज्यव्यापी संपांमध्ये. तिचा ठणठणीत आवाज, भारदस्त व्यक्तिमत्त्व, वक्तृत्व, नेतृत्वगुण यांना तिथे भरपूर स्कोप होता. त्यानुसार ती अनेक वर्षे प्राध्यापक संघटनेच्या कार्यकारिणीवर वेगवेगळ्या पातळ्यांवर महिला आघाडी सांभाळत होती. आणि हे सर्व नोकरी + घर सांभाळून. खूपच बिझी असायची ती ह्या काळात. संघटनेच्या सर्वसाधारण सभा, कार्यकारिणीच्या सभा, संपकाळाची तयारी, धोरणे ठरविणे, खलबते, मोर्च्याची तयारी, निदर्शने, प्रेस कव्हरेज सांभाळणे, इतर प्राध्यापकांचा सहभाग वाढविणे इत्यादीपासून बाहेरगावाहून आलेल्या प्राध्यापकांचे चहापाणी करणे, त्यांचे जेवणखाण नीट होत आहे ना हे पाहणे यासारख्या असंख्य गोष्टी ती अतिशय उत्साहाने करत असे. त्यांच्या अनेक मीटिंग्ज आमच्या घरी चालत. माझे डोके अभ्यासाच्या पुस्तकात खुपसलेले असले तरी कान त्यांची काय खलबते चालतात याकडे असत.

या काळात आई दिवसभरात क्वचितच घरी दिसायची. सकाळीच ती सगळा स्वयंपाक करून जायची. आजीची (वडिलांची आई) तिला खमकी नैतिक साथ होती. आजी आम्हाला खाऊपिऊ घालणे, घरी थांबणे, घरी आलेल्यांची ऊठबस इत्यादी सांभाळायची. आम्हीही तयार होत होतो. फोन सतत घणघणत असायचा. आई एकदा घराबाहेर पडली की तिला परत घरी यायला किती वाजतील याचा काही नेम नसे. वडील या काळात बाहेरगावाच्या दौर्‍यावर असायचे बर्‍याचदा. घरी मी, बहीण व आजी. आई घरी यायची बर्‍याच उशीरा... आल्यावर जाम दमलेली असायची. पण मग आम्हा बहिणींची कुरकूर, तक्रारी, भांडणे, अभ्यास, दुसर्‍या दिवशीची तयारी इ. असायचीच! कधी स्वयंपाकाचा सायंकाळपर्यंत फन्ना उडालेला असायचा. मग ब्रेड, पिठलं-भात, वरण-भाताचा सहारा! त्यानंतर आवरासवर वगैरे करून रात्री साडेअकरा - बारापर्यंत निजानीज, की परत पहाटे साडेचाराचा गजर असायचाच!

तिच्या या सार्‍या धडपडीचे त्या वयात मला जाम कुतूहल, उत्सुकता, थ्रिल वाटायचे. त्याचबरोबर ती आपल्याला मिळत नाही म्हणून तिचा रागही यायचा. तिच्या सहकार्‍यांचाही कधी कधी राग यायचा. रात्री उशीरापर्यंत त्यांच्या चर्चा-मतभेद-वादावादी-खल चालायचे आणि मीटिंग संपली की गप्पा! खरंतर बराच वेळ गंभीर चर्चा वगैरे झाल्यावर सगळेजण जरा रिलॅक्स होत असायचे. कित्येकदा मला फोनवरच्या निरोप्याची भूमिका करायला लागायची. महत्त्वाचे निरोप असत ते! मग उगाच मला स्वतःबद्दल इम्पॉर्टन्स वाटायचा!

संपाच्या काळात आईला एकदा तरी तिच्या इतर सहकार्‍यांबरोबर औपचारिक अटक व्हायची. कधी मुंबईच्या आझाद मैदानावर, तर कधी पुण्यात फरासखान्याला... अर्थात ते सर्व पेपरात छापून येईपर्यंत आम्हाला घरी त्याबद्दल काही माहीतही नसायचे! मंत्र्यांशी फायनल चर्चा - वाटाघाटी होण्याअगोदर सहकार्‍यांसोबत मंत्रालयातील खेटे, खलबते, स्ट्रॅटेजी इत्यादींतही तिचा भरपूर वेळ जायचा. त्या काळात आईच्या पाळतीवर सामान्य वेषातील पोलिस असायचे. संप जसजसा तापत जायचा तसतसे आमच्या घरातील टेंपरेचरही चढायचे! आजीला व बाबांना नाही म्हटले तरी आईची काळजी ही वाटायचीच! कधी कधी आजी आईच्या तडतडीवर वैतागायची. आजी स्वतः शिक्षिका होती. परंतु तिला कधी असे संघटनात्मक पातळीवर काम करावेसे वाटले नसावे किंवा तिच्या काळात तशी संघटनाही नसावी. तिला आईच्या कामाचे कौतुक मात्र होते. संपकाळातील तडतडीबद्दल आजीच्या वैतागण्यात तथ्यही होते. कारण या काळात भूक-तहान वगैरे प्रकार विसरून ही प्राध्यापक मंडळी उन्हातान्हांत वणवण करत असायची. दिवसेंदिवस कटिंग चहा, वडापाव आणि मिसळीवर काढायची. प्राध्यापकी पेशाला एवढी वणवण न सोसवणारे अनेकजण काहीच दिवसात उताणे व्हायचे. अशी गळती सुरू झाली की उरलेल्या कार्यकर्त्यांची कामे पुन्हा वाढायची.

आईच्या या कारकीर्दीतील दोन प्रसंग अगदी ठळक आठवतात, कारण त्यांबद्दल वर्तमानपत्रातही बातम्या छापून आल्या होत्या.

एका प्रसंगात गरवारे कॉलेजच्या येथे संपकरी प्राध्यापकांची मीटिंग संपल्यावर सगळेजण बाहेर चर्चा-गप्पा करत थांबले असताना अचानक कोठून तरी एक राजकीय गुंडांचे टोळके आले व तेथील एका प्राध्यापकांना त्यांनी एका राजकीय पुढार्‍याची गाडी अडवून त्यांना संपाचे निवेदन दिल्याचे धार्ष्ट्य दाखवल्याबद्दल लाथाबुक्क्यांनी तुडवू लागले. आजूबाजूची मंडळी काही क्षण हवालदिल होऊन आश्चर्याने पाहतच राहिली. अचानक हे गुंड येतात काय, त्या निरपराध नि:शस्त्र प्राध्यापकाला बडवायला लागतात काय.... लोकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली, पण ते गुंड बधेनात! शेवटी गुंडच ते!! अखेर माझी आई व तिच्या दोन सहकारी मैत्रिणी मध्ये पडल्या. तरी ते गुंड मारामारी थांबवेनात. शेवटी आई व तिच्या मैत्रिणींनी स्वतःच्या शरीराची ढाल केली व त्या मार खाणार्‍या प्राध्यापकाच्या व गुंडांच्या मधोमध रणरागिणींसमान आपल्या शरीराचे कडे करून उभ्या राहिल्या. भारदस्त शरीरयष्टीची आई व तिच्या दोघी मैत्रिणी काडी पैलवान! पण तिघींच्या आविर्भावात अशी जरब असायची की बास! त्यामुळे या बायकांचे कडे भेदून त्या प्राध्यापक महाशयांपर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. त्यात बायकांच्या अंगावर हात टाकला असता तर त्याचे बरेच वाईट परिणाम झाले असते याची कल्पना त्या गुंडांनाही असावी! त्यामुळे या बायका मध्ये आल्यावर त्यांना नाईलाजाने माघार घ्यायला लागली. तोवर तिथेच मीटिंगसाठी उपस्थित असलेल्या मीडिया, प्रेसवाल्यांनी धपाधप फोटो काढले होते. दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात ठळक बातम्यांमध्ये ही बातमी व सोबतीला फोटोग्राफ्स! त्या वेळी या बायकांनी जे धैर्य दाखवले त्याचे सर्व स्तरांवरून कौतुक झाले. आमच्या घरी ती बातमी वाचल्यावर मग आईकडून आम्हाला उरलेला राजकीय किस्साही कळला!

आणखी एका प्रसंगात टिळक स्मारक मध्ये संपकरी प्राध्यापकांची सभा होती व नंतर सर्व प्राध्यापक स्वतःला अटक करवून घेणार होते. ही संपातील सामान्य रूढ पद्धती आहे. तर मजा अशी झाली की एका व्ही आय पींच्या प्राध्यापक बहिणीच्या व माझ्या आईच्या नामसाधर्म्यामुळे पोलिसांनी आईला अटक करण्यास नकारच दिला! तिला टिळक स्मारकच्या आवारातच पाऊल टाकू दिले नाही. कारण त्या नावाच्या बाईंना अटक करायची नाही अशा त्यांना वरून ऑर्डर्स होत्या! झाले!! आईला टिस्मा मध्येच शिरू न दिल्याने तिलाही काय करावे ते कळेना! तेवढ्यात तिला तिथून जवळच असलेल्या गॅस सिलेंडर एजन्सीत आमचा सिलेंडर बुक करायचे काम आठवले. इथे टिस्मात पोलिस आत तर सोडतच नव्हते, मग त्या वेळात ते काम तरी करून येऊ म्हणून ती त्या एजन्सीत जाऊन सिलेंडर बुक करून पंधरा-वीस मिनिटांनी परत आली. तर काय! तोवर पोलिसांनी सर्व प्राध्यापकांना अटक केली होती व त्यांच्या गाड्या तिथून रवानाही झाल्या होत्या! आई परत आली तर टिस्मा ओस पडले होते व प्राध्यापकांचा मागमूस नव्हता. मग आणखी एक उशीरा पोचलेला सहकारी व आईने मिळून अगोदर सर्व प्राध्यापक कोठे आहेत त्याचा छडा लावला. तर ते पोलिस परेड ग्राऊंडवर होते. अटकेत. दगडी कंपाऊंडच्या आत. मग भिंतीच्या बाहेरच्या बाजूने आई व आतील बाजूने संघटनेचे संपप्रमुख यांच्यात टाचा उंचावून, उड्या मारत वार्तालाप झाला. आत १०८ स्त्री प्राध्यापिका होत्या. मग आईने तेव्हाच्या पोलिस कमिशनरांना, कलेक्टरना फोन करून, भेट देऊन या प्राध्यापिकांना लवकर सोडावे यासाठी विनंती केली. शेवटी रात्री ८:३० वाजता सर्व प्राध्यापिकांना चांदणी चौकात सोडले गेले व रात्री १२ नंतर प्राध्यापक लोकांची सुटका झाली!

हे प्रसंग त्यांच्या नाट्यमयतेमुळे तत्कालीन संपकरी प्राध्यापकांच्या चांगलेच लक्षात राहिले.

संप मिटला की बाकीचे लोक सोडत नसतील इतके सुस्कारे संपात सहभागी प्राध्यापकांच्या घरांमधून सोडले जात असतील! कारण या काळात घरी-दारी-स्वप्नी सगळीकडे संप आणि संप - मागण्या हाच एकमेव विषय चर्चेत असायचा. त्यावरून दोस्ती-दुश्मनी व्हायची, फूट पडायची, राजकारण व्हायचे.... एक ना अनेक! नकळत आम्हीही त्याचे साक्षीदार बनायचो. सामूहिक - संघटनात्मक पातळीवर काही गोष्टी आपल्या हाताबाहेर कशा जाऊ शकतात, आपल्या नियंत्रणात नसतात हेही त्या निमित्ताने पाहिले. संघटनेत पडलेल्या फुटीची झळ कळत-नकळत परस्पर-स्नेहालाही कशी लागते तेही पाहिले. अनुभवले. या काळात मैत्र जुळलेल्या आईच्या दोन घट्ट मैत्रिणी व काही स्नेही मित्र पुढच्या काळात नोकरी-हुद्दा इ. सगळे विसरून एकमेकांच्या आयुष्यातील कठीण आणि आणीबाणीच्या काळात कसे मदतीला धावून गेले तेही पाहिले - अनुभवले. अपघात - आजारपणे - कर्ज - अपमृत्यू - ऑपरेशन्स इ. वेळी एकमेकांशी कडकडून भांडणारे, मतभेद असणारे सहकारी मदतीसाठी उभे राहताना पाहिले. आईने या सर्व कालखंडात अनेक माणसे जोडली. तिच्या तेव्हा केलेल्या कामाबद्दल अजूनही अनेकजण भरभरून बोलतात. त्या काळात आम्हाला ती आई म्हणून हवी होती. पण ती घराबाहेर जे काम करत होती त्याचाही अभिमान होता. तिला झोकून देऊन काम करताना पाहणे हा एक मोठा संस्कारच होता आमच्या मनांवर! आज आमच्या व्यक्तिमत्त्वात तिच्यातील जे चांगले गुण काही अंशांनी तरी आले असतील तर त्याचे मुख्य श्रेय ह्या कालखंडाला जाते, ज्या काळात ती खूप खूप बिझी होती!!! Happy

अरुंधती, आईचा अत्यंत प्रेरणादायी प्रवास आमच्यापुढे उलगडल्याबद्दल धन्यवाद. _/\_ ! Happy

थँक्स सर्वांचे! इतरांचे आपल्या आयांच्या 'बिझी'पणाचे अनुभव वाचायलाही आवडतील. वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या आयांच्या 'बिझी'पणाचा अनुभव, त्यांच्या कामाविषयीही वाचायला आवडेल.

अरुंधती, कित्ती छान लिहिलयस ग Happy मला तो सर्व काळ अाठवला. त्या संपात आम्हाला पण सामिल व्हायचे होते, पण आमचे विद्यापीठ वेगळे होते अन आमचे संख्याबळ नव्तेच काही. पणप्रश्न तेच होते. त्या मुळे खुप आत्मियता होती त्या लढ्याबद्दल. आईंना माझा नमस्कार . खरच बोलणे खुप सोपे असते पण प्रत्यक्ष लढणे खुप अवघड असते.