अभयारण्ये:बिबटयांची, मोकाट कुत्र्यांची कि माणसांची?

Submitted by दामोदरसुत on 12 May, 2012 - 01:49

गावचे रस्ते म्हणजे जणु मोकाट कुत्र्यांची अभयारण्येच !

मोकाट/भटकी कुत्री , गावात शिरलेले बिबटे, आक्रसत जाणारी अभयारण्ये या समस्यांबद्दल आपण वारंवार वाचतो.
[भटक्या कुत्र्यांच्या] श्वानप्रेमींनी लोकांचा छळवाद मांडला आहे. त्यांच्या दबावामुळे महानगरपालिका मोकाट कुत्र्यांच्या नसबंदी आणि अँटी रेबीज लसीकरणासाठी लाखो रुपये खर्च करतात. प्रभातकाळी रस्तॊरस्ती श्वानकृपेने दिसणाऱ्या सुगंधी-सजावटी(?) आपल्याला परिचित आहेत. परवानाधारक श्वानप्रेमीही कुत्र्यांना फिरायला घेऊन जाण्याच्या नावाखाली आपली घरे स्वच्छ ठेवून या रस्त्यावरील सजावटींमध्ये भर घालीत असतात. भटक्या कुत्र्यांना मारा म्हटले की श्वानप्रेमींना अगदी उचंबळून येते. त्यांच्या मदतीला कुठलासा कायदाही आहे म्हणे! मध्यंतरी भटक्या कुत्र्यांसाठी श्वानगृहे काढावीत असे कोर्टाने सुचवल्याचे वाचले होते. कुत्र्यांनाही ते समजले असावे, कारण आपल्याला असे काही फायदे मिळू घातले आहेत म्हणून त्यानीही जास्तच जोमाने लोकसंख्या वाढवल्याचे रस्त्यावर जाणवते.
एकिकडे बिबट्याना उपलब्ध असलेले क्षेत्र आक्रसत चालल्याने त्यांच्या अन्नसमस्येवर मात करण्यासाठी तो गावात येतो असे तज्ञ सांगतात. आता कुत्र्यांसाठी श्वानगृहे काढायला जागा कुठून आणणार? उद्या भटकी गुरे, गाढवे, डुकरे आदींसाठी देखील आश्रयगृहांची तरतूद करावी लागेल. आपल्याला बिबट्या जगवायचा आहे, श्वानप्रेमींना सहृदतेने भटकी कुत्री जगवायची आहेत व आपल्यालाही सुखाने जगण्याची इच्छा आहेच ! सगळ्यांचीच संख्या वाढती आहे. उपलब्ध जमीन मात्र तेवढीच आहे. तीवर फक्त माणूस, कुत्री व बिबटेच नव्हेत तर त्याशिवाय हत्ती, वाघ, रानडुकरे, माळढोक अशा हजारो प्राण्यांचाही हक्क आहे. सा. सकाळमधील एका तज्ञाच्या लेखात बिबट्या हा प्राणी मनुष्यवस्तीच्या आसपासच राहाणे पसंत करतो आणि कुत्री, शेळी, डुकरे पसंत करतो असे म्हटले आहे. गावांतील घाणीमुळे मोकाट कुत्र्यांचे पीक भरघोस येते आणि जंगलात अन्नतुटवडा झाला कि बिबट्याची या कुत्र्यांवर नजर पडते आणी तो शहराकडे येतो ( जशी दुष्काळी भागातून माणसे पोट भरू शकेल अशा भागात जातात. ) दिवसेंदिवस हे वाढणार असल्याचे भाकीतही त्यांनी केले आहे.

मग हा प्रश्न सोडवायचा कसा?

यावर माझ्या खालील तोडग्यावर शासनाने विचार करावा.

आता साक्षात वाघाला द्यायला आपल्याकडे जागा नाही. वाघ, बिबटे, रानडुकरे, हरीण, हत्ती वगैरे प्राण्यांना दिलेल्या अभयारण्यात सहजीवन व्यतीत करायला आपण सांगतोच की!
तेव्हां भटक्या/मोकाट कुत्र्यांना आपली गावेच अभयारण्य म्हणून वापरू देऊन बिबट्यांना निमंत्रित करण्याऐवजी त्यांनाही बिबटे, वाघ, यांच्याबरोबरच सहजीवन व्यतित करायला पाठवायचे! एकाच अभयारण्यात भागवायला सांगायचे ! आता रस्त्यांवर वाघांचे पुनर्वसन करणे अशक्य ! तेव्हां भटक्या कुत्र्यांचेच हळुहळु जंगलात पुनर्वसन करण्याचा प्रयोग करायला काय हरकत आहे? सध्याचा कायदा कुत्री मारू देत नाही पण पुनर्वसन तर करू देईल? भटकी कुत्री पकडायची. श्वानप्रेमींना पुळका येईलच! त्यांना घरी पाळणार असतील तर परवाना काढायला लावून, कायदेशीर जबाबदारी घ्यायला लावायची. नुसता तोंडी पुळका नको. त्यांची तयारी नसेल तर भटकी कुत्री जंगलखात्याच्या मदतीने मोठ्या गर्द जंगलात सोडून द्यायची. तीही नव्या परिस्थितीतही जगण्याची धडपड करतीलच. भटक्या कुत्र्यांना जगण्याची एक संधि मिळेल व बिबट्यांनाही भक्ष्य मिळवायला शहरात यायला नको. ज्या कुत्र्यांची नसबंदी श्वानप्रेमींकडून अद्याप झालेली नाही अशाना जंगलात जाण्याचा अग्रहक्क द्यावा.
नागरिकांनी पालिकांना दिलेले कर शहरातील आवश्यक नागरी सुविधा उत्तम स्थितीत ठेवाव्यात यासाठी दिलेले असतांना पालिकांनी कुत्र्यांच्या नसबंदी आणि अँटी रेबीज लसीकरणासाठी खर्च काय म्हणून करावेत?

गुलमोहर: 

तेव्हां भटक्या कुत्र्यांचेच हळुहळु जंगलात पुनर्वसन करण्याचा प्रयोग करायला काय हरकत आहे? सध्याचा कायदा कुत्री मारू देत नाही पण पुनर्वसन तर करू देईल? भटकी कुत्री पकडायची. श्वानप्रेमींना पुळका येईलच! त्यांना घरी पाळणार असतील तर परवाना काढायला लावून, कायदेशीर जबाबदारी घ्यायला लावायची. नुसता तोंडी पुळका नको. त्यांची तयारी नसेल तर भटकीकुत्री जंगलखात्याच्या मदतीने मोठ्या गर्द जंगलात सोडून द्यायची. तीही नव्या परिस्थितीतही जगण्याची धडपड करतीलच. भटक्या कुत्र्यांना जगण्याची एक संधि मिळेल व बिबट्यांनाही भक्ष्य मिळवायला शहरात यायला नको. ज्या कुत्र्यांची नसबंदी श्वानप्रेमींकडून अद्याप झालेली नाही अशाना जंगलात जाण्याचा अग्रहक्क द्यावा.
नागरिकांनी पालिकांना दिलेले कर शहरातील आवश्यक नागरी सुविधा उत्तम स्थितीत ठेवाव्यात यासाठी दिलेले असतांना पालिकांनी कुत्र्यांच्या नसबंदी आणि अँटी रेबीज लसीकरणासाठी खर्च काय म्हणून करावेत? >> जंगलात कुत्री खाणार काय? त्यामुळे कुत्रेप्रेमी जंगल चलो अभियानाला विरोधच करणार. पुरेश्या अन्नाअभावी जंगल अधिवासात तो राहण्याची शक्यता कमी आहे.

कुकडी जवळच्या 'बिबप पालन केंद्राला' भेट देण्याची एक संधी मिळाली होती

बिबटे पिंजर्‍यात असूनही तो पिंजरा इतका बारीक तारांचा होता की आपल्यात आणि बिबट्यात दोन फुटांचे अंतर

जीवघेणे आविर्भाव करत ते अंगावर येतात

त्यांना तेथे ठेवण्याचे कारण असे सांगण्यात आले की त्यांना जंगलात खायला मिळत नाही

पण त्यांची शिकारीची सवय जाऊ नये म्हणून दर शुक्रवारी एक जिवंत कोंबडी एका एका बिबट्यासमोर फेकली जाते

तर किस्सा हा की एकदा एक बिबटा तिथून निसटला

तीन दिवस शोधाशोध झाली आणि त्याला 'फरार' घोषित करण्यात आले Lol

चौथ्या दिवशी पहाटे तो आपला 'बिबट पालन केंद्राबाहेर' निवांत बसलेला आढळला

मग पुन्हा पकडून त्याला कोंडण्यात आले

तात्पर्यः

(सर्व) स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्र केलेल्या या देशात नुसती माणसेच नव्हेत तर बिबटेही आळशी झालेले आहेत (दिवा)

जंगलात कुत्री खाणार काय?>>

कुत्री लहान कोंबड्या व ससे मारून खातात

(आता ते कुठे असतात जंगलात असा प्रश्न असल्यास मग कुत्री काय शहरात जन्माला आलीक्काय असे म्हणता येईल)

(अवांतर - हा वाहता धागा आहे का?)

(सर्व) स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्र केलेल्या या देशात नुसती माणसेच नव्हेत तर बिबटेही आळशी झालेले आहेत (दिवा)>>> लगाव बत्ती

ही कुत्री भुंकत पाठलागही करतात<<
खासकरुन मोटरसायकलवर जात असताना, सुचतच नाही की गाडी थांबवावी कि आणखी जोरात दामटावी!

इथे कुत्र्यांची नसबंदी करण्याऐवजी माणसांची आधी करायला हवी. कारण मानवी लोकसंख्या (खासकरुन भारतातील) आजकाल कुत्र्यां-मांजरांपेक्षा जास्त गतीने वाढतेय, आणि हीच सर्वात मोठी समस्या आहे. नाहीतर "जग चंद्रावर आणि पांडू डोंगरावर" अशी अवस्था काही दिवसात भारताबाबत दिसेल.

खासकरुन मोटरसायकलवर जात असताना, सुचतच नाही की गाडी थांबवावी कि आणखी जोरात दामटावी!
>>>

सुचत नाही हे खरे आहे, पण एकमेव उपाय म्हणजे गाडी तिथल्यातिथे थांबवणे

(त्यांना आदर दिला की ते भुंकणे बंद करतात हा गुणही मानव जमातीसारखाच) Wink

मग ते जंगलातच का रहात नसावेत..>> बिबटे त्यांना मारतात म्हणून

त्यावरच लेख असावा, की माणसे मारत नाहीत, बिबटे आनंदाने खातात

सुचत नाही हे खरे आहे, पण एकमेव उपाय म्हणजे गाडी तिथल्यातिथे थांबवणे>>>खेड्याकडे गावठी कुत्री असतात ,गाडी थांबवली तरी चावतात.

खेड्याकडे गावठी कुत्री असतात ,गाडी थांबवली तरी चावतात.
>>

ती गाडी थांबवली म्हणून चावत असावीत

खेड्यातील लोकांना कमी कष्टात जे जमते ते करायची सवय शहरीकरणामुळेच लागल्याचे हे निदर्शक आहे

ओह, या बिबट्यांबद्दल आहे का?
मला वाटले ज्यांनी पळशीकरांच्या कार्यालयावर हल्ला केला त्यांच्याबद्दल आहे.

बेफिकिर जी
आपण लिहिलेला बिबप पालन केंद्राबद्दल चा अनुभव विस्मयकारक आणि माहितीपूर्ण होता. चर्चेत भाग घेण्याबद्दल धन्यवाद!

थोडे अवांतरः
मायबोलीवर 'दिवा', ' गटग', 'रच्याकने ' असले शब्द वारंवार वापरलेले दिसतात त्यांचा अर्थ अजून तरी मला कळला नाही. तुम्हाला माहीत असल्यास कृपया सांगावा.

."मॉडेल कॉलनीत डुकरांनी माडला उच्छाद!" आजची बातमी.
आता काय करायचे? कांही लोक डुक्कर खातात. माणसे कुत्र्यांना खातात असे कधी ऐकले नाही.
शिवाय खेडेगावात स्वच्छता राखायला ती मदत करतात असे ऐकले आहे. त्यामुळे डुक्कर प्रेमी लोकांनी त्यांना मारायला बंदी करणारा कांही कायदा करण्यापूर्वी डुकरांना पकडून त्यांची विक्री करून टाकावी. नाहीतर त्यांच्यासाठीही डुक्करगृहे काढावी लागतील.

.

औरंगाबादला असताना असाच लग्न कार्यक्रम आटपुन रात्री मोटारसायकलवर निघालो, एका गल्लीतुन कुत्री भुंकत अंगावर आली मग एक एक करुन जे १५ ते २९ कुत्री मागे लागली दोन्ही टांगावर हानत गाडी डामटली तरी कुत्री पिच्छा सोडेना वळन आले की गाडी हळू करणे भागच होते मग मोकाट रस्त्यावर मोकाट कुत्र्यांनी मला मोकाट सोडले. :प

."मॉडेल कॉलनीत डुकरांनी माडला उच्छाद!" आजची बातमी.
आता काय करायचे? कांही लोक डुक्कर खातात. माणसे कुत्र्यांना खातात असे कधी ऐकले नाही.
शिवाय खेडेगावात स्वच्छता राखायला ती मदत करतात असे ऐकले आहे. त्यामुळे डुक्कर प्रेमी लोकांनी त्यांना मारायला बंदी करणारा कांही कायदा करण्यापूर्वी डुकरांना पकडून त्यांची विक्री करून टाकावी. नाहीतर त्यांच्यासाठीही डुक्करगृहे काढावी लागतील.>> आम्ही ऐकले नाहीच पाहीले