का म्हणू थांबेल कोणी? लोकही व्यापात होते!

Submitted by सतीश देवपूरकर on 12 May, 2012 - 11:17

गझल
का म्हणू थांबेल कोणी? लोकही व्यापात होते!
हात देणे, वा न देणे; ते तुझ्या हातात होते!!

या जगाला फक्त दिसले ताटवे माझ्या फुलांचे;
बोचणारे सर्व काटे माझिया हृदयात होते!

मोकळा तू, मोकळा मी, मोकळे मैदान आहे!
कोण आता जिंकतो; पाहू कुणाची मात होते!!

जिंकले श्रोत्यांस सा-या गायला बसताच त्याने;
काय त्याच्या नेमके पहिल्याच आलापात होते?

सावली होवून ज्याने साथही आजन्म केली,
कोण तो? मी कोण त्याचा; ते मला अज्ञात होते!

याच लाटांना विचारा....जन्मलो मी गात गाणे;
मी बुडालो त्या क्षणीही ओठ माझे गात होते!

काल हातोहात त्यांनी लाटली स्वप्नेच माझी;
कोण जाणे काय त्यांच्या लाघवी शब्दात होते?

फक्त आगीच्या धगीने काय धावाधाव झाली;
पेटले घरदार ज्यांचे तेच आरामात होते!

लाट होती वेंधळी अन् आंधळा होता किनारा;
ऐकमेकांच्या बिचारे सारखे शोधात होते!

ही घडी बसण्यास सारी जाळली मी जिंदगानी;
पापणी लवते न लवते; तोच वाताहात* होते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१
*टीप: “वाताहत” बरोबर व “वाताहात” ही बरोबर!

गुलमोहर: 

छान

लाट होती वेंधळी अन् आंधळा होता किनारा;
ऐकमेकांच्या बिचारे सारखे शोधात होते!

सुरेख शेर, आवडला !
'अज्ञात' आणि 'मोकळे मैदान' या शेरांतला विचार मस्त आहे.

'कुणाची मात' पेक्षा 'कुणावर मात' हा शब्दप्रयोग योग्य वाटतो, मला.
'वाताहात' शब्द माझ्यासाठी नवा आहे.

लाट होती वेंधळी अन् आंधळा होता किनारा;
ऐकमेकांच्या बिचारे सारखे शोधात होते!>>> अतिशय चांगला शेर!

मात आणि गात हेही शेर आवडले.

छान

जिंकले श्रोत्यांस सा-या गायला बसताच त्याने;
काय त्याच्या नेमके पहिल्याच आलापात होते?>>> वा, खयाल सुंदरच मांडलात सर! Happy

लाघवी शब्दांनी लाटली गेलेली स्वप्नेही फार सुंदर!!